ताज्या घडामोडी

“मत” हे दुधारी तलवार ! ग्रामगीता

“मत” हे दुधारी तलवार ! ग्रामगीता

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64

🔰 आकाश भाग्यवंत नायकुडे

अकलूज दिनांक 13/04/2024 :

भारतीय राज्यघटनेनुसार नागरिकांना मिळालेल्या हक्काचे महत्व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या ग्रामगीतेतून कित्येक वर्षापूर्वीच मांडले. निवडणुकीचे महत्त्व पटवून सांगताना निवडणुकीतील सदोष प्रश्नांवरही त्यांनी प्रहार केले. निवडणुकीत कुठल्याही आमिषाला बळी पडू नका, असा सल्ला नागरिकांना देतानाच पैशाची नव्हे तर सेवेची कसोटी लावा असे आवाहन त्यांनी पुढाऱ्यांना केले. राष्ट्रसंताचे त्या काळचे विचार आजच्या राजकीय व्यवस्थेतील जळमटे दूर करण्यासाठी प्रभावीपणे लागू होतात.
निवडणूक प्रक्रियेमध्ये आज विकास कामांपेक्षा पैशांनाच अधिक महत्त्व प्राप्त झाल्याची स्थिती आहे. जो उमेदवार अधिक पैसा खर्च करु शकेल, तोच मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहचू शकेल. निवडणूक लढविणे हे सर्व सामान्याचे काम नाही. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकलेल्या नेत्यांनाही पक्षश्रेष्ठी पाठीशी घालतानाचे चित्र आज पाहायला मिळते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत संघटन शक्ती या अध्यायात निवडणूक प्रक्रियेतील दोषांवर प्रहार करत उमेदवार आणि मतदारांना उपदेश केला.
मतदारांनी कुठल्याही आमिषाला बळी न पडता योग्य नेत्याची निवड करणे यातच राष्ट्राचे हित आहे. त्यामुळे निवडणूका पारदर्शक होणे हेच लोकशाहीचे बळ असल्याचा संदेश राष्ट्रसंतानी ग्रामगीतेतून दिला आहे. निवडणूकीत घरी न बसता प्रत्येकाने मत देण्याचा सल्लाही राष्ट्रसंतानी ग्रामगीतेतून दिला.
🔸राष्ट्रसंताचा उमेदवारांना संदेशः–
स्वार्थासाठी सेवेचे सोंग करु नका. प्रलोभन देऊन मते मिळवू नका. व्यसनी गुंडांना प्रोत्साहन नको. नेत्यांनो, फुटीर वृत्ती टाळा. मते मिळविण्यासाठी दारुचा वापर नको. आपल्या प्रचारातून जनतेच्या हिताचा आलेख मांडा. प्रचार म्हणजे आरडाओरडा करुन गोंधळ घालणे नव्हे. निवडणूकीतील सदोष प्रथांना तिलांजली द्या. पक्षपात न करता गरिबांच्या हक्कासाठी उभे राहा.
मतदारांनो ! नाती, गोती, पंथ, पक्ष, जातपात, गरीब-श्रीमंत, देवघेव या आधारावर मत देऊ नका. राष्ट्राचे हित तुमच्या एका मतावर अवलंबून आहे. राजकारणातील दोष बघून निराश होऊ नका. जाणत्या नेत्यांना निवडा. चुकीच्या व्यक्तीला मत देणे म्हणजे आगीत बारुद ओतण्यासारखे आहे. भ्रष्ट लोकांमधून प्रामाणिक व्यक्तीची निवड करा. देशाच्या हितासाठी संघटनेचा प्रमुख शुद्ध चारित्र्याचा असावा. जनतेची कामे न करणाऱ्या नेत्यांना जागा दाखवा. निवडणूक ही भविष्याची अचूक संधी आहे. जनतेसाठी काम करणारा उमेदवार याच निकषावर आपला नेता निवडा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत निवडणूकीला स्वयंवर संबोधले आहे. ते म्हणतात.
भवितव्य गाव अथवा राष्ट्राचे । आपल्या मतावरील साचे ।
एकेक मत लाख मोलाचे । ओळखावे याचे महिमान ।।
मत हे दुधारी तलवार । उपयोग न केला बरोबर ।
तरी आपलाची उलटतो वार । आपणावर शेवटी ।।
दुर्जन होतील शिरजोर। आपल्या मताचा मिळता आधार ।
सर्व गावास करतील जर्जर । न देता सत्पात्री मतदान ।।
राष्ट्रसंताच्या या ग्रामगीतेतून मतदाराचे महत्त्व आपल्या लक्षात येते. आपल्या राज्यघटनेच्या उद्देशिकेची सुरूवात आम्ही भारतीय लोक अशी झाली आहे. याचा अर्थ भारताची सार्वभौम सत्ता येथील जनतेमध्ये निहित आहे. या उद्देशिकेने भारताच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रातील अभूतपूर्व क्रांतीचा पाया रचला यात दुमत नाही. राज्यघटना देशाचा मूलभूत कायदा असतो. शासन आणि जनता यांचे परस्पर संबंध स्पष्टपणे निश्चित करण्याचे काम हा मूलभूत कायदा करतो. राज्याची सार्वभौम शक्ती मतदारांना बहाल केली असल्याने होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणूकीत जास्तीत जास्त संख्येने मतदान करुन आपल्या संवैधानिक हक्काचा वाटर करु या.
आपल्या गावाचे किंवा देशाचे भवितव्य, बरी-वाईट स्थिती आपल्या मतावरच अवलंबून आहे. एक एक मत लाख मोलाचे समजून मताचे महत्त्व ओळखावे. “मत” दोन्हीकडून धार असलेली तलवार आहे. तिचा उपयोग योग्य केला तर आपले रक्षण होते व नाही केला तरआपला वार आपल्यावार उलटून प्राण जाण्याची भिती असते. आपल्या मताचा दुर्जनांना आधार मिळाला की, ते नंतर आपल्यावर शिरजोर होऊन गावाला सळो की पळो करून सोडतील, याचे कारण आपण योग्य व्यक्तीला मतदान केले नाही. निवडणूक म्हणजे बाजारातील गंमत नव्हे. गावाचे उज्वल भविष्य घडविण्याची ती नेमकी संधी आहे.
निवडणूक म्हणजे जणू स्वयंवरच ! ज्याचे हाती गावाची, देशाची सर्व सूत्रे दिल्या जाणार. त्याला सावध होऊन चांगलीच कसोटी लावली पाहिजे. योग्य व्यक्तीची निवड करा. मतदानाचा अधिकार तुम्हाला दिला आहे आणि आपले मत गुप्त ठेवा.

✍️पुरुषोत्तम बैस्कार, मोझरकर
श्रीगुरुदेव प्रचारक, यवतमाळ
फोन- 9921791677

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button