माहिती तंत्रज्ञानलेखसामाजिक

हनी(बी), आय लव्ह यू ! – मधमाशीचे जीवन-रहस्य

हनी(बी), आय लव्ह यू !

– मधमाशीचे जीवन-रहस्य

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras District Solapur Maharashtra State, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 3/8/2023 :
एकदा काय झाले,
एका मधमाशीने मधाने भरलेले एक भांडे खंडोबास नेऊन दिले.
मधाचे बोट चाखले मात्र, खंडोबा झाला खूष.
तो मधमाशीस म्हणाला,
‘तुला जे काय हवे ते माग, मी देतो.’
मधमाशी काही कमी नव्हती,
तिला अपेक्षित होतेच,
तिने तत्काळ खंडोबाला सांगितले,
‘देवा! मी ज्या प्राण्यास आपली नांगी मारीन,
त्या प्राण्यास फार वेदना व्हाव्या, अशी शक्ति मला दे.’
मधमाशीचे हे दुष्टपणाचे मागणे ऐकून खंडोबास फार राग आला.
तो म्हणाला,
“मी वचन देऊन चुकलो, म्हणून तुझे मागणे मी तुला देतो;
पण एक गोष्ट लक्षांत ठेव की,
ज्या ठिकाणी तू आपली नांगी मारशील,
त्या ठिकाणीच नांगी तुटून जाईल व त्यामुळे तू मरण पावशील’.”
हि गोष्ट मला आठवली कारण,
मला एकदा जेवताना पायाला कुणीतरी जोरात दंश केला,
मी कळवळलो, हाताने जोरात फटका मारला
आणि दुसऱ्या क्षणी ती चावणारी मधमाशी लांब जाऊन पडली.
शेजारीच माझा मुलगा साकेत जेवायला बसला होता,
तो पर्यावरण शास्त्राचा अभ्यासक.
तिला मरून पडलेली बघितल्यावर ‘साकेत’ मला म्हणाला,
‘बाबा, हि ‘देशी’ मधमाशी आहे,
तिचे पोळे आपल्या घराच्या मागील बाजूला आहे.
अशा देशी मधमाशा आपण वाचवायला हव्यात.
मनात म्हणले, मोठी गंमत आहे नाही?
या मधमाशांमध्ये देखील ‘देशी-विदेशी’ आहे!
मंडळी,
आपण या मधमाशीच्या दुनियेत शिरायचा प्रयत्न करू.
या मधमाशांमध्ये जगभरात केवळ सात मुख्य प्रजाती आहेत.
त्यातील भारतात चार जाती आढळतात.
काही जाती सुतारकाम उत्तम करतात,
काही जाती गवंडीकाम सुरेख करतात,
काही जाती झाडांची पाने कापून घरट्यात शेती करतात.
पण या लेखात आपण माहिती करून घेणार,
ती पोळे करून मध साठवणाऱ्या मधमाशीची,
मध तयार करणाऱ्या मोजक्याच जाती आहेत.
आपली भारतीय बाण्याची मधमाशी हि आकाराने लहान असते,
तर युरोपकडून आयात केलेली मधमाशी हि मोठी असते,
त्यांच्या पोटावरील पट्टे बघितले कि लगेच कळते.
मधमाशांमध्ये हे आयात-निर्यात प्रकरण आहे तरी काय?
आपण थोडे इतिहासात शिरू.
वास्को दि गामा याने भारतात प्रवेश केला तो २० मे १४९८ रोजी.
त्यानंतर काही वर्षात ब्रिटीश, डच, फ्रेंच नाविक आले.
ब्रिटीश संपूर्ण भारतभर पसरले.
त्यांनी अठराव्या शतकात संपूर्ण भारतात जम बसवला.
त्यांनी स्वतःसाठी जशी हिल-स्टेशन तयार केली,
तशीच चहा आणि कॉफीची देखील मोठ्या प्रमाणात लागवड सुरु केली.
शेकडो हेक्टर जंगल त्यासाठी कापण्यात आले.
