महाराष्ट्रराजकीयलेख

एका तिकिटावर दोन खेळ संगीत “मानापमान” व “संशय कल्लोळ”

एका तिकिटावर दोन खेळ
संगीत
“मानापमान” व “संशय कल्लोळ”

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.

Akluj अकलूज दिनांक 13/8/2023 : सध्या मराठी प्रेक्षक गंभीर प्रकृतीची नाटक बघत नाहीत. त्यांना विनोदी नाटक, फार्स बघायला खूप आवडतात. तमाशात ही तेच गण गवळण बतावणी झाली कीं, बरेच प्रेक्षक निघून जातात. म्हणून मग लेखक, निर्माते, दिग्दर्शक, नट, नट्या यांनाही विनोदी संहिता करायला आवडतात. म्हणून की काय मराठी माणसाची ही विनोदी आवड बघून राज्यकर्त्यांनीही राजकीय मंचावर विनोदी खेळ सुरु केले आहेत.
इंग्रजीत एक म्हण आहे “टु इज कंपनी अँड थ्री इज क्रॉऊड!” ही म्हण आपल्या राज्य सरकारला हुबेहूब लागू पडते. भाजपनें शिवसेना पक्ष फोडून नवं सरकार बनवलं. इथपर्यंत ठीक होत. कारण एकटं भाजप त्यांच्या कडील आमदारांच्या संखेवर सत्ता स्थापू शकत नव्हतं. म्हणून त्यांनी शिव सेना फोडली आणि सेनेचे 40 आणि महाविकास आघाडी समर्थक 10 अपक्ष आमदार सोबत घेऊन 155 पेक्षा जास्त आमदार जुळवून सरकार बनवलं. आमदार संख्या एवढी भरपूर होती कीं आता पुन्हा इकडून तिकडून आमदार फोडून आपल्या सोबत आणणे गरजेचे नव्हते. दोन पक्ष एकत्र होते तोपर्यंत “टु इज कंपनी” होती. पण त्यांनी पुन्हा राष्ट्रवादी फोडून अजितदादा गट आपल्या सोबत घेतला. आणि तीन पक्षाचे सरकार तयार केले. इथे “थ्री इस क्रॉऊड”(Three Is Crowd) झालं. गोंधळ वाढला. बेबनावाच्या खऱ्या खोट्या अफवा पसरायला लागल्या.
उत्तर पेशवाईत माधवराव पेशव्याच्या मृत्यू नंतर मराठा सम्राज्यात जी परिस्थिती निर्माण झाली होती तीच बजबजपुरी पुन्हा महाराष्ट्रात उद्भली आहे. केंद्रास्थानी पुणे आणि राघोबादादा व नारायणराव ही काका पुतण्याची जोडी होती. नारायणरावाचा खून, त्यातून रामशास्त्री प्रभुणे यांनी राघोबा दादाना घ्यायला लावलेल प्रायश्चित्त, बारभाईंचा राघोबादादा यांना पेशंवे पद देण्यास नकार. त्यातून सर्वत्र अनागोंदी माजून प्रत्येकजण दुसऱ्याकडे संशयाने बघायला लागला. सर्वत्र कट, कारस्थान माजले. तीच परिस्थिती सध्या राज्यात आहे. आता ही केंद्रास्थानी पुणेच आहे आणि काका पुतण्यातील बेबनाव आहे. इथेही मानापमान आणि “संशय कल्लोळ” नाटकाचे खेळ सुरु आहेत. राज्यातील जनतेच भरपूर मनोरंजन सुरु आहे. त्यांना एकाच तिकिटावर दोन दोन नाटक बघायला मिळत आहेत.
पहिलं मानापमान. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील. 15 ऑगस्टलां पुण्यात ध्वजारोहण कारण्याचा मान चंद्रकांतदादा यांचा होता. पण यावर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अधिकार दाखविला. यावर फडणवीस यांनी न्यामी शक्कल लढविली. त्यांनी दोन्ही दादाना आजूला सारून पुण्यातील ध्वजारोहण करण्याच काम राज्यपाल यांच्यावर सोपवलं. अजितदादाच काय केल ते कळलं नाही, पण चंद्रकांतदादा यांची नियुक्ती रायगड जिल्ह्यातील झेंडा वंदनसाठी झाली. ही नियुक्ती सुद्धा वेगळ्याच रोगावरचे औषधं आहे.
