बाबांच्या आत्मक्लेशाचा त्रास त्यांनाच होईल
बाबांच्या आत्मक्लेशाचा त्रास त्यांनाच होईल
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 06/12/2024 :
महाराष्ट्रातील ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी पुण्यात तीन दिवस आत्मक्लेश आंदोलन केले. ईव्हीएम मशीन संबंधात त्यांचे काही आरोप होते, त्याचबरोबर निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण सारखी योजना आणून मतदारांना प्रलोभन दाखविणे आणि निवडणुकीत पैशाचा प्रचंड महापूर वाहिला असे त्यांचे आरोप होते. बाबा आढाव हे राज्यातील सर्वात ज्येष्ठ समाजसेवक आहेत. त्यांच्यासारखे आदरणीय, पितृतुल्य, निष्कलंक समाजसेवक राज्यात बोटावर मोजण्या एव्हढेही शिल्लक राहिलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या आरोपाची दखल घेतली पाहिजेत.
ईव्हीएम मशीन संबंधात राज्यात नाही तर देशात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. तो संपूर्ण तांत्रिक मुद्दा असल्याने त्याबाबत त्या क्षेत्रातील तज्ज्ञांनीच मत व्यक्त केलेले बरे. त्यामुळे तुर्तास तो मुद्दा बाजुला ठेऊ. दुसरा मुद्दा बाबांनी मतदारांना प्रलोभन दाखविण्याचा उपस्थित केला आहे. त्यात सत्यता आहे. नुसताच सत्य नाही तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खुद्द बाबांच्या उपोषणस्थळी येऊन मत मिळविण्यासाठीच आम्ही लाडकी बहीण योजना आणली. आम्हाला सत्तेवर यायचे होते असे परखडपणे सांगून त्यावर शिक्कामोर्तब केले. अजितदादांनी ताकाला जाऊन भांडे लपविणे आपल्याला जमत नाही असे स्पष्ट सांगून बाबांच्या उपस्थितीत त्याबद्दल स्पष्टीकरण दिले. दादांनी त्या पुढे जाऊन मते मिळविण्यासाठी आजवर सर्वच जण असे करीत आल्याचेही सांगितले. त्यावर त्यांनी अंतुले सरकारच्या संजय गांधी निराधार योजनेचे उदाहरणही दिले. ही गोष्ट मान्य केली पाहिजेत की, सत्ता सगळ्यांनाच पाहिजे असते. त्यासाठी मतदारांना ते वाटेल ती प्रलोभने दाखवितात. इंदिरा गांधींनी आणलेली गरीबी हटाव किंवा वीस कलमी कार्यक्रम हाही प्रलोभनच होता. ही प्रलोभने लोकांनी स्वीकारावी की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. यावेळी लाडकी बहीण योजना महिलांनी स्वीकारली. त्याचा फायदा महायुतीला झाला.
बाबांचा दुसरा मुद्दा असा आहे की, निवडणुकीत पैशाचा महापूर वाहिला. ही गोष्ट खरी आहे. बाबांनी ज्या पुण्यात बसून आत्मक्लेश आंदोलन केले. त्याच पुण्यातून १९७७ साली ज्येष्ठ समाजवादी नेते ना.ग.गोरे यांनी लोकसभेची निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांचा निवडणुकीतील एकूण खर्च केवळ ७५० रुपये एवढा होता. आज एवढ्या पैशात लोकसभा तर दूर अत्यंत छोट्या गावातील सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक लढविता येत नाही. बाबांचे वय आज ९५ वर्षाचे आहे. स्वातंत्र लढ्यापासून ते देश पाहत आले आहेत. त्यावेळी असलेले लोक, त्यांच्या मनात देशाप्रती असलेली निष्ठा, त्यांचे चारित्र्य, आचार-विचार, नितीमत्ता आणि आजच्या काळातील जनमानस यात जमिन अस्मानाची तफावत आहे. त्यावेळी लोक घरावर तुळशीपत्र ठेऊन समाजासाठी, देशासाठी लढत असत. आज लोक देशावर, समाजावर तुळशीपत्र ठेऊन आपली घरे भरत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण सारखी योजना आणून निवडणुका जिंकण्याची वेळ का आली याचाही कधीतरी विचार करण्याची वेळ आली आहे. याचे कारण लोकांना आता पक्ष, निष्ठा, देशहित, समाजहित याच्याशी काहीही घेणे देणे राहिले नाही. आपला फायदा कशात आहे, काय केले म्हणजे आपला फायदा एवढाच स्वार्थी विचार जो तो करीत आहे. लाडकी बहिण