ओबीसीनो सावधान !
ओबीसीनो सावधान !
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
अकलूज दिनांक 20/12/2024
ओबीसीनो सावधान! छगन भुजबळ व गोपीचंद पडळकर यांना मंत्रिमंडळात घेतले नाही. तसेच पंकजाताई मुंडे व महादेवराव जानकर यांचा लोकसभेत पराभव केला या दोन्ही गोष्टी एकच आहेत. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ओबीसीचे बरेचसे उमेदवार पाडले गेले व मराठा समाजाचे नेते निवडून आले येथे जरांगे फॅक्टर चालला असे म्हटले गेले. तसेच विधानसभेमध्ये ओबीसीचे नेते निवडून आले थोडीशी मराठा समाजाची पीछेहाट झाली. हे पाहिल्यावर जे ओबीसीसाठी लढत होते त्यांना लोकसभेत पाडले. आणि जे निवडून आले त्यांना मंत्रिमंडळात घेतले नाही. एकंदरीत काय तर ओबीसींना राजकारणातून बेदखल करणे, सत्ता येईपर्यंत ओबीसीचा वापर करून घ्यावयाचा व सत्ता आल्यानंतर त्यांना सत्तेत सामावून घेणे नाही. हा नेहमीचाच महाराष्ट्राच्या राजकारणाचा भाग राहिलेला आहे. आता या निवडणुकीमध्ये नवीन असे काही घडलेले नाही. या मंत्रिमंडळामध्ये निरनिराळ्या जातीच्या ओबीसी नेत्यांना प्रतिनिधित्व दिले गेले आहे. पण हे नेते केव्हाही ओबीसी प्रश्नावर, ओबीसी आरक्षणावर किंवा एका पर्टिक्युलर जातीच्या ज्वलंत प्रश्नावर कधीही बोललेले नाहीत. ते मूग गिळून गप्प बसलेले आहेत. अशा ओबीसी नेत्यांना ओबीसीचे प्रतिनिधी म्हणून मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. व जे ओबीसीच्या प्रश्नावर जागृत होते, ओबीसीसाठी लढत होते त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर ठेवले आहे, लोकसभेमध्ये पाडले आहे. म्हणजेच ओबीसींच्या नुकसानीचे पाठीमागे कोण आहे? तर प्रस्थापित सवर्ण पक्षाचे नेते, पक्षप्रमुख हेच जबाबदार आहेत. या पक्षप्रमुख नेत्यांचा ओबीसींच्या कडे पाहण्याचा दृष्टिकोन कशा प्रकारचा आहे हे आता उघड झालेले आहे. त्यांचा दृष्टिकोन ओबीसींचा विकास न करणे किंवा राजकीय ओबीसींची भागीदारी न देण्याची आहे. ओबीसीच्या हिताचे निर्णय घेणारे नेतेच जर मंत्रिमंडळात नसतील व सवर्ण पक्षाचे नेते जो निर्णय घेतील त्या निर्णयाला हो म्हणणारे ओबीसी नेते असतील तर ओबीसीच्या हिताचा एकही निर्णय होणार नाही. हे ओबीसी ने जाणून घ्यावे व आपल्या हक्काप्रती जागृत राहावे. आत्ता राजकारणाने कूस बदललेली आहे. पूर्वी राजकारण मराठा व ब्राह्मण या दोन आसा भोवती फिरत होते. आत्ताचे राजकारण हे मराठा व ओबीसी या दोन आसा भोवती फिरत आहे. तेव्हा ओबीसीने आपली बाजू राजकारणात मजबूत करण्याच्या दृष्टीने पावले उचलली पाहिजेत. त्याचा परिणाम म्हणून एक ना एक दिवस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ओबीसी झाल्याशिवाय राहणार नाही. आत्ताच्या मंत्रिमंडळामध्ये मराठा जातीचे नेते जास्त आहे एका जातीचे नेते मंत्रिमंडळात जास्त असणे हे केव्हाही इतर जातींच्या लोकांसाठी हितावह नाही. त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांचे नेते असावयास हरकत नाही. म्हणून मराठा समाजास जादाचे राजकीय हक्क, राजकीय फायदे मिळत असतात. ते ओबीसी व इतर समाजास कमी मिळतात. एकंदरीत राजकारणावरती सध्या मराठा समाजाचे वर्चस्व आहे हे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाही सिद्ध होते आहे. तेव्हा आपल मंत्रिमंडळावरती वर्चस्व ठेवावयाचे असेल तर ओबीसी ची वेगळी राजकीय मांडणी असावयास पाहिजे. प्रस्थापिताच्या पक्षात ओबीसींचे हित होणार नाही. ओबीसी हिताचा विचार करणारेच नेते निवडून गेले पाहिजेत. दुसऱ्याच्या पक्षातून निवडून गेलेले ओबीसी नेते हे जातीने ओबीसी असतात पण ते त्या पक्षाचे गुलाम असतात. ते निर्णय प्रक्रियेत नसतात. म्हणून त्यांना ओबीसी साठी काहीही करता येत नाही.ओबीसीनी राजकारण साक्षर झाले पाहिजे.भाड्याच्या घरात राहून, त्या इमारतीवर आपल्याला इमले चढवता येत नसतात. कारण आपण त्या घरात भाड्याने राहत असतो.
वाघमोडे टी. एम. जत