ताज्या घडामोडी

विश्वातल्या बापाची महती उलगडून दाखविणारी कलाकृती- “काव्य नभातील बाप”

मुखपृष्ठ परीक्षण……2.
—————————–
विश्वातल्या बापाची महती उलगडून दाखविणारी कलाकृती- “काव्य नभातील बाप”

  • अकलूज दिनांक 15/07/2024 :

दि. १६ जून २०२४ रोजी प्रकाशित झालेल्या “काव्य नभातील बाप” या कलाकृतीचे मुखपृष्ठ नुकतेच पाहण्यात आले.

विविध कवींच्या कवितेतील बाप समजून घेतांना पत्रकार, लेखक, समीक्षक भगवान राईतकर (गोभणीकर) यांनी साहित्यातून विशेषतः कवितेतून ‘बाप ‘ कसा साकारला आहे, हे जाणून घेतले आहे . आईची महती गाणारे सर्वच भेटतील पण, आसवांनी उपरणे ओले करणारा बाप कुणालाच दिसत नाही. हा बाप समजून घ्यायचा असेल तर, त्यासाठी बापाची भूमिका अंगीकारावी लागते. केवळ लग्न झाले, मुले झाले… म्हणजे ‘बाप’ होत नसतो, त्यासाठी काय खस्ता खाव्या लागतात ? तो बापच जाणून असतो. मुलांचे संगोपन, त्यांना संस्कारक्षम बनवणे, समाजात स्वतःची ओळख निर्माण करणे, मुलांना एक चांगले सुसंस्कारीत बनवणे, हे बापाचे कर्तव्य असते.
“काव्य नभातील बाप” यात भगवान राईतकर (गोभणीकर) यांनी केवळ ‘बाप ‘ या विषयावरील कविता संकलन करून त्या कवितेतील बाप उलगडून दाखवत असलेल्या कलाकृतीचे मुखपृष्ठ माझ्या पाहण्यात आले. अत्यंत साधेपणाने केलेले हे मुखपृष्ठ खूप काही अर्थ सांगणारे दिसून आले. या मुखपृष्ठावर एक बाप पहाटे आपल्या मुलाचा हात हातात धरून क्षितिजाच्या दिशेने जात असल्याचे दाखविले आहे… समोर उगवत्या सूर्याचे अर्धाकृती दर्शन होत आहे… आभाळात इंद्र्धून आकाराचा अंधुकसा अंधार दिसत आहे… बाजूला आकाशात पाच पक्षी उडताना दाखविले आहेत … आणि सर्वात वर अक्षरशिल्प प्रकाशन नावाची तयार केलेली प्रतिमा दिसत आहे. शीर्षकात काव्य नभातील हे शब्द आणि त्याखाली ‘बाप’ लिहिले आहे, असे मुखपृष्ठ पाहण्यात आले. या मुखपृष्ठाचे निरीक्षण करत असतांना खूप काही अर्थ यात दडलेले दिसून आलेत. आपण या मुखपृष्ठाचा अभ्यास करणार आहोत.
“काव्य नभातील बाप” या मुखपृष्ठाने मनाच्या गाभाऱ्यात बापाच्या आठवणी क्षणात जाग्या करून दिल्या. असाच प्रत्येकाचा बाप असतो, जो हाताला धरून चालायला शिकवतो. या मुखपृष्ठावर एक बाप पहाटे आपल्या मुलाचा हात हातात धरून क्षितिजाच्या दिशेने जात असल्याचे दाखवले आहे याचा अर्थ असा आहे की, एक बाप आपल्या मुलाला हे क्षितीज तुला गाठायचे आहे.. जर, तू पहाटे उठून चालायला लागला तर, तुला हे क्षितीज सहज काबीज करता येईल. पहाटेचा अर्थ असा आहे की, जर कामात तत्परता ठेवली, जबाबदारीने, वेळेला जे काम करायचे आहे ते , त्याच वेळी करायला सुरुवात केली म्हणजे काम मागे पडत नाही… आणि दुसऱ्या कामाला वेळ मिळतो. क्षितिजाच्या दिशेने प्रवास करणे म्हणजे आव्हानात्मक जबाबदारी स्वीकारणे आणि ते तत्परतेने पार पाडणे, हा गर्भित अर्थ मला यातून दिसून आला आहे… आणि प्रत्येक बाप आपल्या मुलाला असाच क्षितिजाच्या दिशेने प्रवास करायला मार्गदर्शन करत असतो.
