⭕सावधान……., पुढे धोका आहे! : महेंद्र कुंभारे
⭕सावधान……., पुढे धोका आहे! : महेंद्र कुंभारे
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764
अकलूज दिनांक 13/8/2023 :
मणिपूरमध्ये महिलांची काढलेली नग्न धिंड, लोकनियुक्त दिल्ली सरकारचे हिसकावून घेतलेले अधिकार, निवडणूक आयुक्त नेमण्यासाठी सर्वोच्च न्यायलयाच्या मुख्य न्यायाधीशांना हटवुन सर्वाधिकार केंद्र सरकारने घेणे, मुंबईत इलेक्ट्रिक स्मार्ट मीटर लावून गरीब आणि मध्यमवर्गीयांचे जगणे मुश्किल करण्याचा घेतलेला निर्णय, निवडणूक लढविताना सरकारने जनतेला दिलेली आश्वासने न पाळता महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या यांचा वाढलेला उच्चांक, देशातील सार्वजनिक संस्था आपल्या मित्रांना (अदानी,अंबानी) विकण्याचा लावलेला सपाटा, ED, CBI आणि आयकर या शासकीय यंत्रणांचा विरोधकांवर बेकायदेशीर केला जात असलेला वापर हे सर्व पाहता देशातील लोकशाही संपुष्टात येऊन हुकुमशाही सुरु होत असल्याचे निर्देश मिळत आहे. अंधभक्त (हि एक दुर्मिळ जमात आहे) वगळता समाजातील प्रत्येक घटक सरकारवर (भाजपवर) नाराज असूनही भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला या नाराजीचा काहीच फरक पडत नसेल तर यामागे नक्कीच काहीतरी गेम प्लानिंग असणार, आणि तो गेम म्हणजे EVM मशिन्स हॅक करणे.
भारताने नुकतेच चांद्रयान-३ चे यशस्वी उड्डाण केले आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आजपर्यंत जगातील कोणताही देश पोहचू शकला नाही त्याठिकाणी जाण्याची किमया भारत करत आहे. इथे हे नमूद करण्याचा उद्देश हाच आहे की, *पृथ्वीवरुन जर चांद्रयान कंट्रोल होऊ शकतो तर स्ट्राँग रुम मधील EVM मशीन हॅक करणे काय कठीण काम आहे? मानवाने बनिलेल्या कोणत्याही इलेक्ट्रॉनिक मशिन्स सहज हॅक होऊ शकतात. आणि याच बळावर भाजप जनतेच्या नाराजीची फिकिर करत नाही.
केंद्र सरकारने या अधिवेशनात संख्याबळाच्या जोरावर दिल्लीच्या केजरीवाल सरकारचे प्रशासकीय अधिकारी नेमण्याचे सर्व अधिकार स्वतःकडे घेतले. यामुळे जनतेने निवडून दिलेल्या सरकारचे अस्तित्वच मिटविण्यात आले आहेत. प्रशासकीय अधिकारी केंद्र सरकारच्या तालावर नाचत असल्यास काय घडते हे महाराष्ट्रात राज्यपाल कायदे धाब्यावर बसवून कसे वागत होते हे इतिहासाने पाहिले आहे. केजरीवाल सरकार जनतेच्या विश्वासाला पात्र ठरुन केंद्र सरकारला जुमानत नसल्यामुळेच केंद्रातील भाजप सरकारने एक कायदा पास करुन दिल्लीच्या राज्य सरकारचे अधिकारच संपुष्टात आणले आहे. हे फक्त दिल्ली पुरतेच मर्यादित नसून भाजप सोडून विरोधकांचे सरकार असलेल्या सर्व राज्यांना धोका निर्माण झालेला आहे. ही अतिशय गंभीर बाब होय. तसेच निवडणूक आयुक्त आणि अधिकारी नेमण्याचे सर्वाधिकारही केंद्राने स्वतःकडे घेतले आहे. याआधी अशी नेमणूक करण्याच्या समितीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. मात्र, चंद्रचूड यांची कार्यपध्दती पाहता ते केंद्राच्या मनमानीला जुमाणणार नसल्यामुळेच या अधिवेशनात हे बिल ही पास करण्यात आले. म्हणजे आता संपूर्ण निवडणूक प्रक्रिया अधिकाऱ्यांच्या बळावर केंद्र सरकार आपल्या ताब्यात घेणार यात तिळमात्र शंका नाही.
