ताज्या घडामोडी

” मराठी पत्रकार दिनी आजचा पत्रकार “दीनच “

” मराठी पत्रकार दिनी आजचा पत्रकार “दीनच “

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक : 07/01/2026
ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक(९०९६०५०५८१)(६ जानेवारी २०२६) यांचा ” मराठी पत्रकार दिनी आजचा पत्रकार “दीनच ” ” या शिर्षकाखालील लेख व्हाट्सॲप ग्रुपवर वाचण्याची संधी लाभली.या वास्तववादी व विचारप्रवर्तक लेखाचा सुसूत्र, सविस्तर गोषवारा असा:—
मराठीतील आद्य पत्रकार आचार्य बाळशास्री जांभेकर यांचा जन्म ६ जानेवारी १८१२ रोजी झाला.व आपल्या जन्मदिनी तथा ६ जानेवारी १८३२ रोजी त्यांनी मराठीतील पहिले नियतकालिक दर्पण हे प्रकाशित केले.म्हणूनच महाराष्ट्रातील पत्रकार संघटना आणि महाराष्ट्र शासन सुद्धा ६ जानेवारी हा दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा करत असतात. ज्यावेळी बाळशास्रींनी पत्रकारिता सुरू केली,त्यावेळी वृत्तपत्रे हेच बातम्या देणारे प्रमुख माध्यम होते. नंतरच्या काळात लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर अशा प्रभुतींनी ध्येयनिष्ठ पत्रकारिता केली. वृत्तपत्र हा समाजाचा आरसा म्हणून ओळखला जातो, आणि पत्रकार हे या वृत्तपत्रांचे किंवा आजच्या वृत्त माध्यमांचे प्रमुख आधारस्तंभ मानले जातात.त्यामुळे सुरूवातीच्या काळात पत्रकारिता ही एका ध्येयाने प्रेरित झालेली होती.त्यामुळे पत्रकार देखील कशाचीही पर्वा न करता ” जो फूँके घर अपना ” अशा भावनेतून काम करत असत.त्या काळात वृत्तपत्राचे मालक जे काही तूटपुंजे मानधन द्यायचे,त्यात हे ध्येयनिष्ठ पत्रकार आपला घर संसार चालवायचे आणि ध्येयाला समर्पित अशी पत्रकारिता करायचे.
सुरूवातीच्या काळात वृत्तपत्रे ही पत्रकारानीच सुरू केलेली होती. त्यामुळे संपादकाच्या नावाने वृत्तपत्रे चालायची.नंतर मग उद्योगपतींनी देखील वृत्तपत्रे काढायला सुरूवात केली.तिथे त्यांचा फक्त नफा कमवणे हाच उद्देश असायचा.त्यामुळे पत्रकारांना अपुर्‍या वेतनावर पिळून घेणे, ध्येयनिष्ठ पत्रकारिता बाजूला ठेवून आपल्या सोयीनुसार पत्रकारिता करायला लावणे असे प्रकार सुरू झाले.त्याच काळात मग पत्रकार संघटित व्हायला सुरूवात झाली, आणि त्यातून पत्रकारांच्या संरक्षणासाठी कायदा देखील बनला.सरकारने पत्रकाराला योग्य वेतन मिळावे म्हणून वेतन आयोगही नेमले. मालकांनी त्यातूनही पळवाटा काढल्या. कोणतेही निमणूक पत्र न देता पत्रकारांना कामावर घेतले.ज्या दिवशी मालकाची मर्जी फिरेल त्या दिवशी त्या पत्रकाराला कामावरून काढून टाकून घरी बसवले जाऊ लागले.पण त्यावर देखील उपाययोजना सुरू झाल्या.मात्र मालकांनी त्यातूनही पळवाटा काढल्या.विशेष म्हणजे ही मालकांची लाॅबी चांगलीच सशक्त होती.ती सरकारवर दबाव टाकून आपल्या सोयीचे कायदे बनवून घेऊ लागली.
देशात उदारीकरणाचे वारे वाहू लागल्यापासून तर परिस्थिती अधिकच बदलली.आता कोणत्याही वृत्तपत्रात पूर्वीसारखे नियमित पत्रकार कामावर ठेवलेच जात नाहीत तिथे संपादकापासून तर खालच्या मुद्रीत शोधकापर्यंत सर्वच जण कंत्राटी कामावर असतात.तिथे एक महिन्याच्या सूचनेवर कोणालाही कामावरून कमी करता येते.शिवाय एकदा जे वेतन ठरले आहे त्यात कोणतीही वेतनवाढ दिली जात नाही.अर्थात ही परिस्थिती मोठ्या वृत्तपत्रांमध्ये मुख्यालयात काम करणार्‍या पत्रकारांची आज झाली आहे.त्याशिवाय वृत्तपत्रांमध्ये जिल्हा प्रतिनिधी,तालुका प्रतिनिधी अर्धवेळ पत्रकार,स्तंभलेखक असे बरेचसे कार्यरत असतात.या सर्वांना कोणत्याही कायद्याचे संरक्षण नाही.त्यांना कोणतेही निवृत्ती वेतन मिळत नाही.त्यामुळे हातपाय थकल्यावर हे सर्व पत्रकार पराधीन जीणे जगत असतात.
