जाती फक्त दोनच स्त्री आणि पुरुष ! धर्म एकच माणुसकी !

जाती फक्त दोनच स्त्री आणि पुरुष ! धर्म एकच माणुसकी !
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 05/12/2025 :
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेनुसार समाजातील स्त्री आणि पुरुष हे दोनच महत्वाचे घटक आहेत. जे एकमेकांना पूरक आहेत आणि त्यामुळे जगाचा प्रवाह चालू राहतो. महाराजांनी स्त्री आणि पुरुषाची तुलना संसाराच्या दोन चाकाशी केली आहे. ज्यांच्यामुळे संसाररुपी रथ कौतुकाने चालतो.
ईश्वराच्या इच्छेचे पूरक, समाजाचे दोनची घटक |
पुरुष आणि महिला देख, सृष्टी चक्र चालविती ||
स्त्री आणि पुरुष या दोनच जाती आहेत. या जाती निसर्गाने निर्माण केल्या आहेत. त्यात ढवळाढवळ झाल्यास इतर जातीही तयार होतात. या जाती निर्माण करण्यामागे निसर्गाचा साधा सरळ हेतू होता की, वंश टिकून राहावा आणि मानव जात टिकून राहावी.
“जगात स्त्री आणि पुरुष या दोनच जाती असाव्यात आणि मानवता हा एकमेव धर्म असावा.” हा विचार डाँ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडला होता. याचाच अर्थ समाजात स्त्री आणि पुरुष हे दोनच प्रमुख लिंगभेद असावेत आणि जात किंवा धर्म यावर आधारित कोणताही भेदभाव नसावा, यावर त्यांचा जोर होता.
जातीची उत्पत्ती एकाच वेळी झाली नाही तर ती प्राचीन काळापासून हळूहळू विकसित झाली आहे. जगातील सर्वांत जुना लिखित ग्रंथ ऋग्वेद मध्ये चारच वर्ण सांगितले पण जातीचा कुठेही उल्लेख नाही. काही इतिहासकारांच्या मते इ. स. पू. 1500 च्या सुमारास आर्याच्या आगमनानंतर समाजात चार वर्णाची (ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र) व्यवस्था निर्माण झाली असा सिद्धांत आहे. काही तज्ञांच्या मते जाती व्यवस्थेचे स्वरुप आणि सध्याची रचना मुघल आणि ब्रिटिश काळात अधिक घट्ट झाली. बौद्ध ग्रंथामध्ये ब्राह्मण व क्षत्रिय या शद्बांचा उल्लेख वर्ण असा न करता जाती असा आहे. उपनिषदे मध्ये शूद्राचा उल्लेख “पुषण” पोषण करणारी असा करतात म्हणजेच शूद्र हे शेतकरी होते.
श्रीरामचंद्र तसेच श्रीकृष्ण यांच्या काळात जाती ही आजच्या सारखी संकल्पना नव्हती पण वर्ण व्यवस्था होती. जी कामावर आधारित होती. श्रीराम क्षत्रिय वर्णाचे होते व कुळ सूर्यवंशी होते. श्रीकृष्ण यादव कुळात जन्माला आले होते.
पृथ्वीवर आधुनिक मानव सुमारे 3, 00,000 वर्षापूर्वी विकसित झाला. शास्त्रज्ञांच्या मते सुमारे 2-8 दशलक्ष वर्षापूर्वी आफ्रिकेत (होमो हंँबिलिस) कुशल मानव नावाची प्रजाती उदयास आली होती. जी पृथ्वीवर पाऊल ठेवणारे पहिले मानवासारखे जीव मानले जाते. त्यानंतर उत्क्रांतीचा प्रवास पुढे होत गेला. आफ्रिकेतून मानव जगभर पसरले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा माणुसकी धर्म मानवता या तत्वावर आधारित होता, ज्यात सर्व धर्माचा आणि पंथाचा आदर करणे, कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्वांना समान वागणूक देणे आणि समाजाची निःस्वार्थ सेवा करणे हेच खरे कर्तव्य मानले जाते. ग्रामगीता हा त्यांच्या विचारधारेचा गाभा असून त्यात त्यांनी म्हटले आहे.
मानवता ही पंथ मेरा |
इन्सानियत है पक्ष मेरा |
सबकी भलाई धर्म मेरा ||
मानवासाठी धर्म नाही तर धर्मासाठी माणूस आहे. म्हणजेच प्रत्येक माणसाजवळ माणुसकी हा धर्म हवाय. मग जात कोणतीही असो वा धर्म कोणताही ठरलेला असो. राष्ट्रसंताच्या ग्रामगीतेतील माणुसकी म्हणजे खरी धर्मभावना, जी कोणत्याही जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन न्यायावर आधारित आहे. प्रत्येकाला न्याय मिळायला हवा. माणुसकी म्हणजे सर्व लोकांचा आदर करणे आणि एकमेकांप्रती प्रेमभाव ठेवणे होय. ग्रामगीतेच्या माध्यमातून महाराजांनी समाजात माणुसकीची शिकवण दिली आहे. जिथे श्रमांना प्रतिष्ठा दिली जाते. धर्माच्या नावाखाली समाजात फूट पडू नये आणि सर्वजण एकतेने नांदावेत, यासाठी ग्रामगीतेने माणुसकीचा संदेश दिला आहे.
धर्म माणुसकीशी म्हणती, माणुसकी न्यायावरी शोधिती |
न्याय कोणाच्याही प्रति, एकचि राहतो सर्वदा ||
देवाच्या दर्शनासाठी आतुरतेने जाणाऱ्या माणसाला त्याच्यातील माणुसपण जागे झाल्यास देवपण दूर नाही असे राष्ट्रसंत म्हणतात. माणुसकी असलेला माणसाचा शोध महाराजांनी घेतला. समाजातील माणुसपण जागे केल्याशिवाय त्याच्यातील देवपण सिद्ध होत नाही. तो जागा झाला तर देवळातूध देव शोधण्याची गरजच नाही. माणुसपण हेच देवपणाचे महाद्वार आहे.
स्वामी विवेकानंद यांनी माणुसकीलाच सर्वात मोठा धर्म मानले आहे. प्रत्येक घरात माणूस जन्माला येतो पण माणुसकी काही लोकांच्या घरातच जन्म घेते आणि मला मिळालेला आनंद सर्वांना उपलब्ध होवो अशी विचारसरणी ज्या मनुष्याच्या हृदयामध्ये असते ती खरी माणुसकी होय.
माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा आई (आईचे दुध) त्याच्यासाठी धर्म आहे. बाळाचे संगोपन, पालनपोषण करतो म्हणून वडील हा धर्म आहे. गुरु जगायचे ज्ञान देतो म्हणून गुरु हा धर्म आहे. धर्म आपल्या बरोबर असतो. आपण मरतो पण धर्म मरत नाही. धर्म आहे म्हणून माणूस आहे. श्वास चालू आहे म्हणून शरीराची हालचाल आहे. याचा अर्थ धर्म श्रेष्ठ आहे. धर्म समजून घेतला पाहिजे, नाही तर प्रत्येक वेळी “धर्म संस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे” ईश्वराला अवतार घ्यावा लागेल.

पुरुषोत्तम बैस्कार, मोझरकर
श्री गुरुदेव प्रचारक यवतमाळ
फोन- 9921791677

