ताज्या घडामोडीप्रेरकमहाराष्ट्रसामाजिक

कोकणातील सहकाराचा महापुरुष, “सुभाषराव चव्हाण”…. नाबाद ७७

कोकणातील सहकाराचा महापुरुष, “सुभाषराव चव्हाण”…. नाबाद ७७

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras District Solapur Maharashtra State, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 05/09/2023 :
११ वर्षांपूर्वीची गोष्ट. यशवंतराव चव्हाणसाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षांत (१२ मार्च २०१२ ते १२ मार्च २०१३) महाराष्ट्रात १०० व्याख्याने देण्याचा मी संकल्प केला होता. अणि ११६ व्याख्याने झाली. त्यातील २४ व्या व्याख्यानाला ‘दैनिक सागर’चे प्रख्यात संपादक, माजी आमदार नाना जोशी यांनी मला चिपळूणला व्याख्यानासाठी बोलावले आणि ते व्याख्यान नानांनी प्रचंड गर्दीने यशस्वी केले. त्या यशस्वी व्याख्यानाचे सगळे श्रेय नानांचे. पत्रकार म्हणून आणि माणूस म्हणून नाना खूपच मोठे. व्याख्यानानंतर नानांनी मला सहज म्हटले की, ‘सहकारातील एका मोठ्या माणसाची ओळख करून देतो…’ आणि नाना मला चिपळूण नागरी पतपेढीत घेवून गेले. संस्थेचे प्रमुख सुभाषराव चव्हाण यांच्या कार्यालयात पाऊल ठेवले आणि मी थक्क झालो. ते बसले होते त्या खूर्चीवर यशवंतराव चव्हाण यांचा फोटो पाहून ‘सुभाषराव चव्हाण हे व्यक्तिमत्त्व नेमके काय आहे’ हे एका क्षणात कळले. नानांनी सहकारातील त्यांचे काम नंतर सांगितलेच… मग गेल्या ११ वर्षांत सुभाषरावांशी आणि त्यांच्या संस्थेशी, मी सभासद नसतानाही त्याच्या पलिकडचे नाते तयार झाले. फार मोठा माणूस… संस्थाही मोठी… पण सामान्य माणसांबद्दचे प्रेम आणि सहकाराची निष्ठा त्याहून मोठी. ७ सप्टेंबरला त्यांचा ७६ वा वाढदिवस. त्यानिमित्ताने जे आठवले तेवढे….


