सुनिता विल्यम्स अंतराळातून कधी परतणार? NASA ने सांगितली नवी तारीख

सुनिता विल्यम्स अंतराळातून कधी परतणार? NASA ने सांगितली नवी तारीख
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 08/03/2025 : अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बॅरी बुच विल्मोर हे 19 किंवा 20 मार्च रोजी अंतराळातून परतू शकतात. दोघेही जवळपास 10 महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) आहेत. या दोघांनीही 5 जून 2024 रोजी या चाचणी मोहिमेसाठी स्टारलाइनर अंतराळयानातून उड्डाण केले. यानंतर आठ दिवसांनी ते परत येणार होते.
स्टारलाइनर अंतराळयान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात येताच, त्यात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. दिशादर्शन करणारे अंतराळयानाचे पाच थ्रस्टर खराब झाले. अंतराळयानातील हेलियमही संपले. त्यामुळे, अंतराळयानाला जळणाऱ्या इंधनावर अवलंबून राहावं लागलं. याच कारणांमुळे दोन्ही अंतराळवीरांच्या परत येण्यास विलंब झाला.
61 वर्षीय विल्मोर आणि 58 वर्षीय सुनिता यांना बोईंग स्टारलाइनर अंतराळयानाने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात नेण्यात आलं. माणसं असलेलं हे अशा प्रकारचं पहिलंच अंतराळयान होतं.
हे अंतराळ मोहीम एक चाचणी होती. यात नवीन अंतराळयान नियमित वापरात आणण्यापूर्वी ते कसे कार्य करेल हे पाहिलं जाणार होतं.
मात्र, जसजसं हे अंतराळयान पुढे पुढे सरकत गेले, तसतशा यात अडचणी निर्माण होऊ लागल्या. त्याच्या प्रोपल्शन सिस्टममध्ये गळती झाली. तसेच काही थ्रस्टर देखील बंद होऊ लागले.
सुनिता विल्यम्सनं रचला पुन्हा एकदा विक्रम
सुनिता विल्यम्स 9 महिन्यांहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात आहे. यासह, ती सलगपणे सर्वाधिक काळ अंतराळात राहणारी पहिली महिला बनली आहे.
हा सुनिता विल्यम्सचा पहिला विक्रम नाही. तिने 22 तास 27 मिनिटे अंतराळात चालत राहून एका महिलेने सर्वात जास्त काळ अंतराळात फिरण्याचा विक्रमही केला आहे.
यापूर्वी हा विक्रम अंतराळवीर कॅथरीन थॉर्नटन यांच्या नावावर होता. कॅथरीन यांनी 21 तासांपेक्षा जास्त काळ अंतराळात फिरण्याचा विक्रम केला होता.
सुनिता विल्यम्सचा हा तिसरा अंतराळ प्रवास आहे. तिन्ही मोहिमांसह तिने आतापर्यंत 9 वेळा स्पेसवॉक केला आहे. या काळात त्यांनी 62 तास 6 मिनिटे अंतराळयात्रा केली.
सुनिता विल्यम्स निवृत्त नौदलाची हेलिकॉप्टर पायलट आहे, तर विल्मोर माजी फायटर जेट पायलट आहे असून यापूर्वी दोनदा अंतराळ प्रवासही केला आहे.