प्रेरकसंपादकीयसामाजिक

शिक्षक’ भावी पिढीचा शिल्पकार…

संपादकीय……..✍️

‘शिक्षक’ भावी पिढीचा शिल्पकार…

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 5/9/2023 :
शिक्षक हा समाज परिवर्तन करणारा घटक आहे. भविष्यातले विचारवंत, कलाकार, लेखक, तत्त्वज्ञ, पुढारी, डॉक्टर, प्राध्यापक, इंजिनीयर, शास्त्रज्ञ तयार करण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये असते. ज्या प्रमाणे मातीच्या गोळ्याला कुंभार आकार देऊन त्यापासून एखादी प्रतिकृती तयार करत असतो, अगदी त्याचप्रमाणे शिक्षक बालकांच्या कोर्‍या मनावर योग्य संस्कार करून त्यातून भविष्यातील जबाबदार नागरिक घडवित असतात. आपल्या आई-वडीलांनंतर शिक्षक हे आपले अप्रत्यक्षरित्या पालकच असतात.
शिक्षक हे आपल्याला केवळ पुस्तकी ज्ञान शिकवित नाहीत तर आपण त्यांच्याकडून जगण्याची कला आत्मसात करत असतो.
आपल्या व्यक्तीमत्त्वावर त्यांच्याकडून संस्कार, संस्कृती, परंपरा, चालीरिती व आदर असे पैलू पाडले जात असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी‍ आपल्या गुरूंचा नेहमी आदरपूर्वक सन्मान केला पाहिजे. त्यांच्याविषयी शिक्षक दिनी कृतज्ञता व्यक्त करून त्याचे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
शिक्षक दिन अर्थात चिंतनाचा दिन
समाज व शिक्षक यांचे नाते अतूट आहे. तसेच ते अमूल्यही आहे. भारतीय तत्त्वज्ञानातील परंपरेमध्ये समाजऋण फेडण्यासाठीचाही उल्लेख आढळतो. शिक्षक म्हणजे समाज घडविणारा सर्जनशील घटक. राष्ट्राची ध्येय-धोरणे बळकट करण्यासाठी व देशाला अधिक बलशाली बनवण्यासाठी जी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणे आखली जातात त्याची रूजवणं करणारा, ती मूल्ये वृध्दिंगत होण्यासाठी संस्कार करणारा महत्त्वाचा घटक म्हणजे शिक्षक. राष्ट्रउभारणीत शिक्षण व शिक्षकांना महत्त्वाचे स्थान आहे. अशावेळी एखाद्या राष्ट्राच्या जडणघडणीत शिक्षक हा महत्त्वाचा मानला जातो. समाजातील अनेक पिढय़ा त्यांच्या हाताखालून जात असतात. या पिढय़ांना माणूस म्हणून घडवताना राष्ट्रीय चारित्र्यही घडणे अभिप्रेत असते. महात्मा गांधीजींना शिक्षणांची व्याख्या करताना हेच अभिप्रेत होते व ते कालातीतही आहे.
शिक्षकांनी, शिक्षक हा पेशा न मानता ते व्रत समजावे व घेतला वसा टाकू नये, ऊतू नये, मातू तर अजिबात नये. कालौघात शिक्षणक्षेत्रातील आवाहने व शिक्षकांविषयीच्या संकल्पना बदलत आहेत. गुरू, गुरुजी, मास्तर, बाई, सर, ताई आणि आता मॅडम अशी बिरूदे शिक्षकांसाठी पुढे आली आहेत. शिक्षक व विद्यार्थी यातील अंतर कमी झाले आहे. शिक्षकांविषयीची आदरुक्त भीती आता अभावानेच आढळते. गुरुंविषयीचा अभिमान, आदर असणारी ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्वेही तशीच कमीच होत आहेत. शिक्षकांची जागा तंत्रज्ञानाने घेतली आहे. गुरुची कामं आता यंत्र करत आहे. शाळा, महाविद्यालय ही संकल्पना भविष्यात लयालाही जाईल. ऑनलाइन शिक्षण व ऑनलाइन पदवीही मिळेल. या सगळ्या गदारोळात माणसाच्या सामाजिकीकरण