देशात सहकाराचे महत्त्व ज्या राज्यांना प्रथम कळले, त्यात गुजरात आणि महाराष्ट्र ही दोन राज्ये आघाडीवर आहेत. त्यातही पश्चिम महारष्ट्र सहकारात अधिक यशस्वी झाला. कार्यकर्त्यांची मोठी टीम तिथं तयार झाली. मराठवाड्यावर निजामाचे शासन होते. त्यामुळे मराठवाडा मागे पडला. कोकणामध्ये अनेक मोठे नेते झाले. पण, त्यांनी सहकाराची शक्ती ओळखली नाही. राजकारणात दोन वेळा मुख्यमंत्रीपद मिळवलेले नेतही कोकणात सहकार रुजवण्याचे काम करण्यात फारसे यशस्वी झाले नाहीत. त्याकरिता एक वेगळा माणूस पुढे आला. त्या माणसाचे नाव आहे, सुभाषराव चव्हाण. हा सहकारातील नेता राजकारणी नाही. यशवंतराव चव्हाण हे त्यांचे आदर्श आहेत. पण, सहकारात राजकारण न आणता, सहकार सामान्य माणसाला किती शक्ती देवू शकते. याचे सगळ्यात मोठे उदाहरण कोकणातील चिपळूण येथे सुभाषराव चव्हाण यांनी स्थापन केलेल्या ‘चिपळूण नागरी सहकारी पतपेढी’ने उभ्या महाराष्ट्राला दाखवून दिले आहे.
सुभाषराव चव्हाण हे व्यक्तिमत्त्व म्हणजे सहकारातील हा महापुरूष आहे. सहकाराशिवाय त्यांच्या डोक्यात दुसरा विषय नाही. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत रत्नागिरी शाखेत ते व्यवस्थापक होते. १९९२ साली ५८ व्या वर्षी निवृत्तीनंतर एखादा अधिकारी पेन्शन घेवून घरी बसला असता… पण, सामान्य माणसाचे भलं करण्याची ताकद सहकारात आहे, हे ओळखलेल्या सुभाषरावांनी गेली जवळपास २० वर्षे… सकाळी १० ते रात्री १० असे १२ तास ‘पतपेढी आणि सामान्य माणूस’ याकरिता आयुष्य पणाला लावले आहे.
निवृत्त झाल्याच्या दिवसापासून सलग १९ वर्षे हे व्यक्तिमत्त्व सकाळी १० वाजता पतपेढीमध्ये दिसणार… आणि बघता-बघता संस्थेच्या ४८ शाखा त्यांनी उभ्या केल्या. चिपळूणच्या वाशिष्ठी नदीवरून निघालेली पतसंस्थेची ही दिंडी पश्चिम महाराष्ट्रातील पंचगंगेला वळसा घालून यशवंतराव चव्हाण साहेबांच्या कराड गावापर्यंत पोहोचली. पश्चिम महाराष्ट्रात ७ शाखा उभ्या राहिल्या. आज महाराष्ट्रात या सहकारी पतसंस्थेच्या ५० शाखा उभारणारा हा एकमेव सहकारातील नेता आहे. हे काम करत असताना त्यांच्या संचालक मंडळात सर्वपक्षीय विचारांचे नेते आहेत. पण, त्या प्रत्येकाचे ‘राजकारण’ आणि ‘राजकीय पक्ष’ पतसंस्थेच्या इमारतीच्या बाहेर आहे…. चिपळूण नागरी पतसंस्थेत पाय ठेवल्यापासून इमारतीच्या बाहेर पडेपर्यंत, या प्रत्येक संचालकाचा एकमेव विचार म्हणजे, ‘सहकारी पतसंस्थेतून सामान्य माणसाला कसे मोठे करता येईल…’ काही संस्थांत शिरलेले राजकारण सहकारी संस्थेला बिघडवून टाकते. या संस्थेने राजकारणाला थारा न दिल्यामुळे आज ही संस्था महाराष्ट्रातील नामवंत आणि दिग्गज पतसंस्था झाली. यामागे सुभाषराव चव्हाण आणि त्यांची सगळी टीम… मग उपाध्यक्ष सुर्यकांत खेतले असतील… अशोक साबळे असतील… संचालक मंडळातील अशोक कदम, गुलाब सुर्वे, सत्यवान म्हामुनकर, सोमा गुडेकर, मनोहर मोहिते, राजेश बाझे, रवींद्र भोसले, प्रमोद साळवी, प्रकाश पत्की, निलिमा जगताप असे सगळे संचालक अगदी राजेंद्र पटवर्धन यांच्यापर्यंत सगळ्यांनी एक दिलाने… एक जीवाने ही संस्था उभी केली. त्यामुळे या संस्थेचे गेल्या २० वर्षांत १ लक्ष ३७ हजार, ३२९ एवढे सभासद झाले आहेत. ५० शाखा झाल्या आहेत.. ६५ कोटी ६६ लाख एवढे भाग-भांडवल झाले. संस्थेचा स्वत:चा निधी १३३,२७,३७,४१८ इतका झाला. संस्थेने सामान्य सभासदांना वाटलेली कर्जे ८५५,४०,८१,१३० कोटी एवढी आहेत. संस्थेचा निव्वळ नफा १९,१७,७३, २०५ रुपये एवढा आहे. संस्थेचा कायमचा ‘अ’ वर्ग ऑडिट वर्ग आहे. हा झाला आकड्यांचा तपशील…
संस्थेच्या दोन इमारती दिमाखात उभ्या आहेत. कोकणातील अनेक नेत्यांना सहकारी संस्थांचे जाळे मोठ्या प्रमाणात उभे करता आले नाही.