अनेक पत्रकारानी शहर, जिल्हा, तालुका स्तरावर आपली छोटी छोटी वृत्तपत्रे प्रकाशित करणे सुरू केले आहे.तेच मालक असतात व कित्येक मालक स्वतःचा पेपर घरोघरी वाटताना दिसत असतात.ते पत्रकार म्हणून गणले जातात.मात्र त्यांच्या समस्या पूर्णतः वेगळ्या आहेत.त्यांना आयुष्याची कोणतीही शाश्वती नाही. राजकारणी, अधिकारी, उद्योगपती हे कोणीही पैश्याच्या जोरावर आणि सत्तेच्या जोरावर त्यांच्यावर दबाव टाकू शकतात.मग तिथे तुमच्या ध्येयनिष्ठ पत्रकारितेची ऐसी तैसी झाली तरी चालते.१९९५ नंतर खाजगी वृत्तवाहिन्या आल्या. तिथेही असेच कंत्राटी पत्रकार नेमले जातात. आज खाजगी वृत्तवाहिन्यांचे ग्लॅमर लक्षात घेता या पत्रकारांना मानसन्मान भलेही मिळत असेल,पण सोयीसुविधांच्या नावे बोंबच आहे.एकविसाव्या शतकात डिजिटल माध्यमे पुढे आली. हळूहळू बातम्या देणारे पोर्टल्स कावळ्याच्या छत्र्याप्रमाणे पुढे आले.त्याचप्रमाणे यूट्यूब चैनल देखील पुढे आले.दोन्हींचे अगदी पेव फुटले आहे.हे बघता आता पत्रकारांची संख्या किती वाढली आहे हे लक्षात येईल.पण आज कोणालाही कोणतेही संरक्षण नाही.सरकार दरबारी त्यांची कोणतीही नोंदणी नसते.त्यांना कोणत्याही सोयी सवलती मिळत नाहीत. त्यांच्यावर कोणतीही आपत्ती आली तर त्यांना मदत करणारे कोणीही नसतात.पत्रकारांना मदत करण्यासाठी सरकारी योजना आहेत मात्र नोकरशहांनी लादलेल्या अटी इतक्या किचकट आहेत,की काही मोजक्याच पत्रकारांना त्या सवलतींचा लाभ मिळतो.बाकी भगवान भरोसेच असतात.जी ध्येयनिष्ठ पत्रकारिता लोकमान्य टिळक, गोपाळ आगरकर अशा प्रभुतींनी सुरू केली होती ,ती पत्रकारिता आज शिल्लक राहिली आहे काय ? याचे उत्तर आज नकारार्थीच मिळते.त्याचबरोबर आज पत्रकार दिन साजरा करत असताना या विविध माध्यमांमध्ये कार्यरत असलेला पत्रकार हा अगदी ” दीन ” झाला आहे असे दिसून येते.
विरोधात लिहिणार्‍या पत्रकारांवर अनेकदा हल्ले करून त्यांना जीवे देखील मारल्याच्या घटना या देशात घडल्या आहेत. त्यामुळे ध्येयनिष्ठ पत्रकारिता आता संपलेली आहे.त्याचवेळी पत्रकार आता विकाऊ झाले आहेत,आजच्या पत्रकारितेत काही दम राहिला नाही अशी टीका जनसामान्य करायला अगदी अग्रक्रमाने तयार असतात.त्यामुळे पत्रकाराची समाजातील इज्जत पुरती संपलेली दिसते आहे.म्हणूनच हा पत्रकार आज खरोखरच ” दीन “झाला आहे हे वास्तव नाकारता येत नाही. त्यासाठी संवेदनशील राज्यकर्ते जर असले तरच काही बदल घडवला जाऊ शकेल.आज पत्रकारांसाठी तसेच वृत्तपत्र मालकांसाठी काही आचारसंहिता असणे गरजेचे आहे, त्याचप्रमाणे या वृत्तपत्रांची तसेच सर्व प्रसिद्धी माध्यमांची शासकीय स्तरावर नोंदणी असणे गरजेचे आहे.आज वृत्तपत्रांना रजिस्ट्रार ऑफ न्यूज पेपर्स यांच्याकडे नौंदणी करावी लागते.मात्र पोर्टल्स आणि यूट्यूब चॅनल्सला कोणतीही नोंदणी करावी लागत नाही.त्यांनाही अशी नोंदणी करावी लागेल आणि त्यांनाही नियमांच्या चौकटीत आणले जाण्याची गरज आहे. बातमीसाठी वृत्तपत्रे आणि प्रसिद्धी माध्यमे ही १९ व्या शतकातही गरज होती आज २१ व्या शतकात देखील तितकीच गरज आहे आणि पुढील शतकांमध्ये देखील ही गरज राहील. या माध्यमांसाठी पत्रकार हा महत्त्वाचा कणा राहणार आहे. त्यामुळे हा पत्रकार सर्वांर्थांने सक्षम होण्याची सुरूवात जर होऊ शकली तर खर्‍या अर्थाने आम्ही पत्रकार दिन साजरा केला असे म्हणता येईल.ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांनी ‘मराठी पत्रकार दिनी आजचा पत्रकार “दीनच ” का आहे यांची कारणमीमांसा स्पष्ट करताना तपशीलात केलेले हे अभ्यासपूर्ण भाष्य व विवेचन- विश्लेषण खरोखरच उल्लेखनीय,
विचारप्रवर्तक,सुज्ञ वाचकांना अस्वस्थ करणारे व संबंधित जबाबदार घटकांना अंतर्मुख करणारे ठरते हे मात्र तितकेच खरे! —पत्रकार अरूण दीक्षित.
(८१६०१०५९४०/९४२२६९४६६६)

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button