तो आजार असा आहे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पदावरुन राष्ट्रवादी आणि शिंदे गट यांच्यात साठमारी सुरु आहे. राष्टवादीला रायगडचे पालकमंत्रीपद अदिती तटकरे यांच्याकडे हवे आहे तर भरत गोगावले यांना हे पालक मंत्रीपद स्वतः कडे हवे आहे. तुम्ही म्हणाल भरत गोगावले तर मंत्री नाहीत, मग ते पालक मंत्री कसे होऊ शकतात. बरोबर आहे. भरत गोगावले मंत्री नसले तरी जेंव्हा केंव्हा मंत्रीमंडळ विस्तार होईल तेंव्हा ते नक्की मंत्री असतील याची त्यांना खात्री आहे. ही मंत्रिपदाची खात्री फक्त भरत गोगावले यांनाच नाही तर शिंदे घटातील प्रत्येक आमदार आणि त्यांच्या सोबत आलेल्या सर्वं अपक्ष आमदारांना अशीच खात्री आहे कीं, ते कॅबिनेट मंत्री होणार. म्हणून भरत गोगावले यांनी त्यांच्या भविष्यातील मिळणाऱ्या मंत्रीपदा साठी रायगड जिल्हा पालक मंत्रीपद राखीव करून हवे आहे. आपण St बस मध्ये खिडकीतून रुमाल फेकून सीट राखीव करून घेतो तसे हे आहे. त्यांच्या बरोबरच विस्तारीत मंत्री मंडळात आपलही घोड न्हाऊन निघेल अशी भाजपाच्या आणि राष्ट्रवादीच्या आशावादी इच्छूकांची त्यात भर पडली आहे. पण शिल्लक मंत्रिपद फक्त 12 चं आहेत. म्हणजे प्रत्येक पक्षाच्या वाट्याला 4/4 मंत्रीपद येणार इच्छुक तर खूप आहेत आता हे गणित कसं सोडवायचं ते शहा साहेबानाचं माहीत आणि देवाला माहीत.
पण फडणवीस यांनी एक गणित तात्पुरत सोडविले आहे. त्यांनी अदिती तटकरे आणि भरत गोगावले यांना बाजूला करून रायगड मध्ये चंद्रकांतदादा पाटील यांना डेप्युटेशनवर पाठवून तात्पुरत टेन्शन कमी केलं आहे. तिथे झेंडा वंदन चंद्रकांतदादा करतील.
आज 12ऑगस्टलां पुण्यातील चांदणी चौकातील एका महत्वाच्या उड्डाणं पुलाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उदघाटन होते. त्या कार्यक्रमात मला डावलन्यात आले असा आरोप माजी आमदार मेघनाताई कुलकर्णी यांनी, चंद्रकांतदादा यांच्यावर केला. तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांदणी चौका पासून केवळ दीडसे मैल अंतरावरील त्यांच्या मूळ गावी दरेगावांत होते. तरी ते गैर हजर राहिले. नाराज नसून ते आजारी आहेत असे उभय बाजूने सांगण्यात आले. तसे असले तरी मुख्यमंत्री शिंदे गावात बांबू लावताना दूरदर्शनच्या सर्वच चॅनेलवर दाखवले जात होते. त्यांचा बांबू लावण्याचा उत्साह पहाता मुख्यमंत्री आजारी असावेत असं वाटत नव्हते. त्यांनी तिथे आज 100 बांबू लावले. इथे कोणीही चुकीचा अर्थ घेऊ नये. बांबू लावले म्हणजे बाबूची रोप लावली.
पुलाचे उदघाटन आणि बांबू रोपन संपता संपता “मानापमान” संपून “संशय कल्लोळ” कधी सुरु झाल हे कळलंच नाही. पुण्यातील उदघाटन सोहळा संपल्यावर सर्वं मराठी चॅनेल्यावर सणसनाटी ब्रेकिंग न्यूज सुरु झाली आणि ती दिवसभर सुरु होती. “मेघा संशय कल्लोळ!”
पुण्यातील एक उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या बंगल्यात अजित पवार, शरद पवार आणि जयंत पाटील यांच्यात एक गुप्त बैठक झाली. ही बैठक अतिशय गुप्त असल्यामुळे अजित पवार आणि जयंत पाटील यांनी माध्यमाना मागमूस लागू दिला नाही. पण शरद पवार ज्या प्रकारे दूरदर्शन वार्ताहरां समोर आले त्यावरून या बातमीला माध्यमातून प्रसिद्धी मिळावी अशी साहेबांची इच्छा आहे कीं कांय असं वाटत होत. ही गुप्त बातमी शोधून काढणाऱ्या सर्वं माध्यमाना याच श्रेय द्यावं लागेल. त्यांनी बरोबर या गुप्त बैठकीचा वेध घेतला. यातून महायुतीतील घटक पक्षात एकमेकां बद्दलचा “संशय मात्र कल्लोळ” उडविणारा ठरणार आहे.
