मतदानाचा भुल- भुलैय्या ?

मतदानाचा भुल- भुलैय्या ?
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 08/11/2024 : निवडणूक आली की सर्व मतदारांच्या इच्छा ,अपेक्षा पल्लवीत होतात. प्रत्येकच मतदारांचा उत्साह वाढून आपण काही या निवडणुकी त विशेष वेगळे केल्याचा अंतर्भाव तो मनात जपत असतो. परंतु निवडणुक ही रंगीबेरंगी असते व मागील निवडणुकीत अंगावरचे काळे पडलेले डाग स्वच्छ करण्याची , ती प्रक्रिया असते. निसर्गाचा इंद्रधनुष्य सप्तरंगी आहे. तांबडा , जांभळा, निळा,पिवळा,लाल, हिरवा,केशरी, पांढरा , असा रंगीबेरंगी इंद्रधनुष्य पावसाच्या सरीत आकाशात शोभायमान दिसतो. तसेच लोकशाहीने मात्र हे सर्वच राजकीय रंग पचवून घेतलेत . मूळ घटनेचे जसे तुकडे केले, तसेच सत्ताधीशांनी, राजकीय पक्षांनी, व इतर सामाजिक संघटनांनी सुध्दा, नैसर्गिक इंद्रधनुष्यातील अनेक रंग वाटून घेतले. जसे शेतकरी संघटनेचा लाल रंग, बौद्ध समाजाचा निळा, मुस्लिमांचा हिरवा, मातंग समाजाचा पिवळा. हिंदूचा भगवा, तसेच राजकीय पक्षाने सुद्धा – भारत राष्ट्र समितीचा गुलाबी. आर.पी. आय चा निळा, शिवसेनेचा भगवा, कम्युनिस्टनचा लाल, लोकसंग्राम पक्षाचा लाल – काळा, राजकीय पक्षांचे रंगावर सुद्धा शिक्का मोर्तब झाले. म्हणजेच हे पक्ष एकत्र नांदायला तयार नाहीत. जिकडे तिकडे राजकीय पक्षाच्या दुकानदारीचा बाजार मांडला गेला, म्हणजेच समाजात दुही,भांडणे लावणारे खरे हेच दोषी असून शकुनी मामा आहेत. व हे सर्व स्वार्थासाठी एकत्र येतात अन् मतलब संपला की दूर जातात.
इंद्रधनुश्यातील रंगाप्रमाणे सारेपक्ष एकत्र येऊन. सन २६ जानेवारी १९५० मध्ये लागू झालेली मूळराज्य घटना पुन्हा समाजात कार्यरत झाली. तर आपणहून लोकशाही नांदेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या मूळ राज्य घटनेचा रंग हा सत्तेत आलेल्या पक्षांनी बेरंग करून टाकला. प्रत्येका नी वेळोवेळी आप -आपल्या सोयीनुसार राज्य घटना दुरुस्ती केल्यामुळे देशावर ही कर्जबाजारीपणाची अवदशा आणून ठेवली. आज दर डोई चाळीस हजार रुपये कर्ज, देशाची आर्थिक धोरणे बिघडल्यामुळे झाली. त्याचे बसणारे चटके नागरिकांनाच आता सहन करावे लागत आहे . हे सर्व रंगी बेरंगी पक्षाचे मालक, तिजोरीवरील नागोबा होऊन बसलेत, जनतेच्या कष्टाची तिजोरी लुटण्याचे दिवा स्वप्न पाहत आहे. आपल्या आहारावर कितीक हिस्सा येईल. हीच मतलबी चिंता यांना सतावत आहे.
” ना कोणाला शिवाजीचे राज्य आणायचे आहे? ना कोणाला शेतकरी,शेतमजुराचे आर्थिक स्वातंत्र्य आणायचे आहे? “. जबरदस्तीने सत्ता टिकवायची, अन् कायद्यांची चिरफाड करून , सत्तेच्या बळावर न्यायालये झुकवायची, अशी भाषा जर कोणी करीत असेल तर आता न्याय मागायचा कुठे? कारण आज खोट्या कामाचे सादरीकरण करून, आपल्या बाजूने निकाल लावण्यातच बकाळ पैसा मिळतो. म्हणतात ना जेव्हा जनतेचा राग अनावर होईल, तेव्हा सुप्रीम कोर्ट सुध्दा जनता जाळून टाकायला मागे पुढे पाहणार नाही? ही भविष्याची नांदीच जनतेला आता दिसत आहे. हीच परिस्थिती लोकशाहीला घातक आहे.या आमदार – खासदारांनी लालची पोटी या देशाची वाट लावली. हे सारे भाड्याचे बैल आहेत. म्हणजेच निराशावादी बनवून फक्त शासकीय योजनांवर जगण्याच्या जनतेला सवयी लावल्यात? सर्वच पक्ष,सर्वच जातीचे, नात्यागोत्यातील आमदार- खासदार बदलवून पहिले, पण रस्ता दिसला नाही. कारण या सर्वाचे मूळ खांडूक वारंवार केलेली घटना दुरुस्ती आहे. त्यामुळेच लोकशाहीतील वाटचाल ही हुकूमशाहीकडे नेल्या गेली. त्यासाठी संसद मध्ये पुन्हा आता नवीन धोरणाची कायदे दुरुस्ती करावी लागेल. परिवर्तन हाच निसर्गाचा नियम आहे.
