ताज्या घडामोडी

स्वयंसिद्धा स्री जीवनातील वास्तव चित्रण – रकमा

मुखपृष्ठ परीक्षण क्रमांक : चार
————————————–
स्वयंसिद्धा स्री जीवनातील वास्तव चित्रणरकमा

Akluj Vaibhav News Network.

🔰 संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 23/07/2024 :

सोलापूरच्या लेखिका संध्या सूर्यकांत धर्माधिकारी यांची “रकमा” या कलाकृतीचे मुखपृष्ठ पाहण्यात आले. विविध विषयांच्या एकूण बारा कथानक गुंफलेल्या या कथासंग्रहाच्या मुखपृष्ठाचे निरीक्षण केले असता हि कलाकृती ग्रामीण भागातील स्रीला केंदस्थानी ठेवून साकारण्यात आली असल्याचे निदर्शनास आले. अतिशय अर्थपूर्ण असलेल्या या मुखपृष्ठातून खूप काही दडलेले अर्थ सांगितले आहेत. या कलाकृतीच्या मुखपृष्ठावर एक साधारणतः नव्वदी ओलांडलेली वृद्ध स्री क्षितिजाकडे तोंड करून बसली आहे, संध्याकाळची वेळ झाली आहे, क्षितिजावर गडद अंधार पसरत चालला आहे , सूर्य मावळतीला चाललेला दिसत आहे , या सूर्याच्या मध्यभागापासून कलाकृतीचे “रकमा” शीर्षक दिलेले आहे. असे चित्र असलेली कलाकृती पाहताक्षणीच एका ग्रामीण भागातील हे मुखपृष्ठ असल्याचे जाणवते असे असले तरी या मुखपृष्ठातून स्रीच्या जीवनातील वास्तव चित्रण दिसून येते. या मुखपृष्ठाचा आपण आज विचार करणार आहोत.
“रकमा” या कलाकृतीच्या मुखपृष्ठावर एक साधारणतः नव्वदी ओलांडलेली वृद्ध स्री क्षितिजाकडे तोंड करून करून बसली आहे, संध्याकाळची वेळ झाली आहे, क्षितिजावर गडद अंधार पसरत चालला आहे असे चित्र रेखाटलेले दिसत आहे, याचा अर्थ असा आहे की, लेखिका संध्या धर्माधिकारी यांनी यातील जी स्री या मुखपृष्ठावर साकारली आहे ती समाजातील विधवा (स्वयंसिद्धा) स्रीचे प्रातिनिधिक पात्र आहे. संसारात नवरा कसाही असला तरी त्याच्यासोबत आयुष्य काढावेच लागते. रकमा नावाच्या अशाच एका स्रीला आलेला अनुभव, त्यातून नवऱ्याविषयीच्या असलेल्या कल्पनेला गेलेला तडा, तरीही संसारात मन रमवणे हे रकमाने जाणले. स्रीने मनाने कधीच हार मानू नये यासाठी या कथेत एक सुंदर वाक्य दिले आहे “बीजानं रुजायचंच ठरविले तर परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, मायेच्या ओलाव्याचा पुसटसाही झरा नसला तरीही ती रुजते, वाढते, फोफावते आणि बहरतेही” हेच जणू रकमाने आपल्या जगण्यातून सिद्ध करून दाखवले. पतीच्या निधनानंतर आलेले वैधव्य , तिच्या वाट्याला आलेले दु:ख आणि यातून मार्ग काढून सुखी समृद्ध जीवन जगण्याचा प्रयत्न हे या मुखपृष्ठावर दिसून येते. अर्ध्या आयुष्यातून जीवनाचा जोडीदार इहलोकी गेल्यावर उर्वरित आयुष्य भग्न काचेच्या तुकड्यांसारखे भासते. नवरा गेल्यानंतर आपले आयुष्य कसे जगावे हा आशावादी विचार मनात जरी असला तरी आयुष्य खूप सुंदर आहे ते जगता आले पाहिजे, संकटांना सामोरे जाऊन आव्हानांना पेलता आले पाहिजे ही सकारात्मकता मनात घेऊन घेऊन ही नव्वद वर्षाची वृद्ध स्री हसतमुख चेहऱ्याने क्षितिजाकडे बघत आहे. तिच्यातील ही सकारात्मकता हा महत्वाचा संदेश लेखिकेने या मुखपृष्ठातून दिला आहे.
