ताज्या घडामोडी

‘आपसे भी खूबसूरत आपके अंदाज़ हैं’ – मधुकर भावे

‘आपसे भी खूबसूरत
आपके अंदाज़ हैं’मधुकर भावे

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64

🔰 संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 03/06/2024 :

उद्या निवडणुकीचा निकाल. उद्या संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईल. आज सकाळी शरद पवारसाहेबांना भेटून आलो. अक्षरश: ‘सॅलूट’ केला. निवडणुकीत त्यांनी केलेली मेहनत, रणरणत्या उन्हातील प्रचारसभा, निवडणूक प्रचारदौरा, अख्खा महाराष्ट्र तालुका पातळीपासून त्यांनी पिंजून काढला. केवढी प्रचंड इच्छाशक्ती त्यांना कुठेही अडचणीची झाली नाही. ‘त्यांचे वय झाले आहे,’ असे सांगून जे त्यांच्यापासून फुटले होते, त्यांचीही दमछाक झाली. पवारसाहेब आज ताजेतवाने असल्यासारखे आहेत. किती आत्मविश्वासाने बोलत होते…. ‘उद्या निवडणूक निकाल…. चार दिवसांनंतर काय होतेय ते बघा…’ त्यांना सूचवायचे होते की, जे फुटलेत त्यांची कशी ‘पळापळ’ होईल ते पहा. देशातील अंदाज काहीही असोत… महाराष्ट्रातील संपूर्ण वातावरण हे या महाराष्ट्रातील सरकारविरोधात, मोदींविरोधात, भाजपाविरोधात होते आणि आहे. दादा आणि शिंदे यांच्या विरोधातही आहे. असाच सगळ्यांचा चर्चेचा रोख आहे. पवारसाहेब यांची भेट घेवून बाहेर पडलो… तेव्हा विदर्भातील मंगळूरपीरचे माजी आमदार अनंतकुमार पाटील भेटले. हात मिळवला… त्यांचे पहिले वाक्य होते की, ‘विदर्भात गडकरी सोडले तर बाकी सगळ्या भाजपा उमेदवारांचे आणि शिंदे गटाचे अवघड आहे… विदर्भात दादा गट कुठे नाहीच…’ ते अत्यंत आत्मविश्वासाने बोलत होते. तेवढ्यात हरिभाऊ सोळंके यांचा बीडहून फोन आला. ते अगदी खड्या आवाजात सांगत होते, ‘मराठवाड्यात भाजपा-शिंदे-दादागट साफ होणार….’ विदर्भातील ते चित्र…. मराठवाड्याचे हे चित्र… आणि पवारसाहेब सांगत होते, ‘चार दिवसांत पळापळ होणार…’ ही सगळी बेरिज एकत्र केली तर महाराष्ट्रामध्ये भाजपा-शिंदे-दादागटाची अवस्था अवघड होईल. असा या सगळ्या गणिताचा अर्थ आहे. प्रत्यक्ष आकडे उद्या समजतीलच… पण, या निवडणुकीत आणि गेली दोन वर्षे महाराष्ट्राचे राजकारण ज्या पद्धतीने नासवले गेले त्याचा संताप सर्व महाराष्ट्रात दिसत आहे. त्याचा हा परिणाम आहे. त्यामुळे राजकारणात येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी ‘सेवा-त्याग-समर्पण’ हा राजकारणातील मुख्य मंत्र पार निकालात निघाला आहे. ‘सत्ता, पैसा, धटींगणपणा’ हे आता राजकारणातील परवलीचे शब्द आहेत. आणि महाराष्ट्राने भलते वळण घेतलेले आहे. ५० वर्षांपूर्वीचा तो महाराष्ट्र पुन्हा घडवणे फार अवघड होणार आहे, एवढ्या वाईट सवई लावल्या गेल्या आहेत… त्यामुळे येणाऱ्या निकालात देशाचे काय होईल ते होईल… ते प्रसिद्ध झालेले