ताज्या घडामोडी

♦‘पहाटेच्या या प्रहरी म्हणा हरी… हरी..’

Akluj Vaibhav News Network.

🔰 संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 20/07/2024 :

आषाढी एकादशीचा दिवस जेवढा पवित्र…. सात्विक अगदी परवाच्या आषाढीची संध्याकाळही तेवढीच पवित्र आणि सात्विक वाटली. माटुंगा येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात अशोक हांडे यांच्या ‘चौरंग’तर्फे ‘स्वर-स्नेहल’ हा तीन तासांचा कार्यक्रम अस्वस्थ करून गेला. खचाखच भरलेले सभागृह, कार्यक्रम संपल्यावर पायंड्या उतरताना एक आत्मिक शांतता शेवटपर्यंत टिकून होती. १००० रसिकांना या कार्यक्रमाने अस्वस्थ करून टाकले. इतका मनाला भिडलेला तो कार्यक्रम. ही किमया अशोक हांडे यांच्या संकल्पनेची, दिग्दर्शनाच्या गितांची आणि त्यांच्या टीमची. २५ जणांच्या संगीत ताफ्याला बरोबर घेऊन एका भजनीबुवाचे देशपातळीवरील संगीत कर्तृत्त्व थेट मनाच्या गाभाऱ्यात पोहोचवण्याची…. ते भजनीबुवा म्हणजे वासुदेव भाटकर…. लहानपणी टाळ हातात घेतो… ढोलकी वाजवताे… पेटी वाजवतो… आणि गळ्यात टाळ घेवून भजनी मंडळे गाजवतो… कोकणी माणसाला कोकणातील माणसांचे मोठेपण कधीच मोठे वाटत नाही. पण भाट्याच्या खाडीतून मुंबईत आलेले वासुदेव भाटकर संगीत चित्रपट सृष्टीतील महान संगीतकार ‘स्नेहल भाटकर’ होतात. आणि हे त्यांचे नामकरण दिग्गज दिर्ग्दशक केदार शर्मा करतात. त्याचवर्षी त्यांच्या घरात जन्माला आलेल्या त्यांच्या पहिल्या मुलीचे नाव ‘स्नेहल’ ठेवले जाते आणि हा भजनीबुवा मुलीचे नाव आनंदाने स्वीकारून वासुदेवाचा स्नेहल होतो…. त्या भाटकरबुवांचा तीन तासांचा कार्यक्रम पहात असताना, एका मराठी संगीतकाराची पुढच्या पिढीसाठी अशोक हांडे यांच्या कार्यक्रमाने किती मोठी बेगमी करून ठेवली आहे. आणि त्यामुळेच हा कार्यक्रम मनाला नुसता भावला नाही तर २४ तासांनंतरही मनात रूतून बसलेला आहे. कारण या मायावी हिंदी चित्रपटसृष्टीत वावरताना आपला साधेपणा न सोडणारा…. डोक्यावर गांधी टोपी कायम ठेवून या जगात वावरणारा. सुधीर फडके, ग. दि. माडगुळकर, सी. रामचंद हे तर सिनेसृष्टीतील जेष्ठ मराठी संगीतकार, कवी… यांनी भाटकर यांचे महत्त्व जाणलेच… पण, भाटकर यांनी महम्मद रफी, हेमंतकुमार, तलत महम्मद, महेंद्र कपूर, सुमन कल्याणपूर, लता दीदी अशा दिग्गज गायकांकडून अतिशय वेधक चालींची गाणी गाऊन घेतली आणि त्यांचे सगळे चित्रपट भाटकर यांच्या संगीताने अमर झाले.
अशोक हांडे यांच्या संकल्पनेची ही कमाल आहे… मला एखाद्या नाटकापेक्षासुद्धा मराठीमधील अशा महान कलावंतांना अमर करणाऱ्या अशोक हांडे यांच्या सर्वच कार्यक्रमांचे अप्रूप याचकरिता वाटते. कारण त्यांचा पहिला कार्यक्रम माणिक वर्मा यांच्यावरचा ‘माणिक मोती’ मग पी. सावळाराम यांच्यावरील ‘गंगा-जमुना…’ मग लता दीदींवरील ‘अमृतलता’… मग पु. लं. वरचा ‘आनंद यात्री…’ मग मधुबाला वरील ‘मधुरबाला’ मग यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षांत (१२ मार्च २०१२) ‘मी यशवंत’ आणि मग साहित्य सम्राट आचार्य अत्रे यांच्यावरील ‘अत्रे अत्रे सर्वत्रे’…. आणि परवा सादर केलेला भजनीबुवा भाटकर यांच्यावरील ‘स्वर-स्नेहल’…. खरंतर महाराष्ट्रासाठी हे आठ कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची अष्टपैलू सांस्कृतिक मेजवानी’ आहे. मराठी भाषा… मराठी संस्कृती… मराठी संगीत… आणि मराठी नेतृत्व याची महती गाणारे हे सगळे कार्यक्रम आहेत… ही मोठी माणसं तर गेली… चव्हाण खूप असले तरी यशवंतराव नाहीत…. देशपांडे खूप आहेत…. पु. लं. नाहीत… लतादीदीही आता नाहीत… माणिक वर्मा नाहीत… त्यांनी गायलेला ‘कबीराचे विणतो शेले…’ आता पुन्हा कसे ऐकायला मिळेल? बंडखोर कवी पी. सावळाराम यांच्या लेखणीतून उतरलेली ती गितं… पुन्हा कशी ऐकता येतील?
‘जा.. मुली जा… दिल्या घरी तू सुखी रहा..’
‘पंढरी सोडून चला विनविते रखुमाई विठ्ठला’
‘पतीव्रते सीते, का रडशी धाई-धाई…
रामाहृदयी राम नाही…’
या सर्व कार्यक्रमांतून अशोक हांडे यांनी ५०-६० वर्षांपूर्वीचा तो सगळा वैभवसंपन्न संगीत काळ डोळ्यांसमोर जिवंतपणे उभा केला. भाटकरबुवांचे संगीत हा तोच ठेवा आहे… जुन्या काळात ‘संत तुकाराम’ हा केवढा गाजलेला चित्रपट होता. विष्णुपंत पागनीस यांनी साकारलेला तुकाराम आणि त्याच्या मुखातील ते भजन आणि त्याचे संगीत स्नेहल भाटकर यांचे…
‘पहाटेच्या या प्रहरी म्हणा हरी… हरी…’
ती धून ऐकताना सारे रसिक श्रोते भान हरपून गेल्यासारखे वातावरण तयार झाले. हेमंतकुमार हे केवढे मोठे संगीत दिग्दर्शक. स्वत: गायक… १९५२ सालचा त्यांचा ‘नागिन’ चित्रपट हा केवळ त्यांच्या १२ गाण्यांच्या संगीतामुळे गाजला. ‘तन’ आणि ‘मन’ डोलवून गेला होता…. (‘तन डोले’… ‘मन डोले…’ दिल का गया करार.. कौन बजाए बासुरीया….) या हेमंतकुमार यांना स्नेहल भाटकर यांनी संगीत दिलेले गाणे गायला लावले…. हिंदी चित्रपटसृष्टीत मराठी संगितकाराची ही जी काही वट होती ती त्याच्या संगीत सामर्थ्याच्या आदराची पावती होती. तलत मेहमुदसारखा रेशमी आवाज असलेला नाजूक गळ्याचा गायक, त्याच्याकडून स्नेहल भाटकर यांनी उडते गाणे गाऊन घेतले…. आणि हा सगळा विषय साकारताना अशोक हांडे यांच्या दिग्दर्शनाची कमाल अशी की, खुद्द स्नेहल भाटकर यांच्या मुलाखतीचे तुकडे त्या-त्या ठिकाणी जोडून ते गीत आणि तो प्रसंग असा काही उंचीवर जातो… सारे सभागृह टाळांच्या गजरात दहावेळा तरी ‘वन्समोअर’ करते… हे सगळे कार्यक्रम महाराष्ट्राच्या सांस्कृतिचे वैभव आहेत. लाखो रुपये कशावरही खर्च करणारे अनेक लोक आहेत.. पण, सारस्वत बँकेने प्रायोजक म्हणून पुढे येऊन ‘स्वर-स्नेहल’ कार्यक्रम रसिकांना सादर केला. अशोक हांडे यांनी उभा केलेला सगळा पसारा पाहिल्यानंतर हे कार्यक्रम महराष्ट्रातील दातृत्त्व असलेल्या अनेकांनी पुढाकार घेवून दत्तक घेतले पाहिजेत… महाराष्ट्राचे हे मोठे विचारधन आहे… संस्कारधन आहे… आणि संगीताचा ५० वर्षांतील तो सगळा ठेवा आहे… एका भजनीबुवाला हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये किती उंचीवरचे स्थान होते… परंतु हा भजनीबुवा डोक्यावरील गांधी टोपी कायम ठेवून या मायावी दुनियेत वावरला… तोल कधी जावू दिला नाही. आणि इमान कधी विकले नाही… आपल्या मूळ भजनाचा पिंड सतत कायम ठेवून एका चाळीतील अवघ्या दोन खोल्यांत संसार करणारा हा महान संगीत अवलिया…
