शेतकरी ओळखपत्र नोंदणी प्रमाणपत्र वितरण

शेतकरी ओळखपत्र नोंदणी प्रमाणपत्र वितरण
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 20/03/2025 : केंद्र शासनाच्या ऍग्रीस्टॅक प्रकल्पांतर्गत महसूल विभागामार्फत फार्मर आयडी काढण्याचे काम माळशिरस तालुक्यातील गावोगावी सुरू आहे. कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा शेतकऱ्यांना जलद व परिणामकारक रित्या लाभ मिळण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. या उपक्रमात शेतकऱ्यांना डिजिटल ओळखपत्र देण्यात येईल. यासाठी आपण आधारकार्ड व मोबाईल क्रमांकासह ग्राम महसूल अधिकारी कार्यालय, कृषी सहाय्यक किंवा आपल्या नजीकच्या सीएससी केंद्र चालकाशी संपर्क साधून तात्काळ आपली नोंदणी करून घ्यावी. असे आवाहन प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार सुरेश शेजुळ, तालुका कृषी अधिकारी आबासाहेब रुपनवर यांनी एका संयुक्त प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले होते.
पी एम किसान योजना, नमो शेतकरी योजना, शेती लोन, पिक विमा व इतर कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी “शेतकरी ओळखपत्र” अत्यावश्यक आहे. वेळेपूर्वी आपले शेतकरी ओळखपत्र बनवा तरच येथून पुढे शासकीय योजनांचा लाभ मिळेल.
केंद्र शासन व महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रात सुरू झाला आहे कृषी अमुलाग्र बदल घडविणारा उपक्रम म्हणून याकडे पाहिले जात आहे.
माळशिरस तालुक्यात 1 लाख 21 हजार 995 शेतकरी आहेत. पैकी 51 हजार 789 शेतकऱ्यांनी शेतकरी फार्मर आयडी काढलेले आहे. असे ग्राम महसूल अधिकारी किसन शिंदे यांनी साप्ताहिक अकलूज वैभव आणि पाक्षिक वृत्त एकसत्ता बरोबर संवाद साधताना सांगितले. अकलूज मंडलातील सर्वच शेतकऱ्यांचे ओळखपत्र काढण्यासाठी मंडलाधिकारी एम टी लकडे, ग्राम महसूल अधिकारी किसन शिंदे आणि भानवसे यांच्यासह कर्मचारी वर्ग परिश्रम घेत आहेत.
नॅशनल युनियन बॅकवर्ड एससी एसटी अँड मायनॉरिटी महासंघ दिल्ली अर्थात एनयूबीसी चे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आणि शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटना महासंघाचे महाराष्ट्र राज्य संपर्क व प्रसिद्धीप्रमुख सेवा जेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांचा फार्मर आयडी नोंदणी प्रमाणपत्र नुकतेच अकलूज मंडलाधिकारी एम. टी. लकडे, ग्राम महसूल अधिकारी किसन शिंदे यांचे हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी अकलूजचे सहाय्यक तलाठी गणेश भानवसे, कोंडबावी चे तलाठी अजित पिंगळे, सामाजिक कार्यकर्ते निलेश नागन्नाथ साळुंखे इत्यादी उपस्थित होते