प्रेरकलेखसामाजिक

रूषीतुल्य तत्तचिंतक – “सर्वपल्ली राधाकृष्णन”

रूषीतुल्य तत्तचिंतक – “सर्वपल्ली राधाकृष्णन”

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 05/09/2023 : सर्वपल्ली राधाकृष्णन या माणसाचे राजकीय सामर्थ्य शून्य होते. संघटना, मुत्सद्देगिरी, डावपेच यात त्यांना रस नव्हता. पण त्यांचे नैतिक वजनच एव्हढे मोठे होते कि त्या सामर्थ्यासमोर नतमस्तक होण्यात आपला गौरव झाला असे प्रत्येकाला वाटे.
सर्वपल्ली राधाकृष्णन कोणत्याही राजकीय पक्षाशी संबधित नव्हते. सत्याग्रह, तुरूंग या बाबी त्यांच्या जीवनात नव्हत्या. महात्मा गांधींशी संबध होते पण ते राष्ट्रनेत्याशी सामान्य नागरिकाचे असावेत असेच. राजकिय क्षेत्रात कोणाशिही घनिष्ठ व व्यक्तीगत संबंध नव्हते पण जगभर त्यांची तत्वज्ञ म्हणून प्रसिध्दी होती.
स्वातंत्र काळात संविधान सभेत येण्यापुर्वी त्यांनी प्राचार्य, कुलगुरू हि पदे कौशल्याने भुषविली. पंडित नेहरू व सरदार पटेल यांचे फार थोड्यावेळी एकमत होई त्यापैकी एक ठिकाण म्हणजे राधाकृष्णन. या माणसाचा देशासाठी उपयोग करून घ्यावा त्या दोघांनाही वाटत होते त्यामुळेच त्यांना रशियाचे राजदूत म्हणून पाठविण़्यात आले. पुढे १० वर्ष उपराष्ट्रपती व १९६२ साली राष्ट्रपति झाले.
राधाकृष्णन यांचा स्वभाव रूजू होता पण स्पष्टवक्तेपणामुळे संकेेत पाळले जातीलच असे वागणे त्यांच्याकडून कधीच झाले नाही. जन्मभर ते तत्वज्ञासारखेच वागले. कारकिर्दित कितीतरी राजकिय संकेत त्यांच्याकडून डावलले गेले. पण जरी संकेत मोडले गेले तरी बहुधा सत्यच त्यांच्या तोंडून बाहेर पडलेले आहे. याबाबतचे अनेक प्रंसग सांगता येतात.
रशियाच्या काळात स्टॅलिनने एकदा भेटिला बोलाविले स्टॅलिन सहजासहजी कोणास भेटत नव्हते पण या विख्यात तत्वज्ञास सहजपणे बोलाविले. औपचारीक गप्पा झाल्यानंतर स्टॅलिन म्हणाले डॉक्टर आपण रशियात आहातच रशियन जनतेने जी महान संस्कृति उभारली आहे तिही पाहून घ्या नव्या भारताच्या उभारणीस उपयुक्त होईल. त्यावर राधाकृष्णन म्हणाले महाराज आकाशातून आपण पाखरासारखे उडू शकता, समुद्रात माश्यासारखे खोल वावरू शकता पण पृथ्वीवर माणसांप्रमाणे वागायला शिकलात का ? तत्वज्ञाने, हुकूमशाहाच्या तोंडावर त्याच्या हुकुमशहीचा निषेधाचा फटका मारला होता. स्टॅलिनने निमुटपणे सहन केला.
प्रसिध्द लेखक लुई फिशर यांनी झेकोस्लोव्हाकियातील किस्सा सांगीतला आहे कि तिथल्या संसदेसमोर व्याख्यानात राधाकृष्णन यांनी तिथल्याच हुकुमशाही व्यवस्थेवर सडतोडपणे मत व्यक्त केलेले होते. हा वृत्तांत झेक व्यवस्थेने वगळला असला तरी निमुटपणे राधाकृष्णन यांचे व्याख्यान ऐकून घ्यावे लागले होते.
