रानभाजी – कवळी

रानभाजी – कवळी
अन्य नावे : कोळू, कोवाली, डोमळी
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज
संग्राहक : प्रविण सरवदे/आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 01/10/ 2024 : आदिवासी भागात रानभाज्याचा वापर मोठ्या प्रमाणात आहारात केला जातो. जून महिन्यात पावसाला सुरवात झाली की, जंगलात वेगवेगळया रानभाज्या उगवायला सुरवात होते. यावेळी कवळी ही रानभाजी जंगलात उगवते. साधारण पाऊस सुरू झाल्यानंतर आठवडा ते दोन आठवड्यानंतर कवळीची पाने शिजवून खाण्यायोग्य असतात. कवळी मध्ये औषधी गुणधर्म असतात. कवळी भाजीच्या हळदी प्रमाणे मुळ्या असतात. या मुळ्या पांढऱ्या, लांबट असतात. कवळीच्या मुळ्यामध्ये औषधी गुणधर्म असल्याने यांना बाजारात मोठी मागणी असते. बऱ्याच ठिकाणी याची शेती करून उत्पादन घेतले जाते.
उपयोग
साधारण पावसाळ्यात सुरवातीच्या पंधरा दिवसातच कवळीची भाजी जंगलात उगवते. या भाजीच्या मुळीलाच सफेत मुसळी असे संबोधले जाते. ही सफेत मुसळी अनेक आजारांवर रामबाण उपाय ठरली आहे. # कवळीच्या मुळ्यामध्ये सॅपोजिनाईन हा उत्तेजक घटक असतो. याचा उपयोग शक्तिवर्धक, टॉनिक म्हणून केला जातो. # कवळीच्या मुळयांचा उपयोग कावीळ, दमा, लघवीची जळजळ, अतिसार, पोटदुखी या आजारासाठी होतो. # कवळीची भाजी लहान मुलांना दुध पाजनाऱ्या मातांसाठी, दुधवाढी साठी उपयोगी आहे. # कवळीची भाजी शुक्रजंतूसाठी पोषक, मधूमेही लोकांसाठी गुणकारी आहे.
पातळ भाजी
# साहित्य – कोवळी भाजी, तूर/मूग/मसूर डाळ अर्धा ते १ वाटी, २-३ उभे पातळ चिरलेले कांदे, ३-५ बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या, १-२ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, १ चमचा हळद, १-२ चमचे लाल मिरची पावडर, कोंथिबीर, चवीपुरते मीठ, फोडणीसाठी तेल, जिरे, मोहरी.
# कृती – प्रथम कोवळी भाजीची पाने स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावीत. नंतर एका पातेल्यात पाणी उकळत ठेऊन देठे काढून टाकून मंजिऱ्या काढून घ्याव्या. एका पातेल्यात थोडेसे पाणी (पाने बुडे पर्यंत) गरम करून त्यात वरील पैकी एक डाळ व तोडून बारीक केलेली पाने एकत्रित शिजवून घ्यावे. फोडणीसाठी कढईत तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी मिसळून उभा चिरलेला कांदा मंद आचेवर शिजवून घ्यावा. नंतर त्यात लसूण आणि बारीक चिरलेल्या मिरच्या हळद व लाल मिरची पावडर मिसळून परतून घ्यावा. वरील शिजवलेले मिश्रण घालून चांगले शिजवून घ्यावे. नंतर चवी प्रमाणे मीठ मिसळावे. भाजी शिजल्यानंतर वरून कोेथिंबीर घालावी.
पानाची सुकी भाजी
# साहित्य – कोवळी भाजी, २-३ उभे पातळ चिरलेले कांदे, ३-५ बारीक चिरलेल्या लसून पाकळ्या, १-२ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, चवीपुरते मीठ, फोडणीसाठी तेल, जिरे, मोहरी
# कृती – प्रथम कोवळी भाजीची पाने स्वच्छ पाण्याने धुऊन व बारीक कापून घ्यावीत. फोडणीसाठी कढईत तेल गरम करून त्यात जिरे मोहरी टाकून उभा चिरलेला कांदा मंद आचेवर शिजवून घ्यावा. नंतर त्यात लसूण आणि बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या मिसळून परतून घ्यावा. बारीक चिरलेली कोवळी भाजीची पाने मिसळून चांगले शिजवून घ्यावे. नंतर चवीप्रमाणे मीठ घालावे.
संदर्भ : इंटरनेट
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण