महाकुंभ,साधू,बैरागी नाथ संप्रदाय आणि हिंदू सांस्कृतिक एकात्मता
महाकुंभ,साधू,बैरागी नाथ संप्रदाय आणि हिंदू सांस्कृतिक एकात्मता
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 22/01/2025 :
महाकुंभाच्या निमित्ताने वेगवेगळ्या समाजमाध्यंमावर साधू,बैरागी याविषयी अनेकविध माहिती प्रसूत होत आहे. या अनुषंगाने नेपाळ, पूर्वकालीन भारतात सर्वदूर पसरलेला संप्रदाय म्हणजे नाथ संप्रदाय. सातव्या शतकापासून सुरू झालेल्या इस्लामिक आक्रमणाखाली हिंदू धर्म जिवंत ठेवण्याचे व देशभरातील हिंदूंमध्ये सांस्कृतिक एकात्मता ठेवण्याचे अशक्यप्राय काम या नाथपंथियांनी केले. उदाहरणार्थ महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक गावागावात दिसणाऱ्या वैष्णवधर्माचे मुळदेखील नाथपंथामधेच आहे. पंढरीच्या पांडुरंगाच्या शरीरावरील सर्व खुणा नाथपंथीय असून वारकरी संप्रदायाचे प्रमुख श्रद्धास्थान असलेल्या ज्ञानेश्वर माऊलींचे गुरु निवृत्तीनाथ हे गहिनीनाथांचे अनुग्रहित शिष्य होते. चिरंजीव असलेल्या गहिनीनाथांचे गुरू गोरक्षनाथ आहेत. पैठणच्या एकनाथ महाराजांचे गुरू जनार्दन स्वामी हे भगवान दत्तात्रय अनुग्रहित नाथच होते.
नाथ पंथात मत्स्येंद्रनाथ व जालिंदरनाथ या दोन प्रमुख शाखा आहेत. अनेक नाथांपैकी गोरक्षनाथ हे मध्ययुगातील महान योगी व सुप्रसिद्ध नाथ होत. माझ्या माहितीनुसार आपल्या देशात होऊन गेलेल्या प्रभावी धार्मिक महापुरुषांमधे आदी शंकराचार्यांनंतर गोरक्षनाथांचा प्रामुख्याने उल्लेख होतो. नेपाळच्या चलनावर गोरक्षनाथांचा उल्लेख असून गोरखा हे नावच गोरक्षपासून तयार झाले आहे. संत कबीर व शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक यांच्या लिखाणात गोरक्षनाथांचा उल्लेख आढळतो.
गोरक्षनाथांना हठयोग पुर्ण अवगत होता. हठयोगाची मुळ प्रक्रिया म्हणजे इंद्रियनिग्रहांद्वारे मुक्ती प्राप्त करुन घेणे अशी आहे. गोरक्षनाथांनी ज्या काही विषयांवर लेखन केले त्यापैकी ‘हठयोग प्रदिपिका, सिद्ध-सिध्दांत पद्धति, गोरक्ष शतक, अमनस्क योग’ हे काही ग्रंथ. गोरक्षनाथ प्रणित मार्गालाच पुढे सिद्ध मत,सिद्ध मार्ग किंवा अवधुत संप्रदाय अशी वेगवेगळी नावे मिळाली. तांत्रिक योगसाधनेद्वारे कुंडलिनी शक्ती जागृत करण्याची उपासना पध्दत गोरक्षनाथांनी मुख्यत: शिकवली.
हठयोग साधनेअंतर्गत कुंडलिनी जागृतीसाठी ईडा,पिंगला आणि सुषुम्ना या तीन प्रमुख नाड्यांचे महत्व गोरक्षनाथ विषद करतात. यालाच मुक्त त्रिवेणी असे म्हटले आहे. तसेच शरीरातील नऊ नाड्यांत नऊ नद्यांचा वास असतो असेही गोरक्षनाथ मानत होते. इडा नाडीमध्ये गंगा,पिंगलेत यमुना तसेच गांधारीत वितस्ता अशी यातील काही उदाहरणे आहेत.
