ताज्या घडामोडी

‘सत्यशोधकांचा महाराष्ट्र’ ‘असत्या’च्या विळख्यात…!

‘सत्यशोधकांचा महाराष्ट्र’ ‘असत्या’च्या विळख्यात…!

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 26/9/2023 :
२४ सप्टेंबर १८७३ ला महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना पुणे येथे केली. या वर्षीच्या २४ सप्टेंबरला या महान सामाजिक क्रांतिकारी दिवसाला १५० वर्षे पूर्ण झाली. महाराष्ट्रातील एकाही वृत्तपत्राला बहुधा १५० वर्षांपूर्वीचा हा दिवस माहिती नसावा किंवा माहिती असला तरी, त्या दिवसचे महत्त्व काय आणि त्या संस्थेचे महत्त्व काय, त्याचे विस्मरण झाले असावे. महाराष्ट्रातील कोणत्याही सामाजिक संस्थेने सत्यशोधक समाजाच्या १५० वर्षांच्या वाटचालीचा कुठेही छोटासा कार्यक्रमसुद्धा केल्याचे वाचनात आले नाही. वृत्तपत्रांकडून आता ती अपेक्षाही नाही. चॅनलाल्यांचा तर विषयच संपलेला आहे. आताच्या राजकारण्यांनी महाराष्ट्रातील पुरोगामी मैलाचे सगळे दगड जणू उखडून काढायचे ठरवलेले आहे. पुन्हा आपण जात-धर्म आणि धार्मिक उन्माद या विळख्यात महाराष्ट्राला घेवून चाललो आहोत. या महाराष्ट्राची राजकीय बांधणी हा नंतरचा विषय आहे. पुरोगामी बांधणीची सुरुवात १५० वर्षांपूर्वी झाली. ग्रामीण भागातील बहुजनांचा हुंकार त्याचा पहिलाच अविष्कार ‘सत्यशोधक’ या शब्दात आहे. महाराष्ट्र ही जाणीव विसरला. हा महाराष्ट्र अभिजनांचा नाही… मुठभर शिकलेल्यांचा नाही… झगमगीत शहरांचा नाही… आणि पैसेवाल्यांचाही नाही… हा महाराष्ट्र कष्टकरी शेतकऱ्यांचा, मजुरांचा, घाम गाळणाऱ्या कामगारांचा आणि महाराष्ट्र धर्माला जागून सर्व जाती-धर्मांना बरोबर घेवून जाणारा हा महाराष्ट्र आहे. सत्यशोधकचा अर्थच मूळी ‘मुठभरांच्या मगरमिठीत सापडलेली अर्थव्यवस्था, शिक्षणव्यवस्था, चालिरिती, कर्म-कांड, हुंडा, सावकारी, या सगळ्यांतून सामान्य माणसाला सामान्य माणसाला सोडवणे आणि सत्त्वाची जाणीव करून देणे… यासाठी शिक्षण… ’ हे सगळे उद्देश महात्मा ज्योतिबांच्या या क्रांतिकारी निर्णयात होते. पत्नी सावित्रीबाई यांना शिक्षित करून ज्योतिबांनी घरातूनच या निर्णयाची सुरुवात केली. आज महाराष्ट्रात जे काही सामाजिक-शैक्षणिक परिवर्तन आणि पुरोगामित्त्व दिसते आहे, त्यासाठी १५० वर्षे मागे जावे लागेल. पण, आज महाराष्ट्रात या महान क्रांतिकारी घटनांचा नेमका अर्थ काय? हे कोणीही सांगितले नाही. २४ सप्टेंबरला नेमका रविवार होता… त्या दिवशीच्या वृत्तपत्रांच्या साप्ताहिक पुरवण्यांत या दिवसाची कुठेतरी नोंद घेतली जाईल, अशी अपेक्षा होती. पण, राज्यकर्त्यांना या दिवसाची तशी आठवण होण्याची गरज वाटत नाही… कारण आज महाराष्ट्र भलतीकडे भरकटतच चाललेला आहे. सत्तेमध्ये बसलेले फुले यांच्या नावाने संस्था चालवतात… आणि मिरवतात.. त्यांनाही त्याची आठवण नाही… एकूणच महाराष्ट्र एका कडेलोटाच्या टोकाला आल्याची अवस्था निर्माण झालेली आहे. सत्तेसाठी राजकारण आणि पैसा, याभोवती गुरफटलेल्या महाराष्ट्राला सत्यशोधक चळवळीच्या १५० वर्षांची आठव होऊ नये, यासारखी शरमेची गोष्ट नाही. महाराष्ट्राचे पुरोगामीपण खरोखर संपत आले का?
