ताज्या घडामोडी

रानभाजी – रानशेपू

रानभाजी – रानशेपू

शास्त्रीय : Glossocardia bosvallea
कुळ : Asteraceae
इतर नावे : कडकशेपू, दगडीशेपू, खडकशेपू, मिरगी, पिठपापडा, घोरपडीचा पाला

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज
संग्राहक : प्रविण सरवदे/आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 04/09/2024 :

पोषकतत्वे
# रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे.
# पचनक्रिया सुरळीत ठेवते.
औषधी गुणधर्म
# ज्वरनाशक म्हणून उपयोगी तसेच जखमा भरून काढते. # डोळे आणि कान दुखी साठी उपयुक्त # कोठा साफ करते. # दारूचे व्यसन सोडविण्याकरिता याच्या काढ्याचा उपयोग दक्षिण भारतातील काही भागात केला जातो.
चवीला उत्कृष्ठ अन विविध आयुर्वेदिक घटक असणारी शेपूची भाजी रानावनात, दगडात, दगडकोपऱ्यात, कातळांवर, माळरानात उगवते. या शेपूला दगडी शेपू असेही म्हणतात. कदाचित तुम्ही ही रानशेपू पाहिली असेल; पण अन्नात तिचा कसा उपयोग करायचा हे माहिती नसेल. सर्वसाधारपणे वर्षभर आपल्या भाजी बाजारात शेपूच्या पेंड्या विक्रीसाठी येतात. अनेकजण शेपू विकत घेत नाहीत. खातही नाहीत. शेपूचे ढेकर अनेकांना पचणी पडत नाही; पण शेपू खूप औषधीदृष्ट्या महत्वाची आहे. असे म्हणतात की, एखादा गोड पदार्थ खाण्याआधी शेपूची भाजी खाल्ली तर ढेकर गोड पदार्थाची येत नाही ती शेपूच्या भाजीची येते. लहान मुले, अगदी वयस्क लोकही ही भाजी खात नाहीत. पण या शेपूच्या भाजीचा रानभाजी म्हणून उल्लेख होतो. वनस्पतीशास्त्राच्या काही पुस्तकांमध्ये ‘कड विड’ असा उल्लेख रानभाज्यांच्या बाबतीत दिसतो. ही रानशेपू किंवा दगडी शेपू कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी, पन्हाळा, चंदगड, गडहिंग्लज, शाहुवाडी, कागल, आजरा आदी भागात क्वचित दिसते. ही दगडी शेपू हातकणंगले, शिरोळ, सोलापूर, सांगली, पुणे जिल्ह्यातील काही भागात, विदर्भ, मराठवाडा इथे ही दगडी शेपू अधिक दिसते. ही शेपू आणण्यासाठी तुम्हाला भटकंती करावी लागेल. आगळवेगळी ही दगडी शेपू खाण्याची मुळात आवड हवी. पर्जन्यछायेच्या (कमी पाऊस) प्रदेशातील माळराने, भुंडे डोंगररांगा, खडक, दगडे, कातळ, खाणींच्या बाजूला ही दगडी शेपू असते. जिथे उन्हाळ्यात जास्त तापमान आहे, तिथे ही शेपू तयार होते. हलका पाऊस, धुक्‍यातून मिळणाऱ्या पाण्यावर ही शेपू उगवते. दगडी बेचक्‍यात ती दिसते. माती, पाणी एकत्र आले की, ही शेपू तयार होते. खडकांवर ही शेपू पसरत जाते. जाळी पद्धतीने तिची वाढ होत जाते. ही दगडी शेपू आणून वाळवून ठेवता येते, जेणेकरुन तुम्हाला वर्षभर जेवणात ती खाता येते. विशेषत: नदी किनारी, वाळू दगड असलेल्या भागात सुद्धा ती दिसते. ही शेपू बारीक करुन लोखंडाच्या तव्यावर टाकून तिखट, मीठ, चटणी, तेल टाकून खमंगपणे करता येते. चविला मस्त असल्याने भाकरी, चपाती बरोबर खाता येईल. काही रानभाज्या कमी पावसाळी प्रदेशातही उगवतात. या भाज्या आणून तिची चव घेतली पाहिजे. ही दगडी शेपू जास्त पावसाळी वातावरणात येत नाही. जिथे पाऊस कमी येतो तिथे ती येते.
प्राचार्य डॉ. मधुकर बाचुळकर
वनस्पतीशास्त्रज्ञ
पाककृती
शेपूची कोवळी भाजी, मुळ्या काढून टाका व भाजी निसून भरपूर पाण्यात धुवा आणि पिळून घ्या. तव्यात तेल घाला, तापल्यावर कांदा घातल्या नंतर भाजी घाला. मग तांबडं किंवा हिरव्या मिरच्याचा खर्डा किंवा कुरविलेल्या मिरच्या असेल तर लसणाच्या चारपाच पाकळ्या चेचून घाला,असेल तर शेंगदाण्याचे कूट भुरळा, चवीपुरते मीठ घालून पाण्याचा हबका मारून झाका आणि पाचेक मिनटं दमुद्या. मसूराची, तुरीची, मुगाची डाळ किंवा आख्ये मूग घ्या, या साठी कांद्याची गरज नाही. वरीलप्रमाणे फोडणी देऊन त्यात जी असेल ती डाळ घाला. वरील पदार्थ घाला. डाळ थोडी शिजल्यावर शेपू घालावा. पाणी खूप कमी घालावे, भाजी कोरडी झाली पाहिजे. शेंगदाण्याचे कूट घातल्यास भाजी घट्ट होण्यास मदत होते आणि चवीत फरक पडतो. खाण्याऱ्याच्या आवडी प्रमाणे किंवा उपलब्धते नुसार पदार्थ वापरावेत. भाजीत आख्खे मूग वापरताना भिजवून घ्यावेत आणि जर ते हलक्या हाताने भाजून घेतले तर चवीत आणखी फरक पडेल.
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.