ताज्या घडामोडी

‘मुख्यमंत्रीपद नको’ म्हणणारे उद्धवराव

‘मुख्यमंत्रीपद नको’ म्हणणारे उद्धवराव

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64

🔰 संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 11/07/2024 :
आज सकाळीच एका पत्रकार मित्राचा फोन आला. त्याने सहज विचारले,… ‘आज काय लिहितो आहेस?’… मी विषय सांगितला… तो जोरात हसला… आणि म्हणाला, ‘अरे महाराष्ट्रात काय चाललेय… आणि तू काय लिहितोयस…’ मी म्हटले, ‘काय चाललंय?’… त्याने अगदी काव्यमय भाषेत सांगितले.. ‘अरे, उद्या १३ जणांपैकी कोणाचे १२ वाजतात, हा किती छान विषय आहे… तिकडे काल अजितदादा, प्रफुल्ल पटेल, सिद्धीविनायकाच्या दर्शनाला गेले… दर्शनाला गेल्यावर हात जोडतात… त्यांनी ‘व्ही फॉर व्हिक्टरी,’ अशी हाताची दोन बोटे उंचावून खूण दाखवली… मला वाटले, विधानसभा निवडणूक झालीय… एकट्या दादागटाचे पूर्ण बहुमताचे सरकार आले… दादा मुख्यमंत्री झाले… त्यामुळे कधी देव-देव न करणारे दादा बहुतेक दर्शनाला गेले असतील…. आणखीन विषय बरेच गमतीचे आहेत… पहिल्याच पावसात रस्त्यांची चाळण…. मुंबई-गोवा रस्त्याचे काम घेतलेल्या ठेकादाराने इमले बांधले… माड्या चढवल्या… मोठ्या गाड्या घेवून ते फिरत आहेत… करोडो रुपयांची बीले वसूल झाली… रस्त्यांची मात्र चाळण…. कोकणी माणूस हे सगळं सहन करतोय… मुंबई पाण्यात बुडाली… बोगद्यात पाणी साचल्याने कोकण रेल्वे १८ तास अडकली… प्लॅस्टीकच्या दोन इंची कपात पाच रुपयांचा चहा ३० रुपयांना विकला गेला… पूर्वी संकट काळात महाराष्ट्रातील लोकांना माणुसकी होती…. आता लुबाडणुकीचे लोण छोट्या विक्रेत्यांपर्यंत आले…. आणि सांगू का?…. एका विक्रेत्याने तर बटाटा वडा ३० रुपयांना विकला… त्याला एका प्रवाशाने विचारले…. तो जोरात म्हणाला, ‘अंबानी-अदाणी फसवणूक करतात ते तुम्हाला चालते…. आम्हाला चार पैसे या अशावेळीच मिळणार….’ एक की दोन असे त्याने अनेक विषय सांगितले… ‘फडणवीस यांच्यापेक्षा मुख्यमंत्री आता वरचढ झाले आहेत, याची मोदी-शहा यांनाही खात्री पटली आहे.’ हाही विषय तो हळूच बोलून गेला. ‘असे अनेक विषय असताना तू हा विषय का लिहितोय,’ असेही तो म्हणाला.