आकडे किती खरे, याचा हिशेब अवघ्या २४ तासांत मिळेल. पण, महाराष्ट्रापुरते बोलायचे तर संपूर्ण देशात महाराष्ट्राचे निवडणूक निकाल अगदी वेगळे लागतील… हा पहिला अंदाज सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे. अगदी सांगलीमध्येसुद्धा अपक्ष असलेल्या विशाल पाटील यांच्या विजयाची शक्यता सर्वाबाजूंनी व्यक्त होत आहे. आमचे साताऱ्याचे राजेंद्र शेलार आणि बाबुराव शिंदे हे दोन्ही परिपक्व राजकीय नेते ठामपणे सांगतात… ‘उदयनसिंगराजे पडल्यात जमा आहेत…’ पश्चिम महाराष्ट्रातील चित्र जर असे असेल तर भाजपा-शिंदे आणि दादागटाची अवस्था फार अवघड होणार… पवारसाहेब यांनी ‘पळापळ’ हा शब्द वापरला… जर अशी दाने पडली तर पळापळ होणारच… याच जागेवर दादा गटाला ‘घड्याळ’ हे निवडणूक चिन्ह मिळाल्यावर तीन महिन्यांपूर्वी मी लिहिले होते की, ‘दादा, सर्व दाने तुमच्या बाजूंनी पडली तरी ‘मतदान’ गृहीत धरू नका…’ त्या लेखावर दादा रागवले होते. त्यांचा फोनही आला होता. बोलणेही झाले. पण त्यानंतर उद्या निकाल लागेपर्यंत त्या लेखात काही बदल झालाय, असे मला वाटत नाही. दादा गटाला जागा मिळाल्या इन-मीन चारच…. तेवढ्यासाठी त्यांनी एवढे ‘धर्मयुद्ध’ करायची गरज होती का? या चारमधून निवडून येणार किती? आणि त्यासाठी त्यांनी ‘मी पवारसाहेबांचा मुलगा असतो तर…’ असे शब्द वापरायचे…. राजकारणात तोल किती जातो…. अहो दादा, तुम्हाला २९ व्या वर्षी लोकसभा खासदारकी मिळाली पवारसाहेबांमुळे. पवारसाहेब मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात परत आले. त्या पोटनिवडणुकीत पवारसाहेबांनी तुम्हालाच ‘खासदार’ बनवले ना. चारवेळा उपमुख्यमंत्री सुद्धा…. आता तो विषय जुना झालाय… जाऊ द्या… पण, उद्या निकल लागल्यानंतर तुम्हाला या गोष्टी कदाचित आठवायला सुरुवात होईल…. ‘पळापळ’ हा शब्द त्या अर्थाने आहे.
तर सांगत होतो, उद्याच्या निकालाबाबत… तो जो काही लागायचा तो लागेल… पण, त्यातील एक गंमत सांगतो… सोलापूरला सुशीलकुमार शिंदेसाहेबांची मुलगी प्रणिती शिंदे हिच्या निवडणूक प्रचारात तिऱ्हे ग्रामपंचायतीच्या पटांगणात प्रचारसभा झाली. मी आणि नाना पटोले होतो. सभा छान झाली. मी त्या सभेतून सोलापूरच्या भाषणाकरिता निघालो, तेव्हा दोन-तीन श्रोते उठले आणि माझ्याबरोबर बाहेर आले… आणि मग हळूच म्हणाले, ‘सर, इथली सीट १०० टक्के येतेय… फक्त त्या ‘ई.व्ही.एम’ मशीनचे बघा बुवा… मोदीसाहेबांनी बऱ्याच गॅरंट्या दिल्या… पण या मशीनबद्दलची गॅरंटी कोणीच दिलेली नाही… भीती त्याचीच वाटते… हे लोक काय बी करू शकतील…’ सामान्य खेड्यातील माणसांनी ई.व्ही.एम.वर अविश्वास व्यक्त करणे हे देशातील लोकशाही मजबूत असल्याचे लक्षण नाही. त्यांना का अविश्वास वाटावा? अशी चर्चा का व्हावी…? पूर्वी का झाली नव्हती?