त्यांना चहाबरोबर मध देखील लागायचा,
म्हणून त्यांनी आणखीन एक मोठा ‘प्रमाद’ केला,
त्यांनी युरोपच्या मोठ्या मधमाशा बंद पेट्यातून भारतात आणल्या!
या मोठ्या मधमाशा मोठी मोठी पोळी तयार करू लागल्या,
मोठ्या प्रमाणात मध उत्पादन सुरु झाले,
हळूहळू या ‘विदेशी’ मधमाशा भारतभर पसरल्या.
दीडशे वर्षांनी ब्रिटीश गेले, पण या माशा मात्र इथेच राहिल्या.
आजही ही मोठी मधमाशी भलतीच लोकप्रिय आहे.
मधाचे उत्पादक हीच युरोपियन माशी पसंत करतात.
मूळची भारतीय किंवा दक्षिण आशियाई मधमाशी क्वचित दिसते,
देशी माशी एका पोळ्यातून दोन-तीन किलो मध आणि मेण देते,
तर हि युरोपियन माशी आठ-दहा किलो मध देते.
वरवर बघता वाटते,
चांगलेच आहे कि ते! बिघडते कुठे?
मोठी माशी, अधिक मध!
पण अधिक खोलात जाऊन विचार केला कि कळते,
नक्कीच बिघडते आहे,
जे बिघडते, ते लगेच लक्षात येत नाही,
बिघडते ते पर्यावरण संतुलन.
बिघडते ते वर्षानुवर्षे झालेल्या उत्क्रांतीचे चक्र.
बिघडते ते शेकडो-हजारो पुष्प वनस्पतींचे!
त्यांचे परागीभवन देशी मधमाशांवर अवलंबून होते,
त्यांचे अस्तित्व धोक्यात येत आहे!
ते कसे काय बुवा?
विदेशी मधमाशी आकाराने मोठी,
तिची मधुरस गोळा करायची फुले देखील मोठी.
गरीब बिचाऱ्या लहान गवतफुलाना विचारते कोण?
त्यांच्या परागकणांचे सिंचन कोण करणार?
ती बिचारी मरून जातात.
लहान माशा नाहीत,
म्हणून लहान फुलझाडे मरणार,
असे चक्र खंडित होणार,
कित्येक प्रदेशनिष्ठ जाती नष्ट होणार!
असेच चालू राहिले,
तर एक दिवस मानवजात देखील धोक्यात येणार!
आणि म्हणूनच अल्बर्ट आईनस्टाईन म्हणतो,
“ज्या क्षणी मधमाश्या जगातून नाहीश्या होतील,
त्यानंतर चार-पाच वर्षात मनुष्यजात
या पृथ्वीतलावरून उपासमारीने नष्ट होईल!”
आपण पिकवितो ती सर्व तृणधान्ये मधमाशांमुळे आहेत,
कापसाची बोंडे हि मधमाश्यांकडून परागसिंचीत होतात,
तृणभक्षी प्राणी ज्या गवतावर पोसले जातात,
ते गवत उगवते त्याला कारण मधमाशी हेच!
आपण अंग, वस्त्र यासाठी मधमाश्यांवर अवलंबून आहोत,
हे निर्विवाद सत्य आहे!
आपण मधमाश्यांचे जीवनमान माहिती करून घेऊ.
मधमाशांचे जीवन विलक्षण असते.
सुमारे पंधरा वीस कोटी वर्षापूर्वी त्यांचा जन्म झाला,
म्हणजे आपल्यापेक्षा वयाने खूपच ज्येष्ठ.
त्या समूहाने राहतात,
मोठीमोठी मध भरलेली पोळी उभारतात,
कधी झाडाच्या फांदीखाली,
कधी ढोलीमध्ये तर कधी कड्यांवर,
कधी जमिनीखाली, कधी जमिनीवर,
कधी कृत्रिम लाकडी पेटीत!
एकेक पोळे म्हणजे त्यांचे शहर असते,
एकत्र खेळीमेळीने काम करतात
प्रत्येकीचे ठरलेले काम असते,
आपापल्या वस्तीचा अभिमान असतो त्यांना.