आयुष्याच्या उंबरठ्यावर असतांना स्री म्हणून जे भोग भोगायचे होते ते भोग भोगून झाले, आयुष्यभर कष्ट केले आता म्हातारपणात नातवंड अंगाखांद्यावर घेऊन फिरवायचे ,सुना सांभाळायच्या आणि आपले उर्वरित जीवन जपमाळ घेऊन जपत रहायचे. म्हणून ही वृद्ध स्री एकटीच बसलेली दाखवली असावी. जसं जसे वय वाढत जाते तसे तसे शरीर वृद्धत्वाकडे झुकत जाते, मनात गत आयुष्याच्या आठवणी दाटून येतात, सांज कलताना दिवसभराच्या घटना जशा दृष्टीपटलावर तरळून जातात तशाच घटना आयुष्याच्या सायंकाळी मनात घोळत असतात या आयुष्यातील घटना म्हणजे समोर दिसणारा अंधुकसा संधिप्रकाश आहे. हा संधिप्रकाश म्हणजे स्रीच्या आयुष्यभराच्या आठवणी रेखाटल्या आहेत. तसेच स्रीच्या हृदयस्थानाच्या पुढे जो तेजोमय प्रकाश निघाल्यासारखा दिसतो त्याला खूप महत्व आहे. समाजात आपल्या कर्तृत्वाचा तेजोमय प्रकाश दाखवला पाहिजे या अर्थाने हा तेजोमय प्रकाश दाखवला असावा असे मला वाटते. आणि तो या कथासंग्रहाला साजेसा आहे. कारण कथासंग्रहातील सर्वच स्री पात्र तशाच प्रकारे आलेले आहेत.
“रकमा” या कलाकृतीच्या मुखपृष्ठावर सूर्य अस्ताला जाताना दाखवला आहे आणि त्यात रकमा नाव सूर्याच्या अर्ध्याभागावर लिहले आहे, याचा अर्थ असा की, या कलाकृतीतील शीर्षक कथेतील रकमा या स्री पात्राचा पती विठोबा हा तिला जीवनात अर्ध्यावर सोडून इहलोकी गेला आहे. कलाकृतीवर दाखवलेला सूर्य हा रकमाच्या पतीचे प्रतिनिधित्व करतो तर रकमाचे नाव सूर्याच्या अर्ध्या भागावर लिहले म्हणजेच पती अर्ध्यावर सोडून गेला आहे असा अर्थ यातून दाखवला असावा असे मला वाटते. या कलाकृतीच्या मुखपृष्ठावरील वृद्धा जमिनीवर पाय पसरून बसली आहे याचा अर्थ असा जाणवला की, आयुष्यात कितीही दुखः आले तरी खचून जाऊ नये, आणि कितीही सुख आले तरी हवेत राहू नये.. आपले पाय नेहमी जमिनीवरच असावे. या अर्थाने ही वृद्धा जमिनीवर पाय ठेवून बसली आहे.
“रकमा” या कलाकृतीतील सर्व कथा स्री पात्राच्या भोवती फिरताना दिसतात. या कथासंग्रहातील स्री पात्र अडाणी, ग्रामीण भागातील असल्याने कथेचा बाज ग्रामीण जीवनाशी निगडीत आहे. कथेतील बोलीभाषा लेखिकेने अत्यंत काळजीपूर्वक हाताळली आहे. माकडवाली कमल या कथेतून जौनपुरची भोजपुरी भाषा देखील लेखिकेने सुलभतेने लिहली आहे. माकडावर असलेले प्रेम , मुलाची अपेक्षा यातून कमलची धडपड, हे सारे प्रश्न नैतिक अनैतिकतेच्या प्रवाहात तसेच राहतात. या कथासंग्रहातील देवाज्ञा, न्हानं, हेळवी, जितराब, भिशी, पयलं पाणी, माकडवाली कमल, कोलदांडा, ओढ, रकमा, ब्या ला धरलया, आणि एक दिवस ऑफिसचा या सर्वच कथा वाचनीय असून स्री जीवनाचे दुखः , भावना यातून मांडल्या आहेत.
‘रकमा’ या कथासंग्रहाचे अर्थपूर्ण मुखपृष्ठ श्रीराज धर्माधिकारी यांनी अतिशय सुबक आणि कथासंग्रहातील प्रत्येक कथेतील पात्राला आणि त्यातील संदर्भाला शोभतील असेच केले असून कवितासागर पब्लिकेशन, जयसिंगपूर यांनी या कलाकृतीला प्रकाशात आणले आहे. वाचकांच्या संग्रही रहावी अशी कलाकृती साहित्य क्षेत्रात आपले नाव अबाधित ठेवीत आहे. या कलाकृतीला एकूण सात पुरस्कार मिळाले असून नुकताच संत गाडगेबाबा विचारमंच ओतूर, जि. पुणे यांच्याकडून पुरस्कारही प्राप्त झाला आहे. तसेच या कथासंग्रहाला महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून अनुदानही मिळालेले असून वाचकांनी अल्पावधीतच स्वीकारले आणि आपलेसे केले हे या कलाकृतीचे भाग्य आहे. लेखिका संध्या धर्माधिकारी यांना पुढील लेखनास खूप खूप शुभेच्छा … तुर्ताच इतकेच…


कलाकृती परीक्षण- प्रशांत वाघ (पॅसिफिक टायगर)
संपर्क- ७७७३९२५००० ( तीन सत्ते एकोणचाळीस पंचवीस हजार)

कलाकृतीचा परिचय
कलाकृतीचे नाव- रकमा
साहित्य प्रकारकथासंग्रह
लेखिकासंध्या सूर्यकांत धर्माधिकारी,                  मोबा.नं. 99 22 15 63 35

मुखपृष्ठश्रीराज धर्माधिकारी
प्रकाशक- कवितासागर पब्लिकेशन, जयसिंगपूर

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.