मुंगी उडाली आकाशी । तिने गिळीले सूर्याशी ।।
मुंगी उडाली आकाशी ।
तिने गिळीले सूर्याशी ।।
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 26/11/ 2024 : संत ज्ञानेश्वर महाराज यांची धाकटी बहिण संत मुक्ताबाई यांचा हा विचित्र अर्थाने भरलेला कूठ अभंग असून आध्यात्मिक विचाराने ओतप्रोत भरलेला आहे. या अभंगात सांगितलेल्या सगळ्या गोष्टी म्हणजे मुंगी, विंचू, माशी, वांझ बाई हे निमित्तमात्र आहेत. ज्या गोष्टी कधीच घडल्या नाहीत किंवा घडणार नाहीत पण त्यांचे दाखले दिले आहेत. परमार्थ हा असाच आहे, त्यात नवल घडत असते का? कसे?
हा अभंग संत मुक्ताबाई यांना साधना काळात आलेला प्रत्यक्ष अनुभव आहे. य अभंगाचा शब्दार्थ न घेता आपण गूढार्थ विचारात घेतला तर यातून वेगळचं प्रबोधन होत. आध्यात्मिक साधकांसाठी मार्गदर्शक असा हा अतिशय उच्च प्रतिचा अभंग आहे. सद्गुरु कृपेने जर साधकाला योग्य मार्ग मिळाला तर त्याला साधना करताना असे अनेक अनुभव येतात. त्यावेळेस त्या साधकाला आनंदाने नक्की हसायला येत.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या भेटीसाठी व स्वतःचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी हजारो वर्षाच्या तपोबलाचा अहंकार घेऊन तपस्वी चांगदेव महाराज वाघावर आरुढ होऊन हाती सर्प घेऊन शिष्यगणां बरोबर येत होते. कमी वयाचे श्री ज्ञानेश्वर महाराज अचल भिंतीस चल करुन चांगदेव महाराजांचे स्वागत करण्यास गेले. चांगदेव यांना माऊलीची महती समजली. चांगदेव महाराजांना उपदेश करताना संत मुक्ताबाईंनी हा अभंग लिहिला आसावा. यात ज्ञानदेवांना मुंगीची तर चांगदेवांना सूर्याची उपमा देवून ज्ञानदेव मुंगी समान लहान असते तरी सूर्यासमान शक्तीधारी चांगदेवाला झाकळून टाकण्याची क्षमता ज्ञानेश्वर महाराजांना असल्याचे म्हटले असावे. आपण या अभंगाचा भावार्थ थोडक्यात पाहू या.
मुंगी उडाली आकाशी ।
तिने गिळीले सूर्याशी ।।१।।
मुंगी हा किती छोटासा जीव आहे, तिने कितीही प्रयत्न केले तरी सूर्याला गिळणे किंवा त्याच्या जवळ जाणे मुळीच शक्य नाही. संत मुक्ताई गोरक्षनाथ यांच्या शिष्या होत्या. त्या महान योगी होत्या. मुक्ताई यांनी चौदासे वर्ष जगाणाऱ्या चांगदेवांना उपदेश करुन त्याच्या गुरु झाल्या.
