संविधान दिन
संविधान दिन
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 26/11/ 2024 : आज 26 नोव्हेंबर. आजची तारीख ही भारतासाठी दोन गोष्टींसाठी अत्यंत महत्त्वाची तारीख. ह्या तारखेला भारताची घटना तयार झाली आणि ह्याच तारखेला आपले सर्वांचे लाडके,आवडते राष्ट्रपती कलाम ह्यांना भारतरत्न प्रदान करण्यात आले. आणि ही तारीख दुःखाची पण कारणं ह्या दिवशी अतिरेक्यांनी आपल्यावर जबरी हल्ला करुन आपली मोलाची माणसे आपल्याला गमवावी लागली.
15 आँगस्ट 1947 ला देश स्वतंत्र झाला. सर्वत्र आनंदाला उधाण आले होते,जल्लोष सुरू होता तरीही देशातील मातब्बर राजकारणात आणि स्वातंत्र्यलढ्यात झोकून दिलेली मंडळी वेगळ्याच विचारात होती.आता त्यांना खरी काळजी होती की हे जे स्वातंत्र्य खूप हाल अपेष्टा सहन करून महत्प्रयासाने मिळवले आहे ते आपल्या थोड्या चुकीने,गलथान कारभाराने गमवायला नको.जनतेला आपल्या कारभाराने स्वातंत्र्याची सुमधुर फळेच चाखायला मिळावी. हे सगळे जर साध्य करायचे असेल तर आपल्या देशाचा कारभार सुनियंत्रीतच असावयास हवा. अराजकता, दडपशाही ला येथे थारा नको. देशाचा कारभार हा लोकांनी निवडलेल्या, त्यांच्या पसंतीच्या माणसांनीच सांभाळायला हवा.ह्यासाठी आपल्या देशाची एक काटेकोर नियमावली हवी.
देश स्वतंत्र झाला असला, तरी देश चालवण्यासाठी घटना अजून तयार नव्हती. 9 डिसेंबर 1946 पासून घटना समितीच्या बैठका सुरू झाल्या होत्या. 141 दिवसांच्या परिश्रमा नंतर घटना समितीने पहिला मसुदा तयार केला. तो दिवस होता 3 नोव्हेंबर 1947. अर्थातच हा काही अंतिम मसुदा नव्हता. ह्यात अजून सखोल अभ्यासाने बदल हे होणारच होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली पुढच्या अडीच वर्षांत घटना समितीची एकूण 12 सत्रं पार पडली. घटनेतील प्रत्येक शब्द न शब्द हा संपूर्ण अभ्यास करून, कायद्याचा अक्षरशः कीस पाडून, तोलून-मापून आणि प्रत्येक सामान्य नागरीकाचा सारासार हिताचा विचार करुन सर्व विचाराअंती लिहिण्यात आला.
आणि अखेर तो सुदिन उजाडला.तो दिवस होता “26 नोव्हेंबर 1949”,ह्या दिवशी भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली, म्हणून तो दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.आणि 26 जानेवारी 1950ला ती देशात अंमलात आणल्या गेली, तेव्हापासून आपण आजपर्यंत एक प्रजासत्ताक, सार्वभौम राष्ट्र म्हणून ओळखल्या जातो.प्रजासत्ताक आणि सार्वभौम राष्ट्र ह्या दोन्ही गोष्टी निरनिराळ्या. आपल्यासाठी अभिमानाची बाब म्हणजे आपले राष्ट्र प्रजासत्ताक आणि सार्वभौम दोन्हीही आहे
ज्या देशात घटनात्मक प्रमुखाची नियुक्ती निवडणुकीद्वारे होते, तो देश प्रजासत्ताक असतो. जो देश स्वतःच स्वतःला चालवतो आणि बाहेरच्या शक्तींवर अवलंबून नसतो, त्याला सार्वभौम म्हणतात.
