ताज्या घडामोडी

वारकरी…. टाळकरी… माळकरी…

वारकरी…. टाळकरी… माळकरी…

Akluj Vaibhav News Network.

🔰 संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 17/07/2024 :

गुढी पाडवा, गणपती, दसरा-दिवाळी या सण आणि उत्सवांपेक्षा मला आषाढी-एकादशी हा दिवस अधिक भावतो. कारण काय…? सांगता येणार नाही. पण, बाकी सर्व सण किंवा उत्सव आणि आषाढी एकादशीचा दिवस यात खूप फरक वाटत राहतो. हा आत्मचिंतनाचा दिवस आहे, असे वाटते. दुथडी भरून वाहणारी चंद्रभागे तीरी उभा असलेला लाखोंच्या संख्येतील वारकरी. सामान्यातील सामान्य माणसाच्या मनात वर्षभर कायम राहिलेल्या विठुरायाच्या दर्शनासाठी अंतरिक ऊर्जेने येणारे लाखो वारकरी, हे चित्र संपूर्ण जगात आगळे-वेगळे आहे. ‘सोवळे-ओवळे, जात-पात,’ हे सारे गळून पडते आणि विठुनामाच्या जयजयकारात एका सम पातळीवर हा वारकरी येतो. या लाखोंच्या संख्येला कोणी नेता नाही…. त्याची गजरही नाही… कारण या सगळ्यांचा त्राता तो विठुराया आहे. असा हा जगातील विलक्षण दिवस आहे. आधार नसलेल्या आकाशातून पडणारा पाऊसही याच महिन्यात सर्वाधिक बरसतो आणि हिरव्या-गार निसर्गाच्या त्या खळाळणाऱ्या पाण्यातून वाट काढत हा विठू भक्त ‘कधी एकदा त्याचे दर्शन होते’ याची तीव्र आस या वारीतील वारकऱ्याला आहे. शेकडो वर्षांची परंपरा! हा विलक्षण क्षण. ज्ञाानोबा-तुकोबापांसूनची ही विठुरायाची भक्ती, हरिनामाचा गजर, त्या दिंड्या-पताका, ते रिंगण, त्या पालख्या, डोक्यावर तुलसी वृंदावन घेवून झपाझप चालणाऱ्या त्या भगिनी…. वर्षभराच्या कष्टात हा एकच दिवस असा आहे की, त्याचे दर्शन झाले रे झाले की, वर्षभर जगण्याची ही एक प्रचंड ऊर्जा घेवून महाराष्ट्रातील कामकरी-कष्टकरी-वारकरी विठूनामाचा गजर करीत परततो. गळ्यात तुळशीची माळ घातलेला हा वारकरी विलक्षण संस्काराचा आहे. मुखात विठूचे नाम आणि गळ्यात माळ, हा फार वेगळा संस्कार आहे. कोणत्याही उत्सवात… सणवारात एवढी सात्विकता दिसणार नाही. साधेपणाही दिसणार नाही. तो भक्त काही मागण्याकरिता येत नाही. पण, न मागताही जी ऊर्जा घेवून जातो, ती आजच्या दिवसाचे सामर्थ्य आहे, असे मला वाटते. बाकी कोणत्याही सणात, उत्सवात हे सामर्थ्य मिळण्याची अपेक्षा कोणीच करत नाही. म्हणून ‘आषाढी-एकादशी’ हा दिवस वेगळा आहे. पुढे चार महिन्यांनी हिवाळ्यात येणारी कार्तिकी एकादशीही आहे. नंतर चार महिन्यांनी उन्हाळ्यात येणारी महाशिवरात्री आहे. पण… आषाढीची ओढ काही वेगळीच आहे… आणि या संत परंपरेचा आणि वारकरी पंथाचा इतिहासही विलक्षण आहे. आजच्या महाराष्ट्राच्या समाज जीवनातील जाती-पातींची रस्सीखेच ज्या दिवशी गळून पडते, तो हा दिवस आहे. या मेळाव्यात जात-पात शिल्लक राहात नाही. अठरा पगड जाती एका विठुरायाच्या गजरासाठी एकत्र येतात. महाराष्ट्राच्या संत परंपरेचा हा संदेश आहे. ज्ञाानोबा ते तुकोबा अशी ही संत परंपरा आहे. जगामध्ये ही दोन नावे अशी आहेत की, १२०० व्या शतकातील ज्ञाानेश्वर आणि १६०० व्या शतकातील तुकाेबा… ४०० वर्षांचा फरक आहे. जगात अशी दोन नावे दाखवा जी ४०० वर्षांच्या फरकानेही एकमेकांशी जोडून एवढी एकजीव