राजकीयदृष्ट्या अव्वल असलेल्या बऱ्याचशा पत्रकारांनी मोदींना देशात ३५६ जागा देऊन टाकल्या आहेत. म्हणजे पहिली गोष्ट अशी की, ‘चारसौ पार’मधील ४४ जागा त्यांनी कमी केल्या. आता प्रत्यक्ष निकालात आणखीन किती जागा कमी होतात, हे उद्याच समजेल… पण एक गोष्ट पक्की… मी देशात काही फिरलेलो नाही… माहोल पाहिलेला नाही.. महाराष्ट्रात पाहिलाय… फिरलोय… अनेकांशी बोललोय… सभा पाहिल्या आहेत… देशात सगळ्यात मोठा दणका भाजपा, शिंदे आणि दादा यांना महाराष्ट्रातच बसेल एवढे नक्की. आणि इथं नेमका तो पवारसाहेबांचा ‘पळापळ’ शब्द आठवतो… खरी मजा त्यानंतरच येईल… विधानसभा निवडणुकांना बराच वेळ आहे. मधल्या चार महिन्यात महाराष्ट्राच्या राजकारणाचा आणखीन चोथा कसा होणार आहे, याचे प्रयोग चार दिवसांत सुरू होतील… त्याचे नाव ‘पळापळ’ असेल… अशी आजच्या महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती आहे.
हा झाला निवडणुकीचा विषय.
आणखी दोन महत्त्वाचे विषय महाराष्ट्राला कीड लागल्यासारखे आहेत. त्यातील पहिला विषय म्हणजे वाळूमाफीयांप्रमाणे महाराष्ट्रभर पसरलेल्या-होर्डींग माफीयांचा. ‘होर्डींग माफिया’ ही नवी जमात तयार झाली आहे. दुसरीकडे प्रचंड श्रीमंत असलेले धटींगण बनले आहेत. पुण्याची दुर्दशा त्यांनीच केली. शिक्षण खात्यात आणखी एक घुसखोरी सुरू झाली आहे. ‘मनुस्मृती’चा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या अभ्यासात घुसडण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे. आजचे शिक्षणमंत्री किंवा आजचे शिंदे सरकार यांचा एवढा ‘दिमाग’ असेल, असे वाटत नाही. ‘कोणीतरी बाहेरचे’ ही योजना तयार करीत आहेत आणि पुन्हा एकदा ‘चार्तुवर्ण व्यवस्था’ शिक्षण या विषयात थाेपण्याचा प्रयत्न होऊ घातला आहे. हा राजकीय विषय नाही. जे जे पुरोगामी विचारांचे आहेत, त्या-त्या सर्वांनी ही ‘जातीय व्यवस्था’ पुन्हा घट्ट करायला प्रखर विरोध केला पाहिजे. शरद पवार साहेबांनी पहिला आवाज उठवला… जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ यांनीही आवाज उठवला. हा पक्षातीत विषय आहे. उद्याची पिढी पुन्हा ‘जात’ आणि ‘रूढी’ परंपरांमध्ये गाडायची नसेल तर मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश होता कामा नये. जातींची व्यवस्था मनुनींच केली. ‘हिंदू धर्मशास्त्रात कुठेही स्पृश्य-अस्पृश्य असा भेद नाही.’ हे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जाेशी यांनी आणि अनेक पंडितांनी हिंदू धर्मग्रंथांचा आधार देवून तर्कशास्त्रांनी हे सिद्ध केलेले आहे. ही वर्ण व्यवस्था मनूंनी आणली. मूळ हिंदू धर्मशास्त्रात त्याला आधार नाही. मनूने एकाच्या हातात ‘कर्म-कांडाचा’ धर्म दिला. दुसऱ्याच्या हातात ‘धनुष्य’ दिले. तिसऱ्याच्या हातात ‘तागडी’ दिला आणि चौथ्याला सांगितले की, ‘या