त्याच्या कार्यक्रमाचा समारोप करताना अशोक हांडे परमोच्च बिंदू गाठतात… स्नेहल भाटकर यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार जाहीर झाला आहे…. तो कार्यक्रम दिल्लीत झाला. त्यावेळी मुख्यमंत्री होते विलासराव देशमुख… आणि केंद्रीय विद्युतमंत्री होते, सुशीलकुमार शिंदे…. कार्यक्रमाच्या दिवशी सकाळी भाटकरबुवा हे बाथरूममध्ये पडले.. आणि त्यांच्या मणक्याला मार लागला. त्यांना स्ट्रेचरवर कार्यक्रमाला आणण्यात आले. आणि त्यांना सामोरे गेले ते मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे…. आणि त्याच वेळी ‘हमारी याद आयेगी…’ या अत्युच्च शिखरावर लोकप्रिय झालेल्या त्यांनीच चाल दिलेल्या गाण्याचे सूर बेभान करून टाकतात… कार्यक्रम तिथे संपतो… आणि निशब्द होऊन सारे रसिक नाट्यगृहाची एक एक पायंडी उतरत असताना त्याच्या डोळ्यांसमोर फक्त आणि फक्त स्नेहल भाटकर यांची मूर्ती असते…
हा सगळा कार्यक्रम बसवणे सोपे नाही. अशोक हांडे यांची ही २५ जणांची टीम सहा-सहा महिने मेहनत करते… खुद्द अशोक हांडे यांची दोन गाणी तर….
‘आम्ही लटके ना बोलू’…
‘खेळे भवरा ग बाई भवरा…’
कितीदा ऐकली तरी समाधान होणार नाही… अशी मनाला भिडून जातात. सगळेच कलावंत भारी आहेत… प्रीती वारिअर, शर्वरी जाधव, स्मिता जोशी, निलाक्षी पेंढारकर, प्रमोद सोहनी, गौतम कामत, संतोष वाघमारे, संकेत जाधव हे गायक. संगीत संयोजन करणारे महेश खानोलकर, हार्मोनियमवर गोविंदराव टेंबे यांच्यासारखीच ज्यांची बोटे फिरत असतात त्या नीला सोहनी… आणि सिथ्नेसायझरवर सत्यजित प्रभू यांनी तर कमालच केली. गिटारवाला अभिमान आपटे, तबलेवाला अविनाश मयेकर, ढोलकवाला नारायण साळुंखे, भावेश पाटील, रेणूका पानसे, गौतम सोनावणे, ध्वनी संयोजन दिलीप बोनाटे, प्रकाश योजना सुनील जाधव, व्हिडीओ संयोजन शैलेंद्र म्हात्रे, रंगभूषा प्रसाद ठक्कर असा एक-एक कलाकार लाख मोलाचा आहे… एवढ्या सगळ्या मराठी कलावंतांना एकत्रित ठेवणे आणि उत्साहाने त्यांनी या कार्यक्रमात समर्पणाची भावना ठेवून त्यांच्या प्रत्येक शब्दातून व्यक्त होणे, हे सोपे काम नाही. मानधनासाठी काम करणारे वेगळे…. आणि आत्मियतेने जीव ओतून जणू भाटकर यांच्या परिवारातीलच आपण आहोत, या भावनेने यातील प्रत्येक कलावंत स्नेहल भाटकर यांना त्याच्याजवळ जे सर्वोत्तम आहे ते देऊन गेला.
खंत एवढीच वाटते की, अशोक हांडे या महान कलाकाराने आजपर्यंत ‘मंगल गाणी… दंगल गाणी….’, ‘गाने-सुहाने’, ‘आवाज की दुनिया’, ‘आझादी पचास’ आणि आता गाजत असलेला ‘मराठी बाणा…’ या मराठी बाण्याचे तर २,२६१ प्रयोग झाले आणि अजूनही तो हाऊसफुल्ल आहे… पण, ‘माणिक-मोती’, ‘गंगा-जमूना’, ‘अमृत लता’, ‘मी यशवंत’, ‘अत्रे अत्रे सर्वत्रे’ किंवा स्नेहल भाटकर यांच्या संगीत जीवनावरील ‘स्वर-स्नेहल’ हे कार्यक्रम तिकीट काढून पहायला मराठी माणूस पुढे येत नाही… एवढे मोठे कार्यक्रम सादर करताना त्याची आर्थिक बाजू मजबूत नसेल तर, हा सगळा गेल्या ७५ वर्षांतील इतिहास महाराष्ट्राचा मोठा ठेवा कोण जपणार आहे? म्हणून मराठी रसिकांनी साहित्य-कला-संगीत आणि संस्कृतिमध्ये इतिहास घडवणाऱ्या अशा कार्यक्रमांना खरंतर डोक्यावर घेतले पाहिजे. हे कार्यक्रम तरुण पिढीने पाहिलेच पाहिजेत… शनिवार-रविवार हजार-पाच हजार भोजनासाठी हॉटेलमध्ये खर्च करणाऱ्या मध्यवर्गीयांना, अशा