या सत्यशोधक चळवळीचा उद्देश नेमका काय होता…. महात्मा फुले यांची त्यामागची भूमिका काय होती… समाज सुधारण्याची चळवळ हाती का घ्यावी लागली… ? त्याकाळात इंग्रजी शिक्षणाच्या उपलब्ध असलेल्या सोयींतून लोकहितवादी किंवा न्यायमूर्ती रानडे, बाळशास्त्री जांभेकर, महर्षी धोंडो केशव कर्वे आणि त्यापूर्वी लोकमान्य टिळकांना समकालिन गोपाळ गणेश आगरकर यांनी सामाजिक मागासलेपणावर हल्ला केला… त्यावेळच्या धर्मपंडितांनी अागकरांची जिवंतपणी प्रेतयात्रा काढायला कमी केले नाही. या सर्व शिक्षित नेत्यांचे विचारही पुरोगामी होते. विधवा विवाह, हूंडाबंदी, बालविवाह, विधवांचे केशवपन असल्या भयानक चालिरितींना विरोध करण्याची भूमिका त्यांच्या कृतीत होते… परंतु यातील बहुसंख्य वरिष्ठ वर्गातील होते आणि शहरापुरते मर्यादित होते. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये अशिक्षित असलेल्या बहुजन समाजाला या सर्व कर्मकांडांनी पूर्ण वेढून टाकले होते. शिक्षणाचा अभाव होता…. पुरेशी व्यवस्था नव्हती… नेतृत्वही नव्हते. पुरोगामी विचारांचे वारे वाहणे शक्य नव्हते. ज्या उच्चवर्गियांना इंग्रजी शिक्षणाची संधी मिळाली त्या समाजातील काही नेत्यांनी या रूढींविरुद्ध आवाज उठवला. परंतु सत्यशोधकांचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील बहुजनांना या धर्मरूढींतून बाहेर काढण्याचा होता. त्यासाठी ही चळवळ सुरू झाली. महात्मा ज्योतिबा फुले यांनी यात पहिला पुढाकार घेतला. या १८ पगड जातीचे लोक, धर्म आणि कर्मकांडामुळे दारिद्र्याचे जीवन जगत होते. हुंडाबळी, विवाहातील खर्च, सावकारी पाश, सावकारी लूट, या सगळ्या त्यावेळच्या गुलामगिरी, अज्ञाान आणि अंधश्रद्धेच्या विरोधात हा एक मोठा लढाच होता. त्यासाठी बहुजनांमधून नेतृत्त्व तयार होण्याची गरज होती. महात्मा फुले यांनी बहुजनांना जागे करण्याचे काम या सत्यशोधक चळवळीद्वारे केले. पुढे या चळवळीला ‘ब्राम्हण-ब्राम्हणेतर’ असे स्वरूप दिले गेले असले तरी ग्रामीण भागामध्ये जागरूकता निर्माण करण्यात याच चळवळीमध्ये बहुजनांमधून तरुण नेतृत्त्व उभे राहिले. त्यांनी हा विचार समजून घेतला. त्यातूनच पुढे कार्यकर्ते तयार झाले… आणि त्याच कार्यकर्त्यांतून पुढे नेते तयार झाले. हे या महाराष्ट्रातील पहिले पुरोगामी पाऊल १५० वर्षांपूर्वी उचलले गेले… महात्मा फुले आणि त्यानंतरचे नेते या सर्वांनी या महाराष्ट्राच्या पुरोगामी वाटा १५० वर्षांपूर्वी निवडल्या. त्याच मार्गावरून चालत महाराष्ट्राची पुढची बांधणी आणि जडण-घडण झाली. ‘शाहू-फुले-आंबेडकर’ या तीन शब्दांमध्ये या सर्व पुरोगामित्त्वाच्या खुणा पूर्णपणे सामावलेल्या आहेत. राजर्षी शाहू महाराज यांनी जी पुरोगामी धोरणे स्वीकारली त्यामुळे शिक्षणासाठी सर्वच १८ पगड जातींना फार मोठी संधी उपलब्ध झाली आणि त्यातूनच या चळवळीमध्ये फार मोठे नेते महाराष्ट्राच्या पुरोगामी आघाडीवर लढण्यासाठी निर्माण झाले.
