ताज्या घडामोडी

दाजीसाहेब…. काकीसाहेब….

दाजीसाहेब…. काकीसाहेब….

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64

🔰 संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 11/07/2024 :

आपल्या कर्तबगार माता-पित्याचा स्मृतिदिन एकाच तारखेला यावा… हा नियतिचा खेळ किती विलक्षण आहे… महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्राच्या राजकारणातील एक चारित्र्य संपन्न आणि उच्च विद्याविभूषित नेते पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांचे पिताश्री दाजीसाहेब (आनंदराव चव्हाण) आणि मातोश्री काकीसाहेब (प्रेमलाकाकी चव्हाण) यांचा स्मृतिदिन ८ जुलै या एकाच तारखेला आहे. आनंदराव चव्हाण यांचा ५१ वा स्मृतिदिन जसा सोमवार, दिनांक ८ जुलै राेजी आहे त्याचप्रमाणे प्रेमलाकाकींचा २१ वा स्मृतिदिन त्याच दिवशी आहे. देशाच्या राजकारणात ज्या दाम्प्ात्यांनी अत्यंत चरित्र्यसंपन्न, सुसंस्कृत राजकारण केले त्यामध्ये हे दाम्पत्य महाराष्ट्रात आदरणीय दाम्पत्य म्हणून मानले जाते. आनंदराव चव्हाण आजच्या नवीन पिढीला फारसे माहिती नाहीत. पण पाटण तालुक्यातील कुंभारगावात जन्मलेल्या शेतकरी कुटुंबातील या तरुणाने त्या काळात ‘एम ए.’ आणि ‘एल. एल. एम.’ अशा उच्च पदव्यांनी विभूषित होऊन केवळ व्यक्तिगत वकीली व्यवसाय न करता, सामाजाची वकीली केली. पाटण तालुक्यातील एल. एल.एम. झालेले आनंदराव हे पश्चिम महाराष्ट्रातील पहिले एल. एल. एम.
रयत शिक्षण संस्थेचे त्यावेळचे उपाध्यक्ष बंडो गणेश मुकादमतात्या एवढे खूष झाले की, त्यांनी त्यांच्या कराडमधील कसूर गावात गावकऱ्यांसह त्या काळात ५१ बैलगाड्या जुंपून आनंदरावांची ‘गौरव मिरवणूक’ निघाल्याची नोंद आहे.
१९४१ साली सातारा जिल्हा लोकल बोर्डाची अध्यक्षपदाची निवडणूकही आनंदरावांनी लढवली. पण त्यावेळचे काँग्रेसचे उमेदवार बाळासाहेब देसाई यांच्या विरोधात अवघ्या २ मतांनी आनंदराव पराभूत झाले.
आनंदराव हे निष्णात वकील म्हणून होतेच, परंतु त्याही पेक्षा त्या काळातील शेतकरी-कामगार पक्षाच्या स्थापनेमध्येही एक महत्त्वाचे सदस्य होते. केशवराव जेधे, शंकरराव मोरे, भाऊसाहेब राऊत, तुळशीदास जाधव, तरुण यशवंतराव मोहिते अशा त्या वेळच्या नामवंत डाव्या विचारांच्या नेत्यांनी शेतकरी-कामगार पक्षाची स्थापना केली. त्यात क्रांतिसिंह नाना पाटील, र. के. खाडीलकर, जी. डी. लाड (बापू), नागनाथ आण्णा नायकवडी, कोल्हापूरचे दाजीबा देसाई आणि कराडचे भाई केशवराव पवार या मोठ्या नावामध्ये आनंदराव चव्हाण हेही एक नाव आहे. (हेच केशवराव पवार १९५७ साली यशवंतराव चव्हाण यांच्याविरुद्ध कराड मतदारसंघात विधानसभेसाठी उभे राहिले होते.) १९५२ च्या विधानसभा निवडणुकीत आनंदराव चव्हाण यांनी बाळासाहेब देसाई यांच्याविरुद्ध पाटण मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि अवघ्या १९ मतांनी ते पराभूत झाले होते.
शे. का. पक्षाच्या दाभाडीच्या प्रख्यात प्रबंधात आनंदरावांचे वैचारिक योगदान आहे. आज त्याला ७५ वर्षे होऊन गेली. त्या काळात या नेत्यांनी स्वातंत्र्यानंतर ‘शेतीला उद्योगाचा दर्जा का दिला जात नाही,’ जर उद्योगपतीला त्याच्या उद्योगाच्या उत्पादनाची किंमत ठरवण्याचा अधिकार आहे तर…. शेती उत्पादकाला त्याच्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार का नाही? उत्पादनासाठी होणारा खर्च आणि त्याला मिळणारे त्याचे मोल, याचा मेळ का बसत नाही? ‘कसेल त्याची जमीन’ हा कायदा का होत नाही? हे ७५ वर्षांपूर्वी शेतीचे मुलभूत प्रश्न उपस्थित केले गेले होते. त्यात ‘कसेल त्याची जमीन’ हा कायदा झाला. पण, उत्पादन खर्चावर आधारीत शेतीमालाचा भाव अजून ठरत नाही. शेतीला ‘उद्योग’ मानले जात नाही. त्या काळात ज्या नेते मंडळींनी शेतकऱ्यांची बाजू घेवून हे विषय हाताळले त्यात जेधे-मोरे या जोडीच्या बरोबर आनंदराव चव्हाण होत होते.