मी कोकणातीलच आहे. ही टीका नव्हे…. आत्मचिंतन आहे… पश्चिम महाराष्ट्रात गेल्या १२० वर्षांत सहकार फोफावला. कारण तेथील कार्यकर्त्यांना याचे भान आहे की, ‘जे सरकार करू शकत नाही… ते सहकार करू शकते… ’ कोकणात आंबा, काजू, फणस रुजतो… फोफावतो… पण, सहकार काही फार रुजला नाही. पण, सुभाषराव चव्हाण यांनी १९९३ साली स्थापन केलेल्या चिपळूण नागरी पतसंस्थेचे रूपांतर एका प्रचंड वटवृक्षात झाले. त्या वटवृक्षाच्या ५० फांद्या झाल्या… चिपळूणचे नाव पंचगंगेच्या पलिकडे गेले. सुभाषराव यांचा आदर्श यशवंतराव चव्हाण आहेत. यशवंतराव चव्हाण सांगायचे… ‘मुख्य जेवणात सहकार महत्त्वाचा. लोणचे, पापड म्हणजेच सरकार… आणि मुख्य जेवण सहकार…. सहकार इतकाच सर्वत्र रूजायला हवा. ’
सुभाषरावांचा सहकारातील अभ्यास मोठा आहे. त्यांचे निदान असे आहे की, सहकार ही संकल्पना सध्या डळमळीत होत चालली आहे. अशावेळी सहकारी कार्यकर्त्यांनी कमकूवत वर्गाला आर्थिक ताकद देवून उभे केले पाहिजे. कायद्याने सावकारी मोडून काढली. पण, अजूनही सावकारी पाशातून ग्रामीण महाराष्ट्रातील कष्टकऱ्याची सुटका झालेली नाही. त्यामुळे जो ‘गरजू’ आहे त्याला विनाविलंब कर्ज पुरवठा करणे, हे सगळ्यात महत्त्वाचे आहे. सहकाराचे तत्त्वच असे आहे की, आधी दुसऱ्याचा विचार करा… शिवाय सुभाषरावांचा सहकारातील दृष्टीकोन वेगळ्या स्वरूपाचा आहे. शेतीच्या कर्जाबरोबरच ‘बिगर शेती कर्ज’ व्यवस्थेची सक्षम व्यवस्था होणे गरजेचे आहे. त्यासाठी या संस्थेची स्थापना केल्याचे सुभाषरावांचे काम महत्त्वाचे आहे. त्यांनी कर्ज दिलेल्या हजारो लोकांमधील अनेक तरुण असे आहेत की, ते आज ‘कुठून-कुठे’ गेले आहेत. असे स्वत:च्या पायावर उभे राहिलेले अनेक कर्जदार, ५० शांखांच्या कर्जातून स्वत:च्या पायावर उभे राहिलेले आहेत.
सुभाषरावांची हीच भूमिका आहे की, त्यांची भावना अशी आहे की, ‘कर्जवाटप करत नाही. आम्ही आपुलकीचे वाटप करतो.’ ज्याला कर्ज हवे आहे त्याच्यावर मेहरबानी म्हणून कर्ज देत नाही…त्याला आत्मविश्वासही देतो. कर्ज घेताना त्याच्यावर जबाबदारी टाकतो. कर्ज परतफेडीचे महत्त्वही सांगतो. त्यामुळे आमचा कर्जदार हा कर्जदार नाही. तो कुटुंबातील सदस्य आहे. एक लाख पेक्षा सभासद असलेला प्रत्येक माणूस हा आमच्या कुटुंबातील झालेला आहे.’
सुभाषरावांनी अनेक प्रयोग केले. ५० पर्यंत शाखा स्थापन करताना त्या-त्या भागात जाऊन सहकारी पतसंस्थांचे महत्त्व पटवून दिले. कर्ज हवे असलेल्यांचे मेळावे घेतले. त्यांचे म्हणणे असे आहे की, ‘जर सहकारावर स्वत:ची निष्ठा असेल तर कर्ज बुडवण्याची मानसिकता कधीच निर्माण होत नाही.’ हा विश्वास निर्माण करणे एकातून दुसरा… या पद्धतीने सहकारातून ही साखळी निर्माण करायची असते. पश्चिम महाराष्ट्रात सहकार यशस्वी होऊ शकतो तर कोकणात का होणार नाही….? प्रयत्न प्रामाणिक असतील आणि सहकारावर निष्ठा असेल… तर कोकणातही सहकार रूजू शकतो आणि फोफावू शकतो, हे चिपळूण नागरी पतसंस्थेने दाखवून दिले आहे. त्यामुळेच या संस्थेचा रौप्य महोत्सवही जोरदापणे साजरा केला. आता २५ वर्षांनंतर पुढचा प्रवास सुरू झाला आहे. पुढच्या पिढीने जबाबदारी स्वीकारली आहे. टीमवर्क उत्तम आहे… त्या विश्वासाच्या जोरावर संस्था पुढे चालत आहे. ही सुभाषरावांची भावना सहकाराची शक्ती आहे.
एक मुद्दा याठिकाणी मुद्दाम सांगितला पाहिजे… सहकारी संस्था आणि राष्ट्रीयकृत बँका यांच्यामध्ये मोठा फरक आहे. राष्ट्रीयकृत बँकांचे कर्ज घेवून करोडो रुपये बुडवलेले अनेक उद्योगपती आहेत. पण, प्रसारमाध्यमांमध्ये या विरोधात वातावरण तयार केले जात नाही. सहकाराला पाठिंबा देण्याची भूमिका घेण्याएवजी सहकाराच्या विरोधात वातावर तयार करण्याची एक मोठी लॉबी निर्माण झालेली आहे. त्यामुळे सहकाराचे शत्रूही वाढलेले आहेत. प्रसिद्धी माध्यमांनी सहकाराला अनुकूल वातावरण तयार केले पाहिजे. पण, चित्र उलटे आहे. सामान्य माणसांना मदत करणाऱ्या या संस्था बदनाम करण्याचा प्रयत्न जास्त होतो. सहकार जेवढा दुबळा होईल, तेवढा सामान्य समाज दुबळा होईल. ही भावना लक्षात घेतली तर सहकाराचे महत्त्व आर्थिकदृष्ट्या समजून येवू शकेल…. सहकार हा वटवृक्ष आहे. त्याच्या पारंब्या ग्रामीण भागात सर्वत्र पसरल्या तर स्वत:च्या पायावर उभा राहणारा नागरिक आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होईल. हे सहकाराचे तत्त्व आहे. मग तो मुंबई, पुणे या शहरांकडे रोजगारासाठी धाव घेणार नाही. पश्चिम महाराष्ट्रात सहकाराने २५ लाख लोकांना रोजगार दिलेला आहे. सुभाषराव चव्हाण यांच्यासारख्या सहकारातील नेत्यांनी कोकणात हे वातावरण तयार केले. बचतीची सवय लावली. मोठ्या बँका या १००-२०० रुपयांची ठेव स्वीकारणार नाहीत… तातडीने कर्जे देवू शकणार नाहीत… सुभाषरावांची पतसंस्था १००-२०० रुपये जवळ असलेल्या सामान्य माणसांना आर्थिक आधार देणारी आहे. आणि म्हणून २५-२६ वर्षांत या संस्थेचा वटवृक्ष झालेला आहे. याचे सगळे श्रेय त्यांची संस्था… त्यांचे संचालक मंडळ, त्या संचालक मंडळाच्या मेहनती