योजनेत केवळ महिन्याला पंधराशे रुपये दिल्याने महायुतीला एवढा विजय मिळाला असा जर कोणाचा समज असेल तर ते संपूर्ण सत्य नाही. याचे कारण लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये तर लाडक्या भावाला मतासाठी कोठे हजार, कोठे पंधराशे तर कोठे तीन तीन हजार रुपये वाटण्यात आले. लाडक्या बहिणीच्या पैशाचे एकवेळ आँडिट होईल. या वाटलेल्या पैशाचे आँडिट कोण करणार? २८८ आमदारात किती आमदार असे आहेत की ज्यांनी मतदार संघात एकही रुपया न वाटता विजय मिळविला? विधान सभा निवडणुकीत प्रत्येक मतदार संघात कोट्यावधी रुपयांचा खर्च उमेदवारांनी केला आहे. निवडणूक आयोगाने खर्चाची मर्यादा घालून दिली असली तरी त्या मर्यादेच्या कितीतरी अधिक पट खर्च बहुतांश किंबहुना सर्वच मतदार संघात झाला आहे. याचे कारण अलिकडच्या काळात सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे समिकरण रुढ झाले आहे. राजकारण्यांना हे कळाले की पैशाशिवाय मते मिळत नाहीत आणि मतदारांनाही हे कळाले की, मतासाठी पैसा मिळतो. आपली लोकशाही एका वेगळ्या प्रकारे अशी भांडवलदारांची झाली आहे. मी पराभूत झालो तरी चालेल पण मी निवडणुकीत लोकांना पैसा वाटणार नाही असे उमेदवार म्हणत नाहीत, मला कोणी कितीही प्रलोभन दाखविले तरी चालेल पण मी माझे मत विकणार नाही असे मतदार म्हणत नाही. बाकी सगळे सोडा पण या निवडणुकीत बारामतीतही पैसे वाटले जात असल्याचा आरोप झालाच ना? सापडले काही नाही हा भाग वेगळा. याचे कारण नितिमत्ता आता कोठेच शिल्लक राहिली नाही. निवडणुकीच्या काळात कोट्यावधी रुपये पोलिसांनी पकडले. ते कोणाचे होते आणि कशासाठी आणले जात होते? दुर्देव असे आहे की, आजच्या काळात बाबा आढाव सारखे स्वच्छ, चारित्र्यसंपन्न समाजसेवक जरी निवडणुकीला उभे राहिले तरी त्यांना मते मिळणार नाहीत. याचे कारण मतदारांना पैशाची चटक लावण्यात आली आहे. सामान्य माणसाने निवडणूक लढवावी अशी स्थितीच ठेवली नाही. राजकारण हे समाजकारण न राहता अर्थकारण झाले आहे. अशा वेळी सत्ता मिळवा. ती कोणत्याही पध्दतीने मिळाली तरी चालेल असाच विचार सर्वजण करीत आहेत. पक्षफूट ही त्या अर्थकारणाचाच एक भाग आहे. आपल्या लोकशाहीची अशी अवस्था होणे ही खरी चिंतेची बाब आहे. सत्तेवर लोक येतील जातील, पण पैशाच्या जीवावर निवडणुका जिंकायची अशीच पध्दत सुरु राहिली तर चांगले लोक सत्तेवर कसे येतील? भविष्यात ही लोकशाही कोणत्या थराला जाईल? याचा आज कोणीही विचार करायला तयार नाही. पैशाच्या बळावर ज्या लोकशाहीत निवडणुका जिंकल्या जातात अशा राज्यात लोकहिताचा विचार केला जात नाही. देशहिताचा विचार केला जात नाही. अशा लोकशाहीत केवळ उद्योगपतींच्या हिताचा विचार केला जातो. त्यामुळेच आपल्याकडे निवडणूक प्रचारात विकास, सामाजिक प्रश्न, समस्या यावर भाषणे होत नाहीत, प्रचारात अदाणी, अंबानी प्रचाराचे मुद्दे असतात. बाबा आढाव यांचे दुःख बरोबर आहे. त्यासाठी त्यांना आत्मक्लेश आंदोलन करावे वाटणे हा त्यांच्यातील संवेदनशीलतेचा परिणाम आहे. परंतु परिस्थिती एवढी रसातळाला गेली की, बाबांनी कितीही आत्मक्लेश आंदोलन केले तरी त्याचा कोणालाही क्लेश होणार नाही. त्याचा त्रास फक्त बाबांनाच होणार आहे. आजच्या राजकारणात विधायक गोष्टींना काहीही स्थान नाही. विध्वंसक शक्ती तुमच्या पाठिशी असतील तरच त्याची थोडीफार दखल घेतली जाते. बाबाजवळ ती नाही, त्यामुळे बाबांच्या आंदोलनाचा त्रास केवळ त्यांनाच होईल. त्यामुळे कोणातही कोणताही बदल होणार नाही. राजकारण एवढे रसातळाला गेले आहे. हे सत्य स्वीकारावेच लागेल.
विनायक एकबोटे
ज्येष्ठ पत्रकार नांदेड
दि. ३.१२.२०२४
मो.नं. ७०२०३८५८११