सध्याच राज्यातील राजकारण म्हणजे, केला तुका अन झाला माका!

सध्याच राज्यातील राजकारण म्हणजे,
केला तुका अन झाला माका!
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 05/7/2023 : देवेंद्रजीं तुमची चाणक्य नीती यशस्वी झाली. मी पुन्हा येणार पुन्हा येणार असं म्हणत तुम्ही 2019 ला खरच पुन्हा आलात. पण संजय राऊतानी सेना भाजप मधला पुलच उडवून दिला. तुम्ही येऊन सुद्धा नं आल्या सारखं झालं. उद्धव साहेब काँग्रेस राष्ट्रवादीच्या मदतीने मुख्यमंत्री झाले आणि मग तुमचे विरोधक मी पुन्हा येईन या तुमच्या वाक्याची टर उडवत राहिले. पण पूल तुटला तरी तुम्ही सेनेच्या किनाऱ्यावर जहाज नांगरलं त्यात एकनाथ शिंदे साहेबा सहित 40 सेनेचे आणि काही अपक्ष घेऊन आलात आणि सत्ता स्थापन केली. तुम्ही पुन्हा आलात. तुमच्या कडे आता बऱ्या पैकी बहुमत होते. त्यामुळे तुम्हाला राष्ट्रवादी फोडायची गरज नव्हती. पण हृदयात एक शल्य होते. लोक अजूनही पहाटेच्या शपथ विधिवर कोट्या विनोद करत होते. त्यांची तोंड बंद करायची तर पहांटेचा फसलेला शपथ विधी सत्यात आणून यशस्वी करावा लागणार होता. तो तुम्ही दुपारचा शपथविधी घेऊन खरां करून दाखविला. त्यामुळे तुम्ही राज्यातील सर्वात यशस्वी राजकारणी झालात. तुमच्या नागपूरात तर तुमचं कसलं कौतुक चालले! तुम्हाला महाचाणक्य संबोधत चौका चौकात बॅनर लावले आहेत. मलाही तुमची खेळी आवडली. भाऊ खूप खूप अभिनंदन!
माझ्या मनात एक एक शंका आहे भाऊ, सरकार स्थिर होते, बहुमतही चांगले होते, तर मग राष्ट्रवादी फोडायची गरज होती का? कारण तुमच्या जहाजात आता नको तेवढी गर्दी वाढली. सर्वांना पुरेल एवढं अन्न पाणी जहाजावर नाही भाऊ. त्यामुळे जहाजावरील लोकांत बेदीली माजण्याची भीती आहे. अजितदादा प्रकरणामुळे शिंदे साहेब खुश वाटत नाही. त्यांची बॉडी लँगवेज तस सांगते. शिवसेनेचे प्रतोद आ भरत गोगावले साहेबानी तर उघड बोलून दाखवील. आधी आम्हाला एक भाकरी मिळणार होती आता अर्धीच मिळेल. आज गोगावाले यांनी स्टेटमेंट बदललं आहे, आता ते म्हणतात, पूर्वी आर्धी भाकरी मिळणार होती आता चतकोर मिळेल. ठीक आहे गोगावले नाराजी दाखवत असले तरी ते भायरचे आहेत. त्यांनी उघड बोलून दाखवील. पण आतले म्हणजे आपलें भाजपचेही मंत्रिपदासाठी उत्सुक आमदार अस्वस्थ आहेत तिकडेही लक्ष द्या. कारण शिवसेना शिंदे गट आणि भाजप मध्ये अनेक लोक मंत्री पदासाठी गूडघ्याला बासिंग बांधून बसले आहेत. शिव सेनेला 10 आणि भाजपला 11 असा एकूण 21चा कोटा शिल्लक होता. त्यातून अजितदादानी गपकन 9 मंत्रीपद हाणाली. आता फक्त 12 चं मंत्री पद शिल्लक आहेत. त्यात तीन वाटे पडतील. त्यात काही अपक्ष भीडूना द्यावे लागतील. म्हणजे तिन्ही पक्षाना तीन तीन मंत्री पद मिळतील. तिन्ही ठिकाणी उत्सुक तर 30/30 आहेत. मग ही 3/3 मंत्री पद कोणाच्या नाकाला लावायची? म्हणजे भाऊ तुमच्यासाठी भविष्यात मोठी डोके दुखी आहे. त्यापेक्षा पुढे मंत्री मंडळ विस्तारच करू नका. तीन तीन मंत्री पद राखून ठेवली तर 30/30 लोकांना आश्वासन देता येईल. पुढच्या मंत्रीमंडळ विस्तारात तुमचा नंबर नक्की आहे.
