ताज्या घडामोडी

‘मूकनायक’ विसरले, ‘भूकनायक’ अवतरले!

‘मूकनायक’ विसरले, ‘भूकनायक’ अवतरले!

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 06/01/2024 :
‘मूकनायक’ विसरले, ‘भूकनायक’ अवतरले! असे परखड मत वृत्तपत्र फिनिक्स चे संस्थापक संपादक भारत तुकाराम मोरे पाटील यांनी प्रस्तुत लेखामध्ये नमूद केले आहे.
अधिक व्यक्त होत असताना ते पूढे नमूद करतात कि,आज पत्रकार दिनाच्या निमित्ताने सांगावेसे वाटते की, पत्रकारांची लेखणी ही तलवारीपेक्षा तीक्ष्ण असते. अन्याय, अत्याचार, गुंडगिरी, भ्रष्टाचार यांविरुद्ध लढताना फक्त लेखणी चालवा, समोरचा बरोबर घायाळ होईल. पण तशी परिस्थिती आता राहिली आहे का? गेल्या काही वर्षांत जगभरात १२३६ पत्रकारांच्या हत्या करण्यात आल्या आहेत. जगभरातील कारागृहांत आजही २५९ पत्रकारांना डांबण्यात आले आहे. त्यामुळे ही वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून प्रसारमाध्यमे आणि पत्रकार यांनी आता भलत्याच भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. पत्रकारांनी समाजाचा ‘मूकनायक’ व्हावं, म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या वृत्तपत्राचे नाव ‘मूकनायक’ ठेवले होते. पण आता नव्या युगात, नव्या राज्यात पत्रकार ‘मूकनायक’ होण्याऐवजी ‘भूकनायक’ होऊ लागले, तर जनता तरी काय करणार? अर्थात पत्रकार आपले कर्तव्य समर्थपणे जेव्हा पूर्ण करतील, तेव्हा व्यवस्था त्यांच्या बाजूने उभी राहील का? याबाबत अनेकांना शंका आहे. कारण अनेक घटकांना सुखावताना इतर घटकांची नाराजी होणारच. अतिशय मोठे पेपर, मोठे चॅनल हातात असले, म्हणजे तो रिपोर्टर मोठा होत नाही. आपण त्या प्रसारमाध्यमात किती निष्पक्षपातीपणे भूमिका घेतो त्यावरून आपण किती मोठे आहोत, हे महत्त्वाचे ठरते. सामान्य माणसांच्या म्हणजेच शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार, अन्यायग्रस्त महिलांच्या किती बातम्यांना न्याय दिला, कोणत्या बातम्यांचा पाठपुरावा केला, यांवरच त्या पत्रकाराचे मूल्यमापन ठरते. पण अलीकडे मात्र पत्रकारितेचा प्रवास भावनांवर सुरू झाला आहे. पत्रकार हा जगाचा आरसा असतो. परिसरातील प्रश्न तडीस नेण्यासाठी धडपडतो तो पत्रकार‌ असतो. कुठलाही आधार उपलब्ध नसताना, बातमीला आपला श्वास समजतो तो सच्चा पत्रकार असतो. पत्रकारांची लेखणी ही सत्यासाठी आणि न्यायासाठी लढणाऱ्या शिपायाची तलवार आहे. पत्रकाराच्या लेखणीला तलवारीची धार नसेल, तर सत्य सांगण्याचा आणि न्याय देण्याचा धंदा त्याला यशस्वीपणे करता येणार नाही. त्याने ‘पत्रकार’ होण्याऐवजी ‘पात्रकार’ व्हावे, असे आचार्य अत्रे नेहमी म्हणायचे, ते आज सत्यात उतरू लागले आहे. मध्यंतरी एका देशातील महिला पत्रकाराने टीव्हीवर बातम्या देताना तिला मानसिक धक्का बसला होता. कारण ज्या अपघाताची व त्यातील मृतांची माहिती ती देत होती, त्या मृतांमध्ये तिचा पतीदेखील होता. तरीदेखील चेहऱ्यावर कोणताही भाव न आणता तिने ती बातमी दिली. बातमीपत्र संपल्यावर तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा आल्या. पण दूरदर्शनच्या छोट्या पडद्यावर तिने ते अश्रू येऊ दिले नाहीत. ती खरी पत्रकारिता असते. पण आपल्याकडे