मुंबई मध्ये इलेक्ट्रॉनिक स्मार्ट मीटर लावण्याचा ठेका अदानीला देऊन गरीब आणि मध्यमवर्गीयांना अंधारात ठेवले जाणार आहे. अदानीच्या कंपनीचा विजदर सर्वात जास्त असूनही त्यांना ठेका देऊन स्मार्ट कार्डातील पैसे संपल्यावर जनतेला रिचार्ज करावे लागणार आहे. तोपर्यंत तुमची लाईट येणारच नाही. आधीच महागाईने हैराण झालेल्या जनतेची मुस्कटदाबी करण्याची पूर्ण तयारी सरकारने केलेली आहे. याला जनतेने आत्ताच विरोध केला नाही तर संपूर्ण राज्यात आणि देशात अदानीला इलेक्ट्रॉनीक स्मार्ट मीटर लावण्याचा ठेका दिला जाईल. हा किती गांभिर्याचा विषय आहे हे काँग्रेस नेत्या माजी शिक्षणमंत्री श्रीमती वर्षा गायकवाड यांनी या अधिवेशनात सांगितले आहे. यावर आत्ताच उठाव न केल्यास ठेका दिल्यावर खुप उशीर झालेला असेल, म्हणून आत्ताच सावधान होणे गरजेचे आहे.
मणिपुरचा मुद्दा देशात गाजत आहे. यासाठी देशातील सर्व विरोधीपक्षांनी एकत्र येऊन संसदेत आवाज उठविला. तिथे महिलांची नग्न धिंड काढण्यात आली तरी केंद्र सरकार काहीच करायला तयार नाही. कारण, तिथे भाजपचे सरकार आहे. मणिपूरमध्ये सोन्यापेक्षा महागडा धातू असणाऱ्या प्लॅटिनमची खाण सापडली आहे. या खाणीचं उत्खनन करण्याचा ठेका मोदींचे परममित्र अदानीला देण्यात आला आहे. मात्र, स्थानिक आदिवासींनी याला विरोध केला म्हणून तिथे हिंसाचार घडवून हे निच कृत्य करण्यात आले. या विरोधात आवाज न उठविता भाजपच्या महिला खासदारांना राहूल गांधींच्या फ्लाईंग किसने लज्जा वाटली किती हे दुर्दैव आहे.
सध्या देशात भितीचे वातावरण असून विरोधीपक्ष सत्तेत असलेल्या राज्यात ED, CBI आणि Income Tax विभागाकडून धाडी टाकून तेथील खासदार, आमदारांना भाजपमध्ये येण्यासाठी मजबूर केले जात आहे. अशाप्रकारे केंद्रातील भाजप सरकारकडून शासकीय यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. महागाई, बेरोजगारी, शेतक-यांच्या आत्महत्येचे सत्र सुरु असूनही हवा तितका उठाव जनतेकडून केला जात नाही. वरील उल्लेखिलेल्या प्रमाणे केंद्र सरकारवर समाजातील प्रत्येक घटक नाराज असूनही केंद्राला याचे काहीच सोयरसुतक नाही. निवडणुक जवळ अली तरी भाजप घाबरायला तयार नाही. याचे कारण एकच त्यांच्या हातात EVM मशीन आहे.
वर्ष २०१९ मध्येही मराठा समाज, ओबीसी समाज, शेतकरी, बेरोजगार तरुण, मुस्लिम, महागाईमुळे गृहिणी असा समाजातील प्रत्येक घटक भाजपवर नाराज असतानाही भाजप बहुमताने निवडून आला. याचे कारण एकच EVM मशीनची जादू. म्हणून यावेळीही २०२४ च्या निवडणुकीत समाजातील सर्व घटकांसह सर्व विरोधीपक्ष एकत्र आले आहेत तरीही भाजप घाबरायला तयार नाही. *बेगडी हिंदू धर्माच्या नावावर तरुणांची डोकी भडकावून समाजा समाजात तेढ निर्माण करुन आपली राजकीय पोळी भाजणे हा एकमेव उद्देश भाजपचा आहे. म्हणून पुढे देशासह संविधान आणि लोकशाही धोक्यात आली आहे. हा धोका आजच ओळखला नाही तर पुढे गुलामगिरी अटळ आहे! ✍️
महेंद्र कुंभारे,
संपादक तथा कामगार नेते, भिवंडी.
शनिवार दि. १२ आँगस्ट २०२३.
मो.नं. 8888182324.