एकेका पोळ्यामध्ये पन्नास-साठ हजार माशा राहतात.
आणि त्यांना त्यांच्या पोळ्याची खास ओळख असते.
राणीमाशीच्या अंगातून एक विशिष्ठ द्रव स्त्रवत असते,
ते प्रत्येकीला अबीरबुक्क्यासारखा चिकटलेले असते.
तीच त्यांची ओळख असते.
‘हर गार्डाची न्यारी शिट्टी,
हर ड्रायव्हरचा न्यारा हात.’ (मर्ढेकर)
या चालीवर,
हर राणीचा न्यारा ‘स्त्राव’,
हर पोळ्याचा न्यारा स्वाद.’
असे सार्थ म्हणता येईल!
या त्यांच्या ओळखीमुळेच,
समजा अनेक पोळी एकत्र असतील,
तरी चुकामूक होत नाही.
आणि दुर्दैवाने समजा एखादी पत्ता चुकली,
तर मात्र तिचे मस्तक तत्काळ धडावेगळे होते.
कारण, तिला स्वकीय मानले जात नाही.
पोळ्याची संरक्षण यंत्रणा जोरदार असते,
त्यांची नांगी हे त्यांचे प्रमुख हत्यार,
समुहाने एकत्र तुटून पडणे,
हीच त्यांची शक्ती.
त्यांचे डसणे हे वेदनादायी असतेच,
विषारी देखील असते.
त्या जिथे डंख मारतात,
तिथेच त्यांची नांगी आणि विषकोश तुटून पडतो.
त्याला उलटे काटे असतात.
ते अडकून बसतात अन सहजासहजी बाहेर येत नाहीत.
म्हणूनच कोणी मधाळ बोलू लागला,
तर त्याची नांगी देखील मागोमाग टोचणार,
हे लक्षात घ्यायला हवे.

त्यांच्यामध्ये देखील काम वाटपावरून ‘चातुर्वर्ण्य’ आहेच.
राणी माशी मुख्य,
तिच्याशिवाय हि समूहवस्ती बनूच शकत नाही.
तीच सर्वांची जन्मदा असते.
त्यामुळे पोळ्यामध्ये मातृसत्ताक पद्धत असते.
तिचे आयुष्यही सर्वात जास्त, ३ ते ५ वर्षांचे.
तिचा ‘हनिमून’ मात्र हवेत असतो!
ती अनेक नरांबरोबर समागम करते,
आणि प्रत्येकाचे शुक्रजंतू पिशवीत साठवते,
जरुरीप्रमाणे आवडत्या शुक्रपेशी बरोबर फलित होते!
जो बलवान, तोच आपल्या मुलांचा ‘बाप’ असावा, हि इच्छा!
ऐकावे ते नवलच, नाही का!
नर माशा संख्येने असतात चार-पाच,
पण त्या सहा महिने जगतात,
नराचे काम एकच आणि एकदाच,
राणी माशीबरोबर समागम करणे आणि मरून जाणे.
मिलन होईपर्यंत मात्र तो नुसता बसून खातो!
समागम झाला कि त्याचे शिश्न तुटून मादीच्या शरीरात राहते!
ड्रोन माशा ह्या पोळ्याच्या आतमध्ये राहतात,
त्यांचे काम म्हणजे,
राणीने घातलेली अंड्यांची देखभाल करणे,
ती एकेका घरात नेऊन ठेवणे.
त्यातून आळी बाहेर आली कि खाणेपिणे बघणे,
मृत माश्यांना बाहेर टाकणे,
पोळ्याच्या आतील स्वच्छता करणे.
म्हणजे हाउस कीपिंग बर का!
त्यांना आपण आया, दाई किंवा मावश्या माश्या म्हणू!
चौथा वर्ण म्हणजे कामकरी माशा,
ज्यांना आपण बाहेर उडताना बघतो त्या.
त्या सर्वात जास्त संख्येने असतात.
अगदी एकूण संख्येंच्या ९९ टक्के!