मागे वळून पाहिले तर, या सर्व इतिहासात तीन-चार नावे प्रामुख्याने समोर येतात… त्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील हे नाव अग्रभागी आहे. १९४७ ला देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी त्यांच्या ‘पत्री सरकार’ने सातारा जिल्हा चार वर्षे स्वतंत्र्ा असल्यासारखा तिरंगा फडकवून साऱ्या जगाला आश्चर्याचा धक्का दिला. ४४ महिने भूमिगत राहिलेले नाना पाटील हे या चळवळीचे अग्रस्थान होते. खुद्द पंडित नेहरू यांनी १९३२ साली कराड येथे नाना पाटील यांच्या हिमतीचा जाहीर सभेत गौरव केला. स्वातंत्र्यासाठी नाना पाटलांच्या पत्री सरकारची कामगिरी ही फारच मोठी आहे. पण, त्याचबरोबर पत्री सरकारच्या आगोदर महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचा विचार घेवून सातवी शिकलेल्या नाना पाटील यांनी सातारा जिल्ह्यात जे वातावरण निर्माण कले ते महाराष्ट्रातील फुले यांच्या नंतरचे मोठे परिवर्तन आहे. सावकार शाहीच्या मगरमिठीतून सामान्य माणसालासोडवण्याचे काम त्याच चळवळीने केले. लोकशिक्षणाचे काम त्याच चळवळीने केले. सावकाराने कर्ज दिलेल्या गरीब शेतकऱ्याला हिशेब सांगताना महिन्याचे ३२ दिवस सांगितले. आणि व्याज लुटले. सोमवार ते सोमवार आठ दिवस असे गणित मांडून फेब्रुवारीच्या २८ दिवसांच्या महिन्यातसुद्धा ३२ दिवसांचे व्याज खाणाऱ्या सावकारांना नाना पाटील यांच्या सभांनी उघडे पाडले. लोकशिक्षणाची फार मोठी चळवळ नानांच्या भाषणानी झाली. बहुजन समाजातील दलितांबद्दलचा दुरावा नानांच्या भाषणाने दूर झाला. माणसाची घाण काढणाऱ्या समाजालाही नानांनी जवळ केले. ते भाषणात सांगायचे की, ‘अरे तुमचा डावा हात जे काम करतो… तेच काम तो समाज तुमच्यासाठी करतो… मग त्या समाजाला माणूस म्हणून जगायचा अधिकार हाय की नाय ?’ नानांच्या तेजस्वी भाषणाने त्या काळात जी क्रांती झाली त्या सामाजिक क्रांतीला तोड नाही. नाना पाटील भाषण करत असतानाच पोलिसांच्या दप्तरात ‘फरार’ असल्याचे जाहीर होते… पण, बहुजन समाजाने या नेत्याला तळहातासारखे जपले आणि त्यांच्याभोवती संरक्षण कडे तयार केले. त्यांच्यासोबत कर्मवीर दादासाहेब गायकवाड या महान नेत्याचेही मोठे योगदान आहे. आज अनेकांना दादासाहेब गायकवाड यांचे काम माहिती नाही. या चळवळीचे नंतरचे नेते केशवराव जेधे केवढे वैचारिक दूरदृष्टीचे होते, याचीही कल्पना नाही. त्याच सुमारास कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ‘रयत’ शब्द वापरून शिक्षणंस्था स्थापन केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा त्यांच्या आज्ञाापत्रात ‘रयत’ शब्द वापरलेला होता. ‘रयतेला त्रास होईल, असे कोणतेही कृत्य सहन केले जाणार नाही…’ हा महाराजांचा आज्ञाापत्रातला दंडक होता. तोच ‘रयत’ शब्द आण्णांनी उचलला १९१९ साली कराड तालुक्यातील ‘काले’ येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून पहिली शाळा उघडली. आज या संस्थेत ६ लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. १५०० प्राध्यापक आहेत. आशिया खंडातील ही सगळ्यात मोठी शिक्षणसंस्था… चार-आठ आणे वर्गणी जमा करून ज्या महापुरुषांनी उभी केली ते कर्मवीर आण्णा सत्य शोधकाचेच काम खांद्यावर घेवून आयुष्यभर जगले. महात्मा फुले यांच्यावरील आचार्य अत्रे यांचा चित्रपट गाजला तो गाडगेबाबांचे त्यातील कीर्तन आणि कर्मवीर आण्णांचे निवेदन. त्या चित्रपटाला ८० वर्षांपूर्वी राष्ट्रपतींचे रौप्य पदक मिळाले.
