भारत विकणे आहे; नव्हे विकलाय !
संपादकीय……….
भारत विकणे आहे; नव्हे विकलाय !
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज
संग्राहक : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 30/9/ 2024 : मुळात आम्हीच निगरगट्ट झालोय! सोयीच्या गोष्टी तेवढ्या आम्हाला पटकन पटतात, ज्याठिकाणी आम्हाला आमचे शिक्षण वापरणे गरजेचे असते, त्याठिकाणी आम्ही हमखास पळ काढतो, आपल्या जातीशी व समाजाशी संबंधित प्रत्येक गोष्ट आम्ही अनुकरणाने पाळतो, यामध्ये आम्ही तर्काचा वापर करत नाही, आम्ही निवडलेल्या सरकारने शेण जरी खाल्ले तरी, ते का खाल्ले, हे पटविण्यात आम्ही आपली शक्ती पणाला लावतो, आपल्या पक्षाचा झेंडा दुसर्या झेंड्यापेक्षा आम्हाला मग श्रेष्ठ वाटायला लागतो. आम्हाला धार्मिक टोळीत सक्रिय राहण्यात मजा वाटायला लागलीय, चुकीचा इतिहास जरी आमच्या ताटात कुणी वाढला तरी, त्याचे घास आपल्या मेंदूत भरण्यात आम्हाला मजा वाटायला लागलीय, आपला भारत भविष्यात महान होणार आहे! विश्वगुरू होणार आहे, असे आम्ही निवडलेले सरकार बिंबवत आहे; पण तो कसा महान करणार आहात? हे विचारण्याची तीळभरही हिंमत आमच्यात नाही._
एक वेळ मी जन्म दिलेला मुलगा बदमाश निघू शकतो; पण मी निवडलेले सरकार बदमाश निघूच शकत नाही, अशी भारतातील मतदारांची मानसिक स्थिती होती.
भारतावर अनेक आक्रमणे झाली, करोडो बलिदानातून, हजारोंच्या आंदोलनातून, शिस्तबद्ध विरोधातून आम्ही ही आक्रमणे परतून लावली. धर्मनिरपेक्षतेचा गाजावाजा करत, संविधानाच्या मार्गाने भारतात लोकशाही स्थापन झाली. दिमाखदार तोर्यात उभा झालेला देश मागील १० वर्षांत अदानी आणि काही भांडवलदारांना आंदण दिल्या गेला आणि आम्ही भारतीय बघत राहिलो, अगदी त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे इंग्रज आमच्या देशात प्रथम आले आणि आम्ही भारतीय त्यांच्याकडे कुतूहलाने बघत होतो.
स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे उलटली आणि विकासाची स्वप्ने हा देश आतुरतेने पाहू लागला होता. करोडो रोजगाराच्या गोतावळ्यात गुंतून राहणारा, पाठीवर दणके मारून शाळेत पाठविणारा, शिक्षणाने मुले घडविणारा, नोकरी लागल्यावर आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहणारा, अर्थव्यवस्थेला सातासमुद्रापार नेण्याचे स्वप्न पाहणारा, रुपयाला डॉलरच्या शर्यतेत जिंकविणार म्हणणारा..,पाच वर्षांत बँकेत पैसे डबल करणारा देश सहज आंदण देऊन टाकला आणि आम्ही भारतीय केवळ बघत राहिलो. अहो आमची बैलं रडतात, त्यांना विकल्यावर! मालकही रडतो, पैसे हातात घेतल्यावर! पण राजकारणी तोर्यात मिरवतात, देश विकल्यावर! शेतकरी शेतीत हरला, तर आत्महत्या करतो! पण राजकारणी निवडणूक हरला तर, आत्महत्या करत नाही! शेतकरी मेला तर, त्याची पोरं उघड्यावर पडतात! आणि राजकारणी मेला, तर त्याची पोरं सहानुभूतीच्या लाटेने आपोआप निवडून येतात..!
