ताज्या घडामोडी

मे महिन्याचा लेखाजोखा…!!!

मे महिन्याचा लेखाजोखा…!!!

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64

मुंबई दिनांक 03/06/2024 :

नेमकं जगावं कसं ? तर बसच्या एखाद्या कंडक्टर सारखं…!
तासन् तास उभं राहायची लाज नाही आणि बसायला सीट मिळाली तरी माज नाही….!
आख्खी बॅग पैशाने भरलेली असते; परंतु त्यातले चार आणे सुद्धा आपले नाहीत… आपण फक्त बॅग सांभाळणारे आहोत याची सतत जाणीव ठेवायची…!
चिल्लर साठी एखाद्या वेळी एखाद्याशी वाद होणारच…. परंतु तो विसरून काही घडलंच नाही असं समजून दुसऱ्याशी बोलत राहायचं….,!
“पुढे चला… पुढे सरका….” असं दुसऱ्याला मनापासून म्हणणारा जगातला हा एकमेव माणूस….
खचाखच भरलेल्या बसमधील प्रत्येकाशी यांचं एकदा तरी संभाषण होतंच…
पण कुणावर विशेष लोभ नाही…
कोणावर राग तर मुळीच नाही…
कुणाचा द्वेष नाही…
कुणाचा तिरस्कार नाही…
आपला संबंध फक्त तिकिटापुरता… !
कुणी मध्येच उतरला तर त्याचे दुःख नाही…
कुणी मध्येच बस मध्ये आला तर त्याचं कौतुक नाही…
दोघांसाठी हात पुढे करून दार उघडायचं…
येईल तो येऊ दे…. जाईल तो जाऊ दे…
मूळ ठिकाणी पोचायच्या आधी बस दहा बारा स्टेशनवर थांबते….
प्रत्येक गावात थोडावेळ उतरायचं ….
आळोखे पिळोखे देत, आपलंच गाव आहे असं समजून थोडावेळ रेंगाळायचं….
पण त्या गावात अडकायचं नाही….
आपण इथले नव्हेत हे स्वतःशी बजावत, पुन्हा डबल बेल मारत पुढच्या “ठेसनावर” जायचं….
“शिंगल” बेल मारली की थांबायचं… “डबल” मारली की निघायचं…. बास, इतके साधे नियम पाळायचे…. आयुष्य जास्त किचकट करायचंच नाही…!
हा शेवटचा स्टॉप आहे….समद्यानी उतरून घ्या… असं सर्वांना बजावत स्वतःची वळकटी उचलायची आणि प्रवास संपला की “आपल्या घरी” निघून जायचं…. !
उद्या कुठे जायचं ? कधी निघायचं ? कुठल्या गाडीतनं जायचं ? ड्रायव्हर कोण असेल…. ? हे ठरवणारा वेगळा असतो…
उद्या गाडी कुठली असेल याची खात्री नाही… ड्रायव्हर कोण असेल याचीही खात्री नाही…. सोबत प्रवासी कोण असतील याची शाश्वती नाही…
शाश्वत एकच आहे… तो म्हणजे प्रवास…!
आपण असू तरी, आणि आपण नसू तरीही… प्रवास कोणाचा ना कोणाचा तरी सुरू राहणारच आहे…. निरंतर आणि निरंतर…!
आपल्या असण्यावाचून आणि नसण्यावाचून कोणालाही काहीही फरक पडणार नाही… प्रवास सुरू राहणारच आहे…. निरंतर आणि निरंतर…!
याच माझ्या प्रवासात भेटलेल्या प्रवाशांच्या सुखदुःखाच्या कहाण्या, कंडक्टरच्या भूमिकेतून मांडत आहे, प्रत्यक्ष सोबत नसूनही तुमची साथ लाभली आणि म्हणून या कहाण्या लेखाजोखाच्या स्वरूपात आपल्या पायाशी सविनय सादर…!