१९५७ साली संयुक्त महाराष्ट्र समितीच्या तिकीटावर शे.का.पक्षाचे उमेदवार म्हणून ते कराड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. पुढे संयुक्त महाराष्ट्र निर्माण होत असताना आनंदराव काँग्रेसमध्ये गेले. १९५७, १९६२, १९६७, १९७१ अशी एकूण लोकसभेतील त्यांची कारकिर्द १७ वर्षांची आहे. ८ जुलै १९७३ साली अवघ्या ५६ व्या वर्षी त्यांचे दु:खद निधन झाले. ५६ हे वय काही जाण्याचे नाही. पण, नियतिच्या हातात ज्या गोष्टी आहेत, त्या कोणाला थांबवता येत नाहीत. पंडीत नेहरू यांच्या मंत्रिमंडळात १९६२ साली आनंदराव चव्हाण यांचा संरक्षण उपमंत्री म्हणून समावेश झाला. आणि योगायोग काय असतो पहा… १९६२ च्या आॅक्टोबर महिन्यात चिनी आक्रमणानंतर पंडित नेहरू यांनी संरक्षण मंत्री म्हणून आमंत्रित केले ते कराडच्या यशवंतराव चव्हाण यांनाच. नेहरूंच्या सोबत संरक्षण उपमंत्री आणि संरक्षणमंत्री असे दोन्हीही संरक्षण खाते सांभाळणारे दाेन्ही चव्हाणच होते आणि दोघेही कराडचेच होते. दोन्ही मराठी नेते हाेते.
१९६९ साली इंदिरा गांधी यांनी काँग्रेसमधील प्रतिगाम्यांच्या विरुद्ध उघड आव्हान दिले. आणि इंदिरा काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यावेळी महाराष्ट्रातून ज्या पाच खासदारांनी इंदिरा गांधी यांना पाठींबा दिला त्यात आनंदराव चव्हाण हे प्रामुख्याने त्यांच्या सोबत होते. आनंदराव यांच्या दु:खद निधनानंतर त्यांचा ताेच वारसा त्यांच्या पत्नी प्रेमलाकाकींनी ठामपणे चालवला. इंदिरा गांधी यांच्या पाठीमागे महाराष्ट्रातून प्रेमलाकाकी निर्धाराने उभ्या राहिल्या. त्यानंतर झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत कराड लोकसभा मतदारंसघातून काकी लोकसभेवरही निवडून आल्या. १९७३ ते १९९१ या काळात लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही सभागृहाच्या त्या सदस्य हाेत्या. महराष्ट्रात इंदिरा काँग्रेसची स्थापना करणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील त्या प्रमुख होत्या. महाराष्ट्र काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणूनही त्यांनी प्रभावी काम केले. इंदिरा गांधी १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत जेव्हा पराभूत झाल्या त्यावेळी पहिल्याप्रथम प्रेमलाकाकींनी त्यांना सांगितले की, ‘मी खासदार पद सोडते…. कराडमधून तुम्हाला निवडून आणू’ आपले खासदार पद इंिदराजींसाठी सोडण्याकरिता महाराष्ट्रातून सर्वप्रथम काकी पुढे आल्या. पण, त्याचवेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री देवराज अर्स यांनी ‘चिकमंगळूर’ लोकसभा मतदारसंघातून इंदिराजींच्या विजयाची सर्व तयारी केली होती. त्याच मतदारसंघातून त्या पुन्हा विजयी होऊन लोकसभेत गेल्या. त्यांच्या प्रचाराला काकीही गेल्या होत्या. त्या निवडणुकीतील एक गंमत काकी सांगायच्या… ‘इंदिराजींच्या विरोधात जनता पक्ष होता… त्या जनता पक्षाच्या उमेदवाराने इंदिरा गांधी उभ्या रािहल्यावर असे प्रचाराचे पोस्टर लावले की, आणीबाणी आणलेली एक नागीण चिकमंगळूरमध्ये आली आहे… त्यांनतर नाग-नागीणीची चित्रे मतदारसंघात झळकली. पण, त्या मतदारसंघातील आणि विभागातील लोक नाग आणि नागिणीला देवता मानतात.. त्यामुळे या इंदिरा विरोधातील नाग-नागणीच्या पोस्टरने उलटाच परिणाम झाला. आणि ७० हजार मतांनी इंिदरा गांधी विजयी झाल्या.
काकींचा एक विशेष आहे… मृत्युपूर्वी काकींनी आपले सुपूत्र पृथ्वीराज चव्हाण यांना स्पष्टपणे सांगितले होते की, ‘कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता काँग्रेस पक्ष सोडायचा नाही… एवढेच नव्हे तर निवडणूकीला उभा राहिलास तर, काँग्रस पक्षाकडून एकही पैसा न घेता निवडणूक लढवायची…’
सुदैवाने


