रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांची मुलाखत

रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांची मुलाखत
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 05/12/2025 :
रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांची इंडिया टुडे समुहाच्या दोन महिला पत्रकारांनी घेतलेली मुलाखत पाहिली आणि आपल्या पत्रकारितेचे धिंडवडे निघालेले पाहताना वाईटही वाटले आणि संतापही आला.
जगातल्या एका, सुपर पॉवर मानल्या जाणाऱ्या राष्ट्राच्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीसमोर मुलाखत घेताना आपण कसे बसले पाहिजे, देहबोली कशी असली पाहिजे, बोलण्याचा टोन कसा असला पाहिजे, आपल्या चेहऱ्यावरील हावभाव कसे असले पाहिजेत आणि हातवारे न करता कसे बोलले पाहिजे या मूलभूत बाबींचे ज्ञान यांना नसावे हे अतिशय निराशाजनक चित्र आहे.
समोरील व्यक्तीने जर आपले दोन्ही पाय जमीनीवर टेकवलेले असतील तर आपणही आपले दोन्ही पाय जमीनीवर टेकवूनच बोलले पाहिजे असा संकेत इथे गृहीत असतो. जर आपले पाय क्रॉस्ड म्हणजेच एकावर एक व्ही शेप्ड पोझिशनमध्ये असतील तर जो पाय वरती आहे त्याचे टोक आपल्या खुर्च्याच्या आतल्या दिशेने असले पाहिजे न की समोर बसलेल्या गेस्टच्या दिशेने!
असे कित्येक पत्रकार अकलेचे दिवाळे निघालेल्या अवस्थेत पोहोचले आहेत ही गोष्ट आपल्याकडे सर्वांना ज्ञात झालेली आहेच, किमान जी गोष्ट जगभराच्या मीडियात दाखवली जाणार आहे तिथे तरी यांनी माती खाऊ नये अशी अपेक्षाही आता बाळगता येणार नाही का?
मुलाखतीत जे प्रश्न विचारले गेले ते बालिश आणि पुस्तकी होते! साधे थेट प्रश्नही तुम्ही विचारू शकत नाही का? रशियाच्या अंतर्गत गृहस्थितीवर प्रश्न विचारण्याची परवानगी तुम्हाला मिळाली नसेल हे आपण एकवेळ समजू शकतो मात्र किमान जागतिक राजकारणावरचे कित्येक मुद्दे होते त्यावर तरी प्रश्न विचारले असते तरी चित्र थोडेसे बदलले असते! असो.
यात एक प्रश्न असा विचारला होता की, “भूतपूर्व सोव्हियत युनियनचे विघटन होऊन रशियासह 15 राष्ट्रे अस्तित्वात आली. मग आता ही सर्व राष्ट्रे पुन्हा एकत्र करुन नव्याने पूर्वीचा अखंड सोव्हियत रशिया निर्माण करण्याची आपला संकल्प आहे का?”
यावर पुतीन यांनी तशी कोणतीही योजना नसल्याचे सांगितले. शिवाय आता हे शक्य नाही. सर्व विभाजित राष्ट्रांचे राष्ट्रवाद भिन्न असून पुन्हा एकत्र येण्यास आवश्यक असलेल्या विचारधारेतही साम्य नाही. सबब ते शक्य नाही, असे सांगितले. प्रश्न विचारणाऱ्या बाईंना वेगळे उत्तर अपेक्षित होते हे त्यांच्या चेहऱ्यावरून जाणवले.
युक्रेन युद्ध, रशियावरचे आंतरराष्ट्रीय निर्बंध, भारतासोबतची निर्यात, मानवी हक्कांची गळचेपी, वॉर सेन्सॉरशिप, बेलारूसबरोबरचे डिप रुट्स, येवगेनी प्रीगोझीन यांच्या वॅग्नर ग्रुपची प्रायव्हेट आर्मी, नाटो ट्रीटीचे भवितव्य असे कित्येक महत्वाचे प्रश्न असूनही निव्वळ, तुम्ही आंबा कापून खाता की चोखून खाता अशा प्रकारचे प्रश्न त्यांनी विचारले! मग, विषप्रयोग करुन ठार मारलेल्या रशियन विरोधी पक्षनेते एलेक्सी नॅवेल्नी यांच्याविषयीचा प्रश्न यांनी कधी विचारावा! असो.
टोकदार पत्रकारीतेचे एक ताजे उदाहरण सांगण्याजोगे आहे. काही दिवसापूर्वी सौदीचे प्रिन्स अमेरिका दौऱ्यावर आले होते. 2018 साली सौदीच्या राजधानीत, निर्भीड पत्रकार जमाल खाशोगी यांची अतिशय निर्घृण हत्या करण्यात आली होती, ही हत्या प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या सांगण्यावरून झाली होती. खाशोगी यांनी प्रिन्सच्या एकाधिकारशाही विरोधात आणि दडपशाहीविरोधात आवाज उठवला होता. ते, वॉशिंग्टन पोस्ट या अमेरिकेच्या विख्यात दैनिकाचे प्रतिनिधी होते. त्यांच्या हत्येने अमेरिकेत मोठा संताप व्यक्त करण्यात आला होता. दोन्ही देशातले संबंधही ताणले गेले होते.
मागच्या पंधरवड्यात सौदी प्रिन्स अमेरिका भेटीवर आले असताना त्यांना या हत्येबद्दल अतिशय टोकदार आणि थेट प्रश्न विचारला होता, प्रिन्स सलमान यांचा पडलेला चेहरा खूप काही सांगून गेला. डॉनल्ड ट्रंप यांनीच हा प्रश्न उडवून लावला ही गोष्ट वेगळी! मात्र असा प्रश्न विचारला गेला हे महत्वाचे!
त्याच्या तुलनेत आपली पत्रकारिता अगदीच चरणचुंबक आणि मॅनर्सहीन झाली आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले! जागतिक पातळीवर जेव्हा असे खोबरे उधळले जाते तेव्हा सगळ्याच पत्रकारांना शल्य वाटते की नाही हा संशोधनाचा विषय ठरावा! कारण काही पत्रकार मित्रांना पत्रकारितेवर सवाल उठवले की खूप संताप येतो, मात्र एकंदरच पत्रकार किती कणाहीन होत चाललेत त्याविषयी त्यांना संताप येत नाही हे बोलके आहे!
पत्रकारांचे पाय जमीनीवर नसले की मग असे टंगडे वर होते आणि मग जग हसू लागते!
– समीर गायकवाड