मी शांतपणे सांगितले की, ‘हे सगळं खरं आहे…. महाराष्ट्र लुबाडला जातोय, हे दिसत आहे… .राज्य चालवणारे सत्तेवर कसे आले… हे सगळ्यांना माहिती आहे. जर पक्षबदल केला नसता तर जे तुरुंगात गेले असते, ते आज कायदे बनवणाऱ्या लोकसभेत खासदार होवून बसलेत, हे सगळे विषय सगळ्यांना माहिती आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणाचा चोथा झाला… हे राजकारण गलिच्छ झाले… सत्तेसाठी हवं ते करता येते, हे आता जगजाहिर आहे… दारू पिऊन मोटार कशीही चालवली… कोणालाही उडवावे… हे आता महाराष्ट्रात परिचित झाले आहे. धटींगण्यांच्या हातात शासन-प्रशासन जेव्हा जाऊन बसते तेव्हा हे चालणार… आणि लोकांनाही त्याची आता सवय झालीय… अशाच वेळी हा विषय मी निवडला आहे… ज्या नेत्याने मंत्रीपद नाकारले… सत्ता नाकारली… मुख्यमंत्रीपद नाकारले…. शब्द दिला होता, यशवंतराव चव्हाणांनी… शांतपणे चर्चा करून ते म्हणाले होते की, ‘तुमच्यासारखा अभ्यासू, विचारी, लोकांच्या प्रश्नावर जागरूक असणारा नेता माझ्या पक्षात हवा…. मला अशांची गरज आहे. येत असाल तर आधी मंत्री करतो…. मग मुख्यमंत्री करतो…’ यशवंतरावांनी हाच निरोप घेऊन खासदार रामराव आवरगावकर यांना उस्मानाबादला उद्धवरावांना भेटायलाही पाठवले.
यशवंतरावांनी उदाहरणही सांगितले… ‘तुम्ही ज्या पक्षात आहात त्याच पक्षात असलेल्या लोकल बोर्डाच्या सदस्या शारदाताई पवार यांच्याकडून मी त्यांचा मुलगा असाच माझ्या पक्षासाठी मागून घेतला… तो पुढे याच पुरोगामी विचाराने नेतृत्त्व करेल… तुम्ही त्याचेही नेते होऊ शकता… एवढे ज्येष्ठ आहात…’

त्या नेत्याने सगळे ऐकून घेतले. मन:पूर्वक आभार मानून नमस्कार केला आणि सांगितले की, ‘माझ्याबद्दलच्या आपल्या भावनांबद्दल मी आपला खूप आभारी आहे…. पण, मी ज्या विचारांवर राजकारण करतो आहे, त्या कष्टकरी, शेतकरी-कामगारांच्या प्रश्नासाठी शेवटपर्यंत लढणार आहे…. आणि लाल झेंड्यातच माझे पार्थिव गुंडाळले जाईल…’ मी कोणाबद्दल बोलतोय, हे त्या मित्रालाही माहिती नव्हते…. महाष्ट्रातील अनेकांना आजही ते माहिती नसेल… कारण आजचे राजकारण तिजोरीवर चालत आहे. त्यावेळी विचारावर चालत होते. त्या नेत्याचे नाव आहे… ‘उद्धवराव पाटील’.
१२ जुलै रोजी त्यांची ४० वी पुण्यतिथी आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात कोणाच्याही लक्षातसुद्धा नसेल हा दिवस. पण याच नेत्याचा कणखर निर्धार ऐकून यशवंतराव चव्हाण थक्क झाले. पटकन म्हणून गेले, ‘तुमच्या निष्ठेची मी कदर करतो…’ आणि त्याच यशवंतरावांनी औरंगाबाद येथे या शे. का. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याचा स्वत: जाहीर सत्कार केला.