कार्यकारी संचालक सौ. सपना प्रशांत यादव आणि त्यांची टीम, या सगळ्यांना दिले पाहिजे. सहकारातील एक आदर्श संस्था म्हणून आज चिपळूण नागरी संस्थेचे नाव सहकारातील सगळे अधिकारी, राजकीय, सामाजिक नेते आदराने उल्लेख करीत आहेत. चिपळूण नागरी संस्थेच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमाला स्वत: शरद पवार, त्यावेळचे सहकार मंत्री सुभाष देशमुख, माजी मुख्यमंत्री नारायण राणे असे सर्व राजकीय नेते उपस्थित होते आणि सर्वांनी या संस्थेच्या कामाला मनापासून शुभेच्छा दिल्या. व्यवहारासाठी लागणारा पैसा ही पतसंस्था देतेच… पण, जगण्यासाठी लागणारी ध्येयेसुद्धा या पतसंस्थेतून सामान्य माणसाला मिळू शकतात, याचा आदर्श म्हणजे ही संस्था आहे.
या संस्थेच्या कामात प्रसिद्धीपासून दूर राहून काम करणारे सगळे संचालक आणि पदाधिकारी… मूळचे पश्चिम महाराष्ट्रातील असलेले चव्हाणसाहेबांचे जावई, प्रशांत यादव यांनी खुल्या मनाने मान्य केलेले आहे की, कोकणात सहकार रुजवणे हे कठीण काम चव्हाणसाहेबांनी करून दाखवले आणि ‘ही संस्था माझी आहे… ’ हा विश्वास त्यांनी निर्माण केला आहे. हेच त्यांचे यश आहे. सुभाषराव चव्हाण यांच्या ७७ व्या वाढदिवसानिमित्त त्यांना मन:पूर्वक शुभेच्छा. त्यांच्या संस्थेने आणि त्यांनी शताब्दी पूर्ण करावी आणि महारष्ट्रात यापतसंस्थेचा डंका वाजत रहावा, याच शुभेच्छा!


मधुकर भावे
9892033458

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button