ताज्या घडामोडी

सोनसळचा ‘सोनहिरा’ पतंगराव…!

सोनसळचा ‘सोनहिरा’ पतंगराव…!

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज
संग्राहक : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 04/09/2024 : स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण उद्या (५ सप्टेंबर) राहुल गांधी यांच्या हस्ते… लाखभर लोकांच्या उपस्थितीत होत आहे. शरद पवारसाहेबही या कार्यक्रमासाठी मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पतंगरावांचे सगळे कर्तृत्व पवारसाहेबांनी पाहिलेले आहे.


पतंगराव यांचा जन्म ‘सोनसळ’ या छोट्याशा खेडेगावातील! त्यावेळच्या सातारा जिल्ह्यातील हे गाव… काही व्यक्तिमत्त्व अशी असतात की, हयातभर राब-राब राबतात… सामाजिक काम असो…. लोक शिक्षणाचे असो… सहकाराचे असो…. डोंगरावएवढी कामे उभी करतात. राजकीय पक्षनिष्ठा पतिव्रतेसारखी जपतात. पण, अशा व्यक्तिमत्त्वांचे महत्त्व त्यांच्या मृत्यूनंतर जास्त ओळखले जाते…. ‘केवढा मोठा माणूस होता..’ हे उद् गार ही व्यक्तिमत्त्वे गेल्यानंतरच ऐकू येतात. ती हयात असताना त्यांच्या कामाचे मोल समजले जात नाही म्हणा… किंवा त्या व्यक्तिमत्त्वालाही, कोण काय म्हणते, याची फार फिकीर नसते म्हणा…. पतंगराव त्यातीलच होते… आपले काम करत रहायचे… आणि आयुष्यभर त्यांनी केवढे मोठे काम उभे केले. आजही पुण्यातील रविवार पेठेतील रहाळकरांच्या चाळीत ७० वर्षांपूर्वी एका खोलीत त्यांनी सुरू केलेल्या शिकवणीच्या वर्गाच्या पाटीवर त्यांनी ‘भारती विद्यापीठ’ अशी पाटी टांगून गणित आणि इंग्रजी विषयांची शिकवण्या सुरू केल्या होत्या. पण ध्येय बघितले ते विद्यापीठ उभे करण्याचे…. सुरुवातीला ‘त्या पाटीला’ लोक हसत होते. पण, या जिद्दी माणसाने तुकारामबुवांच्या म्हणीप्रमाणे…. ‘कुणी निंदा… वंदा…’ आपले काम करत राहिले… आणि एक दिवस असा आला की, पंतगरावांनी ‘भारती विद्यापीठ’ स्थापन केलेच..! त्याला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळवला. एवढेच नव्हे तर आमदार झाले… मंत्री झाले… मुख्यमंत्री हाेता -होता ते पद त्यांच्या हातून निसटले… पण, काँग्रेसशी कायम निष्ठा राखून पतंगराव हा महाराष्ट्राच्या राजकारणातील एक, ‘सोनहिरा’च तेवढाच मनाचा मोकळा राहिला. त्या काळातील ती सगळीच माणसं… यशवंतराव चव्हाणसाहेबांचा तो जिल्हा… वसंतदादा, बाळासाहेब देसाई त्याच जिल्ह्यातील… क्रांतिवीर नाना पाटील त्याच जिल्ह्यातील, राजाराम बापू त्याच जिल्ह्यातील… बापू लाड त्याच जिल्ह्यातील… यशवंतराव मोहिते त्याच जिल्ह्यातील… किसन वीर त्याच जिल्ह्यातील…. लक्ष्मणशास्त्री त्याच जिल्ह्यातील…. असे एकही क्षेत्र नाही… त्या -त्या क्षेत्रातील उत्तुंग माणूस सातारा जिल्ह्यात त्यावेळी नव्हता. अशा या जबरदस्त जिल्ह्यात गरिबीत जन्माला आलेले पंतगराव प्राथमिक शिक्षणासाठी सोनसळ गावातून रोज तीन मैल पायी चालत जात होते…. तेवढेच अंतर कापून परत येत होते… मग त्यांनी पुढील शिक्षणासाठी कुंडल गाठले… मॅट्रीकपर्यंत त्यांनी कुंडलमध्ये शिक्षण घेतले… सोनसळ गावातील मॅट्रीक पास झालेला हा पहिला विद्यार्थी! मग कर्मवीर भाऊरावांच्या रयत शिक्षण संस्थेत त्यांनी ‘कमवा आणि शिका’ योजनेत काम करून दोन पैसे मिळवले. त्यांचे सहविद्यार्थी होते, रामशेठ ठाकूर. तेही त्याच ‘कमवा आणि शिका’ या योजनेतून बी. ए. बी. एड. झाले. त्या पिढीला ही जाण होती.