प्रक्रिया मात्र होणार नाही. सहवेदना, सहकार्य, सहानुभूती, त्याग, सोसणे या मानवी भावभावनांचे विकसीकरण कदाचित होणार नाही. सवंगडय़ा सोबत, एका विशिष्टवेळी, विशिष्ट इमारतीत प्रत्यक्ष प्रसंग घडत असताना, प्रत्यक्ष जीवनानुभवातून आपण जे अनुकरणाने, अवलोकनाने, अनुभवातून शिकतो त्याचे काय? हा प्रश्न बाकी असेल. यादृष्टीने विचार करता, मानवाने यंत्रे निर्माण केली. विकसित केली. हीच यंत्रे माणसाची जागा घेत आहेत. पण शिक्षण क्षेत्रात ई-लर्निगची साधने हा शिक्षकांसाठीचा पर्याय होऊ शकत नाही. संस्कार, प्रेम, शिस्त, सृजनांचे रूजवण करण्याचे काम यंत्रे करू शकत नाहीत. हेच खरे.
आज एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करताना पारंपरिक शिक्षण व आधुनिक शिक्षण असे दोन प्रवाह दिसतात. जीवन कौशल्यावर आधारित किमान कौशल्ये प्राप्त करून देणारे शिक्षण हे भविष्यात उपोगी पडणारे आहे. कुशल मनुष्यबळ हीच आपली आपल्या राष्ट्राची खरी संपत्ती असणार आहे. अगदी आधुनिक पद्धतीच्या शेतीपासून ते अवकाश शास्त्रापर्यंतच तंत्रज्ञानाचा शिक्षणात अंतर्भाव करून राष्ट्राला घडवणारी, राष्ट्राला स्वतंत्र वेगळी ओळख प्राप्त करून देणारी पिढी निर्माण करण्याचे मोठे आव्हान मात्र आपल्या पुढे आहे. शिक्षणाने प्रगती होते, समाज विकसित होतो, देश प्रगत होतो हे खरे; पण आपण मिळवलेले ज्ञान, कौशल्ये हे आपल्या ‘स्व’ सुखापुरते मर्यादित न ठेवता. समाजाभिमुख व्हावे आपण कार्य करतो. समाजासाठी लढतो, उभे राहतो, समाजाला योगदानाच्या रूपात काही देऊ शकतो तेव्हाच हे शक्य आहे व हीच मानसिकता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याचे अवघड काम मात्र शिक्षकांना करायचे आहे. धर्म, प्रांत, जात, देश या मर्यादा ओलांडून गेल्याशिवाय ग्लोबलाझेशनच्या खर्‍या अर्थापर्यंत आपण पोहोचू शकणार नाही. म्हणून सर्व थरातील शिक्षणाला व शिक्षकांना आज महत्त्व आहे. माझ्यामधले ‘दि बेस्ट’ देण्याची तळमळ असणारे शिक्षकच हाडाचे शिक्षक ठरतात. समाजभिमुखी पिढी घडवताना विद्यार्थ्यांमध्ये ग्रासलेल्या प्लसची जाणीव, सामर्थ्याची ओळख करून देण्याचे काम होणे आवश्यक आहे. तेव्हाच आपल्याला अभिप्रेत असलेला शिक्षणातून सर्वागिण विकास घडणार आहे. ‘शिक्षक दिन’ म्हणूनच सगळ्यांसाठी चिंतनाचा दिन ठरावा.
मी देशासाठी काय करू शकतो. देशाला काय देऊ शकतो, माझ्या जन्माची सार्थकता कशात आहे, ते इप्सित साध्य करण्याच्या दृष्टीने एक शिक्षक म्हणून आपण कार्यरत असावे. आज काळ बदलला आहे. शिक्षण क्षेत्रातील आव्हाने वाढली आहेत. शिक्षणतज्ज्ञांइतकेच या शिक्षण प्रक्रियेत पालकांनाही महत्त्व आले आहे. समाजाची गरज, विद्यार्थी घडवणे, पालकांची अपेक्षा, आपल्या व्यवसायाची पवित्रता जपणे, प्रतिमा जपणे या सगळ्याचा मेळ घालताना आपले ज्ञानही अद्यावत ठेवणे गरजेचे आहे. या सगळ्याचे संतुलन साधत ह्या व्रताची अवघड वाटचाल करावायची आहे. शिक्षक दिनानिमित्त सर्व गुरुजनांना हार्दिक शुभेच्छा…!

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.