ताज्या घडामोडी

रानभाजी – पेव

रानभाजी – पेव
शास्त्रीय : Costus speciosus
कुळ : Zingiberacea

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज
संग्राहक : प्रविण सरवदे/ आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 19/9/ 2024 :
पेव वनस्पती आल्याच्या (आपण चहात, जेवणात वापरतो ते आलं) कुटुंबातील वनस्पती आहे. आल्या सारखे याचे कंद जमिनीत पसरतात. त्यातुन फ़ुटणारी झुडूपं आजुबाजूची जमिन व्यापून टाकतात. पेवच्या कंदांचा उपयोग ताप, दमा, खोकला आणि जंत यावरील औषधात होतो. त्याठिकाणी इतर वनस्पतीना वाढायला वाव मिळत नाही. त्यामुळे आपल्याला ‘पेवचं बेट’ दिसायला लागत. दरवर्षी जुलै महिन्यात जमिनित असलेल्या कंदा मधून पेव उगवत, सप्टेंबर मध्ये त्याला फुलं येतात आणि नोव्हेंबर मध्ये हे झाड सुकून जा्ते. जेमतेम ४ ते ५ महिन्यांचं आयुष्य असलेलं हे झुडूप आहे. पेवची रोपे कोवळी असताना त्याची भजी व भाजी करतात. पेव हे झुडूप या प्रकारात मोडणारी वनस्पती. २ ते ३ मीटर उंच वाढणारी ही वनस्पती दाट सावलीत वाढते. त्यामुळे याच्या पानांची रचना वैशिष्ट्यपूर्ण असते. पानं १५ ते ३० सेंमी लांब असतात. दाट झाडीखाली वाढणार्‍या या झुडूपाच्या पानांना झाडीतून झिरपणारा सूर्यप्रकाशाचा कवडसा पकडता यावा याकरीता पेवच्या पानांची रचना मुख्य दांड्याभोवती सर्पीलाकार गोल जिन्या सारखी केलेली असते. याचा अजून एक फायदा म्हणजे एका पानाची सावली दुसर्‍या पानावर पडत नाही. पेवच्या बेटाकडे आपल लक्ष वेधले जाते ते हिरव्या बेटावर डोलणार्‍या त्याच्या नरसाळ्या सारख्या दिसणार्‍या पांढर्‍या फुलांमुळे. या फुलांच्या खालच्या बाजूस किरमिजी लाल रंगाची रुपांतरीत पाने पाहायला मिळतात. पूर्ण फुललेलं फुलाचं तोंड खालच्या बाजूला झुकलेलं असतं. फुल पांढर्‍या रंगाचं असून आतल्या बाजूस मध्यभागी पिवळा रंग असतो. यामुळे परागीभवनासाठी येणार्‍या किटकांना मकरंद (मध) कुठल्या दिशेला आहे त्याचे मार्गदर्शन होते. या लांब दांड्याच्या फुलातील मध पिण्यासाठी परागीभवनासाठी लांब सोंड असलेल ग्रास डेमन हे फुलपाखरू पेवच्या बेटातून उडतांना दिसतं. हे कृष्णधवल रंगाचे फुलपाखरू असून पंखांवर पांढरे ठिपके असतात. या फुलपाखराला सावलीत, जमिनीलगत उडायला आवडते. त्याची सोंड त्याच्या आकाराच्या दुप्पट असते. उडतांना फुलपाखराची सोंड कॉईल सारखी गुंडाळलेली असते. पेव सारख्या लांब दांड्याच्या फुलावर बसल्यावर हे फुलपाखरू आपली सोंड उलगडून फुलातील मध पिते.
संदर्भ : डोंगर भाऊ
पाककृती – पानांची भजी
# साहित्य – पेवची कोवळी पाने, बेसन १ वाटी, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, १ चमचा लाल तिखट, थोडे धना जिरा पावडर (नसली तरी चालते), गरजे नुसार मीठ, तळण्यासाठी तेल.
# कृती – वरील तेल व पाने सोडून सगळे साहित्य एकत्र करावे व थोडे थोडे पाणी टाकून इडलीच्या पिठाप्रमाणे पीठ भिजवावे. त्यात धुतलेली पाने बुडवून घ्यावीत. बुडवलेली पाने गरम तेलात सोडावीत. पाने खालून थोडी शिजली वाटली म्हणजे रंग बदलला कि झाऱ्याने पलटावीत. आता बुडबुडे कमी झाले, पाने आत जाऊ लागली कि भजी काढावी. तयार आहे पेवची भजी.
संदर्भ : मायबोली
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.