गोष्ट मोक्षाची

गोष्ट मोक्षाची
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज
संग्राहक : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 30/9/ 2024 :
नको मले खीर पूरी
नको देऊ भजा वळा
गोष्ट मोक्षाचिच सांगे
दारी एकाक्ष कावळा !!
दारी एकाक्ष कावळा
कसा काव काव बोले
मानवाचे कटू सत्य
पट अंतरीचे खोले !!
पट अंतरीचे खोले
एकाक्ष बहुजनांत
तुमचाच बाप कैसा
येतो पित्तरपाठात !!
येतो पित्तरपाठात
आत्मा हा स्वर्गातूनी
आत्म्याचा प्रवास सांगा
पाहिलायकारे कुणी ?
पाहिलायकारे कुणी ?
रस्ता स्वर्ग नरकाचा
सारा कल्पना विलास
धंदा धनाचा पोटाचा !!
धंदा धनाचा पोटाचा
भट शास्त्री पंडिताचा
कधी कळेल रे तुला
खेळ डोळस श्रद्धेचा !!
खेळं डोळस श्रद्धेचा
खेळ होऊन माणूस
मायबापाच्या मुखात
घाल जित्तेपणी घासं !!
घाल जित्तेपणी घासं
नको वृद्धाश्रम गळा
नको करू रे साजरा
अंधश्रद्धेचा सोहळा !!
अंधश्रद्धेचा सोहळा
भीती धर्माची ग्रहाची
आत्म मोक्षासाठी फक्त
भीती असावी कर्माची !!
भीती असावी कर्माची
कर्म सोडीना कुणाला
सांगे मोक्षाचिच गोठ
दारी एकाक्ष कावळा !!
✍️वासुदेव महादेवराव खोपडे
सहा पोलीस उपनिरीक्षक(से.नि.)
अकोला 9923488556