“काव्य नभातील बाप” या मुखपृष्ठावर अर्धाकृती सूर्य डोकावला आहे, असे दाखवले आहे, याचा अर्थ असा आहे की, हाती आलेले कार्य मध्येच सोडून नका, ज्याप्रमाणे सूर्य हळूहळू क्षितिजाच्या वर येतो. तसे,
आपले कार्य हळूहळू पूर्ण होणार आहे. त्यांची तीव्रता फक्त कमी करू नका. ती सूर्यासारखी वाढणार आहे… आणि आभाळात इंद्र्धून आकाराचा अंधुकसा अंधार दिसत आहे ते तुमच्या समोरील संकटे आहेत. हे संकट दूर करायचे असेल तर, सूर्याच्या तेजासारखे आपले कार्य असायला हवे, हा मोलाचा संदेश आतून दिला आहे.
“काव्य नभातील बाप” या मुखपृष्ठावर पाच पक्षी आकाशात उडतांना दाखवले आहेत, याचा अर्थ असा की, माणसाने आपल्यातील पंचेंद्रियाच्या सहाय्याने आपल्या अंगातील “पाच” अवगुण बाहेर फेकले पाहिजे. पंचेंद्रिये कान, नाक, डोळे, त्वचा, आणि मुख आतून असा संदेश जातो की, कानाने जे ऐकले त्यातील जे वाईट , ते सोडून द्यायचे, नाकाने जो सुगंध घेतला तो मनात साठवून ठेवायचा, डोळ्यांनी जी सृष्टी पाहिली तिचे रक्षण करायचे, त्वचाने जो अलवार स्पर्श अनुभवला तो हळूवार जपायचा… आणि मुखातून जे शब्द बाहेर पडतील ते, मोजून – मापून बोलायचे, हा अर्थ मला यातून जाणवला. तसेच या पंचेन्द्रीयाने आपल्यातील पाच तमोगुण म्हणजेच राग, लोभ, मोह, माया, मत्सर या गोष्टी मनातून काढून जीवन जगलो तर, आपण या पाच पक्षांसारखे मुक्त विहार करू शकतो… आनंदी जीवन जगू शकतो …आणि हा संदेश प्रत्येक बाप आपल्या मुलांना देत असतो, हा गर्भित अर्थ मला या पाच उडणाऱ्या पक्षातून दिसून आला.
“काव्य नभातील बाप” या शीर्षकातील बाप हा शब्द स्वतंत्र घेतला आहे, याचा अर्थ असा आहे की, हा ‘बाप’ अजून कुणालाच कळला नाही, त्यांची व्याप्ती फार मोठी आहे, बाप एक स्वतंत्र विद्यापीठ आहे. आईची महती खूप कवींनी, साहित्यिकांनी लिहिली.पण, बापावर जास्त लिहले गेले नाही.’ काव्य नभातील बाप’ या कलाकृतीमुळे बापाचे महत्व अधोरेखित झाले आहे. जसे विजेच्या तारांमध्ये वीज आहे पण, दिसत नाही. तसे बाप हा आपल्यात असतो पण, तो दिसत नाही, तो स्वतंत्र आहे.
“काव्य नभातील बाप” या कलाकृतीच्या सर्वात वरच्या बाजूला अक्षरशिल्प प्रकाशनाचे बोधचिन्ह दाखवले आहे, या चिन्हात पेन दाखवला आहे. याचा अर्थ असा आहे की, जो बाप आपल्या मुलाला क्षितिजाकडे घेऊन जात आहे. ते क्षितीज ज्ञानाने परिपूर्ण आहे. त्यासाठी मुलाने हातात लेखनी घेऊन अक्षरशिल्प कोरले पाहिजे. विज्ञानवादी शिक्षण घेऊन आव्हानांचे क्षितीज गाठता आले पाहिजे. आपण कोरलेल्या अक्षरशिल्पाचा प्रकाश सर्वदूर पोहचला पाहिजे. आपल्या अक्षरशिल्पाचे स्थान जगात सर्वात उंच राहिले पाहिजे. म्हणून हे बोधचिन्ह सर्वात वर दाखवले आहे.