पण भाऊ राष्ट्रवादीतील फूट ही शरद पवार साहेबांची खेळी तर नाही ना? अनेक लोक तस बोलत आहेत. राज ठाकरे यांनी तर जाहीर आरोप केला आहे ही शरद पवार साहेबांची चाल आहे म्हणून. मलाही तसां संशय वाटतो. राष्ट्रवादीचे एक आमदार किरण लमहाटे यांनी तर दूरदर्शन वर सरळ सांगितले कीं, आपण सत्तेत गेलं पाहिजे ही चर्चा सुप्रियाताई समोर झाली आहे म्हणून. दुसरं शरद पवार साहेबांचा लौकिक पहाता तुमच्याकडे गर्दी पाठवून बेबंदशाही माजविण्याचा तर हां डाव नाही ना देवेंद्र भाऊ. कारण यातील बऱ्याच लोकांच्या मागे ईडीचा ससेमीरा आहे. कोणाची चौकशी सुरु आहे, कोण जमिनावर आहे तर काहीचीए चौकशी करण्याची तयारी सुरु आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी म्हणाले राष्ट्रवादीचा 70 हजार कोटींचा घोटाळा आहे म्हणे. त्यातून वाट काढायची तर राष्ट्रवादीच भाजपच्या गोठ्यात बांधाची कल्पना खुद्द पवार साहेबांची तर नाही ना? तस असेल तर मग त्या मालवणी म्हणी प्रमाणे व्हायचं. केला तुका अन झाला माका! राष्ट्रवादीत गोंधळ माजायचं सोडून आपल्याकडेच बेदीली माजायची. भाऊ अहीस्ता कदम. पुढे तिकीट वाटपातही गोंधळ होईल. दोन वाटे होते तिथे तीन वाटे करावे लागतील.
भाऊ आमच्या मनात येणाऱ्या कल्पना आहेत हं. त्या चुकीच्याही असू शकतात. पण सत्य कांय हे तुम्हालाच अधिक माहीत. Ed ने चौकशीच्या रूपाने पिठाची गिरणी सुरु केली आहे. काही जात्यात आहेत. काही पोत्यात आहेत आणि काही सुपात आहेत. सुपातील विरोधात गेले तर जात्यात जातील आणि सोबत आले तर उलटा प्रवास करत सुरक्षित पोत्यात येतील. पण आम्ही मतदार मात्र गोत्यात जातो भाऊ?
भाऊ तुमच्यात अजून एक घोळ होणार आहे. अमोल मिटकरी हे तर हिंदुत्वावर भयंकर झोड उठविणारे विद्वान आहेत. सुषमा अंधारेताई पेक्षा दोन पावले पुढे टाकतात ते. त्यांचं इस्लामपूर मधील भाषण अजून लोकांच्या कानात गुंजते आहे आणि डोळ्या समोर तरंगते आहे. हिंदू त्यांच्या विवाहात मम भार्या समरपयामी म्हणून हिंदू लोक बायको ब्राह्मणाला दान करतात असा सिद्धांत ते मांडातात. शिवाय स्वातंत्र्य वीर सावरकर आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्या बद्दल मिटकरी साहेब यांच्या मनात, डोक्यात आणि हृदयात कांय विचार आहेत. ते कांय बोलतात हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. सर्वं महाराष्ट्राला माहीत आहे ते. त्या मीटकरी साहेब यांची अजितदादा पवार यांनी प्रवक्ते पदी नेमणूक केली आहे. क्रमांक दोन वर शपथ घेणारे भुजबळ साहेब बाळासाहेब ठाकरे सोबत असताना कट्टर हिंदुत्ववादी होते तर शरद पवार साहेबा सोबत गेल्यावर हिंदू विरुद्ध जाऊन सरस्वती वगैरे हिंदू देवता विरुद्ध बोलायला लागले. तसेच तुम्ही म्हणता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज तर अजितदादा म्हणतात, स्वराज्य वीर छत्रपती संभाजी महाराज. हे गणित कसं सोडवीणार? कठीण आहे बुवा. आमची तर मतीच खुंटते. हे बघितल्यावर वाटते उद्धव साहेबानी सुषमाताई अंधारे यांना पक्षात घेऊन काही चूक केली असं आजिबात वाटत नाही.
🚨🪑पारावरच्या गप्पा 🪑🚨
भाजपाशी अढी त्याची ईडी खोड मोडी!
भाजपाशी जोडी त्याला मिळे तूप पोळी!!
वभाजपाशी खोडी त्याची ईडी हाती नाडी!
भाजपाशी गोडी त्याची ईडीशी काडी मोडी!!
नाडी अर्थात चड्डीची नाडी. हे खरं नाही भाऊ पण लोकांत तसा गैरसमज पसरतो आहे काहीही विचारतात लोक. लोक असंही विचारतात, भाजपा राष्ट्रवादीची जोडी कशी जमली? भाजपा हिंदुत्व सोडून लिबरलंवादी झाला कीं, राष्ट्रवादी लिबरलंवाद सोडून हिंदुत्ववादी झाला? भाऊ खरं सांगतो मला या प्रश्नाच उत्तर देता आलं नाही हो. मी पार सोडून धूम घरा कडे पळालो.
असो तर आम्ही जनता मुकी बिचारी कुणीही हाका. तुमचा गोंधळ लवकर निस्तारा आणि आम्हा मतदाराकडेही लक्ष ठेवा भाऊ.
जय हिंद जय महाराष्ट्र!
बापू हटकर
राजकीय विश्लेषक