पृथ्वीराज बाबा त्याच सल्ल्याने आयुष्यभर चालले. ते स्वत: अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातून काॅम्पूटर सायन्स या विषयातील ‘मास्टर अॅाफ सायन्स’ (एम. एस.) असे उच्च विद्याविभूषित आहेत. महाराष्ट्रातील राजकारणात अशा उच्च विद्याविभूषितांची संख्या फार कमी आहे. बाबा त्यातीलच आहेत. नांदेडचे कमल किशोर कदम पवईच्या आय.आय.टीमधून एम. टेक झालेले महाराष्ट्राच्या राजकारणातील एकमेव आहेत. १९५७ चे आमदार दत्ता देशमुख बी. ई. (सिव्हिल) होते. आताचे विधानसभेतीलआमदार इस्लामपूरचे जयंतराव पाटील हे व्हिजेटिआय मधून बी.ई (सिव्हिल) झाले आहेत. असे विज्ञाान-तंत्रज्ञाानातील राजकारणातील पदवीधर नेते कमीच आहेत. राजकारणात एल.एल.बी. झालेले ‘वकील’ बरेच आहेत… कमलकिशोर कदम हेही नांदेड जिल्हा परिषद उपाध्यक्ष, महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री आणि विधानसभेचे उपाध्यक्ष झाले. आणि सत्ता काळात त्यांच्यावर कसलाही ओरखडा आला नाही. पृथ्वीराज बाबाही कराडमधून खासदार झाले, देशाचे त्यावेळचे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या मंत्रिमंडळात ‘पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री’ (पी.एम.ओ.एम. एस.) म्हणून त्यांनी प्रभावीपणे काम केले. २०१० साली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी त्यांना दिल्लीहून पाठवण्यात आले. २०१४ पर्यंत तेच मुख्यमंत्री होते. आताही आमदार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात पृथ्वीराज बाबांना महसूलमंत्रीपद दिले जात होते. पण, बाबांनी स्पष्टच सांगितले, ‘मी मुख्यमंत्री राहिलेलो आहे… मंत्री होणार नाही…’ सत्तेची हाव नसणे हे आजच्या काळात सोपे नाही. आणखीन एक सांगायचे राहिले. आजच्या राजकारण्यांमध्ये उत्कृष्ट बॅडमिंटनपटू म्हणून कोणाला निवडायचे असेल तर पृथ्वीराज बाबा यांनाच निवडावे लागेल. वयाच्या ६० पर्यंत ते अतिशय सुरेख खेळत होते. हे मी दिल्ली येथे पाहिले आहे. आज ते ७८ वर्षांचे आहेत.
२००८ ते २०१० पर्यंत मुख्यमंत्री असलेले अशोक चव्हाण उद्धव ठाकरे यांच्या मंित्रमंडळात चिल्लर बांधकाम मंत्री म्हणूनही सामील झाले. स्व. शंकरराव चव्हाण हे १९७५ ते १९७७ या काळात ते मुख्यमंत्री होते. पण, १९७८ साली श्री. शरद पवारसाहेब यांच्या मंत्रिमंडळात त्यावेळचे पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या आग्रहावरून ‘अर्थमंत्री’ म्हणून ते सामील झाले. पुढे त्यांनी ही चूक कबूल केली. नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यावर त्या जागेवर ‘पृथ्वीराज बाबांनी अध्यक्षपद घ्यावे’ असेही सुचवण्यात अाले होते. बाबांनी तेही नाकारले. अर्थात नानांनी राजीनामा दिला नसता तर महाराष्ट्राच्या नंतरच्या राजकारणात महाभारत घडलेच नसते…..
तर… असे हे दाजीसाहेब आणि काकीसाहेब एक आदर्श दाम्पत्य. आनंदराव चव्हाण ८ जुलै १९७३ रोजी स्वर्गवासी झाले. आणि प्रेमलाकाकी ८ जुलै २००३ रोजी स्वर्गवासी झाल्या. एकाच दिवशी या दाम्पत्याचा स्मृतिदिन.
त्या दोघांच्याही स्मृतीला अभिवादन….


मधुकर भावे

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.