पुण्याच्या रुग्णालयात नर्सच्या खोकल्याने वाचवले मुलीचे प्राण

पुण्याच्या रुग्णालयात नर्सच्या खोकल्याने वाचवले मुलीचे प्राण
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 11/01/2026 :
पुणे शहरात एका ६ वर्षांच्या मुलीच्या सततच्या खोकल्याचे असे काही विचित्र कारण समोर आले आहे, ज्याचा विचार तिच्या पालकांनीही कधी केला नव्हता. गेल्या आठ महिन्यांपासून डॉक्टरांसाठी आव्हान ठरलेल्या या खोकल्याचे मूळ अखेर तिच्या आईच्या ‘परफ्युम’मध्ये असल्याचे निष्पन्न झाले आहे.
या चिमुरडीला गेल्या आठ महिन्यांपासून खोकल्याचा प्रचंड त्रास होत होता. रात्रीच्या वेळी खोकल्याची उबळ येणे आणि घशात सतत खवखवणे यामुळे ती त्रस्त होती. अनेक डॉक्टरांकडे उपचार केले, विविध चाचण्या केल्या, एक्सरे काढले. परंतु खोकल्याचे नेमके कारण समजत नव्हते. औषधे घेऊनही तिला गुण येत नव्हता. पुण्यातील अंकुरा हॉस्पिटलमध्ये या मुलीवर उपचार सुरू असताना एक रंजक घटना घडली. तपासणी दरम्यान मुलीची आई डॉक्टरांशी बोलत असताना, जवळच उभी असलेली परिचारिका (नर्स) अचानक खोकायला लागली.
डॉक्टरांनी विचारणा केली असता, मुलीच्या आईने लावलेल्या परफ्युमचा सुगंध खूप तीव्र असून त्यामुळे आपल्याला खोकला येत असल्याचे नर्सने सांगितले. हीच बाब डॉक्टरांसाठी तपासाचा टप्पा ठरली. पालकांसाठी डॉक्टरांचा इशारा: तीव्र सुगंधामुळे लहान मुलांच्या श्वसनमार्गाला सूज येऊ शकते किंवा त्रास होऊ शकतो.
केवळ परफ्युमच नव्हे, तर एअर फ्रेशनर, डास पळवणारे स्प्रे, अगरबत्ती, आणि तीव्र सुगंधी डिटर्जंट यांमुळेही मुलांना अॅलर्जी होऊन खोकल्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे पालकांनी घरात अशा गोष्टींचा वापर मर्यादित ठेवावा, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