पतंगरावांनी पुण्याच्या वाडीया महाविद्यालयातून शिक्षण क्षेत्रातील पदवी मिळवली…. कायद्याची पदवी मिळवली… आणि १९८० साली ‘शैक्षणिक प्रशासनातील समस्या….’ या विषयावर पुणे विद्यापीठाला प्रबंध सादर करून त्यांनी पी. एच. डी. मिळवली…. पण, स्वत:च्या शिक्षणापेक्षासुद्धा, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव पतंगरावांना होती. त्यातूनच त्यांनी ‘भारती विद्यापीठ’ उभारण्याचे स्वप्न पाहिले होते. ‘भारती’ हे त्यांच्या मुलीचे नाव. पतंगरावांचा मोठा मुलगा अभिजीत हा तर १९९९ साली एका भयानक अपघातात हे जग सोडून गेला… तो धक्का सहन करणे सोपी गोष्ट नव्हती. किमान सहा महिने तरी पतंगराव आणि त्यांच्या सौभाग्यवती यांनी दिवस-रात्र यातना आणि अस्वस्थतेमध्ये घालवली… काही कौटुंबिक दु:खे अशी असतात की, ती कोणाला सांगताही येत नाहीत… मनाची घालमेल काय होऊ शकते… आणि घरातील कर्त्या पुरुषाला तर सगळं दु:ख पचवून उभे रहावे लागते… ते त्यांचे दु:खाचे दिवस मला माहिती आहेत… जेव्हा पंतगरावांच्या पत्नी सकाळपासून संध्याकाळपर्यंत घराची खिडकी उघडून लांब नजर करून दिवसभर कोणाची तरी वाट पहात असल्यासारख्या अश्रू ढाळायच्या. पतंगराव ते शांतपणे पहात होते. बापाला आपले दु:ख व्यक्त करता येत नाही… पचवावे लागते.. शेवटी त्यांनी पत्नीला समजावले… ‘अगं, आपल्या नशिबात तो एवढीच वर्षे होता. विश्वजीत आहे ना… त्याच्यातच आपण अभिजीत पाहू…. आणि भारती विद्यापीठातील सगळी मुलं आपलीच आहेत…’ पतंगरावांनी ही आठवण जेव्हा मला पुण्याच्या भारती विद्यापीठात सांगितली तेव्हा नकळत डोळ्यांतून अश्रू टपकले होते.
