ताज्या घडामोडी

तब्बल चौदा वर्षांनंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात काल सिंहाच्या छाव्याचा जन्म झाला

तब्बल चौदा वर्षांनंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात काल सिंहाच्या छाव्याचा जन्म झाला

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 19 जानेवारी 2025 :
अखेर प्रतिक्षा संपली .एक दोन दिवसाची नाही .चौदा वर्षांची प्रतिक्षा…. तब्बल चौदा वर्षांनंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात काल सिंहाच्या छाव्याचा जन्म झाला . आणि जन्मासाठी दिवस पण काय निवडला … संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा स्थापना दिवस .
पण ह्याच्या जन्माचा प्रवास सोपा नव्हता. खूप खाच खळग्यांचा होता . आशा आणि निराशेच्या सीमेवरचा होता . आनंद आणि दु:खाचाही होता .
मानस आणि मानसी ही जोडी जुनागढ वरून 2022 मध्ये आणली होती .गेल्यावर्षी मानसी सिंहीण आजारी पडली .तब्बल 18 दिवस तिने काहीच खाल्ले नव्हते .बऱ्याच जणांनी तिची आशा सोडली होती .पण आम्ही काही जणांनी ठाम विश्वास ठेवून तिची अखंड शुश्रुषा केली .त्यातून ती बरी झाली . त्यानंतर मानस बरोबर तिचं मिलन केलं .त्या दोघांना एकत्र करणही सोपं नव्हतं . मानस सुरुवातीला डरकाळी फोडून तिच्या अंगावर धावायचा .तिला ओरबाडायचा .ही बिचारी घाबरून जायची .पण आम्ही धीर न सोडता त्यांना पुन्हा पुन्हा एकत्र करायचो .हळूहळू ते एकत्र रुळले आणि चक्क एकमेकांच्या प्रेमात पडले .मग तस सोपं झालं .गेल्यावर्षी गौरी ज्या दिवशी येतात त्या दिवशी त्यांचं मिलन सुरू झालं . प्राणी रक्षक Vaibhav Patil चा मला फोन आला .मी तशीच पिंजऱ्याकडे धावले .तर हे दोघे आखंठ प्रेमात बुडालेले .30 सप्टेंबरला यांचं शेवटचं मिलन झालं आणि मानसीचा मिलन काळ संपला .मग ती त्याच्यापासून दूर बसायला लागली .आता दोघांमध्ये ती वर्चस्व गाजवू लागली .मानस जर तिच्या जवळ आला तर ती पंज्याचा फटका द्यायची .मग हा बिचारा निमूटपणे दूर व्हायचा .आम्ही हे सगळे दिवस तिची काळजी घेत होतो .तिचा वाढीव आहार , बाळंतपणा मधील टॉनिक ची औषधं सगळं कसं वेळच्या वेळी . काल 108 दिवस पूर्ण झाले आणि तिला लेबर पेन चालू झाल्या .मी अखंड सीसीटीव्ही समोर बसून तिच्या एक एक क्षणाच निरीक्षण करत होते . तिच जमिनीवर लोळण ,पुन्हा पुन्हा मागे मान वळवून पिल्लू बाहेर आल की नाही ते पाहणं ,पुन्हा पुन्हा कळा देणं हे पाहत होते .संध्याकाळी माझा धीर सुटत चालला होता .मग मी उद्यानातील वाघाई देवीच्या देवळातही जावून आले .देवीला मनोमन सांगितलं ,” बाई ग,तू उद्यानातील वाघांची देवी आहेस .माझी सिंहीण कितीवेळ झाला अडली आहे .तिला लवकर सोडव.” आणि पुन्हा सीसीटीव्ही समोर बसून राहिले .जर आणीबाणीची वेळ आली तर काय करायचं याची संपूर्ण तयारी ठेवली होती .पण सुदैवाने ती वेळच आली नाही . काल रात्री तिने साडे नऊ वाजता पिल्लाला जन्म दिला .आमचे गार्ड Amit Rane रात्रभर पिंजऱ्याच्या बाहेर जागत होते . पहाटे तीन वाजता ती पिल्लाला दूध पाजायला लागली .मग आम्ही खऱ्या अर्थाने सुटकेचा निःश्वास टाकला .ही गोष्ट एका सिंहाच्या पिल्लाच्या जन्माची …

डॉ. विनया जंगले
पशुवैद्यकीय अधिकारी
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button