तुझा जिव प्रीय तुज जैसा, तसा इतरास नाही का?

तुझा जिव प्रीय तुज जैसा, तसा इतरास नाही का?
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 14/7/2025 :
सर्व जीव हे शेवटी ईश्वराचेच अंश आहेत. दुसऱ्या जीवात ईश्वर पाहणे म्हणजे प्रत्येक सजिवामध्ये मग ते माणूस असो की कोणताही प्राणी असो. सर्व जीवामध्ये एक समान चैतन्य आहे. ते ईश्वराचेच रुप आहे. देव फक्त मंदिरात किंवा विशिष्ट ठिकाणी नाही तर तो प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक जीवात उपस्थित असतो. ईश्वर हृदयात राहतो कारण तो आतील नियंत्रक आहे. तो सर्व जीवांच्या सर्व कृतीचा सर्वोच्च न्यायाधीश आहे. जीवनात काहीतरी संकल्प कराल तर तुम्हाला निश्चितच मार्ग मिळेल आणि त्यातून आत्मोन्नती साधता येईल. जंगली प्राणी दुसऱ्या प्राण्यावर हल्ला करुन जीवे मारुन आपली उपजीविका चालवतात पण मनुष्य जीवन तसे नसले तरी तो एक मानवसदृश्श जनावर बनतो. कोंबडे, बकरे कापून खातो तसेच दुर्बल असलेल्यांचे शोषण करुन स्वतःची उन्नती करतो. जीवन जगताना दुसऱ्याला मदतीचा हात देणे हीच खरी जीवनाची कला आहे.
तुजा जिव प्रीय तुज जैसा ।
तसा इतरास नाही का ।।धृ।।
आपण आपल्या स्वतःच्या जीवनाला किती महत्त्व देतो. त्याचप्रमाणे इतरांच्या जीवनाला महत्त्व का देत नाही. प्रत्येक जीव हा आपल्या कलेनुसार ह्या जमिनीवर आपले जीवन जगतो. कुटूंब आणि प्रीयजनां शिवाय जीवनाला अर्थ नाही. सर्व प्राण्यांचा जीव सारखाच म्हणजे सर्व प्राण्यामध्ये जीवनाची जाणीव, जगण्याची इच्छा आणि वेदना सहन करण्याची क्षमता असते. सर्व प्राणी समान आहे परंतु त्यांचा जीव मौल्यवान आहे. सर्वांना जगण्याचा अधिकार आणि सुखी राहण्याचा अधिकार आहे. आपला जीव आपल्याला प्रीय तसा इतरांना सुद्धा जीव प्रीय असतो. इतरांच्या भावना आणि गरजा समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सर्वांशी प्रेमाने वागले पाहिजे.
तुला माडी हवी राहण्या । हवे मिष्टान्न तुज खाण्या ।
वस्त्र निटनेटके तुजसी । नको इतरास काही का? ।।१।।
सर्वांना मूलभूत गरजा, सुख हवे असते. प्रत्येकाला राहण्यासाठी एक चांगली जागा आणि खाण्यासाठी रुचकर अन्न हवे असते. तुला राहण्यासाठी माडी (घर) हवे आणि चांगले अन्न तुला खायला पाहिजे. तसेच इतरास सुद्धा हवे असते. गरीबाला त्याच्या झोपडीत आनंद मिळतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात. “राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली । ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या ।।” जे सुख महालात नाही ते सर्व सुख माझ्या झोपडीत मिळते. तुला नवनविन वस्त्र अंगावर घालायला हवे तसे इतरास नको का? तुम्ही स्वार्थीपणाबद्दल बोलता. तुम्ही स्वतःच्या कपड्यांची किती काळजी घेता पण इतरांच्या गरजा आणि समस्या समजून घेण्याचा कुणीच प्रयत्न करीत नाही.
तुझे मुल गोड म्हणुनिया । शिकविशी आग्रहाने तू ।
दुजे मुला दूर लोटोनी । ग्राम सुखरुप राही का ।।२।।
तुझे मुल तुला प्रीय आहे म्हणून त्याला आग्रहाने शिक्षण शिकावयास भाग पाडतो. दुसऱ्यांचे मुलास शिक्षण नको का? दुसऱ्यांचे मुल दूर लोटणे म्हणजे एखाद्या गोष्टीचा अतिरेक किंवा चुकीच्या पद्धतीने वापर केल्यामुळे विपरीत परिणाम होतात. प्रत्येकाला दर्जेदार शिक्षण मिळणे अपरिहार्य ठरते. काहींना शिक्षण मिळत नाही. तुला आपलाच मुलगा गोड वाटतो. “आपला तो बाबू अन् दुसऱ्याचे ते कारटे” स्वतःच्या बाबतीत असणारे चांगले विचार दुसऱ्याच्या बाबतीत न ठेवण्याची तुझी वृत्ती आहे. ही वृत्ती बदलली पाहिजे. निराधार मुलांना शिक्षण देण्यासाठी दत्तक योजना आहे. “मुले ही देवा घरची फुले असतात.” मुलांना शिक्षण देणे देवाचीच सेवा करण्यासारखे आहे. गोरगरीब यांच्या मुलांना आपल्या मुलासारखे मानावे. तेव्हा कुठे गाव सुखाने नांदेल आणि भेदभाव समूळ नष्ट होईल.
तुला धन मान जरुरीचे । दुजा नच हौस का त्यांची ।
म्हणे तुकड्या समज काही । पाठ शिकलास हाही का ।।३।।
तुला धन (संपत्ती) आणि मान (सन्मान) हवा आहे पण दुसऱ्याला त्याची मुळीच हौस नाही का? धन असेल तर इतरांच्या गरजा पूर्ण होतात. दुसऱ्याच्या गरजा, भावनांचाही विचार करायला हवा. जर एखाद्या व्यक्तीला खूप जास्त पैसे मिळाले तर ती व्यक्ती इतर गरजू लोकांबद्दल विचार करुन मदत करु शकते. राष्ट्रसंत म्हणतात, काहीतरी समदारीने वाग. दुसऱ्यांच्या भल्याचा पाठ शिक. तु माझं माझं म्हणत पण सारं नाशिवंत आहे.
पुरुषोत्तम बैस्कार, मोझरकर
श्रीगुरुदेव प्रचारक यवतमाळ
फोन- ९९२१७९१६७७