हा टोकाचा विरोधाभास. आम्ही भारतीय आता व्यसनी झालोय, अगदी दारूड्यासारखे! अचानक आपल्यासारख्या असंख्यांना धर्माचे व्यसन लावले गेले आणि आम्हालासुद्धा अचानक धर्म- धर्म खेळ आवडायला लागला, दुसर्या धर्माचा राग यायला, झेंड्याच्या रंगात आम्हाला आपलेपणा वाटायला लागला, अचानक पक्ष आवडायला लागले, कधी नव्हे तो माईकवर विश्वास बसायला लागला..,सरकारने सांगितलेल्या समस्या आपल्या वाटायला लागल्या, सरकारचे सर्वच काही पटायला लागले, सरकार जसे म्हणेल तसे करायला आम्हाला आनंद वाटायला लागला, देशातील गोदी मीडियाच्या पत्रकारांवर विश्वास बसायला लागला, विरोधक मूर्ख वाटायला लागले, पक्षाचा मानसिक गुलाम म्हणून मिरवायला आम्हाला गर्व वाटायला लागला, प्रश्न विचारणारा देशद्रोही वाटायला लागला. सनातन शिक्षणात इतकी ताकद असेल, तर मग परकीय विद्यापीठे भारतात सुरू कशाला? शिक्षण जर मूलभूत हक्क आहे तर मग शाळा बंद कशाला? नोकर्या जर विकास करतात तर मग खासगीकरण कशाला? रेल्वे जर माझ्या पैशाने बनलीय, मग डबे अदानीचे कशाला? आम्ही सत्तेत बसलो, की भ्रष्टाचार संपणार मग, नोटबंदी कशाला?”We the people” जर आपले पहिले वाक्य असेल तर, मग धर्मांधता कशाला? सत्ता जर बहुजनांची चाबी असेल तर, निवडणुकीत भांडवलशाहीचे कुलूप कशाला? विरोध जर लोकशाहीचे ब्रह्मास्त्र असेल तर, विरोधासाठी झेंडे कशाला? रोड माझ्याच पैशातून बांधलाय, मग त्यावरून जाण्यासाठी पैसे कशाला? मग आरटीओ कशाचे पैसे घेतोय? आणि गाडी विकत घेताना आपण जी एक्साईज आणि जीएसटी भरतो ती कशाला? पोट भरण्यासाठी सगळे भारतीय धडपडत आहेत, मेहनत करताहेत मग, २रु. किलो तांदूळ आणि गहू कशाला? आत्मनिर्भर भारताचे स्वप्न दाखवून शेतकर्याच्या सातबार्यावर ६ हजार रुपयांचे उपकार कशाला? भांडवलदार मित्रांचे बुडीत कर्जे गरिबांच्या अकाउंटमधून कापताय कशाला? जे कर्ज घेत नाहीत तरी मग त्यांच्या उरावर देशाचे कर्ज कशाला..? जे शेतकरी जैविक शेती करतात त्यांची रासायनिक खतांची अनुदान मग त्यांना का देत नाही? देशात कॅन्सर, मधुमेह, रक्तदाब सारखे अनेक आजार का वाढताहेत? यावर रिसर्च करणार की नाही; की केवळ त्याच प्रमाणात हॉस्पिटल आणि औषधांची दुकाने वाढवत बसणार आहे सरकार? व्यसन वाढताहेत, क्राईम वाढताहेत, ते का याचा शोध घेणार, की केवळ पोलीस भरती आणि पोलीस स्टेशन वाढवत बसणार आहे सरकार? आणि आम्ही ह्यालाच प्रगती प्रगती म्हणून गोडवे गात राहणार आहोत का? मुळात आम्हीच निगरगट्ट झालोय! सोयीच्या गोष्टी तेवढ्या आम्हाला पटकन पटतात, ज्याठिकाणी आम्हाला आमचे शिक्षण वापरणे गरजेचे असते, त्याठिकाणी आम्ही हमखास पळ काढतो, आपल्या जातीशी व समाजाशी संबंधित प्रत्येक गोष्ट आम्ही अनुकरणाने पाळतो, यामध्ये आम्ही तर्काचा वापर करत नाही, आम्ही निवडलेल्या सरकारने शेण जरी खाल्ले तरी, ते का खाल्ले, हे पटविण्यात आम्ही आपली शक्ती पणाला लावतो, आपल्या पक्षाचा झेंडा दुसर्या झेंड्यापेक्षा आम्हाला मग श्रेष्ठ वाटायला लागतो. आम्हाला धार्मिक टोळीत सक्रिय राहण्यात मजा वाटायला लागलीय, चुकीचा इतिहास जरी आमच्या ताटात कुणी वाढला तरी, त्याचे घास आपल्या मेंदूत भरण्यात आम्हाला मजा वाटायला लागलीय, आपला भारत भविष्यात महान होणार आहे! विश्वगुरू होणार आहे, असे आम्ही निवडलेले सरकार बिंबवत आहे; पण तो कसा महान करणार आहात? हे विचारण्याची तीळभरही हिंमत आमच्यात नाही. भारताच्या काल्पनिक विकासाच्या गोष्टी माईकवर ऐकून रात्री झोप यायला लागलीय, याच धार्मिक झोपेत आमचा देश भांडवलदारांना आंदण देऊन टाकलाय आणि आम्हाला त्याचे काहीच सोयरसुतक नाहीये.