“सुख म्हणजे नक्की काय असतं” या माझ्या लेखातील कुटुंब भीक मागत नाही, परंतु त्यापेक्षा त्यांची अवस्था वेगळी नाही. समाजात अशा स्वावलंबी लोकांची ओळख व्हावी म्हणून लिहिले, अर्थात त्यांची कोणतीही ओळख न देता !
सुरुवातीला या कुटुंबाच्या घरावर पत्रे टाकून देणे, इतकाच मर्यादित हेतू होता… परंतु माझ्या मेसेज नंतर मदतीचा ओघ इतका वाढला की मला शेवटी सांगावे लागले आता पुरे….बास…!
आता मला सांगायला खूप आनंद वाटतोय, की या संपूर्ण कुटुंबाला आपल्या सर्वांच्या वतीने आपण दत्तक घेतले आहे. आपण म्हणजे “आपण सर्व” मी किंवा मनीषा नव्हे…!
*वैद्यकीय
1. नेहमीप्रमाणेच या महिन्यात सुद्धा रस्त्यावर अनेक लोक असे सापडले, ज्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली, अक्षरशः हात किंवा पाय कापावे लागले, अनेक गंभीर रुग्णांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं…. पाण्याबाहेर माशाला काढल्यानंतर तो जसा तडफडेल, तसे तडफडणारे लोक पाहिले… कागद फाटतो तसा, गाल फाटलाय… गळा कापलाय… नारळ फुटतो, तसं डोकं फुटलंय… आणखी हि बरंच काही दिसतं…!
डॉक्टर असून सुद्धा, हे पाहताना माझी चलबीचल होते… शेवटी मी सुद्धा माणूसच आहे…!
माझ्याही पेक्षा जास्त, तुम्ही सर्व संवेदनशील आहात आणि म्हणून मी असे कोणतेही फोटो / व्हिडिओ शेअर करत नाही…!
असो…
पण हि माझी माणसं कालांतराने बरी होतात… रानफुलं हि…. यांना ना पाणी लागत… ना खत लागत… ना मशागत….!
“प्रेमाचं” आणि “मायेचं” टॉनिक यांना पुरतं…!!!
जवळपास दोनशे किलोचं साहित्य मी माझ्या गाडीवर आणि बॉडीवर घेऊन रोज फिरत असतो दिवसभर…. पण आतली गोष्ट सांगतो…. माझ्याकडे कोणतंही औषध नसतंच मुळात… !
मी फक्त “प्रेमायसिन” आणि “मायामायसिन” हे दोनच टॉनिक घेऊन फिरत असतो…!
हिच दोन औषधे, सर्वच्या सर्व रोगांवर जालीम इलाज आहेत…. !
अं… हं…. ! मेडिकलमध्ये मिळणार नाहीत हि औषधे…
तुम्ही “तुमचा कप्पा” खोला… प्रेमायसिन आणि मायामायसिन… आधीपासूनच निसर्गाने आपल्याला भरभरून दिली आहेत… ती तुम्हाला या कप्प्यात मिळतील….
गरज आहे; ती हि औषधे मनापासून वापरण्याची … !!!
या औषधांना एक्सपायरी डेट नसते…. कधीही कुठेही ही औषधे वापरता येतात… कोणताही साईड इफेक्ट नाही….
झालाच तर फक्त फायदा आणि फायदाच होतो … देणाऱ्यालाही आणि घेणाऱ्यालाही…!
Try करके देखो, अच्छा लगता है …!!!
*भिक्षेकरी ते कष्टकरी आणि कष्टकरी ते गावकरी
1. एक प्रौढ महिला…. घरात सर्व लोक असूनही, मुलाबाळांनी तिचा गोडवा पातेल्यात काढला, या गोडव्याचा आमरस करून खाऊन झाल्यानंतर, तिला कोय म्हणून उकिरड्यावर फेकून दिलं ….