आयुष्याची ५० वर्षे शेती, शेतीचे अर्थशास्त्र, शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतीमालाचे भाव, शासनातर्फे शेतीमालाचे किमान दर जाहीर करण्याची त्यांनी लावून धरलेली मागणी… लाखा-लाखांचे काढलेले शेतकऱ्यांचे मोर्चे. संयुक्त महाराष्ट्रासाठी संपूर्ण ग्रामीण भाग ज्यांनी पूर्णपणे घुसळून काढला, तो हा नेता. १९५२ साली हैदराबादच्या विधानसभेत निवडून आलेला… लातूरचा त्यावेळचा आमदार. १९५७ साली महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेता. १९५७ ते १९६२ विधानसभेत आमदार. १९६२ ते १९६६ राज्यसभेत खासदार… १९६७ ते १९७२ विधानसभेत आमदार… १९७७ ते १९८० लोकसभेत खासदार… पण, आमदारकी…. खासदारकी… शेतकऱ्यांसाठीच आणि त्यांच्या प्रश्नांसाठीच हयातभर पणाला लावलेले हे उद्धवराव. शेतीप्रश्नाचा एवढा सखोल अभ्यास असलेला नेता मी पाहिला नाही. संसदेतही नाही आणि विधानसभेत तर नाहीच नाही… स्वभावाने शांत… विचाराने पक्के… भाषणात कोणताही आवेष नाही… शास्त्रशुद्ध, तर्कशुद्ध मांडणी… आजही मला आठवतेय की, मुख्यमंत्री वसंतराव नाईक त्यांच्या जागेवरून उठत आहेत… बाहेर जात आहेत… आणि उद्धवराव भाषणाला उभे राहत आहेत… त्यांचा आवाज ऐकातच…. मागे वळून पाहणारे मुख्यमंत्री…. आपल्या आसनावर येतात. ‘माफ करा… आपण बोलणार आहात मला कल्पना नव्हती…’ आणि त्यांचे भाषण होईपर्यंत जागा सोडत नाहीत… सारे सभागृह एखादा राज्यशास्त्राचा प्राध्यापक वर्गात शिकवताना विद्यार्थी जसे भारावून जावेत… त्या पद्धतीने उद्धवरावांच्या भाषणाला सभागृह सारा जीव कानात सामावून ऐकत असायचा… विरोधी पक्षनेतेपदी ते एकच वर्ष होते. पण, बाकी ११ वर्षे आमदार असताना कायदेशीर मुद्दयांवर त्यांनी सरकारला घाम फोडला होता… त्यासाठी त्यांची जागा सोडली नव्हती. अध्यक्षांच्यासमोर थयथयाट केला नव्हता… त्यांना कधीही निलंबित करावे लागले नाही. त्यांचा मुद्दा कोणालाही खोडून काढता आला नाही. शेतीच्या प्रश्नाची एवढी चर्चा या सभागृहात सर्वात जास्त उद्धवरावांनी केली.
त्या उद्धवरावांचे सगळे शिक्षण ऊर्दु भाषेत झाले. निजामाविरुद्धच्या लढाईत उस्मानाबाद जिल्हा आघाडीवर होता. त्यात उद्धवरावही होते. हैदाराबाद विधानसभेतील त्यांची भाषणे ऊर्दू भाषेत होत असत आणि त्या भाषेला अशी नजाकत आहे… की, काहीवेळा हे गद्य आहे की पद्य आहे, असा त्या शब्दांचा भ्रम पडावा… महाराष्ट्र विधानसभेत १९६७ ते १९७२ काळात उमरखाडीमधून निवडून आलेले
जी. एम. बनातवाला हे मुस्लिम लीगचे आमदार होते. ते उच्च विद्याविभूषित होते. अतिशय उच्च दर्जाचे इंग्रजी आणि नजाकतीचे ऊर्दु असे त्यांचे भाषण असे. एकदा बनातवाला यांच्या भाषणानंतर उद्धवरावांनीही भाषण केले आणि ते ऊर्दुत केले… आणि ते एवढे अस्खलीत होते की, खुद्द बनातवाला चाट पडले. हिंदीमधील फार मोठे कवी कैफी आझमी हे उद्धवरावांचे वर्गमित्र. दोघेही हैदराबादला शिकलेले. त्यामुळे उद्धवराव आणि आझमी परिवार यांचा घरोबा… १९९३ साली लातूर येथे भूकंप झाला तेव्हा उद्धवरावांचे सुपूत्र धनंजय पाटील यांनी मदतनिधीकरिता फेरी काढली. त्यासाठी त्यांनी अभिनेत्री शबाना आझमी यांना बोलावले. सगळ्यांना आश्चर्य वाटले. ती म्हणाली, ‘मै तो मैके आयी हूँ… उद्धवरावसाहब की फोटो देखके मुझे मेरे अब्बाजान की याद आती हैं…’

