सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त अकलूज पोलीस ठाणे यांच्या वतीने एकता दौड संपन्न

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त अकलूज पोलीस ठाणे यांच्या वतीने एकता दौड संपन्न
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 02/11/2025 :
भारताचे लोहपुरुष आणि देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून अकलूज पोलीस ठाणे च्या वतीने ‘रन फॉर युनिटी , एकता दौडचे भव्य आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत ही मिनी मॅरेथॉन रॅली अकलूज शहरातून उत्साहात पार पडली.सकाळी ठीक ७ वाजल्यापासून या एकता दौडचा प्रारंभ विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल, अकलूज येथून झाला.
या रॅलीमध्ये सहभागी झालेले नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या उत्साहात धावले. क्रीडा संकुलातून निघालेली ही दौड महर्षी चौक, सदुभाऊ चौक, प्रतापसिंह चौक मार्गे अकलूज पोलीस स्टेशन येथे येऊन पोहोचली आणि तिची सांगता 8वाजता झाली.
‘रन फॉर युनिटी’ मिनी मॅरेथॉन रॅलीमध्ये शालेय विद्यार्थी, डॉक्टर असोसिएशन, व्यापारी असोसिएशन, मेडिकल असोसिएशन, किराणा असोसिएशनच्या सर्व संघटनांचे पदाधिकारी, पत्रकार, शिक्षक, नोकरदार वर्ग, नगरपंचायत अधिकारी व कर्मचारी, पोलीस पाटील, पैलवान आणि व्यायाम प्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन राष्ट्रीय एकात्मतेच्या या उपक्रमाला पाठिंबा दिला.
या महत्त्वपूर्ण रॅलीचे यशस्वी आयोजन अकलूजचे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके आणि अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
यातून देशाची एकात्मता,सुरक्षिततेचा व जनजागृतीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे असे वाळके यांनी सांगितले.
उपस्थितांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याला अभिवादन करत ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’चा संदेश दिला.

