ताज्या घडामोडी

देवघर किंवा घरचे देव

देवघर किंवा घरचे देव

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 24/01/2025 :
आपण सगळे सश्रद्ध लोक वर्षातून एकदोन किंवा आणखीन काही वेळा निरनिराळ्या तीर्थक्षेत्री जाऊन देवदर्शन घेतो. काही आणखीन सश्रद्ध माणसं तर रोज सकाळी किंवा संध्याकाळी देवदर्शन घेतात, एखाद्या मठात, देवळात नित्यनेमाने जातात. देवालय हे एक पवित्र स्थान असते यात शंका नाही. कारण, देवळात रोज त्रिकाळ पूजाअर्चा, अभिषेक, मंत्रोच्चार वगैरे सुरु असतात. तिथे वेगळी शक्तीस्पंदने असतात…. पण माझ्या मते आपलं निवासस्थानातील ” देवघर” ही जागा देखील तितकीच बलवान आणि उत्कृष्ट असते हेही कायम लक्षात ठेवा….
तुमच्या देवघरातील मूर्तींची प्राणप्रतिष्ठा झालेली नसेलही, रोजच्या रोज कदाचित षोडशोपचार पूजाही होत नसेल पण आपल्या खाजगी कौटुंबिक देवघराविषयी आपल्या मनात खास स्थान असते. आपण निदान तिथे रोज हात जोडून प्रार्थना करत असतोच. आपल्या प्रार्थनांची सकारात्मक शक्ती देवघरात एकवटलेली असते. तुमच्या देवघरातील मूर्तींशी तुमचं विशेष कनेक्शन असतं…आईने माहेरहून दिलेली अन्नपूर्णा बाळकृष्ण, आजोबांनी हरिद्वारहून कोणे एके काळी आणलेला शाळिग्राम, आजीने रामेश्वरहून आणलेलं दगडी शिवलिंग, एखादं पुरातन नाणं, अनेक पिढ्या देवघरात सुखेनैव असलेला खंडोबाचा टाक… काय नं काय…
ही सगळी मंडळी तुमची परिचित असतात. रोज तुमच्या प्रार्थना ते ऐकतात, तुमच्या खापर पणजोबांचे शब्दही त्यांच्या कानी पडलेले असतात. तुमचे कठीण संघर्षांचे, कटकटीचे, आनंदाचे, सुखाचे सगळे दिवस त्यांच्यापैकी प्रत्येकाने अनिमिष नेत्रांनी बघितलेले असतात. तुम्ही कधीही घराबाहेर गेलात तरी तुमच्या अनुपस्थितीत देवघर घराची काळजी घेतं यावर तुमचा ठाम विश्वास असतो. जुने देव भग्न झाले किंवा अन्नपूर्णेची पळी मोडली तरी तुमचं मन खट्टू होतं. काही अपरिहार्य कारणांमुळे देव विसर्जन करावे लागले तर तुम्ही डिस्टर्ब होता, नवीन बनविलेल्या मूर्तींशी कनेक्ट व्हायला तुम्हाला वेळ लागतो. प्रत्येक मूर्तींशी तुमचं सुरेख नातं असतं…. जुन्या शाळिग्रामवरचा एक चकचकीत ठिपकाही तुम्हाला माहिती असतो. समर्थांच्या मूर्तीच्या पाटावरचं डिझाईनही तुम्हाला नीट लक्षात रहातं…. अशी गंमत असते.
लक्षात ठेवा…. तुमचं देवघर हे खूप सुरेख शक्तिपीठ आहे. ते कायम सुंदर ठेवा, स्वच्छ ठेवा, फाफटपसारा न मांडता आटोपशीर आणि देखणं ठेवा. रोज जमेल तशी पूजा करा, मूर्ती अधुनमधुन उजळवा. रोज तुपाचे निरांजन, चंदन अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न ठेवा. तुमचे घरचे देव, कुलदेवता आणि सद्गुरु हेच जास्त महत्वाचे आहेत.

-सचिन मधुकर परांजपे ( पालघर। )

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button