झालेली आहेत. ‘ग्यानबा’ म्हटले की ‘तुकाराम’ हा शब्द आलाच…. आणि पंढरीच्या दारात तो उभा असलेला वीणेकरी…. लहान मुलगा का असेना…. पण, त्या वीणेकऱ्यांत पांडुरंग पाहून त्याच्या पायावर डोके ठेवणारी ही संत परंपरा आहे. किती मोठा संस्कार आहे हा… आणि या संत परंपरेने हे संस्कार आम्हाला शिकवलेला आहे. महाराष्ट्राला शिकवलेला आहे… मडकी तयार करणारा तो गोरा कुंभार तयार झालेले मडके ‘कच्चे की पक्के’ असे म्हणून, चवलीचे नाणे त्या मडक्यावर वाजवतो… आणि क्षणामध्ये त्याला वाटते की, ‘अरे, माझे मडके कच्चे की पक्के’ आणि मग डोक्यावर ते नाणे वाजवून बघतो… हे त्याचे आत्मज्ञाान. त्याला विठुभक्तीतून झालेले आहे. मळ्यामध्ये तण उपटताना ‘माझ्या मनात अविचारांचे किती तण आहेत…’ अशी भाषा सावतामाळी बोलतो. हा काही त्याचा प्रज्ञावाद नाही… हे त्याचे आत्मज्ञाान आहे. लोकांची डोकी साफ करता करता ‘माझ्या डोक्यात किती मळ शिल्लक आहे’, असे म्हणणारे संत सेना महाराज…. अशी ही महान संत परंपरा… अठरा पगड जातींची आहे आणि त्या सर्व जाती गळून पडून त्यांच्या भावाचा भुकेला हा देवही कोणतीही जात-पात न मानता सर्वांना प्रसन्न होणारा आहे. खरा ‘समाजवादी देव’ पंढरपुरचा विठुराया आहे… आणि तो गरिबांचा देव आहे… या मांदियाळीत श्रीमंत पैसेवाले तुम्हाला दिसणार नाहीत… किंवा जग्वार गाड्या घेऊन कोणी आलेले आधुनिक श्रीमंत तुम्हाला पहायला मिळणार नाहीत.
हे सगळे वारकरी श्रद्धेने आलेले आहेत. रामायणातील कथांपेक्षाही, पंढरपुरच्या पांडुरंगाच्या कथा या कथा मनाला अधिक भावतात… भिडतात…. आणि आत्मचिंतन करायला लावतात आणि मग पंढरीचा पांडुरंग आपल्या भक्तालासुद्धा किती अंजारतो…. गोंजारतो… मग तो पुंडलिक आठवतो… ज्याने या पांडुरंगाला विठेवर उभे करून ठेवले. ‘आई-वडीलांची सेवा करतो आहे… तू अवचित आलेला आहेस… तिथे उभा रहा…’ आणि हा विठुराया त्या सेवेचे कौतुक करीत विटेवर उभा आहे. मनाला किती भिडून जातात या कथा…. केवढा मोठा संदेश देतात… ‘देवापेक्षा माय-बाप देव मोठा आहे’ हे पुंडलिक सांगत आहे. आणि मग ज्या चंद्रभागे तीरी विठुरायाचे मंदिर उभे राहते त्याच चंद्रभागे तीरी त्याचा भक्त असलेल्या पुंडलिकाचे मंदिर उभे राहते, हा काय विलक्षण भक्तीसंगम आहे. देवावर कोणी विश्वास ठेवा… न ठेवा… देव आहे की नाही, याची चर्चा ज्यांना करायची त्यांनी करा… पण, एक अफाट सामर्थ्याचा साक्षात्कार देणारी अदृष्य शक्ती त्याला नाव काहीही द्या… मानवापेक्षा कितीतरी अधिक पटीने प्रभावी वाटते. हाच विठुराया जनीच्या घरी दळण दळायला जातोय…. दुष्काळात गरिबांना अन्न नाही म्हणून कोठारातील धान्य वाटून टाकणाऱ्या दामाजीच्या धान्याचा हिशेब द्यायला विजापूरच्या बादशहाच्या दरबारात हजर होतोय… कथा-कादंबऱ्या वाचताना तल्लीन होणाऱ्या वाचकांपेक्षा या समतावादी पांडुरंगाचा हा सगळा अविष्कार मन आणि बुद्धी हेलावून टाकते. या आषाढी एकादशीचे मोल त्यामुळेच जास्त वाटते… गरिबातील गरीब वारकरी आज इथे हजर आहे. आणि वारी म्हणजे ‘सहल’ नव्हे. ही एक तपश्चर्या आहे. गळ्यातील माळ म्हणजे लॉकेट नव्हे. माळ तुटली तर दुसरी