कार्यक्रमाचे मोल समजू नये, हे दुर्दैव आहे. हे कार्यक्रम बसवताना करावी लागलेली मेहनत, संयोजन, त्याचा समतोल (कोऑर्डिनेशन) ही सोपी गोष्ट नाही…. अफाट मेहनत, समर्पण आणि तन्मयता याशिवाय असे कार्यक्रम यशस्वी होणे शक्य नाही. अशोक हांडे यांच्या संस्थेचे नावच ‘चौरंग’ आहे. चौरंग म्हणजे बसायचे स्टूल नव्हे… ‘चौरंगा’ला पावित्र्य आहे… कोणतीही पूजा चौरंगावर होते. अशोक हांडे यांच्या या संस्थेने या महान संगीतकारांची ही पूजा एक साधना म्हणून ‘चौरंग’मार्फत सादर केलेली आहे. त्याचे मोल अनमोल आहे… ते तिकीटाच्या दरात मोजता येणार नाही. इथून पुढे असे संगीतकार, गीतकार फार अवघड आहेत. सुधीर फडके, ग. दी. मा., सी रामचंद, वसंत देसाई, स्नेहल भाटकर, लता दीदी, माणिक वर्मा असे संगीतकार आणि गायक पी. सावळाराम यांच्यासारखे कवी आणि यशंतरावांसारखे नेते आणि आचार्य अत्रे यांच्यासारखा संयुक्त महाराष्ट्राचे राज्य महाराष्ट्राच्या झोळीत टाकणारा नेता, वक्ता, पत्रकार पुन्हा होणार नाही… आणि एका भजनीबुवाच्या अंत्यसमयी गाताना लतादीदी भजनीबुवांनीच चाल दिलेले गीत गाऊन श्रद्धांजली वाहताना दीदींच्या डोळ्यांतून अश्रू ओघळतात… स्नेहल भाटकरांचे मोल लतादीदी यांना समजते. मराठी रसिकांना हे समजत नाही… त्यासाठी प्रायोजक शोधावा लागतो…. महाराष्ट्राचा हा सांस्कृतिक पराभव आहे. पण, त्यामुळे अशाेक हांडे यांच्या कार्यक्रमाला जराही उणेपणा येत नाही. त्यांचे काम शब्दात तोलताच येणार नाही… कोणताही पुरस्कार देवूनही त्यांचा पुरेसा गौरव होईल, असे नाही. त्याच्याही पलिकडे त्यांचे हे काम मोठे आहे.
दिवसभर आंब्याचा व्यवसाय करणारा हा व्यावसायिक…. संध्याकाळ झाली रे झाली की, देवगडच्या हापूस आंब्याच्यापेक्षाही अधिक मधूर असा मराठी सारस्वताच्या संगीताच्या सप्तसुरांच्या मेजवानीचे ताट रसिकांसमोर ठेवतो… आणि त्या भरल्या ताटावर अनेक महान संगीतकारांचे चेहरे आपल्याला दिसतात. महाराष्ट्राचे हे वैभव अशोक हांडे यांच्यामुळे पुढच्या पिढीला समजणार आहे… आषाढी एकादशीची ती संध्याकाळ त्यामुळेच अधिक पवित्र झाली… मनाला भावली. एवढेच नव्हे तर त्या कार्यक्रमाने अस्वस्थ केलेली ही मनाची अवस्था अजूनही स्थिरावलेली नाही… काल सकाळी उठल्याबरोबर जमिनीवर पाय टेकताना तोंडून शब्द आले….
‘पहाटेच्या या प्रहरी… म्हणा हरी… हरी…’
एका कार्यक्रमाचा हा परिणाम आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाने हा महाराष्ट्राचा ‘सांस्कृतिक अष्टकोन’ दत्तक घेतला पाहिजे…. त्यात राजकारण न आणता महाराष्ट्राच्या संस्कृती, कला, साहित्य याचा चौघडा वाजत राहिला पाहिजे, हीच अपेक्षा आहे… सरकारला हे जमले नाही तर… महाराष्ट्रातील नामवंतांनी पुढे येऊन हे कार्यक्रम गावो-गावी नेले पाहिजेत…. एका एका पिढीला सुसंस्कृत आणि चारित्र्यसंपन्न करण्याचे सामर्थ्य या कार्यक्रमांमध्ये आहे. एवढे अगदी ठामपणे सांगतो… आणि अशोक हांडे यांच्या संपूर्ण टीमचे…. त्यांचे स्वत:चे आणि त्या दिवशी उपस्थित असलेल्या भाग्यवान रसिकांचे पुण्य किती मोठे होते… ते असेच जपून ठेवतो आणि थांबतो…
सध्या एवढेच.

 

मधुकर भावे

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.