तुझ्या स्वरुपी सदा आनंद !

- तुझ्या स्वरुपी सदा आनंद !
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 22/11/2025 : देवाने आपल्याला निर्माण केले आणि त्याने सर्वकाही दिले. त्या देवाचा आपल्याला आनंद वाटायला हवा. परमेश्वराचे स्वरुपच आनंद आहे कारण आनंद हा कशावरही अवलंबून नसतो. तो स्वयंभू असतो आणि प्रत्येकाच्या अंतरंगात असतो. संत आणि योगी या आनंदात मग्न असतात. आनंद प्रत्येकाचे आत असतो तो शोधण्यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही. खरी भक्ती आणि शुद्ध श्रद्धा यातून आनंद मिळतो. देवाबाहेर आपल्याला मिळणारा एकमेव आनंद तात्पुरता असतो.
तुझ्या स्वरुपी सदा आनंद |
अनुभवती संत स्वच्छंद ||धृ.||
परमेश्वराच्या किंवा आत्म्याच्या स्वरुपात नेहमीच आनंद असतो आणि संत, ज्ञानी व्यक्ती मुक्तपणे स्वच्छंद अनुभव घेतात. त्यांना बाह्य जगाच्या बंधनाची पर्वा नसते. ते स्वतःच्या आनंदात मग्न असतात. हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा विचार आत्मिक शा़ंतीवर जोर देते. संत त्या आनंदात स्वतःला पूर्णपणे झोकून देतात. स्वच्छंद म्हणजे कोणत्याही बंधनाशिवाय आनंदाने जगणे. त्यांना जगाच्या मोहापासून काहीही फरक पडत नाही. उदाः- आपण अवकाशातून प्रवास करतो तेव्हा आपले मन आश्चर्याने थक्क होते व आनंदाने उचंबळून येत तसेच आपले मन ईश्वर नामात मग्न झाले पाहिजे.
गोविंद म्हणा गोविंद |
सगळेची धरा हा छंद ||
तोडोनी भेद भव व्दंद |
अविस्मरणी कोंदला नाद ||1||
गोविंद (ईश्वराचे नाम) हेच नाम सतत म्हणण्याचा छंद, आवड मनाला लागली पाहिजे आणि हाच विचार सर्वत्र पसरला पाहिजे. भक्ती आणि ईश्वराच्या ध्यानात पूर्णपणे लीन व्हावे. जेव्हा मनाला गोविंद गोविंद म्हणण्याचाक छंद लागतो तेव्हा मन पूर्णपणे रमून जाते. यामुळे देव आणि भक्त यांच्यातील भेद नाहिसा होतो. शरीरही गोविंदमय होते. ज्याला ज्या वस्तूचे ध्यान लागते तसे त्याचे मन होते. गोविंदाचे नामाचा छंद मनाला लागला तर देह पण गोविंद स्वरुपमय होतो. त्या अगोदर दुसऱ्या विषयीचे मतभेद, वैर संपवून पुन्हा एकता, सलोख्याने राहिले पाहिजे. भव म्हणजे जीवन मृत्यूच्या चक्रातून सुटका होण्याकरिता ईश्वर नामच हा भवसागर पार करु शकेल. तसेच देवामध्ये लीन होणे किंवा भक्तीच्या अवस्थेला भव म्हणतात. व्दंद-भेद आणि मायेचे बंधन तोडून मनाला परमात्म्याचे नामाचा ध्वनी अंत:आत्म्यात कोंडल्या गेला पाहिजे. ईश्वर नामाचे ध्वनीत पूर्णपणे हरवून जाणे, त्याची आवड लागावी. अविस्मरण म्हणजे ईश्वराची आठवण सतत करावी, त्याला विसरु नये.