माळ लगेच घालता येत नाही… ज्ञाानेश्वर माऊलींच्या ज्ञाानेश्वरीवर सात दिवस माळ ठेवून तेवढेच दिवस उपवास करण्याचे तप करावे लागते आणि फारसा न शिकलेला भक्तीमार्गातील हा वारकरी श्रद्धेने हे सगळे करतो… तो किती शिकला, याची चर्चा करू नका… आधुनिक जगाला त्या माळेचे महत्त्व समजो न समजो… पण, जो भक्त ती माळ गळ्यात घालतो, त्याला सदाचाराने वाग, असे सांगावे लागत नाही. दारू पिऊ नको, हे सांगावे लागत नाही… सत्संग शिकवावा लागत नाही…. प्रामािणकपणे काम कर, हेही सांगायला लागत नाही. ही साधी-साधी माणसं त्यांच्या वागण्यात श्रद्धा मिसळून भक्तीभावाने उद्धरून गेलेली आहेत. आणि हा देश अशा ९० टक्के प्रामाणिक, सश्रद्ध माणसांच्या जीवावर आज उभा आहे. नेत्यांच्या जीवावर नाही… म्हणून जगात या वारकरी सांप्रदायाला एक चारित्र्य आहे. तुम्ही ज्ञाानी असा किंवा नसा…. ज्ञान ही फार मोठी गोष्ट आहे. सर्वांना पेलणारी नाही. पण श्रद्धा किंवा भक्तीला ज्ञाानाची गरज नाही. त्यासाठी आत्मज्ञानाची गरज आहे. हा वारीतील आमचा वारकरी अनेक पदवी वाल्यांपेक्षा जास्त ‘आत्मज्ञानी’ आहे. लाखो भाविकांचा आजचा चंद्रभागेच्या तीरी होणाऱ्या भक्ती संगमाचा हा अर्थ आहे…. म्हणून आजचा दिवस हा विलक्षण चिंतनाचा दिवस आहे. उपवासालाही काही वैज्ञाानिक आधाराचे अर्थ आहेत. पावसाळ्यातील आषाढी, हिवाळ्यातील कार्तिकी आणि उन्हाळ्यातील शिवरात्री या प्रत्ये उपवासात १२० दिवसांचे अंतर आहे. ऋतुचक्र बदलताना हे नेमके उपवासाचे दिवस आलेले आहेत. मध्येच २७ एकादशी आहेत. म्हणजे वर्षभरातील ३० दिवसांचे उपवास हे केवळ ‘मन शुद्धीसाठी’ सांगितले नसून…. ‘शरीर शुद्धीसाठी’ही त्याचे फार महत्व आहे. आज ‘डाएट’ हा शब्द प्रचिलत आहे… पण तो शब्द उपवास या अर्थाने नवीन माध्यमातील शब्द आहे. हे सगळं आषाढी-एकादशी शिकवते आहे. आजच्या वैज्ञाानिक युगात आषाढीच्या एकादशीच्या उपवासाच्या पदार्थांची थाळी तयार करून त्याचेही प्रदर्शन सकाळपासून सोशल मिडीयावर सुरू आहे. एका थाळीत चाळीस पदार्थ दाखवले आहेत. आषाढी दुप्पट खाण्याकरिता नाही… संयमाकरिता आहे. चिंतनाकरिता आहे… आणि आत्मचिंतनाकरिता आहे. जे पंढरपूरला पोहचू शकत नाहीत, ते आत्मचिंतनाने तिथे पोहचू शकतात आणि आजचा दिवस आत्मचिंतनात घालवलेले समाधान त्यांना काय मिळू शकेल, हे अनुभव घेतल्याशिवाय त्यांना कळणार नाही. असा हा आजच्या आषाढीचा अर्थ आहे.
आज साने गुरुजींची आठवण होते. याच पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात जेव्हा ‘अस्पृशांना’ बंदी होती, तेव्हा साने गुरुजींनी प्राण पणाला लावले. आपल्या धर्म मार्तंडांनी आणि बडव्यांनी देवालाही किती संकुचित करून बंधनात जखडुन ठेवले होते. त्यासाठी एका गुरुजींना प्राण पणाला लावावे लागले. तेव्हा पंढरपुरच्या विठ्ठल मंदिराची दारे सर्वांना उघडी झाली. भक्ती आणि श्रद्धेसाठी सामाजिक क्रांती करणारे गुरुजीही त्या पांडुरंगाएवढेच पवित्र आहेत. आणि त्यांचे नावही योगायोगाने ‘पांडुरंग’ सदाशिव साने हेच आहे. तिकडे नाशिकच्या काळाराम मंदिरात प्रवेशासाठी दादासाहेब गायकवाड यांना चार वर्षे झूंज