ताज्या घडामोडी

“मोहिते पाटील यांची हक्काची आर्धी भाकर शाबूत”… भाग्यवंत ल. नायकुडे

“मोहिते पाटील यांची हक्काची आर्धी भाकर शाबूत”… भाग्यवंत ल. नायकुडे

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64

अकलूज दिनांक 25/03/2024 :
सर्व क्षेत्रांमध्ये आपल्या नेत्रदिपक कर्तबगारीने घराण्याचा दबदबा कायम राखणाऱ्या मोहिते पाटील घराण्याने “निवडणूक क्षेत्रातील आपली हक्काची अर्धी भाकर शाबूत ठेवलेली आहे”. हे वाचून अनेकांच्या भुवया वक्र झाल्याशिवाय राहणार नाहीत, तर काहींना हे वेगळे वाटेल, आणि बावळटांना काय वाटेल हे सांगायचे कष्ट आम्ही घेणार नाही. कारण त्याची आम्हाला गरज वाटत नाही. निवडणूक विधानसभेची असो की लोकसभेची असो. मोहिते-पाटील यांची निवडणूक रणनीती ही ठरलेलीच असते. आपल्या हक्काची आर्धी भाकर सुरक्षितपणे राखून ठेवली जाते. उर्वरित आर्धी भाकर खुल्या मैदानात ठेवून त्यामध्ये जास्तीत जास्त हिस्सेदार कसे निर्माण होतील, याची मोहिते पाटील हे जातीने खबरदारी घेतात. तेथे हिस्सेदार कमी वाटले तर विश्वासातील घटक हिस्सेदार म्हणून पाठविण्यात मोहिते पाटील यांचा हातखंडा आहे. आणि मग होते काय तर खुल्या मैदानातील अर्ध्या भाकरी मध्ये जो तो आपापल्या कुवतीने जास्तीत जास्त तुकडे आपल्या पदरात पाडून घेण्यात गर्क होतात. पण शेवटी परिणाम काय तर उर्वरित अर्ध्या भाकरीने हिस्सेदारांचे पोट अर्धेच राहते आणि इकडे मोहिते पाटील यांनी सुरक्षितपणे राखून ठेवलेल्या अर्ध्या भाकरीने तृप्तीची ढेकर दिली जाते. फंद फितुरी, दगलबाजी, लबाडी, चमकोगिरी, दोन डगरी, इत्यादीं बाबत खडा न खडा माहिती असणारा चाणक्य जयसिंह मोहिते पाटील यांच्या रूपाने या मोहिते पाटील घराण्यामध्ये असणे हे वरदानच होय. निवडणूक कोणतीही असो. खरे मुख्य सूत्रधार जयसिंह मोहिते पाटील हेच असतात. त्यांनी बांधलेला अंदाज,आडाखा अचूक आणि बिनतोडच. “जिंकण्यासाठीच लढायचे” ह्या ध्येयाने मोहिते पाटील घराण्यातील प्रत्येक घटक प्रेरित झालेला आहे हे सांगण्याची वेगळी गरजच नाही. मोहिते पाटील यांनी मेहनत घेऊन दुसरे पैलवान आखाड्यांमध्ये मिरविले, फिरविले आणि जिंकूनही आणले. तेच पैलवान स्वार्थापोटी आपल्या वस्तादांसमोर दंड थोपटून उभे राहण्याचा प्रयत्न करते झाले. हे आता नवे राहिले नाही. म्हणून मोहिते पाटील यांनी निवडणुकीच्या आखाड्यामध्ये धैर्यशिल मोहिते पाटील यांच्या रूपाने आपल्या घरातील मल्ल उतरविला आहे. आता बस् झाले उपऱ्या मल्लास पोसणे. या विचाराने प्रेरित झालेले मोहिते पाटील घराणे उपऱ्यांसाठी जीवाचे रान करतात मग घरातीलच घटकासाठी काय करतील याचा विचार समोरच्यांनी जरूर करावा हे या निमित्ताने सांगावेसे वाटते. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उमेदवारीचा प्रभाव फक्त माढा लोकसभा मतदार संघावरच असणार नाही तर सोलापूर, सातारा आणि बारामती लोकसभा मतदार संघावर निर्णायक प्रभावशाली ठरणारा आहे हे आम्ही जाहीरपणे नमूद करीत आहोत. हे काही उगाच नाही. मोहिते पाटील यांचं “आमचं ठरलंय” ह्यात यामध्ये बरंच काही दडलेले आहे. जयसिंह मोहिते पाटील यांच्या जाहीर सूचक वक्तव्याचा विसर पडून चालणार नाही त्यांनीही माढा, सोलापूर, सातारा आणि बारामती “गेलं” हे भाजपाला उद्देशून केलेले सूचक विधान, सूचक वक्तव्य ज्या त्या पक्षश्रेष्ठींनी ध्यानात घ्यावे. अजून वेळ गेलेली नाही. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अद्यापही माढा लोकसभेसाठी कोणाची उमेदवारी जाहीर केलेली नाही आणि आमच्या माहितीनुसार माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा दिलेला नाही. जयसिंह मोहिते पाटील हे भाजपमध्ये नाहीत. आमदार रणजितसिंह विजयसिंह मोहिते पाटील आणि इच्छुक उमेदवार धैर्यशिल मोहिते पाटील हे अधिकृतपणे भाजपाचे सदस्य आहेत. आणि मोहिते पाटील यांच्यामुळेच सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश विकास सोसायटी, ग्रामपंचायत, पंचायत समिती जिल्हा परिषद, पणन संस्था यांच्यावर भाजपाचे वर्चस्व आहे. हे नाकारून चालणार नाही. भाजपाने अधिकृतपणे धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवार म्हणून घोषित केले नाही तर ते नक्कीच बंडखोरी करून ही निवडणूक लढविणारच अशा निर्णायक भूमिकेत आहेत. शरद पवार यांनी आपल्या पक्षाचे तिकीट धैर्यशील मोहिते पाटील यांना देऊन सोलापूर माढा सातारा आणि बारामती येथील लोकसभे च्या निवडणुकीतील विजयाचा मोठा आणि हक्काचा कौल घेतील. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोहिते पाटील यांच्या माध्यमातून शह देतील. मोहिते पाटील आणि शरद पवार यांच्यामध्ये अंतर पाडण्यासाठी प्रथमपासून क्रियाशील असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव आता गुप्त राहिलेले नाही. आपणापासून बाजूला गेलेल्या अजित पवार यांना मोहिते पाटीलच शह देतील याची खात्री त्यांना नक्कीच झालेली आहे. समोर ठाकलेल्या लोकसभा निवडणुकी बरोबरच येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील मोहिते पाटील यांचे योगदान अत्यंत भरीव आणि फायदेशीर असणार आहे याची जाण राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आहे हे वेगळे सांगायला नकोच. …..  क्रमशः

