शिवसेनेला “गट” संबोधणे प्रसारमाध्यमांनी थांबवावे
शिवसेनेला “गट” संबोधणे प्रसारमाध्यमांनी थांबवावे
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 20/6/2023 :
गेल्यावर्षी जून महिन्यात महाराष्ट्रात एक राजकीय भूकंप झाला. हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी ५७ वर्षापूर्वी स्थापन केलेल्या शिवसेनेला खिंडार पाडून एकनाथ शिंदे ४० आमदार घेऊन बाहेर पडले. त्यानंतर ज्या नाट्यमय घडामोडी घडल्या हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्या इथे विषद करण्याची आवश्यकता नाही. या राजकीय भूकंपामुळे देशातील सर्वच प्रादेशिक पक्ष हादरले. ज्या भाजपने हे घडविले (हे आता लपून राहिले नाही) भविष्यात त्यांनाही या फोडाफोडीच्या राजकारणाची फळे भोगावी लागणार आहेत. कारण, सत्ता जाते येते. कोणीही सत्तेचा आमरपट्टा घेऊन येत नाही. कर्नाटकात जे सत्तांतर झाले तसे अनेक राज्यात आणि केंद्रात आज ना उद्या घडणारच आहे. त्यामुळे सत्तेचा माज कोणालाही चढू नये. या सर्व घडामोडींवर लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची म्हणजेच प्रसारमाध्यमे, मिडिया यांची भूमिका सत्य मांडण्याची होती. मात्र महाविकास आघाडी सत्तेत आल्या नंतर मिडियाची भूमिकाच संशयास्पद वाटायला लागली. फोडाफोडीच्या नाट्यमय घडामोडी नंतर उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहचला. त्या दिवसापासून मिडियाने शिंदे गट आणि ठाकरे गट असे बोलायला सुरुवात केली.
खरेतर शिवसेना ही एकच आणि ती ही स्व. बाळासाहेब ठाकरे यांचीच, त्यानंतर वारसा हक्काने म्हणा अथवा पक्षाच्या घटनेनुसार रितसर ठराव घेऊन ती शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचीच. हे महाराष्ट्रातील शेंबड पोरंही सांगेल. मग हा ठाकरे गट कुठून आला? हो, शिंदे गट असू शकतो. कारण, कित्येक पक्ष फुटून त्यांनी वेगळा गट स्थापन केला असल्याचे आपण पाहतो. आरपीआय त्याचे उत्तम उदाहरण आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयात खटला चालू असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने केंद्राच्या दबावामुळे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदेंना बहाल केलं. त्यानंतर तब्बल नऊ महिन्यांनी सर्वोच्च न्यायालयाने जे काही निरिक्षणे नोंदविली त्यानुसार ज्याला कायद्याचे ज्ञान नाही असा व्यक्तीही हेच सांगू शकतो की निकाल हा उध्दव ठाकरे यांच्या बाजूनेच लागला आहे. कारण, न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपिठाने निरिक्षणे नोंदविताना स्पष्टच म्हटले आहे की, शिंदे शिवसेना पक्षावर दावा करु शकत नाही. प्रतोद ठाकरेंचाच, गटनेता ठाकरेंचाच, फडणवीसचे पत्र चुकीचे, राज्यपालांची भूमिका चुकीची आणि निवडणूक आयोगाचा निर्णयही चुकीचाच. मात्र, कायद्यानुसार विधिमंडळात आमदारांना निलंबित करण्याचे आणि त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचे अधिकार हे विधानसभा अध्यक्षांना असल्यामुळे घटनापिठाने निरीक्षणे नोंदविली. आता सभापती राहुल नार्वेकर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, घटनेनुसार आणि त्यांच्या म्हणण्यानुसार ऐतिहासिक निर्णय कधी देतात हे पहावे लागेल. तो निर्णय तीन महिन्यात घ्यावा असेही न्यायालयाने निकालात म्हटले आहे. परंतु, हल्लीच्या राजकारण्यांनी आपली सदसदविवेकबुध्दी गहाण ठेवली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून योग्य न्यायाची अपेक्षाच नाही.
इतके सर्व घडल्या नंतर शिवसेना कोणाची हे स्पष्ट झाले आहे. शिवसेना ही ठाकरेंचीच असल्यामुळे यापूढे प्रसारमाध्यमांनी उध्दव ठाकरे यांच्या बाबतीत बातम्या देताना आणि वृतांकन करताना शिवसेना असाच उल्लेख करणे गरजेचे आहे. ठाकरे गट बोलून सर्वच कायद्याचा अवमान करत आहेत. उध्दव ठाकरे यांनीही सर्व मिडियाला शिवसेना आमचीच असे पत्र देऊन असाच नामोल्लेख करण्याच्या सूचना करायला हव्यात. त्याच बरोबर आपल्या पदाधिकारी आणि शिवसैनिकांनाही लिहिताना शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे असेच लिहावे ठाकरे गट लिहू नये असे सांगणे गरजेचे आहे. कारण, आजही शिवसेनेचे पदाधिकारी “ठाकरे गट” असा उल्लेख करत असल्याचे पहायला मिळत आहे.
महेंद्र कुंभारे
संपादक तथा कामगार नेते, भिवंडी
सोमवार दि. १९ जून २०२३
मो.नं. 8888182324

