ताज्या घडामोडी

शिंदखेडा मतदार संघाची जागा राष्ट्रवादी (श.प.) गटाला जाणार ?

संपादकीय………..✍️

शिंदखेडा मतदार संघाची जागा
राष्ट्रवादी (श.प.) गटाला जाणार ?

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 14/9/ 2024 : देशाचे नेते आणि राष्ट्रवादी पक्षाचे सर्वोसर्वा शरदचंद्रजी पवार आज शिंदखेडा येथे दाखल होत आहेत. मागील महिन्यात खासदार सुप्रियाताई सुळे यांनी देखील शिंदखेडा मतदार संघात हजेरी लावली होती. मागील महिन्यातच जिल्हा परिषदेचे सदस्य आणि भाजपा आमदार जयकुमार रावल यांचे उजवे हात समजले जाणारे कामराज निकम यांनी राष्ट्रवादी (श.प.) गटात केलेला प्रवेश म्हणजे शिंदखेडा मतदार संघाची जागा शरदचंद्र पवार यांनी निवडली असल्याची चर्चा आता होऊ लागली आहे. महाराष्ट्राच्या निवडणूका या नोव्हेंबरमध्ये होतील असे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत. त्यादृष्टीने राज्य निवडणूक आयोग तयारीला देखील लागला आहे. याच पार्श्वभूमीवर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे दोन-दोन दौरे महाराष्ट्रात झालेत. 20 तारखेला प्रधानमंत्री पून्हा वर्धा येथे येत आहेत. अजित पवार यांची ‘गुलाबी’ यात्रा सुरू झाली आहे. काँग्रेसच्या गोटात शांतता आहे. उबाठाच्या नेत्यांची सक्रीयता सर्वात जास्त आहे. अशा पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे 84 वर्षाचे तरूण नेते राज्याच्या दौर्‍यावर आहेत. विविध उपक्रमांना त्यांची उपस्थिती दिसते आहे. दिवसातून किमान पाच ते सहा कार्यक्रमांना ते उपस्थित असतात. त्यांनी मला एव्हढ्याच जागा हव्यात, आमचाच मुख्यमंत्री असेल अशा प्रकारची ‘उथळ’ वक्तव्ये सुद्धा केलेली नाहीत. लोकसभेत सुद्धा त्यांनी कोणत्याही प्रकारचे वक्तव्य जागा मागणी संदर्भात केेले नव्हते. त्यांच्या राष्ट्रवादीत उभी फुट पडलेली होती. 40 आमदार अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार यांना सोडून भाजपात दाखल झाले होते. तरी सुद्धा हा ‘जाणता राजा’ डगमला नाही. हवालदील झालेला दिसला नाही. आणि घरात सुद्धा बसला नाही. उलट नव्या ताकदीने नवी टीम उभी करण्यासाठी शरदचंद्रजी पवार तरूणाईच्या ताकदीने घराबाहेर पडले. आणि पून्हा नव्याने पक्षाची ‘मोट’ बांधण्याची त्यांनी तयारी सुरू केली. पक्ष गेला, चिन्ह सुद्धा गेले परंतू तरीही विचलीत न होता लोकसभेच्या केवळ दहा जागा मागीतल्या आणि त्यापैकी आठ जागा निवडून आणल्या. म्हणजे राजकारण कसे खेळायचे याच ‘शक्तीस्थळ’ म्हणजे शरदचंद्र पवार आहेत, अस म्हणता येईल. ते उद्या शिंदखेडा मतदार संघात दाखल होत आहेत ही गोष्ट साधारण नाही. आता शिंदखेडा मतदार संघाची पार्श्वभूमी काय आहे ते पाहु. हा मतदार संघ जातीय समीकरणात पाहिला तर यामध्ये बहुजन समाज म्हणजे पाटील समाजाचे वर्चस्व असलेला मतदार संघ आहे. दूसर्‍या क्रमांकावर राजपूत समाज या मतदार संघात आहे. या शिवाय कोळी, माळी, आदीवासी आणि बारा बलुतेदार लोक या मतदार संघात राहतात. सातत्याने दुष्काळग्रस्त या तालुका म्हणून इतिहास आहे. सातत्याने सलग पाचवर्ष जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा दादासाहेब रावल यांनी अथक परिश्रम घेवून तालुक्यातील जमीन, हवामान, पाणी याचा अभ्यास करून मका आणि दुध या दोन गोष्टी निवडल्या. आणि संपूर्ण शिंदखेडा तालुक्यातील शेतकर्‍यांना दोन पैसे मिळतील या दूर दृष्टीने शेतकर्‍यांना मका पेरण्यासाठी प्रोत्साहित केले, मार्गदर्शन केले. आणि दोंडाईचा शहरात स्टार्च प्रकल्प उभारला. यातून शिंदखेडा तालुक्यात रोजगार उभा राहिला. या शिवाय दुध संघाची स्थापना करून प्रत्येक गावात शेतकर्‍यांना गाई वाटल्या आणि यातूनच खर्‍या अर्थाने शिंदखेडा तालुक्याची ओळख निर्माण झाली. दादासाहेब रावल म्हणजे निष्ठावंत काँग्रेसचे नेते, प्रचंड संयमी, जात-पात-धर्म याकडे कधीही लक्ष न देता सुधारणावादी-समन्वयाचे राजकारण करणारे सर्वमान्य नेते होते. असे असतांना सुद्धा दादासाहेब रावल खासदार होवू शकले नाहीत, आमदार ही झाले नाहीत. परंतू बापूसाहेब रावल आमदार झालेत. त्यानंतर जेव्हा तत्कालीन शहादा मतदार संघातून राजकारणातले दोन महारथी अण्णासाहेब पी.के.