पण ड्रोन आणि कामकरी माश्यांचे आयुष्य खूप कमी,
म्हणजे अगदी ३ आठवड्यात त्या मरतात,
त्यांची जागा नव्या जन्मलेल्या माशा घेतात.
हिवाळ्यात मात्र जास्त जगतात.
रोज सकाळी पोळ्यावरून उडून लांब जातात,
प्रत्येकीबरोबर एकेक पोते असते!
आसपासची उत्तम मधुरसाची फुलांची झाडे,
आवडत्या पिकांची शेती हेरतात,
त्या पुन्हा पोळ्यापाशी येतात,
न चुकता.
त्यांच्या लहानशा मेंदूमध्ये विद्युत चुंबकीय यंत्रणा असते,
आणि बाकीच्याना त्या ठिकाणची ‘गुगल लोकेशन’ सांगतात!
त्यांची भाषा हाच एक मोठा संशोधनाचा विषय आहे.
त्या नृत्य करून इतरांना संदेश देतात!
हे नृत्य सांकेतिक असते.
फुलांचे स्थान दूर असेल तर ‘वॅगल डान्स’ करतात.
जवळच असेल तर वर्तुळाकार नृत्य करतात.
मधुरस आणि परागकण साठवून परत आल्या
कि त्या थरथराट नृत्य करतात !
ह्या नृत्याचा खूप अभ्यास झाला.
वॅगल डान्स म्हणजे इंग्रजी 8 या आकड्यासमान नाच करणे,
हा विशिष्ट नाच करून बाहेरून घरात आलेली मधमाशी
तिच्या इतर सहकार्यांना सूर्याची दिशा लक्षात घेऊन
जवळपास फुलांतील परागकण कोणत्या दिशेला आहेत,
किती अंतरावर आहे हे तंतोतंत सांगतात.
पोळ्यापासून पाणीपुरवठा किती अंतरावर आहे,
ह्याची देखील माहिती याच नृत्यातून दिली जाते.
त्यांचेही शत्रू आहेतच.
पहिला शत्रू म्हणजे माणूस!
रासायनिक खत फवारणी हि त्यांना मारक असते,
जंगल तोड हि पोळ्यांची संख्या कमी करते.
सध्या बोकाळलेले मोबाईल टॉवर्स त्यांचा गोंधळ उडवतात.
जागतिक तापमानवाढ, वारे, वादळे आदी शत्रू आहेतच.
त्यावर मात करत त्यांचे काम निमुटपणे चालू असते.
त्या प्रत्येक फुलामधील मधुरस पोटात शोषून घेतात,
पिवळे पिवळे परागकण पोत्यामध्ये ठासून भरतात.
पोळ्यामध्ये परत आल्या कि
त्यांची मुख्य दोन कामे त्या करतात.
मेण आणि मध तयार करणे.
बरोबर पोत्यात भरून आणलेले परागकण ओतायचे,
त्यात विशिष्ठ ग्रंथीमधील द्राव घालायचा,
त्यांचे योग्य मिश्रण करून मेण तयार होते.
हे मेण म्हणजे सिमेंट-कॉन्क्रीट सारखे मजबूत.
ह्याच मेणाची लहान लहान षटकोनी घरे तयार करतात.
त्याला आपण पोळे म्हणतो.
झाडाच्या सालीतून स्त्रवणारे रेसीन (डिंक) वापरायचे,
त्यात आपली लाळ घालून चिकट द्रव करायचा,
त्याला ‘प्रोपोलीस’ असे म्हणतात,
त्याच्यामुळेच पोळे झाडाला घट्ट धरून राहते.
याच प्रोपोलीसचे पोळ्याभोवती कंपाऊंड करतात,
का? तर फांदीवरून मध खाण्यासाठी मुंग्यांनी येऊ नये!
मुंग्या हि प्रोपोलीसची भिंत पार करूच शकत नाहीत.
मध तयार करण्याची प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची,
एकीने ओकलेला मधुरस, दुसरी स्वतःच्या पोटात घेते,
ती तिसरीच्या, मग चौथी, पाचवी
असे आठ आठ मधमाश्या हा मधुरस चाखतात.