आज उद्धवराव समोर येत आहेत. १९५८ च्या दिल्ली मोर्चात अग्रभागी राहणारे, १३ मार्च १९६६ ला मंत्रालयावर एक लाख बैलगाड्यांचा शेतकरी मोर्चा आणणारे… उद्धवराव स्वत: बैलगाडी हाकत मुंबईपर्यंत आले… त्यांच्यासोबत होते बापू लाड. शेतकरी-कामगार पक्षाचे सगळे राजकारण त्यावेळी आक्रमकपणे चालायचे. सभागृहात जेमतेम १८ आमदार होते. पण, समोर बसलेल्या काँग्रेसच्या २०२ आमदारांना हे १८ आमदार भारी होते. असे होते कधी-कधी… ज्याला सत्तेची बैठक असते. तो एकटाही २९३ ला भारी पडू शकतो. हे आपण पाहत आहोत. उद्धवरावांनी आयुष्यात राजकारणात तडजोड केली नाही. ‘शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव’ हा तर त्यांच्या किती जिव्हाळ्याचा विषय होता. केंद्र सरकारने शेतीमालाची ‘अॅपसेट प्राईज’ (किमान किंमत) ठरवण्याचा निर्णय केला. ती मागणी १९६४ साली राज्यसभेत उद्धवरवांनी लावून धरली होती. महाराष्ट्र विधानसभेतही त्यांनी आलतू-फालतू एकही प्रश्न विचारला नाही. सभागृहात हजेरी न चुकता लावायचे. एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक चुकून बोलून गेले की, ‘महाराष्ट्र-म्हैसूर सीमा प्रश्न संपला…’ एका क्षणात उद्धवराव उभे राहिले… त्यांनी आठवण दिली की, ‘५ अॅागस्ट १९६६ रोजी याच विधानसभेने सीमाप्रश्नांची सोडवणूक करण्याचा एकमताचा प्रस्ताव केलेला आहे. आणि १९६७ च्या विधानसभा निवडणुकीत सीमाभागातील मतदारांना महाराष्ट्रात मतदान करता यायला हवे, याच्या आगोदर हा प्रश्न सुटला पाहिजे….’ त्यांनी कधीही आवाज वाढला नव्हता. पण त्या दिवशी ते आक्रमक झाले होते. ‘विधानसभेने ठराव मंजूर केला असताना प्रश्न संपला, असे मुख्यमंत्री कसे म्हणू शकतात? मुख्यमंत्र्यांविरोधात माझा हक्कभंग आहे…’ सारे सभागृह ऐकत राहिले. वसंतराव नाईकसाहेब अतिशय सुसंस्कृत आणि संवेदनाशील मुख्यमंत्री होते. त्यांना त्यांची चूक लक्षात आली… त्यांनी क्षणात शब्द मागे घेतले. आणि एका क्षणात विषय संपला. दोन्ही बाजूंनी विचारी सदस्य असले की, प्रश्नांची सोडवणूक विचारपूर्वकच होते.
त्यावेळची विधानसभा त्या पद्धतीची होती. आजपर्यंतचे विधानसभेचे सर्व अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सर्व सभापती यांच्याबद्दल आदर ठेवून हे मुद्दाम लिहितो की, ‘महाराष्ट्र विधानसभेत बाळासाहेब भारदे (१९६२ ते १९७२) अाणि विधान परिषदेत वि. स. पागे (११ जुलै १९६० ते २४ एप्रिल १९७८) अशी जोडी पुन्हा होणे नाही. आणि विधानसभेत उद्धवरावांसारखा प्रश्नासाठीच लढणारा नेता होणे नाही.
(अलिकडे आणखी एक गंमत आहे… विधानसभेला अध्यक्ष नसताना दोन वर्षे विधानसभागृहाची बैठक चालली… आता दोन वर्षे विधान परिषदेला सभापती नाही… तरीही बैठक चालूच आहे.. संपादक नसताना वृत्तपत्र चालू शकते… अध्यक्ष आणि सभापती नसताना सभागृहाच्या बैठका चालवणारे महाराष्ट्र हे जगातील एकमेव राज्य.)