अमरत्व प्राप्तीसाठी अमृत किंवा अमृत रसाच्या रक्षणाची नितांत आवश्यकता गोरक्षनाथांनी सांगितली आहे. मनुष्याच्या नाभीतील कमलात असलेल्या चंद्रातुन अमृताचा स्त्राव शरीरात होत असतो. हेच अमृत ईडा व पिंगला नाड्यातुन शरीरभर फिरत असते. मात्र मुलाधार चक्रातील सुर्य या अमृतरसाचे शोषण करुन त्याठिकाणी विषोत्पत्ती करत असतो. या विष प्रवाहामुळे मानवाला रोगावस्था व मृत्यु येतो म्हणुन गोरक्षनाथांनी या अमृतरसाचा सदुपयोग व या विषाच्या प्रभावापासुन मुक्तीचे विविध उपाय व साधनापद्धती तपशिलवार सांगितल्या आहेत. गोरक्षनाथांच्या मतानुसार जो प्राणवायुवर नियंत्रण ठेवु शकतो त्याचे मन आपोआप निश्चल होते,तसेच जो मनावर नियंत्रण ठेवतो तो प्राणवायुवरही नियंत्रण ठेवु शकतो.
नाथपंथात त्र्यंबकेश्वर हे महत्वाचे सिद्धपीठ आहे. तेथे ब्रम्हगिरि पर्वताच्या अनेक रांगा आहेत. त्याठिकाणी कोलागढ शिखरावर अनेक सिद्धांचे वास्तव्य आहे. इथे मुख्यत: मत्स्येंद्रनाथ,गोरक्षनाथ, नागनाथ, गंभिरनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ, रेवणनाथ,भुतनाथ, सोनासिद्धनाथ,सोहंसिद्धनाथ,सिद्धनाथ, सत्यनाथ, खेचरनाथ अशा अनेक सिद्धांचा वास आहे.
नाथ पंथीयांच्या कथेनुसार भगवान परशुरामांनी रोटन व्रताची साधना केली असता आदिनाथांनी (महादेव) प्रसन्न होऊन त्यांना ५ वस्तु दिल्या.(नाथ संप्रदायातिल अधिकारी व्यक्तींना त्या ५ वस्तु कोणत्या आहेत त्याची माहिती आहे.) त्यांनी त्या वस्तू घेण्यासाठी ओंजळ पुढे केली असता ‘त्या वस्तू हातात रहाणार नाहीत’ असे आदिनाथ म्हणाले. हे ऐकल्यावर परशुरामांनी त्या पाच वस्तू एका चक्री भोपळ्यात घेतल्या व त्यांची यथासांग पुजाअर्चा केली. यांनाच ‘पात्र देवता’ म्हणतात. पुढे परशुरामांना साधनेसाठी एकांतवासाची आवश्यकता होती म्हणुन त्यांनी कर्नाटक मेंगलोर येथील कदलीमठाकडे प्रयाण केले.
कदलीवन/मठ योग्यांचे परमतीर्थ आहे. त्र्यंबकेश्वराहुन निघालेल्या कुंभमेळा यात्रेची परिपूर्णता कदलीमठात प्रवेश केल्यावरच होते. कदलीमठ उर्फ विठ्ठलमठात वर उल्लेख केलेल्या पात्रदेवतेचे नित्य वास्तव्य असते. १२ वर्षांनी कुंभमेळ्यांच्या वेळी ती नाशकास आणली जाते आणि नाथसंप्रदायी योग्यांकडुन पात्र देवतेची पुजा झाल्यावर पुन्हा कदलीमठात परतते. ज्या ठिकाणी गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना अनुग्रह दिला त्या ब्रम्हगिरी पर्वतावरच्या ‘अनुपानशिला’ नावाच्या स्थानावर श्रावणात सर्व भारतातील सिद्ध जमतात. त्यात नाथसंप्रदायातील सर्व शाखांचे सिद्ध असतात. नाथ संप्रदायाच्या मुख्यत: १२ शाखा आहेत.त्या पुढील प्रमाणे :
सत्यनाथ,धर्मनाथ,राम,नटेश्वरी,कंथड, कपिलानी,वैराग्य, माननाथ,आईपंथी,पागल, ध्वजनाथ,गंगानाथ (याचे उच्चार वेगवेगळे करतात)
त्यावेळी नाथसंप्रदायाशिवाय इतर कुणालाही प्रवेश नसतो. पूजेसाठी आवश्यक असलेल्या ‘रोट(पदार्थ),ज्योत’ यांची पुर्ण व्यवस्था केल्यावर शुभ मुहुर्तावर नागपंचमीला पात्रदेवतेची स्थापना ‘अनुपानशिलेवर’ केली जाते. पात्रदेवतेचे स्तवन झाल्यावर हिंदुस्थानी भाषेतून (हिंदी) गोरक्षनाथ,आदिनाथ,पार्वती यांच्या आरत्या होतात. संध्याकाळी सर्व सिद्धांना सावधानतेचा इशारा करुन खरासाचा पुकार केला जातो.(खरास म्हणजे आपल्या आरतीप्रमाणे.)