या दु:खद काळातही भारती विद्यापीठाचा व्याप… पतंगराव, त्यांचे मोठे बंधू मोहनदादा आणि धाकटे बंधू डॉ. शिवाजीराव या सर्वांच्या सहकार्याने आणि मेहनतीने बघता बघता भारती विद्यापीठाच्या १८० संस्था उभ्या केल्या. १९६४ साली पुण्यातील रहाळकरांच्या चाळीत १०X१० च्या घरातील ‘विद्यापीठ….’ आता दीड लाख विद्यार्थ्यांना शिकवत आहे! १९६८ साली पुण्यात शंकरराव मोरे विद्यालयाची स्थापना पतंगरावांनी केली. राजकारणातील त्यांचे खरे गुरु हे यशवंतराव माेहिते…. अत्यंत पुरोगामी विचारांचे… बाळासाहेब देसाई, यशवंतराव मोहिते, राजारामबापू, मधुकरराव चौधरी ही अशी त्यावेळची मंडळी… महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची कुवत असलेली मंडळी होती. पंतगराव हे यशवंतराव मोहिते यांचे शिष्य. पतंगरावांनी ‘यशवंतराव मोहिते लॉ कॉलेज’ उभे केले. त्याच काळात म्हणजे १९८३ साली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी, फार न शिकलेला महाराष्ट्राचा सर्वात शहाणा माणूस — त्यांचे नाव वसंतदादा पाटील…. ते पाहात होते की, ग्रामीण भागातील मुलांना मुंबई-पुण्याच्या स्पर्धेमध्ये उच्च शिक्षण घेता येत नाही… म्हणून आपल्या अधिकारात त्यांनी सर्व मदत करून खाजगी शिक्षण संस्थांना परवानगी देण्याचा अत्यंत क्रांतीकारी शैक्षणिक निर्णय घेतला. त्यात पतंगरावांना पुण्यातील ‘धनकवडी’ या कात्रज घाटाच्या पायथ्याशी असलेली जागा मिळाली. त्यातूनच ‘भारती विद्यापीठाचा’ प्रचंड पसारा उभा राहिला. भारती विद्यापीठाचे ते कुलपतीसुद्धा होते. आज या संस्थेत दीड लाख विद्यार्थी आणि २० हजार कर्मचारी आहेत.
पतंगराव हे १९८५ साली महाराष्ट्राच्या राजकारणात उतरले…. आताच्या पलूस (त्यावेळचा भिलवडी-वांगी) मतदारसंघातून सलग चार वेळा ते विजयी झाले. त्याच्या निवडणूक प्रचारात मी सहभागी झालो होतो… सामान्य माणसांना पतंगरावांबद्दलचे असणारे प्रेम मी डोळ्यांनी पाहिले आहे. कार्यक्रम संपल्यावर त्यांच्या भोवती ज्या गरीब महिला जमायच्या… पतंगराव तिथून निघताना खिशात हात घालून हातात येईल ती रक्कम त्या महिलांच्या हातात टेकवत होते…. हा ‘देणारा’ माणूस होता…. मंत्रीपदाच्या काळात त्यांच्यावर एकही ओरखडा आला नाही… अनेक खाती त्यांनी सांभाळली. अनेक संस्था उभ्या केल्या… सोनहिरा सहकारी साखर कारखाना, सागरेश्वर सूत गिरणी, कृष्णा-वेरळा सूत गिरणी, सांगली येथील ग्राहक भांडार आणि भारती विद्यापीठाच्या शैक्षणिक शाखांचे मोठे जाळे… अगदी दुबईतसुद्धा भारती विद्यापीठाची शाखा सुरू केली. दुबईतील त्यांचे अभियांत्रिकी, व्यवस्थापन आणि संगणकीय विज्ञाान केंद्र या अद्ययावत संस्था झालेल्या आहेत. एका गरिब कुटुंबातील हा विद्यार्थी एवढे प्रचंड काम उभे करू शकतो… मंत्रीपदाच्या स्पर्धेत टिकून राहतो… काँग्रेसशी निष्ठावान राहतो… मुख्यमंत्रीपद मिळाले नाही तरीसुद्धा, विलासराव असोत…. सुशीलकुमार असोत… मुख्यमंत्री झाल्यावर त्यांचे मोकळ्या मनाने अभिनंदन करतो…
२००४ ची गंमत सांगतो…. विलासरावांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले… आणि सुशीलकुमार शिंदेे मुख्यमंत्री झाले.. त्यांचे अभिनंदन करताना पतंगराव म्हणाले, ‘काय रे…. दोघातच वाटून घेताय का काय?’ विलासराव तेवढ्याच मोकळेपणाने म्हणाले, ‘पतंगराव, लातूरचा रस्ता सोलापूरहूनच जातो ना….’ आणि मग तिघांनीही एकमेकांना हासून टाळ्या दिल्या. इतक्या मोकळ्या मनाची ही माणसं होती आणि सुशीलकुमार शिंदेे आजही त्याच भावनेने राजकारणात आहेत.
