आपला जिल्हाऐतहासिकताज्या घडामोडीधार्मिकमहाराष्ट्र

आनंदडोह – तुकोबांच्या वैचारिक घुसळणीचा परिपाक : योगेश सोमण

आनंदडोह – तुकोबांच्या वैचारिक घुसळणीचा परिपाक : योगेश सोमण

Akluj Vaibhav News Network
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 19/6/2023 :
“आनंदडोह” हा संपूर्ण दीर्घांक म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या वैचारिक घुसळणीचा परिपाक आहे.यात आपल्या विठ्ठल भक्तीची चिकित्सा तर तुकाराम महाराज करतातच, पण आपल्याला अभिप्रेत विठ्ठल म्हणजे काय हेही ते सांगतात.भक्तीच्या नावाखाली पाळल्या जाणार्‍या परंपरा आणि त्या परंपरा घालून देणारे त्यांचे पाईक यांचा येथेच्छ शब्दांत समाचारही ते घेतात. भक्तीची व्याख्या नीट समजावून सांगताना विठ्ठलाचे निराकार,निरावयव रूप आपल्या प्रत्येकात,निसर्गात आहे,याची जाणीवही ते करून देतात. असे मत सिनेअभिनेते योगेश सोमण यांनी संत तुकाराम महाराजांच्या वेशभूषेत तुकोबांचे आत्मविश्लेषण केले.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा अकलूज,शंकरराव मोहिते महाविद्यालय,ग्रीनफिंगर्स कॉलेज ऑफ कॉंप्युटर ॲण्ड टेक्नॉलॉजी, शिवरत्न इंस्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज,विजयसिंह मोहिते पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने संवाद,पुणे व सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या वतीने योगेश सोमण अभिनीत संत तुकाराम महाराज यांच्या जिवनावर आधारित ‘आनंदडोह’ एकपात्री दिर्घांकाचे आयोजन अकलूज येथे केले होते. त्याप्रसंगी त्यांनी तुकोबांचे आत्मचरित्र कथन केले.
संत तुकाराम महाराजांची गाथा इंद्रायणीत बुडालेली आहे आणि या तेरा दिवसाच्या काळातले,तुकोबांचे हे आत्मविश्लेषण आहे. सिंहावलोकनाच्या मार्गाने जाणारे हे आत्मविश्लेषण दस्तुरखुद्द तुकोबा तर करतातच,पण त्यांचेच स्त्रीरूप असणारी त्यांची पत्नी आवडीही करते.खरे तर संत तुकाराम महाराज आपल्याला कधी समजलेच नाहीत आणि झेपलेही नाहीत हे म्हणणं जास्त योग्य ठरेल.नेमका हाच तुकाराम लोकांसमोर आणण्याचा स्तुत्य प्रयत्न रंगकर्मी योगेश सोमण यांनी आपल्या ‘आनंदडोह’ या दीर्घांकाद्वारे केला आहे.तुकारामांच्या भोवतीचे ‘साजिरे-गोजिरे’ भक्तीमय रूप लोकांना ठावूक असले तरी हा बंडखोरी करणारा तुकोबा स्वतःच्या वैचारिक घुसळणीत प्रेक्षकांनाही सामील करून घेतो. ‘आनंदडोह’ हे काही तुकोबांचे चरित्र नाही,किंवा त्यांच्या आयुष्यातल्या प्रसंगावर आधारीत सुसंगत कथानकही नाही.याला कथा आहे पण तुकोबांना स्वतःची वैचारिक परंपरा मांडण्यास सहाय्यभूत ठरेल.
तुकाराम हे व्यक्तिमत्व पावणेदोन तासांच्या दीर्घांकात मावणारे नाही,पण सोमण यांनी त्याच्या नेमक्या त्यांच्या भूमिके वरच भर देऊन आणि ती तशीच मांडून संहितेत बंदिस्त केली आहे.शिवाय ती तितक्याच प्रत्ययकारी पद्धतीने सादरही केली आहे.ही संहिता म्हणजे तुकारामांच्या अभंगांच्या दरम्यान भरून काढलेले ‘गद्य’ नाही, तर तिलाही एक स्वतंत्र अस्तित्व आहे.म्हणूनच अभंगाच्याच जोडीने त्याच्या संवादालाही टाळ्या पडतात ते त्यातल्या सकसपणामुळेच.तुकोबांची मनोभूमिका अधिक स्पष्ट करणारे हे संवाद आहेत. सोमण यांनी तुकाराम आणि आवडी अशी दोघांची पात्र रचना करून दोन्ही पात्रे आपणच मांडली आहेत. पण त्यांच्या मते आवडी ही तुकारामांचेच स्त्रीरूप आहे. तुकारामांविषयीच्या अनेक गोष्टी ती आपल्या भाबड्या भाषेत लोकांपर्यंत पोहोचवते.त्यामुळे अनेकदा क्लिष्ट नि वैचारिक होऊ पाहणारे नाटक ती सावरून धरते. तुकारामांच्या अध्यात्मिक भूमिकेचे पदर उलगडत असताना आवडीचे संवाद अर्थातच, जास्त ‘मानवी’ वाटतात.नि ते लोकांना भिडतातही.तुकोबा पाहणार्‍यांची ही वैचारिक घुसळण करणारा हा ‘आनंदडोह’ आहे.यात डुंबल्या शिवाय राहू नका असेही सोमन म्हणाले.यावेळी विविध संस्थांचे संचालक,पदाधिकारी व नाट्य रसिक उपस्थित होते.
🟣नाट्यासाठी खास सेट
‘आनंदडोह’ या एकपात्री दिर्घांकासाठी अकलूज येथील सुनिल कांबळे यांनी स्वखर्चाने मनमोहक नेपथ्य उभा केले. या नेपथ्याचे कौतुक योगेश सोमणसह रसिकांनीही केले.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.