2. म्हाताऱ्या सासू सोबत जगणारी, एक तरुण महिला; आपल्या मुलांना घेऊन जगण्याची लढाई लढत आहे… नवरा नावाचा प्राणी “बेधुंद” असतो… मुलं आणि सासूला जगवण्यासाठी थोडा वेळ हि ताई काम करते…. थोडा वेळ सासूसह भीक मागते…! (हिच्या मुलांची शैक्षणिक जबाबदारी आपण घेतली आहे)

3. चुकून मार्ग चुकलेला एक तरुण… !
आपणही आडवाटेवर खूपदा चुकून चुकतो… चुकायची इच्छा कुणाचीच नसते, परंतु परिस्थिती रस्ता चुकायला लावते… मग एखाद्याची आपण वाट पाहतो… कोणीतरी येईल आणि मला रस्ता दाखवेल…
आपण रस्त्यावरच्या एखाद्याला पोटतिडकीनं पत्ता विचारतो…. तेव्हा एखादा “तो”, तोंडातली तंबाखूची गुळणी आवरत, पण अगदी मनापासून आपल्याला सांगतो…”आता सरळ जावा… मंग दोन फाटे फुटतील, तिथं डाव्या हाताला वळा…. थोडं फुड गेला की एक चौक लागंल… चौकातनं उजव्या हाताला वळा… तीतं मारुतीचं मंदिर लागंल… मारुतीच्या मंदिराला वळसा घातला की मंग आलं तुमचं ठिकाण…!”
भेटलेला “हा” आपल्या आयुष्यातला वाटाड्या…!!!
पत्ता सोपाच असतो, परंतु कोणीतरी सांगितल्याशिवाय कळत नाही…!
जेव्हा आपण चुकलेलो असतो, तेव्हा एखाद्या अशा पत्ता सांगणाऱ्या “वाटाड्याची” मात्र गरज असते…
आपणा सर्वांच्या मदतीने या तरुणाचा मी वाटाड्या झालो… !
या तिघांनाही आपण स्वतंत्रपणे तीन हात गाड्या घेऊन दिल्या आहेत…
यावर ते भाजीपाला विकतील, लिंबू सरबत विकतील किंवा भंगाराचा व्यवसाय करतील…. काहीही करोत… पण माणसं म्हणून जगतील…!
रस्ता वर्षानुवर्ष तिथेच होता….पोचायचं ठिकाण सुद्धा वर्षानुवर्ष तिथंच जवळच होतं… ते वाट चुकले होते… मी फक्त तुमच्या साथीने; “वाटाड्या” होऊन त्यांना वाट दाखवली…. बाकी माझं काहीही कर्तुत्व नाही…. !!!
4. जीला कुणीही नाही अशी एक मावशी, दोन लहान मुलं पदरात असणारी एक विधवा ताई…. फरशीवर पाणी सांडल्यानंतर ते अस्ताव्यस्त जसं कुठेही दिशाहीन फिरतं तसाच दिशाहीन फिरणारा एक तरुण….!
तिघेही गटांगळ्या खात होते…. फक्त एका काडीचा आधार हवा होता… आपल्या सर्वांचे वतीने तिघांनाही हा काडीचा आधार दिला आहे.
या तिघांनाही छोटे छोटे व्यवसाय करण्यासाठी आपल्या सर्वांच्या मदतीने आर्थिक मदत केली आहे.
वरील सहा जणांच्या आयुष्याविषयी जर लिहायचं ठरवलं तर सहा स्वतंत्र पुस्तक होतील….!
तुटून फुटून गेली होती ही माणसं…. पण हरकत नाही, आयुष्याला आकार द्यायला स्वतःला तोडून फोडूनच घ्यावं लागतं…!
भीक न मागता यांना काम करायला सांगितलं आहे… त्यांना हे सुद्धा सांगितलं आहे की, फक्त नशिबावर विश्वास ठेवू नका… निसर्गाने सुद्धा हाताच्या रेषांआधी प्रत्येकाला बोटं दिली आहेत…. ती काम करण्यासाठी… मेहनत करण्यासाठी… भविष्य बघण्यासाठी नव्हे…!