याच काळात माणगाव (त्यावेळचा कुलाबा जिल्हा) येथील परिषदेत छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांचा जाहीर सत्कार केला होता. आणि त्याच सुमारास गाडगेबाबांनी सगळा महराष्ट्र आपल्या कीर्तनाने जागा करण्याचे काम सुरू केले होते. ‘फुले-शाहू- आंबेडकर’ परंपरा म्हणजे या सर्व पुरोगामी नेतृत्त्वाची एक मोठी साखळी आहे. त्यात महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचासाखा शिक्षणतज्ञा आहे. १९२७ साली लंडन येथे शेकडो डॉलर पगाराची नोकरी मिळत असताना विठ्ठल रामजी शिंदे यांनी या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात येऊन शैक्षणिक काम हाती घेतले. पगाराची अपेक्षा केली नाही. या सर्व थोर नेत्यांचे या महाराष्ट्रावर केवढे मोठे उपकार आहेत. आज महाराष्ट्र हे सगळं विसरलेला आहे. महाराष्ट्रातील सामाजिक परिवर्तन आणि प्रबोधन, अंधश्रद्धेचे निर्मुलन, दारूबंदी, जुगारबंदी, लग्नसोहळ्यावर होणारे खर्च, त्यातून कर्जबाजारी होणारा बहुजन समाज या सर्व अपप्रवृत्तींविरुद्ध सत्यशोधकांपासून प्रेरणा घेवून महाराष्ट्रात एक मोठा जागर झाला. खुद्द नाना पाटील यांनी स्वत:च्या लग्नात कुठल्याही पुरोहिताला न बोलावता स्वत:च मंगलाष्टकं म्हटली आणि लग्न लागले. त्यानंतर खेड्या-पाड्यांतील हजारो लग्न नाना पाटील यांनी ‘गांधी लग्न’ या नावाने उरकून टाकली. ‘गांधी लग्न’ म्हणजे काय? तर नवरा-नवरीने खादीचे कपडे घालून महात्मा गांधीच्या फोटोला हार घालायचा आणि मग एकमेकांना हार घालून लाडू भरवायचा.. झाले लग्न… आज लाखो रुपये ज्या लग्न समारंभांवर खर्च होतात त्या महाराष्ट्राला आणि झगमगत्या मुंबई, पुणे शहराला, हा इितहास माहिती असणार नाही. महाराष्ट्राची पुरोगामी बांधणी ज्या विचारातून झाली त्या विचारांची सुरुवात सत्यशोधकातून झालेली आहे. आज महाराष्ट्र हे सगळे विसरलेला आहे.