एक काळ असाही होता जेव्हा विमानतळे, रेल्वे, बँका, इन्शुरन्स, बंदरे, विद्यापीठे, मोबाईल सेवा, संरक्षण क्षेत्र, खाणी, वीज आणि इतर अनेक गोष्टी आपल्याच होत्या, त्यामुळे या क्षेत्रातील नोकर्याही आमच्याच होत्या; पण आता नाहीत, पण का नाहीत? हे विचारण्याचे धाडस आता आमच्यात उरलेले नाही. कारण दुसर्याला चूक म्हणायला शिक्षणाचा वापर करावा लागतो, जे आता आम्ही विसरलोय. एरव्ही आमच्या शेजार्याने जर दोन इंच Wall Compound इकडे आणले किंवा आमच्या धुर्यावर जरा शेजारच्या शेतकर्याने काही केले, तर आपण कुर्हाड घेऊन उभे होतो.. पण सरकारने आमचे सर्वच विकले, तरी आम्ही नुसते षंढासारखे बघत बसलोय, कारण सरकार आम्ही निवडलेले आहे म्हणून? की आमची आणि सर्वांची यात फसगत आहे म्हणून? समस्या स्वतःची असली तर प्रश्न पडतो, पण जर समस्या सर्वांची असली, तर प्रश्न सोडवेल कोण? हा प्रश्न पडतो…खरं सांगायचं तर आम्ही आता नपुंसक झालोय. आमच्या मनगटात दम राहिला नाही. लढाई सोडाच! साधे विरोधात व समाजाच्या भल्यासाठी, आमच्या पुढील पिढ्यांच्या भविष्याकरिताही बोलायची आमची हिंमत नाही व वेळ तर अजिबात कुणालाच नाही.
धर्माच्या सुयांनी पार पोखरल्या गेलोय आम्ही, आम्हाला आता देवदूताचे स्वप्न पडायला लागलेय, कुणीतरी येईल व आमचे आयुष्य सफल करेल इतके आम्ही फिल्मी झालोय, म्हणून आम्ही कधी राहुल, तर कधी उद्धव, कधी मोदी तर कधी, राज आणि पवार ह्यांच्या आरत्या करतो. आमच्या महामानवांनी जी लोकशाही रूजवली, ती कशी टिकवायची? त्याचा सिलॅबस आता जातोय याची आम्हाला काळजी नाही. आम्ही आता लक्झरी लाईफ जगतोय, त्यामुळे दुसर्यांवरचा अन्याय आम्हाला काल्पनिक वाटायला लागलाय. आपले सातबारे व बँक बॅलेंस बघून देशाचा विकास होतोय व दुसर्यांना पिवळे रेशन कार्ड मिळतेय यातील विरोधाभास आम्हाला हुकूमशाही वाटत नाही, किमती वाढत आहेत; पण श्रीमंत असल्याने आपल्याला उपभोग घेता येतोय व तिकडे काहींना ताप आल्यावर बचत गटातून कर्ज काढावे लागतेय, या कृतीचा आमच्यावर आजकाल काहीच दुष्परिणाम होत नाही, गरिबी ही गरिबांच्या नशिबाने मिळाली आहे, अशा मतांचे आता आम्ही झालोय.., चारचाकी आम्ही सुसाट पळवतोय, पण काहींची पायपीट ही नशिबाने त्यांना मिळालीय अशी आमची धारणा झाली आहे.या सर्व विरोधाभासांचा आता आमच्यावर काहीच परिणाम होत नाहीये, त्यामुळे त्यांनी देश विकून टाकला तरी आम्ही विरोध करत नाही…!उद्या नद्या, जंगले, पहाड, धरणे, रस्ते, वन्यजीव, पक्षीसुद्धा विकायला काढतील. गरज पडलीच तर तुम्ही तुमच्या किडन्या, डोळे व आतड्यासुद्धा विका; पण तुम्ही तुमच्या धर्माला धोक्याच्या बाहेर काढा, इकडे आमच्या मुलांचे भविष्य पिढ्यांपासून धोक्यात राहिले तरी चालेल, पण त्या धर्माला धोक्याबाहेर काढा. कारण *धर्म धोक्यात आला आहे. तो बाहेर काढण्यासाठी २८टक्के GST भरा, ३४टक्के इन्कम टॅक्स भरा. पेट्रोल, डिझेलवर १००/१२५ टक्के VAT भरा. दोन चाकी किंवा चार चाकी कुठलेही खरेदी करा; मात्र त्यावर एक्साईझ भरा, GST भरा RTO टॅक्स भरा, फास्ट टॅगद्वारे आगाऊ पैसे भरून टोल नाक्यावर टोल टॅक्स द्या, हे भरता भरता दिवाळे निघाले, तर प्रॉपर्टी विका आणि तिची नोंदणी करतानासुद्धा कर भरा, कारण ‘मेरे भाइयों और बहनो, हमको देश को गिरवी नही रखना है, तो देश बेचनाही है.’ आभार प्रकाश पोहरे, दै. देशोन्नती, (प्रहार 22 ऑक्टोबर 2023)