*शैक्षणिक
दुसरी- तिसरी -पाचवी, सातवी- बीबीए – कम्प्युटर सायन्स – यूपीएससी… आमची मुले या इयत्तांमध्ये शिकतात…!
या सर्वांच्या फिया भरून झाल्या आहेत…!
माझ्या आयुष्यावर जे पुस्तक लिहिलं आहे…. ते आपण विकत घेतलं आणि म्हणून मी या मुलांच्या फिया भरू शकलो…!
जी मुलं राहिली असतील त्यांच्या फीया जूनच्या पहिल्या आठवड्यात भरणार आहोत…!
ज्यांना या अगोदर शाळाच माहीत नव्हती, अशा सर्व मुला मुलींना मॉडर्न स्कूल, शिवाजीनगर येथे ऍडमिशन घेऊन देत आहोत.
यातला एक जाणता मुलगा परवा रागाने मला म्हणाला, ‘असल्या भिकारी आई बापाच्या घरात माझा जन्म झाला म्हणून माझं आयुष्य वाया गेलं… चांगल्या घरात जन्मलो असतो तर माझ्या आयुष्याची अशी वाट नसती लागली… मला जर वरदान मिळालं; तर मी पहिल्यांदा आई बाप बदलेन…’
त्याला फक्त इतकंच सांगितलंय…. ‘आतापर्यंत भर समुद्रात जे जहाज तुला घेऊन आलंय त्या जहाजाला विसरू नकोस… या जहाजाविषयी कृतज्ञता बाळग… नाहीतर इथपर्यंत सुद्धा आला नसतास…. वादळ आलं; की दिशा बदलायची असते बाळा… जहाज नव्हे…!
*डोळे तपासणी
ज्यांना डोळ्यांचे काही त्रास आहेत, अशा सर्वांना आपण महिन्यातील एका दिवशी, एका ठिकाणी जमा करतो आणि त्या सर्वांना एकत्रितपणे घेऊन डोळे तपासणी / ऑपरेशन साठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. तिथे एक तर त्यांना चष्मा मिळतो किंवा डोळ्यांचं ऑपरेशन होतं.
परंतु आमच्याकडे असे अनेक लोक आहेत, ज्यांना इतके शारीरिक त्रास आहेत की, त्यांना आमच्याबरोबर, आमच्या गाडीत बसून तिथं येणं सुद्धा जमत नाही… ऑपरेशन आणि तपासणी तर दूरच…
अशांसाठी आता रस्त्यावरच डोळे तपासणी सुरू केली आहे. रस्त्यावरच डोळे तपासणी करून आम्ही रस्त्यावरच आता त्यांना चष्मे द्यायला सुरुवात केली आहे.
जवळपास अंधत्व आलेल्या माझ्या या लोकांना जेव्हा दिसू लागतं… तेव्हा माझ्या नजरेत नजर घालून माझ्याशी ते मायेनं बोलतात… आणि त्या प्रत्येक डोळ्यात मला मग सूर्य दिसतो…. !
सुरकुतलेले खरबरीत हात मग किरण होऊन माझ्याकडे झेपावतात…. आणि हे किरण, माझ्या मस्तकाचे, गालाचे आणि हाताचे मुके घेतात…!
आणि मग सुर्य आकाशात नाही… तो आपल्या आई – बाबा,आजी आणि आजोबाच्या डोळ्यात आपल्याच घरी आहे हे उमगतं…!
कोण म्हणतं सूर्याजवळ जाणं अशक्य आहे…? आपले बाबा आणि आजोबा यांच्या जवळ एकदा मनापासून जाऊन बघा… सूर्य तिथे भेटेल…!
चंद्रावर जाण्यासाठी कोणत्याही यानाची गरज नाही… आईचे / आजीचे पाय एकदा मांडीवर घेऊन बघा…. चंद्र तिथे भेटेल…!!