पतंगराव अचानक गेले. ते जाण्यापूर्वी काँग्रेच्या ‘संघर्षयात्रा’ कार्यक्रमात त्यांना शे. का. पक्षाच्या उद्धवराव पाटील यांचे चिरंजीव धनंजय पाटील भेटले. उद्धवराव आणि बापू लाड या दोन नेत्यांबद्दल पतंगरावांना कमालीचा आदर. पतंगरावांचे शिक्षण बापूंच्या कुंडलमध्येच झाले होते. धनंजय पाटील यांची भेट झाली तेव्हा पतंगरावांनी कडकडून मिठी मारली… आणि म्हणाले, ‘अरे, तुझ्या घरी नक्की येणार आहे… केवढ्या मोठ्या नेत्याचा मुलगा आहेस तू….’ त्यावेळची नेतेमंडळी किती मोकळी-ढाकळी होती. दृष्टपणा… सूड, द्वेष… तिरस्कार याचा लवलेष त्यावेळच्या राजकारणात नव्हता. आजच्या राजकारणात आता हे निर्लेपपण सगळ्याच बाजूंनी हरवल्यासारखे झालेले आहे. यावर्षी भरपूर पाऊस झाला… रान हिरवंगार झालं… तरी महाराष्ट्रात मात्र समंजस्यपणाचा आणि सुसंस्कृपणाचा फार मोठा दुष्काळ पडल्याचे जाणवत आहे. आणि प्रत्येक दिवशी हे दुष्काळी पट्टे महाराष्ट्रभर वाढत चालले आहेत. अशावेळी पतंगराव, विलासराव, आर. आर. आबा, गोपीनाथ मुंडे ही त्यावेळची समवयस्क मोकळ्या मनाच्या नेत्यांची महाराष्ट्राला आठवण येतेच.
‘भारती विद्यापीठ’ सुरु केल्यावर पतंगरावांनी किती गरजू मुलांना मदत केली असेल, याची यादी ठेवायला पाहिजे होती. गरिब पालकांच्या कितीतरी मुलांची फी त्यांनी माफ केली… किंवा अर्धी केली. पण ते बापाला दम द्यायचे… ‘पोरगं चांगल्या मार्कांनी पास व्हायला पाहिजे….’ बोलायला एकदम मोकळे आणि स्पष्ट हाेते…. काहीवेळा हा स्पष्टपणा त्यांना अडचणीचाही ठरला… पण स्वभावाला औषध नसते… आणि त्याचे पंतगरावांना कधीही काहीही वाटले नाही. ते त्यांच्या मिजाशीत आणि ऐटीत जगले. वरिष्ठ नेत्यांच्या भोवती ते कधी फार घोटाळताना दिसले नाहीत. किंवा मुख्यमंत्री होण्याकरिता ‘फिल्डींग’ लावण्याचा जो कार्यक्रम असतो… तशा नादालाही ते कधी लागले नाहीत. पण, एक गोष्ट नक्की सांगितली पाहिजे…. या कर्तृत्त्ववान नेत्याने महाराष्ट्रात जेवढे काम उभे केले त्या मानाने त्यांचे कौतुक आणि दखल महाराष्ट्राने घेतली नाही. त्यांच्यातील कार्यकर्ता, नेता आणि शिक्षणशास्त्री यशवंतराव मोहिते यांनाच कळला होता…
ते राजकारणात आल्यावर भारती विद्यापीठाचा व्याप ते सांभाळातच होते. प्रत्येक संस्थेत त्यांचे लक्ष होते. पण त्याचवेळी त्यांचे बंधू डॉ. शिवाजीराव कदम हे ही ३०-३५ वर्षे

‘लक्ष्मणासारखे’ त्यांच्यासोबत होते आणि आजही आहेत. २५ वर्षे डॉ. शिवाजीराव हे प्राचार्य होते. आणि आता कुलपती आहेत. आणि भारती विद्यापीठाचा सर्व पसारा त्यांनी पतंगरावांच्याच कार्यक्षमतेने सांभाळलेला आहे.
