“बालनाट्य शिबीरांमधून मुलांना स्वत:ची ओळख निर्माण होते” – सौ. शितलदेवी मोहिते-पाटील

“बालनाट्य शिबीरांमधून मुलांना स्वत:ची ओळख निर्माण होते” – सौ. शितलदेवी मोहिते-पाटील
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 02/05/2025 :
“बालनाट्य शिबिरांमधून मुलांना अभिनयाची ओळख होते. त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळते आणि आत्मविश्वास वाढतो. विविध विषयांवरील प्रात्यक्षिकं व चर्चांमुळे त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते,” असे प्रतिपादन शिवरत्न शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सौ. शितलदेवी धैर्यशिल मोहिते-पाटील यांनी केले.
अकलूज येथे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबई शाखा अकलूजच्यावतीने 7 दिवसीय नृत्य, नाट्य व अभिनय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
“मुलांच्या अंगी उपजत कलागुण असतात. नाट्य परिषद त्यांना सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. याचेच उदाहरण म्हणजे आजच्या शिबिरात 78 मुलांचा सहभाग प्रशिक्षण कार्यशाळेत झाला आहे. डिजीटल युगात नाट्य व नृत्यकला जपणे अवघड आहे, मात्र परिषद हे कार्य सातत्याने करत आहे,” असेही सौ. मोहिते-पाटील यांनी सांगितले.
त्यांनी पुढे सांगितले की, “उन्हाळ्याच्या सुट्टीत केवळ शारीरिक आणि मानसिक विकासासाठीच नव्हे, तर नृत्य-नाट्यकलेत संतुलन साधण्यासाठी पालकांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे.”
या उद्घाटनप्रसंगी शिवरत्न शिक्षण संस्थेचे सचिव धर्मराज दगडे, नाट्य परिषद नियामक मंडळाचे सदस्य डॉ. विश्वनाथ आवड, संचालक श्रीकांत राऊत, सहकार्यवाह सुनील कांबळे, लालासाहेब मुजावर, प्रशिक्षक मनोज वर्दम, आशिकी चिंतामणी आदी मान्यवर व बालकलाकार उपस्थित होते.