संत मुक्ताबाईंनी या ओवीत त्राटक क्रिया सांगितली आहे. त्राटक क्रिया म्हणजे एखाद्या वस्तूवर टक लावून पाहणे. ती एक ध्यानधारणा आहे. हठ योगातील षट् कर्मापैकी एक कर्म आहे. त्राटक हे एक ध्यान तंत्र आहे. जे मन स्थिर ठेवण्यासाठी दृष्टीच्या इंद्रियाचा वापर करते. जरी तुम्ही भिंतीवरील बिंदू, नाकाचे टोक किंवा आकाशातील तारा पाहून त्राटकाचा सराव करु शकता. परंतु हे पारंपारिकपणे आणि सर्वात प्रभावीपणे आमच्या मते मेणबत्तीच्या ज्वालाकडे टक लावून साध्य केले जाते. आकाश निरभ्र असेल व स्वच्छ सूर्य प्रकाश असेल अशा वेळेस आकाशात त्राटक करावं तेथे आपणास एक मुंगी इतका छोटासा काळसर रंगाचा ठिपका दिसेल. त्याच्यावर नजर स्थिर करावी. काही वेळा नंतर आपल्या डोळ्यातून कोटी सूर्या इतका प्रकाश निर्माण होईल, यावेळेस भर दुपारी आपण सूर्याकडे बाघितलं तर आपल्यातील प्रकाशामुळे इमारतीच नाही तर सर्व सृष्टी यापैकी काहीच दिसत नाही तर सर्वत्र प्रकाश आणि प्रकाशच दिसतो म्हणून संत मुक्ताईने असे उद्गार काढले आहेत की, मुंगी उडाली आकाशी, तिने गिळीले सूर्याशी.
थोर नवलाव झाला ।
वांझे पुत्र प्रसवला ।।२।।
असे नवल घडले की, वांझ व्यक्तीला म्हणा अगर स्त्रीला म्हणा पुत्र झाला, हे शक्य आहे का? तर अजिबातच नाही. मग त्या असे का म्हणाल्या असतील. अध्यात्माच्या दृष्टीने विचार केला तर त्या म्हणतात. ते अगदी खरं आहे. येथे वांझोटी कोण याचा विचार बारकाईने केला तर असं लक्षात येत की, आपली नजर ज्यावेळेस वांझ होते, तेव्हाच आत्मप्रकाश प्रकटतो. नजर वांझ कशी करावी तर आपली बाह्य नजर घालवून तिला आतल्या बाजूस वळवली तर ती वांझ झाली असे म्हणावे आणि ती जेव्हा वांझ होते तेव्हाच तिला प्रकाशरुपी पुत्र होते. आपली दृष्टी घालवून तिला आत वळवणे ही फक्त सद्गुरुची किमया आहे म्हणून ही क्रिया साध्य करावी म्हणून थोर नवलाव झाला, वांझे पुत्र प्रसवला.
विंचु पाताळाशी जाय ।
शेष माथा वंदी पाय ।।३।।
विंचु म्हणजे आपला अहंकार हा पाताळात गेला म्हणजे त्यावर आपण विजय मिळवला तर आपलं मन आणि चित्त शुद्ध होत. त्यानंतर शेषशायी भगवंत जो आपल्या डोळ्याच्या भागातील ब्रम्हरंध्रा जवळ राहतो, त्याचे दर्शन होते. तेथेच शेष त्या आत्मरुपी भगवंताला वंदन करत आहे म्हणून संत मुक्ताई म्हणतात की, अहंकार रुपी विंचूवर ताबा मिळवा. प्रत्यक्ष भगवंत आपल्याच देहात भेटेल.
माशी व्याली घार झाली ।
देखोनी मुक्ताई हासली ।।४।।
संत मुक्ताईने येथेही आकाशात त्राटक करायला सांगितलं आहे. आपण जेव्हा त्राटक करायला सुरूवात करतो तेव्हा आकाशात आपणास एक काळ्या रंगाचा छोटासा बिंदू दिसतो. जसं जसं त्राटक वाढत जाईल तसं तसं त्या छोट्या बिंदूला पंखासारखे आकार असलेले दिसतील. ते इतके मोठे होत जातात की, पूर्ण आकाश नाहीतर सृष्टी व्यापून जाते. याचा जिज्ञासूंनी गुरुच्या मार्गदर्शना खाली स्वानुभव घ्यावा म्हणतात. माझं म्हणणं आपोआपच पटेल. म्हणून संत मुक्ताईंना अशी नवलाची गोष्ट पाहून आनंदाने हसू येत आहे.
पुरुषोत्तम बैस्कार, मोझरकर
श्रीगुरुदेव प्रचारक यवतमाळ
फोन- ९९२१७९१६७७