पाटील आणि नानासाहेब हेमंत देशमुख निवडणूकीच्या रिंगणात होते त्यावेळी शिक्षण घेवून नुकतेच भारतात आलेले जयकुमार रावल यांनी या दोन्ही महारथींच्या विरोधात निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आणि आश्चर्य म्हणजे सहकार महर्षी, पी.के.अण्णा पाटील आणि ताकदवर नेते हेमंत देशमुख या दोघांचा पराभव करत जयकुमार रावल राज्याच्या विधानसभेत पोहचले. आणि त्यानंतर 2009-2014 व 2019 या तिन्ही विधानसभा निवडणूकीत जयकुमार रावल यांनी मागे वळून पाहिले नाही. अर्थात ‘गढीचा’ राजकीय-सामाजिक वारसा त्यांच्या पाठिशी होता. त्यांचे विरोधात काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शामकांत सनेर, राष्ट्रवादीचे संदीप बेडसे, ज्ञानेश्वर भामरे यांनी निवडणूका लढविल्या. परंतू त्यांना यश मिळाले नाही. अर्थात 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणूकांमध्ये मोदी लाट होती हे विसरून चालणार नाही. परंतू जयकुमार रावल यांचा मतदार संघाशी असलेला संबंध, सातत्याने असलेला जनसंपर्क, विकास कामांची जाण आणि विशेष म्हणजे दुष्काळग्रस्त शिंदखेडा तालुक्यासाठी ‘जामफळ’ धरणाची निर्मिती ही जयकुमार रावल यांची जमेची मोठी बाजू आहे. या पार्श्वभूमीवर आता येणार्‍या निवडणूकीत शिंदखेडा मतदार संघात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल ? या विषयीची मोठी उत्सुकता मतदार संघात आहे. कारण महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे प्रमुख दावेदार शामकांत सनेर यांनी ताकदीने आपल्याला उमेदवारी मिळावी अशी मागणी केलेली आहे. त्यांनी धुळे जिल्हा लोकसभेच्या निवडणूकीत सुद्धा आपल्याला उमेदवारी मिळावी अशी मागणी सुरूवातीपासून लावून धरली होती. परंतू बाळासाहेब थोरत यांनी डॉ.शोभा बच्छाव यांचे नावाचा आग्रह आणि हट्ट धरल्याने शाम सनेर यांना यावेळी उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे संतप्त होवून सनेर यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षश्रेष्टींना पाठविला होता. परंतू पक्ष नेत्यांनी त्यांची समजूत घातल्यानंतर त्यांनी तो मागे घेतला होता. आता त्यांनी शिंदखेडा मतदार संघाची विधान सभा निवडणूक लढण्याची तयारी सुरू केलेली आहे. आणि महाविकास आघाडीत मलाच उमेदवारी मिळेल असा त्यांना विश्वास आहे. परंतू याच सोबत विधान सभा आणि शिक्षक मतदार संघातून निवडणूकीचा अनुभव असलेले आणि शरदचंद्र पवार यांचे मानसपूत्र समजले जाणारे, प्रशासकीय सेवेचा अनुभव असलेले संदीप बेडसे यांनी सुद्धा राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी सुरू केलेली आहे. महाविकास आघाडीत त्यांनाच उमेदवारी मिळेल असा त्यांना विश्वास आहे. तालुक्यातील ज्येष्ठ नेते त्यांचे सोबत आहेत. या शिवाय शरद पवार गटात नुकतेच दाखल झालेले कामराज निकम यांना देखील उमेदवारीची अपेक्षा आहे. परंतू त्यांना उमेदवारी मिळेल अशी शक्यता नाही. परंतू ते संदीप बेडसे यांचेसोबत आहेत. त्यामुळे संदीप बेडसे जयकुमार रावल यांचे गोटातून बाहेर आलेले कामराज निकम, हेमंतनाना देशमुख अशी मातब्बर मंडळी ही संदीप बेडसे यांचे सोबत असल्याने आता महाविकास आघाडीची उमेदवारी शामकांत सनेर यांना मिळते की संदीप बेडसे यांना मिळते ? यावर मतदार संघात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. जयकुमार रावल यांचे विरोधात एकास-एक उमेदवार देण्याचे धोरण महाविकास आघाडीचे असल्याने आता उमेदवारी कुणाला मिळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. परंतू केवळ एका महिन्याचे आत खा. सुप्रियाताई सुळे आणि शरदचंद्रजी पवार या दोघांच्या शिंदखेडा दौर्‍यामुळे शिंदखेडा मतदार संघाची जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे जाणार अशा चर्चांना आता पुष्टी मिळते आहे. त्यामुळे विधानसभेतही शामकांत सनेर यांना थांबावे लागणार का ? असा प्रश्न त्यांचे समर्थकांना पडला आहे. तर संदीप बेडसे यांच्या समर्थकांमध्ये आनंदाला उधाण आलेले आहे. कालाय तस्मे नमः जागा वाटपात कुणाचे भाग्य कुठे फुलणार हे येणारा काळाच सांगू शकेल. तूर्तास एव्हढेच… साभार दै. पोलीस शोध

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.