काही जुनी व्यवस्था कालबाह्य झाली. तर पुन्हा पुढील पिढीसाठी नवीन प्रोत्साहित व्यवस्था उभी करावी लागेल. देश तर भिकरचोट व्यवस्थेत आणून ठेवला. शेतीमालाचे भाव कमी देवून ,सरकारी स्वस्त दुकानात धान्य वाटप फुकट वाटप चालू आहे. भारत हा कृषी व ऋषीची परंपरा असलेला देश आहे. मूळ संस्कृतीला बगल देवून लूच्चेशाहीला जिवंत ठेवण्याचे नाटक चालू झाले आहे. नुसते स्टेज वर जाऊन, एकमेकाची खरडपट्टी काढणे, एकमेकांचे गटारे उधळणे, शिव्यादेवून टाळ्या घेणे,असाच तमासखोरांचा तमाशा चालू आहे. नुसते दिवसभर टीव्ही, चॅनल , इलेक्ट्रॉनिक मीडिया, बरबटलेल्या परिस्थितीचे दर्शन घडवीत आहे. सर्वच पक्ष भ्रष्टाचारी आहेत. कोणीही धुतल्या तांदळाचे नाहीत. एकेकाळी काँग्रेस भ्रष्टाचारी होती आता बीजेपी सुद्धा भ्रष्टाचारी झाली . आणि पुन्हा सत्ता बदल झाला तर बीजेपीचा भ्रष्टाचार सुद्धा बाहेर आल्याशिवाय राहणार नाही, याची बीजेपीला सुद्धा आता भीती आहे . भ्रष्टाचार संपवायला निघाले होते,जे बाहेर गेलेला भ्रष्टाचारी पैसा आणायला गेले होते , तेच आता स्वतःच भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण द्यायला निघाले?
अगोदर सन१९९० चे काळात कर्तबगारीवर, नितीमत्तेवर, संस्कारी पक्षाचे ध्येय धोरणावर, मतदार मते देवून उमेदवारांना शिक्का मोर्तब करायचे. मात्र नंतरचे काळात त्यांनीच सरकारचे तिजोरीतला अर्थार्जनाचा सहारा घेतला.अन् समाजात महाचोराची किंमत वाढायला लागली,आणि तिथेच नीतिमत्ता संपली. शेतकरी – शेतमजूर वर्ग हा शासन योजनेचा लाभ घेण्यासाठी सत्तेतील आमदार- खासदारांच्या मागे धावू लागला . हेच तर स्वतःच लुटारु, धोकेबाज असून फक्त शेती उत्पादनाचे समर्थक आहेत, कारण शेती उत्पादनातून देश पोसल्या जातो. परंतु त्या शेतकरी- शेतमजुरांची परिस्थिती बदलविण्यासाठी शेतकऱ्यांचे आर्थिक धोरणे बदलविण्यासाठी, मात्र ते शेतकऱ्यांचे विरोधक आहेत . देशाचे आर्थिक धोरणे बहुंताशी समाजाला कळत नाही, अन् त्यामुळेच रंगी बेरंगी झेंडे ऊतू आले. शेतकरी- शेतमजुराचे प्रश्न गेल्या 75 वर्षात काँग्रेस – बीजेपी सोडू शकली नाही. म्हणून मतदारांनी अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देणे व निवडून आणणे चालू केले , परंतु याचा परिणाम असा झाला की, शेतकरी शेतमजुरांचे प्रश्न हे केंद्रातील असल्यामुळे आयात- निर्यात धोरणे शेतीमालाचे भाव, हे यांच्या कक्षेच्या बाहेर आहे. कोणताही अपक्ष आमदार हे प्रश्न सोडवू शकत नाही. त्याचाच गैरफायदा घेऊन अपक्ष आमदारांनी मतदानाचा व्यापार करणे सुरू झाले. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती विरोधी विधानपरिषद, मतदानाची गरज भासल्यामुळे,अपक्षांचा खजिना वाढणे सुरू झाला .
