माळशिरस तालुक्यातील फोंडशिरस येथे झालेल्या खुनातील तीन आरोपींना जन्मठेप

माळशिरस तालुक्यातील फोंडशिरस येथे झालेल्या खुनातील तीन आरोपींना जन्मठेप
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
वृत्त एकसत्ता न्यूज
माळशिरस / सुजाता गोखले दिनांक 16/01/2025 :
राहत्या घराच्या जागेच्या वादातून फोंडशिरस (तालुका माळशिरस) येथे झालेल्या खून प्रकरणातील तीन आरोपींना माळशिरस येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल डी हुली यांनी जन्मठेप व प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. किसन महादेव वाघमोडे (वय वर्षे २२), धर्मेंद्र महादेव वाघमोडे (वय २८ वर्षे) व अंकुश महादेव वाघमोडे वय (३५ वर्षे) सर्व रा फोंडशिरस ता . माळशिरस अशी शिक्षा झालेल्या तीन सख्ख्या भावांची नावे असून याबाबत मयताचा मुलगा बापू नाना वाघमोडे यांनी नातेपुते पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
याबाबतची हकीगत अशी की फिर्यादी व आरोपी हे एकमेकांच्या शेजारी गट नं १४१३ राहण्यास आहेत. त्यांच्यामध्ये जमिनीचा वाद होता. फिर्यादीचे घर हे आरोपींच्या शेतात येत असल्याने व फिर्यादीची जनावरे आरोपी आमच्या जागेत बांधायची नाहीत असे सांगत असल्याने फिर्यादी व आरोपी यांच्यात नेहमी वाद होत होता. दिनांक १९ ऑक्टोंबर २०२१ रोजी सायंकाळी साडेचार वाजता फिर्यादी व आरोपी यांच्यात घर व जनावरे बांधण्याच्या कारणावरून वाद झाला या वादाच्या वेळी आरोपी किसन वाघमोडे यांनी लोखंडी पाईपने फिर्यादीचे वडील नाना आण्णा वाघमोडे (वय ७० वर्ष) यांच्या डोक्यात मारहाण केली तर धर्मेंद्र वाघमोडे व अंकुश वाघमोडे यांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. डोक्यात जबरी मार बसल्याने नाना वाघमोडे यांच्या तोंडातून व डोक्यातून रक्त येऊन ते बेशुद्ध पडले. त्यांना नातेपुते येथील दवाखान्यात नेले असता व तेथून अकलूज येथे दवाखान्यात नेले असता ते मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबत मयताचा मुलगा बापू वाघमोडे यांनी वरील तीन आरोपीच्या विरोधात नातेपुते पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. या घटनेचा तपास नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांनी केला व तपास करून वरील तीन आरोपींच्या विरोधात जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. या खटल्यात इतर साक्षीदारा बरोबरच मयताच्या नातवाची साक्ष महत्त्वाची ठरली आहे. पोलिसांनी दाखल केलेले पुरावे व सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. हुली यांनी किरण वाघमोडे धर्मेंद्र वाघमोडे व अंकुश वाघमोडे या तिघांना जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे ॲड. संग्राम पाटील व ॲड सूर्यकांत ढवळे यांनी काम पाहिले तर फिर्यादी पक्षातर्फे ॲड. राजाभाऊ वाघमोडे यांनी काम पाहिले कोर्ट पैरवी म्हणून सहाय्यक फौजदार शिवाजी घाडगे तर कोर्ट ड्युटी पोलीस हेड कॉन्स्टेबल मारुती शिंदे यांनी काम पाहिले.