पण 1950मध्ये राज्यघटना तयार झाल्यावर गव्हर्नर जनरल हे पदच रद्द करण्यात आलं आणि त्यानंतर पहिले राष्ट्रपती, देशाचे घटनात्मक प्रमुख म्हणून डॉ. राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आली.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वतंत्र भारताची सुव्यवस्थीत घडी बसविणं हे वाटतं तितकं सोप काम नव्हतं.ते आपल्यापुढील एक आव्हानच होतं. पाकिस्तानमधून येणाऱ्या निर्वासितांचं पुनर्वसन करणं, जवळजवळ साडेपाचशे स्वायत्त संस्थानांना भारतात सामील करून घेणं हे जिकीरीचं काम होतं. यापैकी हैद्राबाद, जुनागढ व काश्मीर वगळता सर्व संस्थानांनी भारतात विलीन होण्यास तात्काळ संमती दिली. 500 पेक्षाजास्त संस्थानांना भारतात सामील करून घेण्याच अतिशय जटील, जिकीरीचं आणि जबाबदारीचं काम सरदार पटेलांनी लिलया आणि योग्य रितीने हाताळलं.
सर्वप्रथम आपली सापंत्तीक स्थिती बळकट करून जगात आपला आर्थिक स्तर उंचावणे हे प्रमुख आव्हानं होत. इंग्रज जातांना आपली परिस्थिती अतिशय बिकट आणि विदारक करून गेले होते.देशांत गरिबी होती, निरक्षरता होती, शेती अत्यंत वाईट परिस्थितीत होती. हे सर्वकाही सुस्थितीत आणण्याचं आव्हान स्वतंत्र भारता च्या शासकांपुढे होतं.
भारतीय संविधान हे अनेक लोकांच्या परिश्रमातून, अभ्यासातून, आणि संशोधनातून निर्माण झालं आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर हे ड्राफ्टिंग कमिटीचे म्हणजेच घटनेच्या मसुदा समितीचे प्रमुख होते. भारतीय संविधानाचं स्वरूप कसं असावं, त्याची चौकट त्यांनी आखली, विविध विषयांवरील तज्ञांकडून मिळणारी माहिती, त्यांच्या सूचना ध्यानात घेऊन त्या राज्यघटनेत कशा येतील याचा विचार बाबासाहेबांनी केला. राज्यघटनेच्या निर्मितीत त्यांनी जो मोठा वाटा उचलला आहे त्यामुळे त्यांना राज्यघटनेचा शिल्पकार म्हटलं जातं.भारतीय राज्यघटनेचे जनक डॉ. बी.आर. आंबेडकर यांनी भारतीय संविधान,संविधान सभेचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद यांच्याकडे 26 नोव्हेंबर 1949 रोजी सुपूर्द केला.
भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. देशासाठी सर्वोच्च प्रतीचे काम करणाऱ्या भारताची कीर्ती जगभरात वृद्धीगंत करणाऱ्या व्यक्तीस हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविले जाते. अशा व्यक्तींनी उभी हयात यासाठी घालविलेली असते. अनेकांना तर हा सन्मान मरणोत्तर दिला गेला आहे. सेवा,कला साहित्य, विज्ञान व विश्वशांती, मानव विकास, कारखानदारी इत्यादी क्षेत्रांतील लोकांना, सनदी सेवा बजावलेल्या व्यक्तींना व अन्य अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्यांना हा अमूल्य पुरस्कार देऊन गौरवायचे, असा निर्णय इ.स. १९५४ मध्ये तत्कालीन भारत सरकारतर्फे घेण्यात आला २ जानेवारी १९५४ रोजी भारताच्या राष्ट्रपतींनी त्यावर मान्यतेची मोहर उठवली. १९५५ साली कायद्यात काही बदल करून मरणोपरान्त ‘भारतरत्न’ देण्याची सोय करण्यात आली.
असा हा मानाचा,सर्वोच्च पुरस्कार राष्ट्रपती, संशोधक, शिक्षणावर मनापासून प्रेम करणारे, निगर्वी आणि अतिशय साधे सरळ संयमी व्यक्तीमत्व असलेल्या कलाम सरांना मिळाल्यावर प्रत्येक भारतीयाला मनापासून आनंद झाला.
ह्या दिवशीचे महत्त्व जाणून कलाम सरांना आदरपूर्वक सलाम करुन आणि भारताचे स्वातंत्र्य चिरायू राहो ही प्रार्थना करुन व ह्या तारखेला घडलेल्या अतिरेकी हल्ल्यामध्ये हौतात्म्य पत्करलेल्या विरांना श्रद्धांजली अर्पण करुन आजच्या पोस्टची सांगता करते.
सौ.कल्याणी बापट (केळकर) 9604947256
बडनेरा, अमरावती