“काव्य नभातील बाप” या कलाकृतीच्या प्रकाशनच्या निमित्ताने अक्षरशिल्प प्रकाशन संस्थेने जागतिक पितृदिनाचे औचित्य साधून अत्यंत भावनिक तितकाच जवळीकता असलेल्या ‘ बाप’ विषयावरील साहित्य कलाकृतीला प्रकाशात आणले आहे. या अर्थपूर्ण मुखपृष्ठाला अक्षरशिल्पच्या शाळेत सजवले असून प्रत्येक जातीधर्मातील ‘बाप’ या निमित्ताने लेखक भगवान राईतकर (गोभणीकर) यांना धन्यवाद देईल. ज्यांच्यामुळे समस्त विश्वातला बाप कळाला… आणि या कलाकृतीला वाचक स्वीकारतील , वाचकांच्या पसंतीस ही कलाकृती उतरेल यात शंकाच नाही . एक संदर्भग्रंथ म्हणून या कलाकृतीला वाचक संग्रही ठेवतील . पत्रकार,समीक्षक व लेखक भगवान राईतकर (गोभणीकर) यांना पुढील साहित्य कलाकृती निर्मितीसाठी खूप – खूप शुभेच्छा.


मुखपृष्ठ परीक्षकप्रशांत वाघ (पॅसिफिक टायगर)
संपर्क- ७७७३९२५००० (तीन सत्ते एकोणचाळीस पंचवीस हजार)

कलाकृतीचा परिचय
कलाकृतीचे नावकाव्य नभातील ‘बाप’
साहित्य प्रकारसमीक्षणात्मक लेखन
लेखक- भगवान राईतकर (गोभणीकर), हिवरा आश्रम ता.मेहकर
संपर्क – +91 97303 32151

प्रकाशकअक्षरशिल्प प्रकाशन
मुखपृष्ठव्ही.एन. राऊत, अक्षरशिल्प प्रकाशन
किंमत – रु. १५०/-

मुखपृष्ठ परीक्षण……
—————————–
आज पर्यंत अनेक वेळा पुस्तक परीक्षण प्रसिद्ध केली आहेत. त्यामध्ये ग्रंथ, कथा संग्रह, कविता संग्रह, कादंबरी, ललित लेखन इत्यादी अनेक साहित्य प्रकारातील पुस्तकांचा समावेश होता.
तथापी पुस्तकावरील मुखपृष्ठाचे परीक्षण प्रसिद्ध करण्याचा प्रथमयोग मुखपृष्ठ परीक्षक प्रशांत वाघ (पॅसिफिक टायगर) यांनी केलेल्या लेखक तानाजी धरणे लिखित विविध 10 पेक्षा अधिक पुरस्कार प्राप्त ‘हेलपाटा’ कादंबरीच्या मुखपृष्ठ परीक्षणाने लाभला. त्यानंतर लेखक भगवान राईतकर (गोभणीकर) लिखित ‘काव्य नभातील बाप’ या समीक्षणात्मक लेखन साहित्य प्रकारातील पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे परीक्षण प्रसिद्ध करण्याचा द्वितीय योग जुळून आला. यापुढेही मुखपृष्ठ परीक्षण मालिका साप्ताहिक अकलूज वैभव, पाक्षिक वृत्त एकसत्ता या प्रिंट मीडियाच्या आणि aklujvaibhav.in (अकलूज वैभव डॉट इन) या डिजिटल मीडियाच्या माध्यमातून सुरू राहील. पुस्तकाचे लेखक, मुखपृष्ठ परीक्षक आणि मीडिया संपादक यांचे संपर्क नंबर ज्या त्या प्रसिद्धीकरणांमध्ये उपलब्ध असेलच. मुखपृष्ठ परीक्षणा बाबत वाचकांच्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत आम्ही आहोत.
“वाचकांची प्रतिक्रिया हीच आमची प्रेरणा आणि ऊर्जा”!!!
धन्यवाद!
भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे
संस्थापक संपादक
अकलूज 413101.
मोबा. नं. 98 60 95 97 64.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.