असाच एक प्रसंग १९६५ साली भारत पाक युध्दावेळी अमेरिकन दौरयावर गेले असताना अमेरिकेचा पाठिंबा पाकिस्तानला होता. त्यावेळी पाऊस पडत होता. अमेरिकेन अध्यक्ष छत्री घेवून विमानतळावर आले त्यांनी भारताच्या राष्ट्रपतींचे स्वागतच केले म्हणाले महोदय निसर्गावर आमचा ताबा नाही त्यावर राधाकृष्णन म्हणाले निसर्गावर आपला ताबा नाही हे खरे पण आपल्या भावना व बोलणे यावर तर आपण ताबा ठेवू शकतो तेव्हढे केलेत तरी पुरे आहे.
अशा अनेक कथा प्रसंगांतून त्यांचे तत्वचिंतक प्रांजळ मनच प्रकट होत असे. भारतीय संस्कृतित जे काही मधूर, मंगल आहे त्याचा वारसा लाभलेले हे व्यक्तीमत्व होतं.
राधाकृष्णन तत्वज्ञ कि शिक्षक यावादापेक्षा एक गोष्ट आपण मान्य केली पाहिजे कि, तत्वज्ञ शिक्षक असतोच पण शिक्षक तत्वज्ञ असेलच अशी खात्री देता येत नाही. तत्वज्ञ हा अगोदर स्वताचा शिक्षक असतो नंतर दुसरयाचा तसे राधाकृष्णन होते.
राधाकृष्णन यांच्या बाबतीत एक महत्वाची गोष्ट सांगितली पाहिजे कि भारतातल्या ज्या दोन परंपरा आहेत, एक पंरपरा प्राचीन भारताकडे अतिव प्रेमाने, ममतेने, गौरवाने पाहते. जगात आपण सर्वाोच्च आहे. किरकोळ बदल केले तर भविष्यकाळही उज्वल व मार्गदर्शक आहे असे गोडवे गाणारी आहे. दुसरी पंरपरा नव्या जगाचा आस्थेने विचार करणारी व भारताच्या भुतकाळात गौरव करण्यासारखे काही नाही असे मानणारी आहे. या दोन्ही पंरपराकडे राधाकृष्णन यांनी तत्वज्ञाच्या भुमिकेतून पाहिले आहे. ते म्हणतात कि जगातील इतर देशांना वारसा आहे तसा वारसा आपल्यालाही आहे. यामध्ये वरयाच वाईट चालीरिती कर्मकांड यासारख्या गोष्टीही आहेत ते सगळेच आपण संभाळनार आहोत काय. ? आणि दुसरया पंरपरेचा मुद्दा मांडताना ते म्हणतात तुम्ही ज्याला नवे जग म्हणता त्यातही दोष आहेत त्या म्हणजे नव्या व्यथा व नव्या जाणिवा आणि सगळेच नवे आहे म्हणून आपण ते स्विकारणार आहोत का ? म्हणूनच चिकित्सा आणि निती यांची पूर्ण संगति साधणारा नवा माणूस कसा निर्माण करता येईल हा खरा प्रश्न आहे. आणि हा माणूस निर्माण करण्यासाठी शिक्षण असावे लागते.
शिक्षकाची भुमिका मांडताना हे सांगणे आवश्यक आहे कि काही शिक्षक हे केवळ वर्गातल्याच विद्यार्थ्यांचे शिक्षक असतात. समाजात त्यांचीच संख्या अधीक असते. यापुढे जावून काही शिक्षक मात्र आपल्या बरोबरीच्या आणि अनेक भावि पिढ्याचेंही शिक्षक असतात. हे शिक्षकपण किंवा गुरूपण त्यांच्यातील खोल तत्वनिष्ठ तत्वचिंतक व्यक्तीमत्वामुळे निर्माण होत असते राधाकृष्णन हे असे दुसरया गटातील थोर आचार्य होते. त्यांच्या रूषीतुल्य तत्तचिंतक तपस्वी व्यक्तीमत्वामुळे शिक्षक हे पद भुषणावह ठरलेले आहे. समाजात सामान्यच समजल्या गेलेल्या पदाला त्यांच्या अंगिभुत ज्ञाननिष्ठेमुळे, ज्ञानोपासनेमुळे, व ज्ञानदानामुळे प्रतिष्ठा मिळाली आहे हे नाकारून चालणार नाही.
शिक्षक दिनाच्या मनःपुर्वक शुभेच्छा

…डॉ विश्वनाथ आवड …

संदर्भ :
१. निवडक नरहर कुरूंदकर व्यक्तीवेध खंड १ पान नंबर ७४ ते ८१

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.