प्रत्येक माशी स्वतःची लाळ त्यात घालते.
शेवटी मधुरस, दवबिंदू आणि लाळ यांचे मिश्रण तयार होते,
त्यासाठी चवीला परागकणांची फोडणी देतात,
झाला त्यांचा मध तयार.
हा मध ते षटकोनी बरण्यातून भरून ठेवतात.
त्यागोदर त्या पंख हलवून त्यातील पाणी कमी करतात.
पंख हलवतानाचा वेग सेकंदाला दोनशे इतका!
मधात फक्त साखर आणि आम्ल शिल्लक राहते.
मधामध्ये साखर ८० % तर पाणी १७ %
साखर म्हणजे फ्रुक्टोज़, ग्लूकोज़ आणि माल्टोज़
व्हिटॅमिन, खनिजे आणि आम्ले उर्वरित ३ %.
सगळ्या मधाची रवानगी लहानलहान कोशिकांमध्ये होते.
त्याचा वापर अंड्यातून पिल्लांना अन्न म्हणून होतोच,
शिवाय थंडीमध्ये हेच साठवलेले अन्न उपयोगी पडते.
आणखीन एक रहस्य म्हणजे,
या माश्या मधामध्ये स्वतःचा विशिष्ठ द्रव घालतात,
त्याचा राजरस बनवतात.
हि ‘रॉयल जेली’ खूपच पौष्टिक असते.
ती नवजात पिल्लांना एक-दोन दिवस खायला देतात.
पण जर का हीच जेली सतत खायला दिली,
तर त्या आळीची दुसरी राणी तयार होते!
तिची वाढ देखील भरपूर होते,
आणि ती जननक्षम देखील होते.
पण ती तिथे राहूच शकत नाही,
अन्यथा अस्सल राणी बरोबर युद्ध अटळ!
तिला एकच मार्ग, दुसरा घरोबा करणे!
मग ती तिच्या दोन-चार याराना फितवते,
त्यानाही पोळ्यातून बाहेर पडायला लावते,
आणि ती स्वतः उडते,
तिच्याबरोबर उडताना तिच्या पायांना धरून
चार-पाच कामकरी माशा लोंबत उडतात!
तिच्या सेविका म्हणून त्या नव्या घरात जातात!
पुन्हा एकदा, ऐकावे ते नवलच नाही का!
आता थोडे मधाबद्दल,
एक माशी एका फेरीमध्ये शंभर फुलांना भेट देते,
तब्बल चाळीस लाख फुलांना भेट दिली कि,
एक किलो मध आणि ५० ग्रम मेण तयार होते.
एक किलो मेण तयार व्हायला वीस पट फुलांना भेट द्यावी लागते!
थेंबे थेंबे तळे साचे, हेच बरोबर आहे, नाही का!
पोळ्याच्या सहा किलोमीटर परिघात त्या फिरत असतात!
आसपासच्या फुलांच्या वनस्पतींवर मधाचा वास अवलंबून असतो.
कितीतरी चवीचे मध असतात.
गोड, तूर्त, खारट, इ इ,
जांभूळ, कारवी, ओवा, लीची, मोहरी, सुर्यफूल,असे अनेक फ्लेवर्स आहेत.
आयुर्वेदात मध हे औषध आहेच,
कितीतरी आयुर्वेदिक औषधे मधात मिसळून घेतात.
मध उत्तम सौंदर्य प्रसाधन आहे.
मधामध्ये असलेली अॅन्टिऑक्सिडेंट्स रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.
वजन कमी करण्यासाठी मध-लिंबू सेवन खूप फायद्याचे ठरते.
आश्चर्य हे कि मध कधीच नासत नाही.
कारण ५५०० वर्ष जुना मध मातीच्या बरणीत सापडला आहे !
पिरॅमिडमध्ये सर्वात जुना ३००० वर्षापूर्वीचा मध आढळला आहे.
पेरू देशातील ममीजबरोबर बशीमध्ये मध ठेवलेला सापडला आहे!
युरोपमध्ये चक्क मधाचे पोळे काढतानाचे शिल्प आहे!