राम मंदिराची माहिती देताना एका महिला पत्रकाराला अश्रू अनावर झाले होते. कारण काय तर पूर्वी रामलल्लाची मूर्ती कोठे होती व आता कोणत्या ठिकाणी गेली. यामुळे त्या महिला पत्रकाराच्या भावना उचंबळून आल्या. परंतु आता तीच घटना देशपातळीवर चर्चिली जात आहे. कारण संबंधित महिलेने यापूर्वी अनेक बातम्या दिल्या आहेत. मग देशात विवस्त्र अवस्थेत धिंड काढलेल्या महिलेला पाहून तिच्या डोळ्यात अश्रू का आले नाहीत? म्हणजे डोळ्यातून अश्रू केव्हा आणायचे व त्याचे ‘मार्केटिंग’ कसे करायचे, याची सुरुवात आता पत्रकारितेत सुरू झाली असे समजायला हरकत नाही. पत्रकारिता जीवनाची सेवा आहे. ढोंग, विषमता आणि अन्याय यांच्याविरुद्ध उपसलेली ती तलवार असते. सत्य, समता, आणि स्वातंत्र्य यांच्या आराधनेची ती पूजा आहे. पत्रकारांची लेखणी ही सत्यासाठी आणि न्यायासाठी लढणाऱ्या शिपायाची तलवार आहे. पण पत्रकारिता करताना त्यात तुमच्या भावना गुंतून पडत ‌असल्यास तुम्ही पत्रकारितेला न्याय कसा देऊ शकाल? खरं म्हणजे बातमी आल्यावर तिचे परिणाम भोगतो, तो पत्रकार खरा असतो. लोकांची दूषणे,‌ पुढाऱ्यांच्या नको त्या प्रश्नाला भिडतो व सर्व काही समाजासाठी भोगतो, तोच खरा पत्रकार‌‌ असतो. पत्रकारितेत अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, म्हणून काहीही प्रयोग करणे योग्य नसते. गेल्या एक दशकापासून काही प्रमाणात निधर्मी व निष्पक्ष असलेला पत्रकार धार्मिक झाला, पक्षपाती झाला हे सत्य नाकारता येणार नाही. कोरोना महामारीत कित्येक लाख नागरिक मरण पावल्यावर कुठेही रडण्याचा आवाज आला नाही. पावसाअभावी व अतिवृष्टीमुळे शेतातील पिके नष्ट झाल्यामुळे रडणाऱ्या महिला कोणाला दिसल्याच नाहीत. मंदीमुळे अनेकांंच्या नोकऱ्या गेल्या, लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, अनेक महिलांवर बलात्कार झाले, अलीकडेच पत्रकारितेच्या समोर बूट ठेवून साक्षी मलिक ढसाढसा रडली, तरीही कुणी पत्रकार रडतांना पाहण्यात आले नाही. पण आपला सर्वांचा मंदिराअभावी राहिलेला राम पाहून एका महिला पत्रकाराला गहिवरून आले आणि ती ढसाढसा रडली. पत्रकार हा निष्पक्ष असतो. त्याला जात आणि धर्म नसतो. पत्रकारिता हाच पत्रकाराचा धर्म असतो. पण असे धर्मांध पत्रकार असल्यावर ते निष्पक्ष पत्रकारिता कसे करत असतील? लोकशाहीत माध्यमांचं मोठं महत्त्व असतं. त्यामुळे ही माध्यमं टिकली पाहिजेत. पत्रकारिता हा काही प्रामुख्यानं पैसा कमावण्याचा, नफा कमावण्याचा धंदा नसतो, असे नेहमी म्हटले जाते. पण ते सर्व काळाच्या ओघात संपले आहे. या धंद्यात नफा प्राप्त होत नसेल, तर या व्यवसायाची दुकानदारी बंद केली जाते. मग नफा हवा असेल, तर ‘डिबेट’मधील मारामारी दाखवावी लागते. संपादक स्वत: जोरजोरात ओरडतांना दाखवावा लागतो. महिला पत्रकाराला कॅमेऱ्यासमोर रडावे लागते. पत्रकारांनी प्रवाहाच्या बाजूने वाहत न जाता निर्भीडपणे, सद्सदविवेक जागरूक ठेवून आवाज उठविला तर काय होते, हे संपूर्ण देश पाहत आहे. त्यामुळे आता पत्रकारांना रडावेदेखील लागेल, हा पहिलाच धडा या देशात पाहायला मिळाला!

मोबा. : 8446980824/8698484689

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button