*अन्नपुर्णा
पूर्वी याचना करणाऱ्या लोकांकडून जेवणाचे डबे तयार करून घेऊन त्यांच्याकडून आम्ही हे डबे विकत घेत आहोत..!
हॉस्पिटलमध्ये विविध योजनांखाली उपचार घेत असणारे रुग्ण…. ज्यांचे या जगात कोणीही नाही…. अशाच लोकांना आपण जेवणाचे डबे देत आहोत.
आम्ही जो अन्नपूर्णा प्रकल्प चालवत आहोत, यातून याचना करणाऱ्या लोकांना व्यवसाय मिळतो आणि खऱ्या भुकेल्या व्यक्तीला अन्न मिळते…. !
*खराटा पलटण
खराटा पलटण म्हणजेच Community Cleanliness Team !
अंगात व्यवसाय किंवा नोकरीचे कोणतेही कौशल्य नसणाऱ्या प्रौढ / वृध्द महिलांची एक मोळी बांधून, त्यांच्याकडून पुण्यातील अस्वच्छ भाग स्वच्छ करून घेत आहोत, त्या बदल्यात त्यांना पगार किंवा किराणा माल देत आहोत.
या महिन्यातही खराटा पलटणाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी स्वच्छता केली आहे आणि त्या बदल्यात टीममधील प्रत्येकाला पंधरा दिवस पुरेल इतका कोरडा शिधा दिला आहे.
*कापडी पिशवी प्रकल्प
ज्यांच्या अंगात शिवणकला आहे अशा माझ्या भीक मागणाऱ्या लोकांनी कापडापासून पिशव्या शिवायला सुरुवात केली आहे…
ज्यांच्या अंगात बोलण्याची कला आहे अशा लोकांना या कपड्याच्या पिशव्या विकण्याचे काम दिले आहे…
पिशव्या विकणाऱ्या लोकांच्या गळ्यात तयार केलेले पुणेरी टोमणे आपण अडकवले आहेत…
“प्लास्टिक पिशव्या वापरणे सोडून द्या आणि कापडी पिशव्या वापरा” या अर्थांचे हे पुणेरी टोमणे अंगा खांद्यावर अडकवून माझे हे लोक समाज प्रबोधन करतील… !
हे टोमणे वाचून संवेदनशील माणूस क्षणभर नक्कीच स्मित हास्य करेल आणि प्लास्टिक पिशवी सोडून; कापडी पिशवी वापरण्याचा विचार नक्कीच करेल अशी मला आशा आहे.
भीक मागणारे लोक कापडी पिशव्या शिवत आहेत, समाजाला विकत आहेत आणि प्लास्टिक वापरू नका म्हणून विनंती / समाज प्रबोधन करत आहेत हा जगातला पहिला प्रकल्प असावा…!
यात मला आपण वेगवेगळ्या पद्धतीने मदत केली आहेच, परंतु आणखी सुद्धा मदत हवी आहे… आर्थिक नव्हे… नेमकी काय ते स्वतंत्रपणे कळवेन…!!!
असो…!
जे काही थोडंफार करू शकलो तुमच्या साथीनं, त्या प्रत्येक वेळी डोळ्यातून आनंदाश्रू गालावर ओघळले…
अश्रूंचा हा खारट स्वाद कोणत्याही मिठाई पेक्षा कमी नव्हता…!
माझ्या आयुष्यातील हे आनंदाचे क्षण केवळ तुम्हा सर्वांमुळे आले आणि म्हणून या महिन्याचा लेखाजोखा आपल्या सर्वांच्या पायाशी सविनय सादर…!!!
प्रणाम !!!
दिनांक : 31 मे 2024

डॉ. अभिजित सोनवणे
डॉक्टर फॉर बेगर्स
सोहम ट्रस्ट
9822267357

🔰 संकलन आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.