पात्रदेवतेची स्थापना झाल्यानंतर वेगवेगळ्या आखाड्याच्या पंचाच्या नेमणुका आणि इतर कार्य होते. नविन राजा निवडला जाऊन त्याला राज्याभिषेक केला जातो. पंचायत नेमली जाते. एकेका शाखेला एक पंच असे पाच पंच नेमले जातात. (पंचाचे स्थान सर्वोच्च असते ) त्यानंतर संसदीय दलाचे २० सदस्यांचे अधिकार मंडळ तयार होते.
राजा,महंत,कारभारी,कोठारी,पुजारी,रोटभंडारी अशाप्रकारे नेमणुका होतात. कुंभमेळ्याच्या वेळी साधकांना नाथसंप्रदायाच्या उपासना पद्धती सांगितल्या जातात. त्याचप्रमाणे आपल्या शिष्याचा अभ्यास व निष्ठा पाहुन उत्तम शिष्याला राजापुढे हजेरी द्यायला लावुन दिक्षा देतात. मग त्याचे नाव ,त्याची शाखा इ. माहितीची नोंद राजाच्या वहित केली जाते व त्याला सांप्रदायिक नाव दिले जाते. राजाच्या वहीत नोंद असलेल्या शिष्यालाच “सांप्रदायिक दिक्षांत ” समजले जाते.
नाथ पंथीय साधूकडे पुढील वस्तू असतात.
शृंगीशैलि : सुत कातायच्या टकळिवर मेंढ्यांच्या लोकरीपासुन तयार केलेले नऊ हात लांब काळ्या लोकरीचं हे एक प्रकारच जानवं असतं.या जानव्याचे विशिष्ट प्रकारचे वेढे ठरलेले असतात. त्यात एक रिंग असते त्या कुंडलामधे एक रुद्राक्ष,देविचं प्रतिक म्हणुन एक पोवळे आणि हरणाच्या शृंगाची तयार केलेली साधारण दोन इंच लांब पुंगळि या वस्तु गुंफलेल्या असतात. दीक्षेच्या वेळी हे जानवे मंत्रयुक्त करुन साधकाला देतात.
कुंडले : ज्या सिद्धाला शरीरातील सर्व नाड्यांची माहिती आहे व ज्याला नाड्यांचे शुद्धिकरण करण्याची कला अवगत आहे असा सिद्ध आपल्या साधकाचा कर्णछेद करतो. या कर्णछेदामुळे साधकाच्या रक्त आणि वायुचा पुरवठा शरीरात ज्या ज्या बाजुला सुरू असतो तो उर्ध्वगामी बनतो. अशा तऱ्हेने प्रणवशक्ती उर्ध्व झाल्यामुळे साधनेची प्रगति वेगाने होते. कर्ण छेदानंतर त्याला कुंडले दिली जातात. हि कुंडले हस्तिदंत,गेंड्याचे शिंग किंवा भाजलेलि माती यापैकी एका प्रकारची बनवलेली असतात.
कंथा : हा लोकरीचा किंवा हरणाच्या चामड्याचा असतो. याला नऊ कप्पे असतात. नाना प्रकारची औषधे, विभूती ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो.
कुबडी : ही आपट्याच्या किंवा औदुंबराच्या झाडापासुन किंवा “जराभरण” नावाच्या वेलींपासुन केली जाते. कुबडीचा वरचा आकार अर्धचंद्राकार करतात. त्याला मध्यभागी खुंटी मारुन सव्वा हात लांबीची कुबडी तयार करतात. ती सरळ उभी रहावी म्हणुन तिला खाली बैठक करतात. एखाद वेळी जप करताना साधकाचे सुर विषम होतात त्यावेळी कुबडी डाव्या किंवा उजव्या बगलेमध्ये घेऊन जप केला असता सुर सम होतो. अशाने माळेवर चाललेले नामस्मरण वैखरीमधुन आत मध्यमेमधे जाते आणि तिथे नाभी-नाम ऐक्य होते. (वाणीचे चार प्रकार आहेत. १) वैखरी वाणी म्हणजे जिभेने बोलली जाणारी २) मध्यमा वाणी म्हणजे विचारांमधील भाषा, या वाणीचे स्थान कंठाजवळ असते ३) पश्यन्ती वाणी म्हणजे डोळ्यांनी बोलली जाणारी,पश्यन्तीवाणीचे स्थान अनाहत चक्रामध्ये असते ४) परा वाणी म्हणजे एकाच्या मनाने दुसऱ्याच्या मनाशी बोलली जाणारी, परावाणीचे स्थान नाभीकमलामध्ये असते.