भाग दुसरा…..

भाजपने माढा मतदारसंघातून रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर मोहिते पाटील यांच्या शिवरत्न बंगल्यावर माढा मतदारसंघातील तालुक्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी भेट दिली. यावेळी विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, शेतकरी कामगार पक्षाचे आ.जयंत पाटील, सातारा जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे निंबाळकर, रघुनाथराजे निंबाळकर फलटणचे आ. दिपक चव्हाण, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील, सांगोला तालुक्यातील डाॅ.बाबासाहेब देशमुख, डाॅ.अनिकेत देशमुख, माजी आ.जयवंत जगताप, संजय कोकाटे व माण खटाव तसेच सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख नेते उपस्थित होते. या नेत्यांमध्ये सुमारे दोन तास बंद दरवाजाआड बैठक झाली.
या बैठकीनंतर रामराजे निंबाळकर यांनी आपण कोणत्याही राजकीय बैठकीसाठी आलेले नसून केवळ विजयसिंह मोहिते पाटील यांना भेटण्यासाठी आलो असल्याचे सांगितले. त्यांना माढा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून प्रश्न विचारले असता त्यांनी ‘नो कमेंट्स’ एवढेच उत्तर दिले.
यावेळी शेकापचे जयंत पाटील यांनी अकलूज व शिवरत्न ची भूमी ही महाराष्ट्राच्या राजकारणातील घडामोडीला कलाटणी देणारी आहे आज मुंबईत बैठक असतानाही तेथे गैरहजर राहत शिवरत्न वरील बैठकीसाठी आलो असल्याचे सांगत येत्या दहा दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल झालेले दिसतील असे सूचक वक्तव्य केले आपणाला शरद पवार यांनी पाठविले आहे काय या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी मला कोणीच पाठवलेले नसले तरी इंडिया आघाडीत शरद पवार यांचे शब्द प्रमाण मानतो. त्यांना आपण सांगून आल्याचे ही सांगितले.

*मोहिते पाटलांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपचे संकटमोचक, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन ‘शिवरत्न’वर

माढा मतदारसंघासाठी रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर मोहिते पाटील समर्थकांच्या तीव्र भावनांची दखल घेत मोहिते पाटलांची नाराजी दूर करण्यासाठी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी शिवरत्नवर विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतली. यावेळी जयसिंह मोहिते पाटील, मदनसिंह मोहिते पाटील, आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील आदी उपस्थित होते. यावेळी हजारो कार्यकर्ते उपस्थित होते त्यांनी आपला माणूस आपला खासदार माढा निंबाळकर यांना पाडा अशा घोषणा देत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. सुमारे दोन तास बंद खोलीत ही बैठक पार पडली
बैठकीनंतर गिरीश महाजन यांनी, मोहिते पाटील यांची कालच आपली भेट झाली या भेटीत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली सदरची नाराजी पक्षश्रेष्ठींनी पुढे मांडली व मोहिते पाटलांची नाराजी पक्षाला न परवडणारी असल्याचे आपण सांगितले. त्यामुळे त्यांनी मला ताबडतोब अकलूजला जाण्यास सांगितले त्यानुसार आपण मोहिते पाटील यांच्या नाराजीचे सर्व मुद्दे ऐकून घेतले असून ते पक्षश्रेष्ठींसमोर मांडणार आहे. त्याचबरोबर कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना ही तिथेपर्यंत पोहोचवेन असल्याचे सांगून. निवडणुकीत अनेक ठिकाणी नाराजी व्यक्त केली जाते नाराजी चर्चेतून दूर होऊ शकते त्यासाठीच आपण आलेला असून पक्षश्रेष्ठींबरोबर मोहिते पाटील यांची चर्चा होईल या चर्चेतून त्यांची नाराजी दूर होईल असे सांगितले.
यावेळी शिवरत्न वर जमलेल्या हजारो कार्यकर्त्यांचा तीव्र भावना लक्षात घेऊन त्यांनी कार्यकर्त्यांची ही संवाद साधला मोहिते पाटील यांची नाराजी आपण जाणून घेतली असून त्यावर पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील असे सांगत अजून आपल्याला भरपूर वेळ आहे फॉर्म भरलेले गेले नाहीत तरी कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा असे आवाहन केले.
ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद करून गेल्यानंतरही कार्यकर्त्यांनी घोषणा देत शिवरत्न दुमदुमून सोडला. या कार्यकर्त्यांशी धैर्यशील मोहिते पाटील यांनी संवाद साधत आज झालेल्या बैठकीत विजयसिंह मोहिते पाटील व रामराजे निंबाळकर यांना पुढील निर्णय घेण्याचे सर्वाधिकार दिले असून त्यांनी जो निर्णय घेईल त्याप्रमाणे सर्व कार्यकर्त्यांनी काम करावे त्यांचा निर्णय होईपर्यंत सर्व कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा असे आवाहन केले.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button