पुरोगामी महाराष्ट्राच्या या खुणा ब्रिटीशांचे सरकार गेल्यानंतर महाराष्ट्रात जपण्याचे काम त्या- त्या वेळच्या नेत्यांनी केलेले आहे. त्यामुळेच या राज्याचे नाव ‘महाराष्ट्र’ खऱ्या अर्थाने सार्थ झाले आहे. पण आजच्या राज्यकर्त्यांना हे समजणार कसे… आणि सांगणार कोण…? सत्यशोधक या शब्दाचेच पुढचे पुरोगामी अर्थ पुढच्या नेत्यांनी ओळखले आणि म्हणूनच ‘बहुजनांसाठी…. कष्टकरी शेतकऱ्यांसाठी…. कसेल त्याची जमीन हा कायदा आला… कामगारांसाठी साप्ताहिक सुट्टी…. हक्काचा बोनस… निवृत्तीवेतन… हे कायदे आले. द्विभार्या प्रतिबंधक कायदा आला. दारूबंदीचा कायदा आला…. खाजगी गाड्यांचे राष्ट्रीयकरण हा कायदा आला….’ ज्या शेताच्या बांधावर जी झाडे आहेत ती सरकारची मालकीची होती. ती सगळी झाडे शेतकऱ्याच्या मालकीची करण्याचा कायदा आला. ज्या ठिकाणी लोकांनी कधी गाडी बघितली नव्हती… त्या गावात पहिली एस.टी. गाडी धावली, हे त्या पुरोगामी विचारांचेच पुढचे पाऊल आहे. एस. टी. ने महाराष्ट्रात केलेले परिवर्तन आणि ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी एस. टी. ची झालेली मदत आज बेदखल असली तरी, एखाद्या विद्यार्थ्याला पी. एच. डी. मिळेल, असा एवढा मोठा हा विषय आहे. पण त्याचे मोल महाराष्ट्राने समजून घेतले नाही. महाराष्ट्राचे ५० वर्षांतील सगळे पुरोगामी कायदे हा त्याच पुरोगामी खुणांचा परिपाक आहे. त्यातूनच ‘रोजगार हमी योजना’ आली. त्यातूनच ‘कापूस एकाधिकार खरेदी योजना’ आली… आजच्या सरकारला याची गरज वाटत नाही. विदर्भातील शेतकरी आज सरकारच्या नावाने तळतळाट करत आहे. गेल्यावर्षीवा त्याचा कापूस आजही घरात भरून ठेवला आहे. त्याला भाव नाही… आणि यावर्षी पाऊस नाही. ही विदर्भातील शेतकऱ्याची अवस्था…. त्याच्या आत्महत्या… अर्ध्या मराठवाड्यात पाऊस नाही… हातातील पिक करपून गेलेय… कोणाला काहीही पडलेले नाही. महाराष्ट्र होता कुठे आणि निघाला कुठे… यशवंतराव चव्हाण हे लहान असताना त्यांना त्यांच्या आईने पंढरपूरला नेले होते. गर्दीमध्ये लहानग्या यशवंतरावांचे बोट आईने घट्ट धरून ठेवले. गर्दी मुलगा भरकटू नये म्हणून… पण, महाराष्ट्राने यशवंतारवांचे जे बोट पडकले होते ते कधीच सोडून दिले आहे… त्यामुळे महाराष्ट्र भरकटला… एकीकडे आत्महत्या… दुसरीकडे राजकीय धिंगाणे… तिसरीकडे राजकारणात वाढलेला धटींगणपणा… आणि अस्थिर राजकारणाची भयानक अवस्था…. कोण कोणाचे आहे, हेच समजत नाही. अशा या महाराष्ट्राने आपले पुरोगामीपण कुठेतरी हरवल्यासारखे वाटते आहे. आणि म्हणूनच सत्यशोधकांच्या १५० वर्षांच्या या अफाट मेहनतीवर आजचेनेते पाणी ओतत आहेत. आणि भलत्या महाराष्ट्राला आपण डोक्यावर घेत आहोत… ‘कार्य’ नसलेले ‘सम्राट’ अचानक िनर्माण झालेले आहेत. काम न करणारे नेते झाले आहेत… ढिगभर प्रश्न पडले असताना मुख्य प्रश्नांपासून महारष्ट्र खूप दूर आहे… आणि जाहिरातबाजीवर महाराष्ट्राची गुजराण होते आहे. त्या सत्यशोधकांनी नेमके सत्य शोधण्याचा प्रयत्न केला… आताचा महाराष्ट्र असत्याचे प्रयोग करीत आहे. त्यामुळे तारखावर तारखा पडत आहेत… सुप्रीम कोर्टाचे ताशेरे सहन करावे लागत आहेत… सत्यशोधकांचा महाराष्ट्र आज असत्याच्या विळख्यात सापडलेला आहे. त्याची सुटका कधी होणार? कोणालाही सांगता येणर नाही. पण, ही सुटका महाराष्ट्रातील सामान्य मतदारच करेल… तो दिवस फार लांब नाही. आणि हेच अंतिम सत्य आहे.
सध्या एवढेच

मधुकर भावे
📞9892033458

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button