कटोरा : हे भिक्षापात्र होय. हा भोपळ्यापासुन बनवतात.कमीतकमी अर्धा ते पाऊण शेर धान्य रहाण्याइतकं हे पात्र खोलगट असतं. त्यात गरम अन्न घातलं तरी काही दोष निर्माण होत नाही.
चिमटा : चिमटा पंचधातुमिश्रित जाडजुड व लांबीला तीन ते चार फूट असतो. साधू चालताना चिमट्याचा नाद निर्माण करतात, तसेच याचा उपयोग वेळप्रसंगी कुदळी सारखाही करतात. हा चिमटा साधकाचा एक प्रकारचा योगदंडच असतो. त्याच्यामुळे भुमित, वृक्षात दोष आहे का ते साधकाला कळते.
नाथ संप्रदायात अग्निपुजा अत्यंत महत्वाची समजली जाते. नाथसिद्धांना आपल्या कायम वास्तव्याच्या ठिकाणी अग्नीपुजा अखंड चालु ठेवावी लागते .अग्नीमध्ये शक्यतो गाईच्या शेणाच्या गोवऱ्या घातल्या जातात. धुनीच्या जवळ दर्भासन,मृगाजिन,धुतवस्त्राचे आसन असते. त्या आसनांवर पुर्वाभीमुख किंवा उत्तराभीमुख अवस्थेत साधक साधनेला बसतो.साधकाच्याशेजारी दुसरे आसन मांडले जाते परंतु त्यावर कोणी बसत नाही. सर्व साधक रोज ध्यानधारणेला बसतात त्यावेळी नाथसिद्ध प्रथम आपल्या शृंगीशैलिच्या नादाने सद्गुरूंना पुकार देतो.त्या नादामुळे साधकांचे सद्गुरू देहाने कुठेही असले तरी किंवा देहात नसले तरी अव्यक्त रुपाने ते या स्थानाला कृपादृष्टीने न्याहाळतात. तास दोन तास ध्यान झाल्यावर साधक ओंकार लावतात,”ओम परमज्योति तेज:स्वरुपिणि नमामि” असा पुकार करतात. त्यानंतर चारही बाजुला प्रदक्षिणा घेऊन चारही दिशेच्या देवतांना नमस्कार करतात.
मधल्या काळात हा संप्रदाय पंच मकारांचा अवलंब करणारा पंथ असल्याचा समज लोकांमधे पसरला,कारण या संप्रदायाच्या साधकांजवळ अमोघ विद्या राहिली पण या विद्येवर अंकुश ठेवण्यासाठी आवश्यक असलेले विवेक,वैराग्य,संयम,तारतम्य आणि सत्वशिलवृत्ती, चारित्र्य हे गुण कमी झाले. त्यामुळे साधकांकडून विद्येचा दुरुपयोग होऊ लागला. याला अटकाव करण्यासाठी म्हणुन काही विशिष्ट संकेत करुन या विद्येला एक “संपुष्ट” करुन ठेवले आहे. हि विद्या त्रंबकेश्वरी ब्रम्हगिरीमध्ये ज्या ठिकाणी शंभुजती व गहिनीनाथ यांचे नित्य वास्तव्य आहे त्याठिकाणी ठेवली आहे. त्या विशिष्ट संपुष्टांचा उच्चार केल्याशिवाय या विद्येचे मंत्र सिद्ध होत नाहीत. ही विद्या गोरक्षनाथ,गहिनीनाथ,शंभुनाथ यांनी आपल्या अधिकारात ठेवली आहे. त्यांच्या कृपेचा वरदहस्त ज्यांच्या डोक्यावर ठेवला जाईल त्यांनाच ही विद्या प्राप्त होते.
टीप : वरील लेखातील माहिती नाथसंप्रदायातील समजुती व श्रध्दा यांवर आधारित असून याबद्दलची अधिक माहिती अथवा आक्षेप यासंदर्भात नाथ संप्रदायातील अधिक तज्ञ व्यक्तीशी संपर्क साधावा.
तुषार दामगुडे