ज्या विश्वासाने जनतेनी अपक्ष आमदारांना मते दिली, ते शेतकरी- शेतमजुरांचे प्रश्न तर सोडवु शकलेच नाहीत. तर उलट अमरावती जिल्ह्यात या अपक्ष आमदारांचे पूर- महापूर येऊ लागले. एकेकाळी समाजसेवेचे व्रत घेऊन मोठमोठे ग्रामीण भागातील ऐश्वर्याचे वाडे जनतेच्या सेवेसाठी खलास झालेत , त्याच्याच उलट एकेकाळी साधारण परिस्थितीतील असलेले आमदार – खासदार आज करोडपती – अब्जोपती , मालगुजार झाले, तर ते जनतेच्या मतावर व शासनाच्या तिजोरीतील मलाई खाल्ल्यामुळे झाले, हे आता स्पष्ट झाले आहे. शेतकरी – शेतमजुराच्या नावावर प्रत्येक निवडणुकीत आवाज उठविणे,बोंबा ठोकणे ,मते जमा करणे व त्यातून स्वहित जपणे, एवढाच गोरख धंदा उरला. आता तर राजकीय पक्षावर सुद्धा विश्वास राहिला नाही. स्व. शरद जोशी यांच्या अ-राजकीय व्यवस्थेमुळे, शेतकरी शेतमुजरांमध्ये, जागृती झाली . परंतु आंदोलनातून परिपूर्ण प्रश्न सुटू शकले नाहीत. ते प्रश्न राजकीय स्वरूपात सोडविण्यासाठी, शेतकऱ्यांच्या आक्रोशाचा फायदा घेण्यासाठी अपक्षांनी धाव घेतली. शेतकरी प्रश्न आम्ही सत्तेतून सोडवतो हेच अर्धज्ञानी ओरड करू लागले. जेव्हा मतदार काँग्रेस- बीजेपीच्या विरोधी राहून अपक्ष उमेदवाराला मतदान करतो आणि तोच अपक्ष उमेदवार निवडून आल्यानंतर युती व आघाडीला पाठिंबा देतो. म्हणजेच मतदारांने ज्या हक्काने, अपेक्षेने मते दिली. त्या मतदानाची दिशाभूल करून गैरवापर करतो, अन् त्यांच्याच मताचा व्यापार करतो. इथेच मते दिलेल्या मतदारांचे अवमुल्यन होते. जिधर दम उधर हम. अशाप्रकारे चालतीच्या गाडीत बसून ज्या विश्वासाने मतदारांनी मत टाकले तो विश्वास गमावल्यामुळे आता अपक्षावर सुद्धा जनतेचा विश्वास राहिला नाही.
अपक्ष आमदारांना कुठेही भटकण्याची, व स्वमतलबाची व्यवस्था करून घेता येते. अपक्ष आमदारांचा हा मोठा बिझनेस झालेला आहे. सत्तेची मलाई चाखून स्वहित सांभाळल्या जाते, त्यामुळे सर्व अपक्ष आमदार गब्बर सिंग झाले. मूळ प्रश्न न सुटता खाबुगिरी व्यवस्था सुरू झाली, व त्यातील काही मुरमुरेच्या लाह्या जनतेला वाटल्या जातात एवढाच काय तो फरक होऊ शकतो. पंचायत समिती , तहसीलीची कामे कर्मचारी वर्ग करून देताना, समाजाला त्रास देतो. त्यामुळे शासनातील जबाबदार माणूस समजून जनता त्याच्या पाठीमागे लागते. त्याच मताचा फायदा आमदार खासदारांना मिळतो. ही चक्रीच मात्र समाजाला घातक आहे. निवडणुकीच्या माध्यमातून किंवा राजकीय पक्षांना सत्तेसाठी पाठिंबा देऊन, जनतेची मते विकून टाकले जातात ? म्हणून अशा राजकीय पक्षापेक्षा आता अपक्ष आमदारांचा सुळसुळात व जोर वाढत आहे. त्यामुळे धोकेबाज व सौंदेबाज व नौटंकीची वाढ झाली . आता तर जुने अपक्ष आमदारांना निवडून येण्यासाठी पक्ष सुद्धा, त्या मतदारसंघात डमी उमेदवार टाकायला लागलेत. त्यामुळे पक्षातील सत रंज्या उचलणारेची यांची किंमत पक्षांनीच कमी केली. त्यामुळे पक्षातील अंतर्गत कलह वाढलेत. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी नौटंकी आमदाराची तिसरी आघाडी मैदानात उतरविली, शेतकरी मतदान हे ग्रामीण भागात असते, परंतु ग्रामीण भागात को-ऑपरेटिव्ह बँक, कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी -विक्री चे माध्यमातून , काँग्रेस राष्ट्रवादीचे आतापर्यंत वर्चस्व राहिले आहे. हे शेतकऱ्यांची मते खाण्यासाठी तिसरी आघाडी तयार करून याचा फायदा बीजेपीच्या आघाडीला होण्याचेच संकेत दिसत आहे.त्यामुळे मतदारांनी कोणाला मतदान करावे, हेच आता कळेनासे झाले.मतदार निष्क्रिय व दिशाहीन झाला. मतदारासमोर गंभीर प्रश्न उभा झाला आहे? म्हणजेच निवडणुकीत फक्त जनतेच्या मताचा, भुल -भुलैया सुरू आहे ?. हेच स्पष्ट होते ?
जय महाराष्ट्र …. जय भारत राष्ट्र.
लेखक- धनंजय पाटील काकडे.9890368058.
(ज्येष्ठ साहित्यिक व शेतकरी चळवळीचे विश्लेषक) मु. -वडूरा, पोस्ट -शिराळा, तालुका- चांदूरबाजार, जिल्हा- अमरावती.
अध्यक्ष – शेतकरी, वारकरी- कष्टकरी महासंघ. महाराष्ट्र राज्य.