मध हा ‘हायग्रोस्कोपिक’ असतो.
जो कोणी जीव-जीवाणू तेथे शिरतो, तो तत्काळ मरून जातो!
मला कास पठारावर नेहेमीच असे अनुभव येतात.
त्या पुष्पपठारावरील सूक्ष्म जैवविविधता अनुभवताना
अनेक वेळा लहानसहान गोष्टीमध्ये देखील ब्रह्मांड दर्शन होते.
मनात प्रश्न उभे राहतात,
हि फुलांची विविधता, रंगसंगती, आकार, सुगंध,
ह्यांचे प्रयोजन काय?
ती तर आमिषे आहेत,
त्यामुळे कीटक तिथे येऊ लागले.
हि फुले त्यांना रंगांचे, सुगंधाचे आणि
शब्दशः मधुरसाचे बोट चाखायला लावतात.
परागकणांची आपोआपच निर्यात होते.
त्यातूनच विशिष्ठ फुलांचे किटकांशी अलिखित करार होतात.
त्यातच मुख्यत्वे ह्या मधमाश्या असतात,
त्या आणि इवल्या इवल्या फुलांचा तो रंगसोहळा बघताना,
समजून घेताना मी अवाक होतो, प्रेमातच गुंतून जातो,
मधमाश्यांचे साम्राज्य जगभर पसरलेले आहेच,
त्याची झलक मला कास पठारावर दिसते,
पहाट झाली कि त्यांच्या झुंडीच्या झुंडी इथे येतात,
फुलांवर अक्षरशः तुटून पडतात.
हे साहचर्य आपण समजून घ्यायला हवे.
ह्या मधमाशा ज्या काळामध्ये उत्क्रांत झाल्या,
त्याच काळात ह्या पुष्पवनस्पतींची देखील उत्क्रांती झाली.
फुलांची ठेवण आणि कीटकांचे आकार संबंधित आहेत, हे नक्की.
म्हणूनच,
मी पुन्हा सुरुवातीच्या देशी-विदेशी मधमाश्यांकडे येतो.
ब्रिटीश लोकांनी युरोपमधील मोठी मधमाशी इथे आणली,
ती इथे सहज पसरली,
पण नेमके बिघडले ते कुठे?
आपल्याकडील फुले हि आकाराने खूप लहान,
त्यांच्या गंधकोश देखील लहान,
त्यात या मधमाशीचे डोके आतपर्यंत जाऊच शकत नाही,
त्यामुळे युरोपची मधमाशी मधुरस संपूर्ण पिवूच शकत नाही,
तेथेच मोठा घोटाळा होतो.
फुलामधील उर्वरित मधुरस हा तसाच आत राहतो,
त्यामध्ये इतर सूक्ष्म जीवजंतू वाढतात
फुलांवर, पर्यायाने त्या झाडांवर रोग पडतो.
ब्रिटीशांनी तेथील मधमाशी आणली पण,
तिच्या जोडीला तेथील फुलझाडे कशी आणणार?
हा मोठा परिणाम स्थानिक पर्यावरणावर होतोच.
हेच आपण समजून, उमजून घ्यायला हवे,
मी हाच विचार करत कास पठारावर जातो,
पहाट होताच मधमाश्यांच्या झुंडी इथे येतात,
फुलेदेखील त्यांचीच वाट बघत असतात,
म्हणता कशी, “हनी(बी), आय लव्ह यु!”
कारण ती देखील त्यांच्या स्पर्शाने लगेच पाकळ्या उघडतात,
आणि आपापला गंधकोष आणि मधुरस
त्यांच्या ह्या युगायुगांच्या मैत्रिणीच्या स्वाधीन करतात!
मी बारकाईने ही देवाणघेवाण बघत असतो,
मी सुखावतो,
कारण त्या मात्र देशी मधमाशा असतात.
पुष्पपठार कासवरील असंख्य फुल-जातींचे,
त्या अखेरच्या आशास्थान असतात.

डॉ. संदीप गजानन श्रोत्री. (सातारा)

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.