पतंगरावांच्या राजकीय आघाडीवर आता विश्वजीत कदम अतिशय आत्मविश्वासाने स्वत:चे नेतृत्त्व निर्माण करून ठाम उभे आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत सांगली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने काँग्रेसला जागा सोडली नाही. सांगलीची जागा ही काँग्रेसची जागा होती. पण, शिवसेनेने चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करून टाकली. ते आव्हान स्वीकारून विश्वजीत कदम यांनी पुढाकार घेतला आणि विशाल पाटील यांना अपक्ष उमेदवार म्हणून उभे केले.. प्रतिक पाटील हेही सोबत ठाम राहिले आणि दादांच्या घराण्याने विश्वजित कदम यांच्यासह सांगलीत यश मिळवले. निवडून आल्यानंतर विशाल यांना लाेकसभेतील काँग्रेस पक्षाचा सहसदस्य करून घेण्यात विश्वजीत कदम यांनीच पुढाकार घेतला. नशीब महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांनी अपक्ष निवडणूक लढवणारऱ्या विशालवर निलंबनाची कारवाई केली नव्हती!
आज रोहित पवार, विश्वजीत कदम, सत्यजित तांबे, रोहित आर. आर. आबा पाटील, अमोल कोल्हे, प्रणिती शिंदे, संदीप क्षीरसागर, हे तरुण उद्याच्या महाराष्ट्राचे नेते आहेत. विश्वजीत यांना खूप पुढे जाता येईल…
पतंगरावांच्या पुतळ्याचे लोकार्पण आणि ‘लोकतीर्थ’ या स्थळाचे लोकार्पण हे दोन्ही कार्यक्रम पतंगरावांच्या कामाची स्फूर्ती देत राहतील… या कार्यक्रमाला शरद पवारसाहेबही उपस्थित राहणार आहेत. राहुल गांधी आणि शरद पवारसाहेब या दोन नेत्यांच्या हातात महाराष्ट्र आणि देशाचे भवितव्य आहे. राहुल गांधी हे ५४ वर्षांचे आहेत… पवारसाहेब ८४ वर्षांचे आहेत. फरक फक्त ३० वर्षांचा आहे. पण इच्छाशक्तीमध्ये दोघांच्या वयामध्ये कोणताच फरक नाही. पवारसाहेबांची महाराष्ट्रभर फिरण्याची क्षमता थक्क करणारी आहे. कडेगाव येथील पुतळा अनावरणाचा कार्यक्रम संपला की, ते खटाव तालुक्यात रयत शिक्षण संस्थेच्या एका नवीन शाळेच्या लोकार्पणासाठी जाणार आहेत… आणि रात्री १२ वाजता ते पुण्याला पोहोचतील… सकाळी ८ वाजता पुन्हा त्यांना भेटणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या किमान १०० असेल…
पतंगराव यांच्या पुतळ्याच्या लोकार्पणाचा कार्यक्रम हा ५ सप्टेंबर रोजी ‘शिक्षक दिनी’ आहे. या दिवशी हा कार्यक्रम घेणे यातील औचित्यही फार मोठे आहे. रहाळकरांच्या माडीवरील पतंगरावांनी जीवनाची सुरुवात शिक्षक म्हणून केली होती. आणि आयुष्यभर ते काहीतरी नव्याने शिकतच राहिले… करतच राहिले… आणि त्यातून अनेकांना शिकायला मिळाले.
त्यांच्या स्मृतीस मन:पूर्वक अभिवादन..!


                          मधुकर भावे
                          9869239977📞

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.