ताज्या घडामोडी

लोकशाही लोकांसाठी की सरंजामांसाठी ?

लोकशाही लोकांसाठी की सरंजामांसाठी ?

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 06/12/2024 :
नुकतीच महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक झाली. या निवडणूकीत भाजपाने प्रचंड बहूमत मिळवले. विरोधकांचा सुफडा साफ केला. आता तो कसा केला, कसा झाला ? याबाबत जनतेत संशयकल्लोळ आहे. भाजपाचा हा विजय कुणालाच निखळ वाटत नाही. या मागचे गौडबंगाल काय आहे ? ते कधीतर स्पष्ट होईलच. राज्यात कुठलीही लाट नसताना कमळाबाई इतक्या जागा कशी जिंकू शकते ? २०१४ ला अकरा हजार कोटी खर्च करून उभारलेल्या मोदींच्या भव्य प्रतिमेची (इमेजची) लाट असतानाही इतक्या जागा त्यांना जिंकता आल्या नव्हत्या. मग आत्ताच हे कसं साध्य झालं ? सत्तेविरोधात अनेक नकारात्मक मुद्दे असताना त्यांनी इतक्या जागा कशा जिंकल्या ? हे उघड गुपित आहे. पण आज चिंतनाचा मुळ मुद्दा भाजपाचा विजय नव्हे तर पराभवानंतर लोकशाही रक्षणाच्या हाकाट्या मारणारी पिलावळ आहे. विधानसभा निवडणूकीतील पराभवानंतर एक मोठी पिलावळ राज्यात लोकशाही रक्षणाच्या हाकाट्या मारताना दिसली. त्यांना खरंच लोकशाही हवी आहे का ? खरंच या पिलावळींना देशात संविधानाचे राज्य हवे आहे का ? हा महत्वाचा विषय आहे. कारण याच लोकांनी राज्यात भाजपाची सत्ता असताना त्यांची तळी उचलली होती. कॉंग्रेसची नाव बुडताना दिसल्या दिसल्या या सर्व उंदरांनी भाजपाच्या नावेत उड्या मारल्या होत्या. लोकसभा निवडणूकीनंतर भाजपाची नाव बुडणार असे वाटत होते. त्यामुळे यातल्या अनेक उंदरांनी पुन्हा शिवसेना, शरद पवार, कॉंग्रेस असे पर्याय शोधायला सुरूवात केली होती. याच लोकांनी भाजपाची सत्ता असताना भाजपात प्रवेश केले होते. भाजपाच्या सत्तेचे लाभ उठवले होते. लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले होते. ( ते मिळाले होते की चकवा देण्यासाठी सेट करून दिले होते ? हा ही अभ्यासाचा विषय आहे. ) लोकसभेनंतर राज्यभर महाविकास आघाडीचे वारे वहात होते. त्यांनाच विधानसभेला यश मिळेल अशा चर्चा होत्या. शरद पवार, राहूल गांधी आणि उध्दव ठाकरे यांच्या करिष्म्याच्या चर्चा सुरू होत्या. मधल्या काळात शरद पवारांच्या पक्षात, ठाकरेंच्या शिवसेनेत अनेकजण उड्या मारत येताना दिसत होते. सत्ता असताना भाजपाच्या दरवाजावर हावरटासारखे उभे राहिलेले अनेकजन पुन्हा उध्दव ठाकरे, शरद पवार यांच्या पार्टीत उड्या मारताना दिसत होते. कारण अनेकांचा असाच समज होता की राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येईल. त्यामुळे हे सगळे सत्तापिपासू कावळे या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारताना दिसत होते. पण विधानसभेचा निकाल लागला आणि झालं भलतंच. महाविकास आघाडीची सत्ता येईल असे वाटत होते पण ती आली नाही. लागलेला निकाल नक्कीच शंकास्पद आहे. भाजपाच्या यशाचा गोलमाल कधीतर समोर येईलच. पण या निमित्ताने राज्यात या सत्तापिपासू कावळ्यांनी लगेच संविधानाची, लोकशाही रक्षणाची भाषा सुरू केली आहे त्याचे हसू येते. खरच या लोकांना लोकशाही हवी आहे का ? असा प्रश्न या निमित्ताने पडल्याशिवाय रहात नाही. हे संरजाम आप-आपली संरजामी, आप-आपले वतन वाचवण्यासाठी गोचिडासारखे सत्तेच्या कासेला चिकटून बसतात. यांना लोकशाही लोकांसाठी नको असते. त्यांना आपली सत्ता, सत्तेचे दुकान अबाधीत ठेवण्यासाठी हवी होती. या संरजामांनी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना आणि भाजपाही व्यापली आहे. दोन-तीन पिढ्यांची हयात कॉंग्रेसमध्ये काढलेला अशोक चव्हाण भाजपात जातो, तो मोदींच्या विचाराने प्रभावीत होवून जातो काय ? तसे असते तर मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले होते तेव्हाच अशोक चव्हाण भाजपात गेले असते. उद्या भाजपा सत्तेतून पायउतार झाल्यावर हेच अशोकराव कॉंग्रेसमध्ये येतील. अशोकराव लोकसभेनंतर परतले नाहीत. त्यांनी तुर्तास तरी बुड भाजपात रोवलय पण अनेक कावळे तिकडून इकडे पुन्हा येवू लागले होते. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली नाही. भाजपाच्या खेळीने हे जमले नाही. या संधीसाधू कावळ्यांचा कावा साधला नाही म्हणून त्यांच्या तोंडी आता लोकशाही आणि संविधान रक्षणाची भाषा येताना दिसत आहे. पण हेच बहाद्दर सत्तेच्या बुडावर लाथ मारून पुढील पाच वर्षे लोकशाहीच्या रक्षणासाठी लढणार का ? भाजपाची अघोषित हूकुमशाही मोडीत काढण्यासाठी काम करणार का, रस्त्यावर उतरणार का ? हे खरे प्रश्न आहेत. खरेतर असं काही होणार नाही. हे सत्तेला चटावलेले भ्रष्ट संरजाम काही दिवस शांत बसतील. त्यानंतर मतदारसंघाच्या विकासाचे कारण पुढे करत पुन्हा फडणवीसांच्या कासेला चिकटतील. आत्ता लोकशाहीची भाषा करत भाजपाला दोष देणारे, इव्हीएमवर खापर फोडणारे पठ्ठे लवकरच भाजपवासी होतील. कारण पुढची पाच वर्षे त्यांना सत्तेशिवाय दम निघणार नाही हे नक्की. त्यासाठी अजून चार सहा महिने वाट पहावी लागेल.
लोकशाही रक्षणाची लढाई असले बाजारबुणगे लढू शकत नाहीत. खरेतर ही लढाई लोकांनाच लढावी लागेल. त्यांनीच रस्त्यावर उतरायला हवं. ‘लोकशाही व्यवस्था’ ही या सरंजामाची गरज नाही तर ती सामान्य लोकांची गरज आहे. स्वातंत्र्यानंतर अनेक संरजाम जन्माला आले. त्यांनी सत्तेच्या आडोश्याला दडून हजारो कोटींची माया जमवली. राज्यातली जनता कफल्लक आणि तिचे प्रतिनिधी म्हणवणारे सारे करोडपती. हे कसं काय ? एकेकाच्या संपत्तीचे आकडे डोळे विस्फारणारे आहेत. या लोकांनी सत्तेचे फायदे उपटत केवळ आपली घरं भरली. घराणेशाही निर्माण करत लोकांचा गळा घोटला. पैशाचा प्रचंड वापर करत लोकांना आणि कार्यकर्त्यांना गुलाम केले. हे असले शोषक लोकशाही रक्षणाची लढाई कसे लढू शकतील ? त्यांना लोकशाही हवी तर आहे का ? याचा विचार व्हायला हवा. लोकशाहीची लढाई आता या संरजामांच्या हातातून काढायला हवी. हे लोकांची दिशाभूल करत आहेत. भाजपाने सत्तेचे गाजर दिले, त्रास न देण्याचा, इडी न लावण्याचा शब्द दिला, एखादे महामंडळ, विधानपरिषद दिली किंवा करोडो रूपये कमावण्याची संधी दिली तर याच घुबडांची तोंडं आपोआप बंद होताना दिसतील. त्यांच्या लोकशाही रक्षणाच्या हाकाट्या थंड होताना दिसतील. हे भामटे लोकशाहीची लढाई लढणार म्हणजे उंदीर खायला मिळत नाही म्हणून उपवासाचे ढोंग रचणा-या बोक्यावर विश्वास ठेवण्यासारखे आहे. येत्या वर्षभरात या बोक्यांची लोकशाही रक्षणाची हाकाटी बंद पडेल आणि फडणवीसांचे तळवे चाटण्यासाठी जिभेला धार लावून हे सज्ज असल्याचे दिसून येईल. लोकांनी या दलबदलू भामट्यांना ओळखायला हवे. या सरंजामांची सरंजामी नष्ट करायला हवी. त्यांच्या झुंडशाहीत लोकशाहीचा आवाज गुदमरतो आहे. भाजपाच्या हुकूमशाहीविरूध्द लोकानीच एल्गार करण्याची गरज आहे. पण लोकांनीही जाती-धर्माची भांग ढोसली आहे. ती उतरल्यावर लोक नक्की ही लढाई लढतील.

दत्तकुमार खंडागळे
संपादक वज्रधारी,
मो. 9561551006

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button