१२ जुलै १९८४ ला उद्धवराव गेले. कॅन्सरशी ते झुंजत होते. १९८४ साल हे महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी फार वेदनादायी होते. १७ जानेवारी १९८४ ला महाराष्ट्राचे फार मोठे नेते राजाराम बापू पाटील गेले…. निमित्त काय झाले..? एक छोटी पुळी झाली… आणि सेफ्टीक झाले.. आणि बापू गेले… त्यांनीही मंत्री म्हणून प्रभावी काम केले. १२ जुलै १९८४ ला उद्धवराव गेले. सगळ्यात मोठा आघात म्हणजे ३१ अॅाक्टोबर १९८४ ला इंिदराजी गांधी यांची हत्या त्यांच्याच सुरक्षा रक्षकांनी केली. (२५ जून २०२४ च्या लोकसभा अधिवेशनाची सुरुवात अध्यक्ष ओम बिर्ला यांनी २५ जून १९७५ च्या आणीबाणीचा निषेध करून केली.. पण, कायद्याने आणीबाणी आणणाऱ्या इंिदराजींवर टीका करताना इंदिराजींनी देशासाठी बलिदान केल्याची आठवण मात्र अध्यक्षांना झाली नाही.)
आणखी एक मोठा आघात २५ नोव्हेंबर १९८४ ला झाला. यशवंतराव चव्हाण यांचे दु:खद निधन त्याच दिवशी झाले. महाराष्ट्र खऱ्या अर्थाने पोरका झाला.
उद्धवरावांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने २५ वर्षांपूर्वीचा तो सत्ताधारी बाकांवरचा सुसंस्कृत, सभ्य, लोकशाहीची जपणूक करणारा पक्ष आणि ते मंत्री…. आणि त्याचवेळी वेळप्रसंगी सरकारला धारेवर धरून ‘राेजगार हमी योजनेसाठी कर लावा’ असे सांगणारा विरोधी पक्ष. आणि त्यासाठी विरोधी पक्षाच्या बाकावरून करप्रस्ताव मांडणारा लोकशाहीतील जगावेगळा विरोधी पक्ष आणि त्या पक्षाचे ते नेते…. विरोधीपक्षनेत्याला मंत्र्याचा दर्जा देणारा त्यावेळचा सत्ताधारी काँग्रेस पक्ष. त्याचीही सुरुवात महाराष्ट्रातच झाली. उद्धवरावांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने ती विधानसभा, त्या चर्चा, ते नेते… ते निर्णय… आणि त्या नेत्यांबद्दल महाराष्ट्रात असलेला आदर सर्वकाही आठवते आहे… पण ते आता संपले आहे… आता भरधाव गाड्या बेफामपणे उधळलेल्या आहेत. आणि सत्तेसाठी कोणाला कुठेही… कसेही…. फरफटत नेले जात आहे… तो महाराष्ट्र बघण्याची वेळ आली… आज जसे वाटते यशवंतराव हवे होते.. दादा, बापू हवे होते… आचार्य अत्रे हवे होते, तसेच उद्धवरावही हवे होते… मंत्रीपद, मुख्यमंत्रीपद नाकारणारे… आणि आज जे मिळतेय त्यासाठी लाज, लज्जा, आपला पक्ष, घराणे, हवं ते सोडून सत्ता… सत्ता… आणि सत्ता…. यामागे धावणारे…
आणि एकदा असे वाटते, उद्धवरावसाहेब, हे बघायला तुम्ही नाहीत, हे एका अर्थी बरेच आहे.
आणि त्या मित्राला फोन केला…
त्याला सांगितले… ‘तुला विषय सांगितला होता… आता तो मांडलेला विषय तुला पाठवतोय.. तू वाच आणि माझा विषय बरोबर आहे का ते सांग….’
दहा मिनिटांनी त्याचा फोन आला… च नशिबी तेही नाही… ’
आणि त्याने फोन ठेवून दिला…


मधुकर भावे

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.