द्यावी लागली… सत्याग्रह करावे लागले… आणि मग… काळाराम मंदिराची दारे सर्वांना उघडली गेली. हिंदू धर्मातील काही विशिष्ठ वर्गाने देव आणि धर्मावर कसा कब्जा केला होता…. जगन्नाथपुरीच्या मंदिरात लाॅर्ड माऊंट बॅटन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकत्र गेले तेव्हा तिथल्या पुजाऱ्यांनी लाॅर्ड मांऊंट बॅटनना बूट घालून मंदिरात येऊ दिले आणि डॉ. बाबाबासाहेब आंबेडकर यांना बाहेर उभे केले. विशिष्ट वर्गाच्या हातात असलेली मंदिरेसुद्धा सामान्य माणसाला मोकळी करण्याकरिता झालेला लढा हाही इतिहास बनला. आणि तो लढा लढवणारी माणसंही देवासारखीच भक्तीभावाने आदरली गेली. इतिहास पाहिला तर नामदेव महाराज यांनाही मंदिरात उभे राहून भजन करायला त्यांची ‘जात’ आडवी आलीच होती. त्यांनाही मंदिराच्या बाहेर काढले गेले होते. म्हणून ते पंजाबला गेले. हे सर्व निर्बंध त्यावेळचे धर्ममार्तंड लादत होते. ज्यांचा लोकजीवनाशी संबंध नव्हता… विशिष्ट जातीत धर्म गुरफटला गेलेला होता.
आज पंढरीचा विठोबा सर्वांसाठी खुला आहे… त्याच्या मागचा संघर्षही मोठा आहे. नवी निपढीला याची जाणीव करून देण्याची गरज नाही. आता, सार्वजनिक जीवनात तरी जात-पात नष्ट झालेली आहे पण, राजकीय वातावरणाने जाती-पाती अधिक घट्ट केल्याची भीती निर्माण झालेली आहे. पण, महाराष्ट्रातील पंढरपूरच्या विठुरायांमध्ये हे सामर्थ्य आहे की, तो या सगळ्या जाती-पातींमधील संघर्ष गळून पडतील, अशी सुबुद्धी सर्वांना देईल. त्याची प्रचिती चंद्रभागेच्या तीरावर आज येते. म्हणून आषाढीचा आजचा दिवस मला इतर कोणत्याही सण-वार आणि उत्सवांपेक्षा अधिक जिव्हाळ्याचा वाटतो आणि भावतो.
अलिकडे भजन परंपरा खंडीत झालेली आहे. पण ग्रामीण भागात अजूनही आजच्या आषाढीला टाळ-मृदंगाच्या नादात विठुरायाचा जयघोष हाेणारी भजने ऐकताना मनाला मिळणारी शांती विलक्षण आहे. ही ‘भजनी मंडळे’ हाही महाराष्ट्राचा फार मोठा सांस्कृतिक ठेवा आहे. आजच योगायोगाने भजनी भाटकरबुवांच्या जीवनावरील ‘स्वर-स्नेहल’हा कार्यक्रम अशोक हांडे सादर करणार आहेत. हा भजन सम्राटांचा गौरव कार्यक्रम असाच मनाला भिडणारा आहे. एकादशीच्या दिवशीच कोकणातील या भजनी बुवाने मराठी-िहंदी चित्रपटसृष्टीतील संगीत दिग्दर्शनाची शिखरे गाठली. पण, आपला मूळ भजनाचा ताल आणि टाळ याची साथ सोडली नाही. अशा महान संगीतकारांनीच महाराष्ट्राची संत परंपरा पुढे नेलेली आहे. आणि म्हणून आजचा दिवस मला फार विलक्षण वाटतो. मनाला एक शांती वाटते. पंढरपुरात असा किंवा नसा…. मी लहानपणी भजनाला जायचो… तेव्हा बाबुराव गोविलकर आम्हाला भजन सांगायचे… आजचाच आषाढीचा दिवस होता… आणि भजन होते,


‘कशास जाता दूर…
आमुचे इथेच पंढरपूर’
आजही त्या ओळी आठवतात… जे पंढरपूरला गेले ते… आणि जे गेले नाहीत ते… सारा महाराष्ट्र आज विठुमय आहे… त्या एका श्रद्धेच्या मार्गाने अनेक अडचणींचे मार्ग सोपे होऊन जातात. ‘श्रद्धेने पर्वत हलतात,’ असे म्हटले जाते.. महाराष्ट्रातील वारकरी, टाळकरी आणि माळकरी हेच त्याचे प्रतिक आहेत…


मधुकर भावे

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.