विषयाची वासना गेली |
मोह माया भावना मेली ||
ब्रम्हानंदी टाळी वाजली |
आता उरला एक गोविंद ||2||
विषयाची वासना गेली म्हणजे ऐहिकक सुखाची, वासनांची आणि लौकिक आकर्षणाची ओढ संपून त्यातून मिळणारा आनंद क्षुल्लक वाटू लागणे. सर्व जगाच्या मोहातून सुटका होऊन एक प्रकारची अनासक्ती आणि आध्यात्मिक शांतता अनुभवणे. जिथे भौतिक गोष्टी किंवा वासनांचा प्रभाव मनावर राहत नाही. मोह म्हणजे अवास्तव प्रेम किंवा आसक्ती. माया म्हणजे हे जग एक भ्रम आहे अशी जाणीव. या मोहातून निर्माण होणाऱ्या भावना मेल्या म्हणजे त्यातून पूर्णपणे मुक्त होणे. माया आणि मोह हे ईश्वरापासून दूर नेणारे घटक मानले जाते. व्यक्तीला सुखापेक्षा, वासनेपेक्षा, सांसारिक आकर्षणापेक्षा परमार्थात किंवा आत्मिक शांतीमध्ये अधिक आनंद दिसू लागतो, हे एक आध्यात्मिक उन्नतीचे लक्षण आहे. जेथे मनाला खरी शांती आणि समाधान प्राप्त होते.
ब्रम्हानंदी टाळी वाजली म्हणजे परमानंद प्राप्त झाला. आत्म्याची परमात्म्याशी भेट झाली किंवा मन पूर्णपणे ईश्वरी नामात मग्न झाले. ही एक आध्यात्मिक अवस्था आहे. ब्रम्हानंदी टाळी लागणे म्हणजेच हा आनंद इतका गहन असतो की, देहाची शुद्ध हरपते. परमेश्वराच्या प्रेमात पूर्णपणे बुडून जाणे. जिथे सांसारिक भावना आणि दुःख नाहिसे होतात आणि जीवन सार्थक होते. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. “देवाचिया व्दारी उभा क्षणभरी | तेणे मुक्ती चारी साधियेल्या ||” मुक्ती चार प्रकारच्या आहेत. 1) समिपता:- देवाचे सानिध्य प्राप्त होणे. ही मुक्ती पुण्याईने मिळते. 2) सलोकता:- ही मुक्ती तपामुळे मिळते. 3) स्वरुपता:- देवाचे रुप प्राप्त होणे. ही मुक्ती ध्यानामुळे मिळते. 4) सायुज्यता:- ब्रम्हरुप होणे, मोक्ष मिळणे. ही मुक्ती ज्ञानाने प्राप्त होते. ह्या चारही मुक्ती साधल्या त्याचीच ब्रम्हानंदी टाळी लागली असे अध्यात्मात म्हटले आहे. ब्रम्हानंदी टाळी लागल्यावर गोविंदा शिवाय दुसरे काहीही उरत नाही. साधकाला आत्मज्ञान प्राप्त होऊन परमात्म्याशी तो जोडला जातो. सर्व सांसारिक मोह, माया, भेदभाव आणि चिंता संपून फक्त गोविंदाचे भान राहते, तेव्हा आत्मसाक्षात्काराची अवस्था प्राप्त होते.
नयनातूनी वाहती धारा |
गहिवरला कंठ हा सारा ||
रोमांच उठोनी शरीरा |
तुकड्या म्हणे सुखस्वानंद ||3||
भगवंताच्या प्रेमामुळे नयनातून अश्रू वाहायला लागतात. हे आनंदाश्रू वाहू लागणे म्हणजे खरा परमोच्च आनंद आणि भक्तीचा मार्ग आहे. अत्यंत भावनिक झाल्यामुळे रडू येते आणि घसा दाटून येते. भावनांचा बांध फुटून अश्रू वाहू लागते. शरीरात रोमांच उठणे म्हणजे उर्जेचा प्रवाह, चैतन्याचा अनुभव किंवा आध्यात्मिक जागृती दर्शवते. शरीरात आनंदाची लहरे उठतात. तेव्हा सुख आणि स्वानंदाचा अनुभव प्राप्त होतो. स्वानंद केवळ तात्पुरता आनंद नसून स्वतःच्या आतून अनुभवलेली शाश्वत आणि सखोल आनंदाची भावना आहे. खरा स्वानंद जो दुसऱ्यांना आनंद देतो आणि इतरांना आनंदी पाहून आपल्याला आनंद मिळतो. सुखस्वानंद स्वतःच्या ठिकाणी असतो तो स्वतःच्या आतून येतो. तो कधीही बाहेरच्या गोष्टीवर अवलंबून नसतो.

पुरुषोत्तम बैस्कार, मोझरकर
श्रीगुरुदेव प्रचारक यवतमाळ
फोन- 9970404180