महाराष्ट्रराजकीयसंपादकीय

शरद पवारांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला होता का?

शरद पवारांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला होता का?

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 30/8/2023 :
पुरोगामी लोकशाही दल किंवा पुलोदची स्थापना करून शरद पवारांनी राज्यातलं पहिलं आघाडी सरकार स्थापन केलं होतं. वयाच्या 38 व्या वर्षी ते मुख्यमंत्री बनले. नाट्यमय घडामोडीनंतर ते मुख्यमंत्री झाले.
शरद पवारांनी पाठीत खंजीर खुपसल्याची टीका त्यांच्यावर त्यावेळी झाली होती. काही जणांच्या मते शरद पवारांनी अगदी तरुण वयात सरकार स्थापन करून आपल्या राजकीय चातुर्याची ओळख राज्याला करून दिली. वसंतदादा पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचं सरकार पाडून शरद पवार मुख्यमंत्री कसे बनले हे आज आपण पाहू.
इंदिरा गांधी यांना देशभरातून होणारा विरोध लक्षात घेता पक्षांतर्गत चलबिचल सुरू झाली. इंदिरा गांधी यांचं नेतृत्व स्वीकारण्यावरून काँग्रेस पक्ष दुभंगला. ‘इंदिरा गांधीनिष्ठ’ आणि ‘काँग्रेस पक्षनिष्ठ’ असे गट निर्माण झाले.
“देश पातळीवर यशवंतराव चव्हाण आणि ब्रह्मानंद रेड्डी यांनी इंदिरा गांधी यांचं नेतृत्व झुगारून देत, ‘रेड्डी काँग्रेस’ची स्थापना केली. यशवंतराव चव्हाणच हेच संस्थापक असल्याने शरद पवार अपरिहार्यपणे रेड्डी काँग्रेसमध्ये गेले,”
1978 सालच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात दोन्ही काँग्रेस स्वतंत्रपणे लढल्या. आणीबाणीमुळे इंदिरा गांधींवरील जनतेचा राग एव्हाना कमी झाला नव्हता. याचा फटका जसा इंदिरा काँग्रेसला बसला, तसाच रेड्डी काँग्रेसलाही बसला. परिणामी जनता पक्षाने 99 जागांसह महाराष्ट्रात घवघवीत यश मिळवलं आणि इंदिरा काँग्रेसला 62, तर रेड्डी काँग्रेसला 69 जागा मिळाल्या.
“त्यात शेतकरी कामगार पक्षाला 13, माकपला 9 आणि अपक्षांना 36 जागा मिळाल्या होत्या. कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं. त्यामुळं राज्यात त्रिशंकू स्थिती निर्माण झाली होती.
“महाराष्ट्रात जनता पक्षाला सत्तेपासून रोखण्यासाठी रेड्डी काँग्रेसमध्ये असलेल्या वसंतदादा पाटील यांनी प्रयत्न सुरू केले. त्यांनी दिल्लीत जाऊन यशवंतराव चव्हाण, ब्रह्मानंद रेड्डी, चंद्रशेखर यांच्याशी चर्चा केली. तसंच, ब्रम्हानंद रेड्डी आणि यशवंतराव चव्हाण यांनी एकत्र येऊन महाराष्ट्रातलं सरकार चालवावं, अशी इंदिरा गांधी यांनी इच्छा व्यक्त केली. त्यासाठी त्यांनी एक पाऊल मागे येण्याचीही तयारी दर्शवली,”
त्यानुसार महाराष्ट्रात रेड्डी काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेस यांची आघाडी झाली.
7 मार्च 1978 रोजी वसंतदादा पाटील यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची, तर इंदिरा काँग्रेसचे महाराष्ट्रातील तत्कालीन नेते नासिकराव तिरपुडे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शरद पवार हे या मंत्रिमंडळात उद्योगमंत्री होते.
दोन्ही काँग्रेस मिळून जर सरकार चालत होतं तर सरकार कसं पडलं याबद्दल चोरमारे सांगतात, “इंदिरा काँग्रेस महाराष्ट्रात नवीन पक्ष होता, त्यामुळे नासिकराव तिरपुडेंनी पक्षवाढीसाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, त्यांनी सातत्यानं यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार यांच्यावर टीका करण्यास सुरूवात केली. शिवाय, सरकार चालवताना इंदिरा गांधींवर असलेल्या एकनिष्ठतेमुळे नासिकराव तिरपुडे अतिवर्चस्व दाखवायला लागले. त्यामुळे सरकार चालवणं वसंतदादांसाठीही तारेवरची कसरत होऊ लागली होती.”
“रेड्डी काँग्रेसमधील शरद पवारांसारख्या नेत्यांमध्ये नासिकराव तिरपुडेंबद्दल मोठ्या प्रमाणात नाराजी होती. मात्र, मुख्यमंत्रिपदाचा काटेरी मुकूट सांभाळत वसंतदादा सरकार चालवत होते. मात्र, नासिकराव तिरपुडेंमुळे इंदिरा काँग्रेस आणि रेड्डी काँग्रेस यांच्यातील दरी वाढतच गेली. याचा परिणाम शरद पवारांनी या आघाडी सरकारमधून बाहेर पडण्यात झाला.
1978 सालच्या जुलै महिन्यात विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होतं. हे अधिवेशन सुरू असतानाच शरद पवार यांनी 40 आमदार घेऊन वसंतदादांच्या सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. सुशीलकुमार शिंदे, सुंदरराव सोळंके आणि दत्ता मेघे यांसारख्या मंत्र्यांनीही शरद पवारांसोबत राजीनामा दिला.
“पवारांच्या बंडखोरीमुळे इंदिरा काँग्रेस आणि रेड्डी काँग्रेसचं सरकार अल्पमतात आल्याने वसंतदादा पाटील आणि नासिकराव तिरपुडेंनी राजीनामे दिले. परिणामी महाराष्ट्रातील पहिलं आघाडी सरकार अवघ्या साडेचार महिन्यात कोसळलं.
सरकार पाडण्यासाठी हालचाली सुरू होत्या, त्यावेळी महाराष्ट्र टाईम्समध्ये ‘हे राज्य जावे ही श्रींची इच्छा’ असा अग्रलेख संपादक असलेल्या तळवलकरांनी लिहिला होता. यशवंतराव चव्हाणांशी तळवलकराची घनिष्ट मैत्री होती. त्यामुळे वसंतदादांचं सरकार पाडावं, ही यशवंतरावाचीच इच्छा होती, असाच या अग्रलेखाचा अर्थ घेतला गेला.
तर वसंतदादांच्या सरकारमधून बाहेर पडल्यानंतर पवारांनी ‘समाजवादी काँग्रेस’ची स्थापना केली आणि पुन्हा एकदा सत्ता स्थापनेचे खेळ सुरू झाले.
राजकीय हालचालींना वेग आला. त्याचवेळी शरद पवारांनी जनता पक्षासोबत बैठक घेतली. एस. एम. जोशी यांनीही पवारांना नेतृत्व बहाल केलं. आबासाहेब कुलकर्णी, एस. एम. जोशी आणि किसन वीर हे तेव्हाचे वरिष्ठ नेते शरद पवारांच्या पाठीशी उभे राहिले.
18 जुलै 1978 रोजी महाराष्ट्रात पहिल्यांदाच बिगर-काँग्रेस सरकार सत्तेत आलं. यात पवारांची समाजवादी काँग्रेस, जनता पक्ष, शेकाप आणि कम्युनिस्ट पक्ष सहभागी झाले होते. या बिगर-काँग्रेस आघाडीचं नाव होतं पुरोगामी लोकशाही दल अर्थात “पुलोद”.
पुलोदच्या या प्रयोगामुळे शरद पवार हे वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. ते स्वतंत्र भारतातले सर्वांत तरुण मुख्यमंत्री ठरले.
पण 17 फेब्रुवारी 1980 रोजी इंदिरा गांधींच्या शिफारशीनंतर राष्ट्रपतींनी शरद पवारांचं पुलोदचं सरकार बरखास्त केलं आणि महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली.
बीबीसी वरून साभार

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.