सर्वांची घाण तू काढायची…’ ही वर्णव्यवस्था मनुस्मृृृृतीमुळे आली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा राग मनुस्मृतीवर त्यामुळेच होता. आज पुन्हा १०० वर्षे मागे जाऊन महाराष्ट्राच्या शिक्षण खात्यात जातीचे वीष कालवण्याचा प्रयत्न जे कोणी करीत आहेत, त्याला प्रखर विरोध व्हायलाच हवा. आणि हा विरोध पक्षातीत असायला हवा. पुरोगामी महाराष्ट्राच्या परंपरा पुसून टाकण्याचा हा कार्यक्रम आहे. एकीकडे महाराष्ट्र धटींगण होत चाललेला आहे… ज्यांच्याजवळ अमाप पैसा झाला, ते बेदरकार होत चालले आहेत… कायदा-सुव्यवस्थेला जुमानत नाहीत. त्यांच्यामागे कोणाचे पाठबळ असते हे काही लपून राहिलेले नाही. त्यामुळे होर्डींग कोसळून २० माणसं मेली काय आणि ५० माणसं जखमी झाली काय…. याची पर्वा कुणालाही नाही. १४० फुटांचा उंच उभा केलल्या होर्डींगचा जमिनीतील पाया अवघा अडीच फूटांचा आहे. तो कोसळणारच… कोणाला याची पर्वा नाही. प्रशासनसुद्धा महाराष्ट्राला न शोभणारे झाले आहे. दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या ज्या तरुणाच्या रक्ताचे नमूने ससूनमधील ज्या डॉक्टरांनी कचराकुंडीत फेकून दिल्याचे सिद्ध झाले आहे. ते नमूने कसे बदलले असतील…. हे सांगण्याची गरज नाही… कोणाच्या दबावाने बदलले… कोणत्या ‘अर्थ’प्रभावाने बदललले, हेही लोकांना कळते आहे. पण, जे डॉक्टर हा पवित्र व्यवसाय करतात त्या डॉक्टरी व्यवसायाचे सगळे पावित्र्य छिनाल लोकांच्या हातात गेलेले आहे. आणि महाराष्ट्र, महाराष्ट्राचे प्रशासन नासवण्याचे काम पैसा करीत आहे. हे सगळे संतापजनक आहे. त्याविरुद्ध शासनाच्या आगोदर पुण्यातील लोक जागरूक झाले, रस्त्यावर आले. आमदार धंगेकर यांचे म्हणूनच अभिनंदन. त्यांनी आवाज उठवला… जनतेने त्यांना साथ दिली. हे शुभचिन्ह आहे… गेल्या काही वर्षांत लोक निर्भय झालेले आहेत. शासनाविरुद्ध उघडपणे बोलू लागलेले आहेत. आपली ठाम मते मांडू लागलेली आहेत. वाहिन्यांनी एकतर्फी ज्या एका पक्षाच्या प्रचाराचे काम अंगावर घेतले आहे. त्यामुळे त्या वाहिन्यांना ‘विटलेले’ लोक आणि…. सरकारातून ‘फुटलेले’ लोक…. या सगळयांचा संताप एकत्र झालेले मतदार… आपल्या संतापाला वाट मोकळी करून देण्याची वाट पहात होते…. त्यामुळे प्रसार माध्यमांवर देशाच्या पंतप्रधानांच्या भूमिकांविराेधात ज्या निर्भयपणाने व्यंगचित्रे प्रसिद्ध झाली… गेल्या दहा वर्षांत ही हिम्मत झाली नव्हती… आता सामान्य कार्यकर्ता, ईडी, सीडी, सीबीआय यांना भीत नाही… आणि पत्रकारही भीत नाहीत. व्यंगचित्रकारही आता आक्रमक झालेले आहेत. या निवडणूकीत त्याचा जागोजागी प्रत्यय येत होता. त्यामुळे या व्यंगचित्रकारांनी भारतीय लोकशाही जिवंत ठेवण्याकरिता आपल्या कुंचल्यांचा भाला करून त्यांनी जी चित्रे रेखाटली आहेत… ती लोकशाही जिवंत असल्याची लक्षणे आहेत.
आणखीन एक चांगली गोष्ट झाली… मोदीसाहेब एवढे भांबावलेले आहेत की, त्यांना काही सुचत नाही. ते एकदम गांधीजींवर घसरले. ‘गांधीचे महत्त्व गांधी चित्रपटानंतर लोकांना कळले’ या पंतप्रधानांच्या विधानाचे जगभर हसू झाले.. हे त्यांना अजून कळले नसेल… देशाच्या आजपर्यंतच्या कोणत्याही पंतप्रधानांनी एवढे अज्ञाान दाखवले नाही. माजी पंतप्रधानांचा सगळ्यांनीच आदर केला आहे. पण या आपल्या आध्यात्मिक पंतप्रधानांनी अर्थतज्ञ मनमोहन सिंग यांचीही टींगल केली होती. ‘ते आंघोळीला जाताना रेनकोट घालून जातात..’ ती टींगल खपून गेली. पण महात्मा गांधींवरील त्यांचे विधान त्यांचा एकूण आवाका पंतप्रधान पदाला शोभणारा नाही… हे ही लोकांच्या लक्षात आले. आता ते ध्यानस्थ होते. ध्यान करणे चांगलेच आहे… त्यांच्या ध्यानात व्यत्यय नको. पण, ध्यानस्थ होण्यापूर्वी पंजाबच्या शेतकऱ्यांच्या मागण्याकडे त्यांनी ‘ध्यान’ दिले असते तर लोकसभेत शेतकरीविरोधी कायदे मागे घेण्याची त्यांची फजिती झाली नसती. मणिपूरमध्ये भगिनींची विटंबना होत असताना त्यांनी ‘ध्यान’ दिले असते तर ‘राखी पौर्णिमेला मुस्मिल भगिनींना राखी बांधा’ या त्यांच्या निवेदनात काही भावनात्मकता आहे, असे मानता आले असते.
आता ‘अंदाजी’ पत्रकारांनी त्यांच्या पारड्यात ३५० जागा घातलेल्याच आहेत… उद्या मतपेट्या उघडल्यानंतर राहिलेल्या ५१ जागा घालून चारसौ पार ही घोषणा प्रत्यक्षात येते की नाही, हे स्पष्ट होईलच… तिथपर्यंत थांबूया… एका हिंदी गीताच्या दोन ओळी खूप छान आहेत… लतादीदींच्या आवाजातील आहेत. त्या ओळींचा चित्रपटातील संदर्भ वेगळा आहे… पण, उद्याच्या निकालापूर्वी हा ‘अंदाज’ व्यक्त करताना एवढेच म्हणता येईल की, ज्या मिडीयावाल्यांनी हे अंदाज व्यक्त केले आहेत, त्यांच्यासाठी या दोन ओळी आहेत.. आर. डी. बर्मन यांचे संगीत आहे… चित्रपट ‘घर’ आहे. रेखा आणि विनोद मेहरा यांच्यावर चित्रीत केले आहे. गीत गुलजार यांचे आहे. आवाज लतादीदी आणि किशोरकुमार यांचा आहे…
“आपकी आँखों में कुछ
महके हुए से राज़ हैं
आपसे भी खूबसूरत
आपके अंदाज़ हैं”

सध्या एवढेच…

📞 9869239977

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.