गरज नसताना राष्ट्रवादी फोडली. यात कोणाचा काय फायदा होईल हे परमेश्वर जाणो कीं अमित शहा जाणो. पण यातून कोणीच खुश नाही हे प्रथम दर्शनी चित्र आहे. शिवसेनेतून फुटून निघणाऱ्या बहाद्दरांनी मुख्य दोन आरोप केले होते. एक उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब यांचा हिंदुत्वाचा विचार सोडून दिला म्हणून आम्ही सत्तेतून बाहेर पडतो. दुसरा आरोप होता उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार निधी वाटपात दुजाभाव करतात. आता तेच अजितदादा पुन्हा महायुतीत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री झाले. तर मग आता दुसऱ्या आरोपाच कांय? भारतात पाकिस्तान विलीन होण काय किंवा पाकिस्तानात भारत विलीन होण काय, परिणाम सारखाच होईल.
मुळात अजित पवार सारखा तगडा नेता विरोधी पक्षनेता असणं आणि त्यांच्या सोबत 80/90 आमदाराची विरोधी पक्ष आघाडी असणं ही लोकशाहीची गरज आहे. ती भाजपनें नष्ट केली. विरोधी पक्ष आणि विरोधी पक्ष नेता दोन्ही कमकुवत केले. हे लोकशाहीला मारक आहे.
राष्ट्रवादी महायुतीत येण्या आधी भाजपचे आमदार आणि शिंदे गटाचे आमदार दोन्ही पक्ष खुश होते. कारण त्यांना 21/20 एवढी मंत्री पद वाट्याला येणार होती. तसेच इतरांची महामंडळावर वर्णी लावता आली असती. आता तिसरा भिडू राष्ट्रवादी त्यांच्यात वाटेकरी आल्यामुळे. त्यांना 14/14/13 अशी मंत्रिपद मिळतील म्हणजे जुन्या भिडूंची 13 मंत्रिपद राष्ट्रवादी कडे जाणार. हे दुःख भाजप आमदार आणि शिंदे गटाच्या आमदारांना पचवण जड जाईल.
वैचारीक दृष्ट्या विचार केला तर तर भाजप आणि शिवसेना शिंदे गट हे हिंदुत्ववादी आहेत तर राष्ट्रवादी पुरोगामी. म्हणजे ते एकमेकांला पूरक नसून विरोधक आहेत. शिंदे फडणवीस म्हणतात,”धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज” त्याला विरोध करत अजितदादा म्हणतात “स्वराज्य वीर छत्रपती संभाजी महाराज” याच्यात एकमत कसं होणार? हिंदू देव देवता, हिंदुत्ववादी आणि मोदी यांच्यावर सडकून टीका करणारे अमोल मिटकरी बाबासाहेब पुरंदरे यांना एकेरी संबोधन करून शिवीगाळ करतात. सावरकराचा जाहीर अपमान करतात हे भाजप सहन करणार का?
शिवसेनेत जशी प्रमाणिक फूट पडली आहे तशी फूट राष्ट्रवादीत पडल्याच जाणवत नाही. शिंदे गट आणि ठाकरे गट सभागृहात आणि सभागृहा बाहेरही एकमेकां विरुद्ध जसे षड्डू ठोकून उभे रहातात तस शरद पवार गट आणि अजित पवार गट वागत नाहीत. शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आणि अजितदादा गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे विधान भवनात ज्या प्रकारे एकमेकांना मिठी मारतात ते बघून आता जनतेच्याही मनात संशय कल्लोळ वाढत चालला आहे. हे बंड खरं आहे कीं, निव्वळ तोतयेगिरी आहे. यांनी ईडी पासून स्वतःचा बचाव करावा म्हणून तर ही लुटू पुटू ची फूट पाडली नाही ना. शरद पवार अजितदादा हे अगदी कुठेही कधीही एकमेकांना भेटू शकतात. या पूर्वी अशा दोन भेटी जाहीर पणे झाल्या आहेत. ते एका कुटुंबातील असल्यामुळे या दोन भेटी झाल्या तशा अजून कितीही भेटी ते घेऊ शकल्या असत्या. मग आज पुण्यात अशी गुप्त भेट घेण्याच कारण कांय. या सर्वं गोष्टी जनतेच्या मनात सभ्रम निर्माण करतात. किंवा सर्वत्र तसा “संशय कल्लोळ” उठावा म्हणून खेळली गेलेली खेळी तर नाही ना? त्याची गरज होती कां? या त्रिकुटातील मतभेद, नाराजी, मानापमान, संशय कल्लोळ सोडवता सोडवता नेतृत्वाच्या नाकीनऊ येतील मग जनतेचे प्रश्न कोणी, कसे आणि कधी सोडवावे?

बापू हटकर

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.