करनुर येथे एकाच आठवड्यात एकाच कळपावर दुसऱ्यांदा हल्ला… वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ९ बकऱ्यांचा मृत्यू

करनुर येथे एकाच आठवड्यात एकाच कळपावर दुसऱ्यांदा हल्ला…
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ९ बकऱ्यांचा मृत्यू
करनुर ता. कागल येथील घटना
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 07/12/2025 :
कागल :- लांडगासदृष्य वन्यप्राण्यानी एकाच कळपावर दुसऱ्यांदा शुक्रवारी हल्ला केल्याने ९ बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अगोदर याच कळपावर बुधवारी रात्रीही हल्ला करून ३ बकरी ठार २ जखमी व ४ बेपत्ता आहेत. एकाच आठवड्यात सलग वन्यप्राण्यानी हल्ला केल्याने मेंढपाळाचे ४ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की म्हाळु आण्णाप्पा धनगर , राहणार करनुर ता. कागल यांच्या मेंढरांचा कळप दोन-तीन दिवसापासून खतासाठी धनगर कोड, येथील आवबा आण्णाप्पा धनगर यांच्या शेतात खतासाठी बसायला असताना बुधवारी (दि.३) ६ ते ७ वा. लांडगासदृष्य प्राण्यांनी तळावर जाळीत ठेवलेल्या मेंढरांच्या कोकरांवर हल्ला चढवला या हल्ल्यात ३ ठार २ गंभीर जखमी तर ४ कोकरे बेपत्ता झाली. या घटनेचा रितसर पंचनामा ही करण्यात आला होता. हि घटना ताजी असतानाच म्हाळू धनगर यांच्या कळपावर शुक्रवारी दि. ५ रोजी रात्री पुन्हा वन्यप्राण्यांनी त्यांच्याच कळपावर हल्ला करून ९ बकऱ्यांना ठार मारले आहे. वन्यप्राण्यांनी एकाच कळपावर एकाच आठवड्यात सलग दुसऱ्यांदा हल्ला केल्याने मेंढपाळांच्यात घबराहट निर्माण झाली आहे. या घटनेने करनुर कागल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची माहिती मेंढपाळ म्हाळू व यशवंत क्रांती चे कागल तालुका अध्यक्ष आनंदा धनगर यांचे कडून यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांना मिळताच त्यांनी वनरक्षक सागर पांढरे यांना कळविली. शनिवारी सकाळी घटनास्थळी वनपाल आप्पासो बुरटे, वनरक्षक सागर पांढरे यांनी उपस्थित राहून घटनेचा पंचनामा केला. पशुसंवर्धन अधिकारी डॉ. बोंगार्डे यांनी मृत बकऱ्याचे शवविच्छेदन केले
यावेळी यशवंत क्रांती संघटनेचे कागल तालुका अध्यक्ष आऩदा धनगर, तानाजी धनगर,करसिध्द येडके, यशवंत क्रांती च्या करनुर शाखेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते

